जळजळीत, झणझणीत व्यंगचित्र काढण्यासाठी त्यात फार मोठ्या घडामोडी, मोडतोड, पेटवापेटवी, मारामारी, दंगल वगैरे काढण्याची गरज नसते. निव्वळ दोन माणसांच्या चेहर्यांमधूनही डोक्यात संतापाची तिडीक जाईल असे हृदय जाळत जाणारे व्यंगचित्र काढता येते, हे देशातले एक सर्वश्रेष्ठ व्यंगचित्रकार असलेल्या बाळासाहेबांच्या कुंचल्याने इथे समर्थपणे दाखवून दिलं आहे. इथे फक्त दोन चेहरे आहेत, एक कर्नाटकाचे तत्कालीन मुख्यमंत्री रामकृष्ण हेगडे यांचा, दुसरा आहे महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा… दादा हेगडेंना सांगतायत की फक्त उरणच्या शेतकरी आंदोलनात मी पाच ठार केले, तुमच्याकडे राज्यव्यापी आंदोलनात एकही ठार झाला नाही. अशाने लोकशाही धोक्यात येते… जगात कोणतीही दंगल सत्ताधार्यांच्या पाठबळाशिवाय ‘यशस्वी’ होत नाही, त्याचप्रमाणे जगात कोणत्याही आंदोलनावर लाठीमार, गोळीबार, अश्रुधुराच्या फैरी झाडण्याचे काम पोलीस सर्वोच्च पातळीवरून आदेश आल्याशिवाय करत नाहीत. सत्ताधार्यांच्या राजकीय फायद्यासाठी आखलेल्या व्यूहरचना सर्वसामान्य माणसांच्या, शेतकरी-कष्टकर्यांच्या जिवावर बेततात आणि त्यांच्यासाठी तो फक्त एक आकडा असतो… या व्यंगचित्रात दोन्ही व्यक्तिरेखांचे नुसते चेहरे पाहिले तरी सगळ्या भावना बरोब्बर पोहोचतात, ही बाळासाहेबांच्या प्रखर कुंचल्याची ताकद!… वर्तमानात कोकणातल्या अणुऊर्जा प्रकल्पांपासून मराठा आरक्षण आंदोलनापर्यंत सगळीकडे झालेल्या बलप्रयोगातून काय धडा घ्यायचा, ते उमगायला या व्यंगचित्राची मदतच होईल.