□ गद्दारांना रोखले नाही तर लोकशाहीचे नुकसान होईल – पक्ष बदलणार्या आमदारांच्या अपात्रतेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत.
■ ते काम आता देशाच्या संसदेत होणार नाही, राज्यांच्या विधिमंडळात होणार नाही आणि निवडणूक आयोगाकडूनही अपेक्षा नाही, हे शिवसेनेतल्या फुटीच्या प्रकरणातून पुरेसं स्पष्ट झालेलं आहे. सर्वोच्च न्यायालयानेही आता (तरी) कोरडी खंत व्यक्त न करता पुढाकार घेऊन गद्दारांना धडा शिकवला पाहिजे.
□ हिंदुस्थानी अर्थव्यवस्था मेलीये – ट्रम्प यांचा मोदींना धक्का.
■ हेही मोदींचेच भाऊ! अतिरेक आणि अतिशयोक्ती हा दोघांचाही स्थायी भाव. एक सांगणार आम्हीच जगात नंबर वन, तेही खोटं आणि हे बरळतात भारतीय अर्थव्यवस्था मेलीये, तेही खोटं, तिचा गळा या सरकारच्या धोरणांनी पुरता आवळलेला आहे, हे मात्र खरं.
□ ट्रम्प सत्यच बोलले; मोदींनी अदानीसाठी देश रसातळाला नेला – राहुल गांधी यांचा हल्ला.
■ मोदींची नियुक्तीच मुळात अदानीच्या हितांचं रक्षण करण्यासाठी झालेली आहे, ते त्यांचेच चौकीदार आहेत, हे राहुल पाच वर्षांपासून सांगत आहेत; पण डोक्यात धर्मविद्वेषाचं जहर भरून घेतलेल्या आम जनतेला हे कळेल तोवर फार उशीर झालेला असेल.
□ नवी दिल्लीत एकनाथ शिंदे काळोखात अमित शहांना भेटले.
■ त्यांनी काही हुडी वगैरे घातला होता की नाही? दाढी लावण्याचा तर प्रश्नच येत नाही. की शहांनी विग घातला होता. असले कोणते चोरटे उद्योग करायचे आहेत जे उजळ माथ्याने करताच येत नाहीत यांना?
□ कारवाई नाहीच, फक्त खाते बदलले… रमीपटू कोकाटे क्रीडामंत्री झाले.
■ त्यांच्यातल्या क्रीडागुणांना अजितदादांनी आणि मुख्यमंत्र्यांनी न्याय दिला, हिर्याला योग्य कोंदण लाभले… महाराष्ट्राचे, खासकरून लाडक्या बहिणींचे अभिनंदन!
□ बेस्टने निवृत्त कर्मचार्यांचे ४९३ कोटी रुपये थकवले.
■ जे कार्यरत आहेत, रोज मुंबईकरांच्या सेवेत आहेत, त्या कर्मचार्यांचीही फिकीर यांनी सोडलेली आहे, ते निवृत्तांना काय लाभ देणार?
□ लाडक्या बहिणींसाठी सामाजिक न्याय विभागाच्या ४१० कोटी रुपयांवर सरकारचा डल्ला.
■ सामाजिक न्यायाची अशीही यांच्याकडून अपेक्षा नाही. त्यामुळे, तो निधी खरोखरच निकषांची पूर्तता करणार्या लाडक्या बहिणींना मिळाला असता तरी समजण्यासारखं होतं. पण तो गेलाय भलत्याच भावांच्या खिशात.
□ महायुतीत वादाची ठिणगी – शिंदे गटाशी युती नको; भाजपमध्ये प्रवेश करताच गोरंट्याल यांची मागणी.
■ अहो, आत्ताच आला आहात पाहुणे! जरा दोन घटका विश्रांती घ्या, इथला खेळ समजून घ्या. की प्रवेशाच्या आधीच हातात स्क्रिप्ट मिळालेली आहे तुमच्या यापुढच्या हास्यस्फोटक स्किटची?
□ ठाण्यात विजेचा रोजच खेळखंडोबा; उद्योगधंदे गुजरातला न्यायचे काय? वागळे इस्टेटमधील उद्योजकांचा सरकारला सवाल.
■ कुठे न्यायचे तिथे न्या, तुमची मर्जी! पण गुजरातच्या बोगस विकासाच्या मॉडेलला भुलून तिथे जाल, तर भ्रमनिरासच पदरात पडेल, हे विसरू नका. अख्खा देश त्यानेच बरबाद केला आहे.
□ डोंबिवलीच्या पलावामध्ये अदानीच्या स्मार्ट मीटरचा झटका; दोन हजारांचे बिल २८ हजारांवर.
■ हा स्मार्ट मीटर नाही, ओव्हरस्मार्ट मीटर दिसतोय!!
□ हिंदुस्थान-पाकिस्तान युद्ध थांबवले, ट्रम्पना नोबेल द्या – व्हाईट हाऊसची मागणी.
■ यांच्याकडे मिठाचं पोतंच आणून ठेवलेलं दिसतंय… दिसली भारताची जखम की चोळ मीठ, हाच एक कार्यक्रम चालवला आहे यांनी. आणि या इसमासाठी आपल्या देशाचे १०० कोटी रुपये वाया घालवले मोदींनी. भोगा आता.
□ निवडणूक आयोगाविरुद्ध माझ्याकडे पुराव्याचा अॅटमबॉम्ब – राहुल गांधी यांचा मतचोरीवरून हल्ला.
■ निवडणूक आयोगाच्या कृष्णकृत्यांचा आता पर्दाफाश झाला नाही, तर भारतीय लोकशाहीचं थडगं बांधून हे लोक मोकळे होणार, यात काहीच शंका नाही.
□ ५० लाखांच्या खंडणीप्रकरणी शिंदे गटाच्या कमलेश राय यांना अटक.
■ फक्त ५० लाख? अरेरे, इभ्रतच घालवली. इतकी छोटी खोकी त्यांनी कधीच पाहिली नसतील.
□ माणिकरावांची संपत्ती १० वर्षांत ४८ कोटींवर; अंजली दमानिया यांनी कोकाटे, योगेश कदमांची कुंडलीच काढली.
■ न खाऊँगा, न खाने दूँगा, अशा गर्जना करणार्यांचा आशीर्वाद आहे त्यांना. किती कुंडल्या काढा, काही फरक पडत नाही.
□ मंत्र्यांची बेशिस्त वर्तणूक खपवून घेणार नाही – फडणवीस यांचे संकेत.
■ त्यांच्या खात्यात बदल करण्याची कडक कारवाई होईल… हा हा हा हा, हसा लेको!!
□ नवी मुंबईत गणेश नाईक विरुद्ध मंदा म्हात्रे वाद पुन्हा पेटणार; ताईंच्या रुग्णालयाच्या जागेवर दादांचे कांदळवन.
■ एकेका भागातले नेते असे एकमेकांमध्ये झुंजी लावून संपवायचे आणि मग तिथे आपलं एखादं बाहुलं पुढे करायचं, असं हे वजाबाकीचं राजकारण आहे.