मराठीत विडंबनकाव्याची पताका रोवणार्या ‘झेंडूची फुले’ या आचार्य प्र. के. अत्रे यांच्या कवितासंग्रहाचे हे शतक महोत्सवी वर्ष. लेखक, संपादक, कवी, नाटककार, चित्रपट दिग्दर्शक, पत्रकार, राजकारणी पुढारी अशी नानाविध क्षेत्रे दणाणून सोडणार्या आचार्य अत्रे यांच्या महाप्रचंड व्यक्तिमत्त्वामधली ही मिश्किल बाजू उलगडून दाखवणारा कार्यक्रम नुकताच पुण्यात सादर झाला. त्या कार्यक्रमाची ही संपादित संहिता. ‘झेंडूची फुले’ काय होती ते उलगडून सांगणारी.
– – –
माझी शाळा (कविता)
ही आवडते मज मनापासुनी शाळा
लाविते लळा ही जसा माउली बाळा
हासर्या फुलांचा बाग जसा आनंदी
ही तशीच शाळा मुले इथे स्वच्छंदी
हासुनी खेळुनी सांगून सुंदर गोष्टी
आम्हास आमुचे गुरुजी शिक्षण देती
– केशवकुमार (प्र. के. अत्रे)
– – –
आजीचे घड्याळ (कविता)
आजीच्या जवळी घड्याळ कसले
आहे चमत्कारिक
देई ठेवुनि ते कुठे अजुनि हे
नाही कुणा ठाऊक
त्याची टिक टिक चालते न कधिही
आहे मुके वाटते
किल्ली देई न त्यास ती कधी
तरी ते सारखे चालते ।।
अभ्यासास उठीव आज मजला
आजी पहाटे तरी
जेव्हा मी तिज सांगुनी नितजसे
रात्री बिछान्यापरी
साडेपाचही वाजताच न कुठे
तो हाक ये नेमकी
बाळा झांजर जाहले आरवला
तो कोंबडा ऊठ की!
आली ओटीवरी उन्हे बघा म्हणे
आजी दहा वाजले!
जा जा लौकर । कानि तो घणघण्ण
घंटाध्वनी आदळे ।।
आजीला बिलगून ऐकत बसू
जेव्हा भुताच्या कथा
जाई झोप उडून रात्र किती हो
ध्यानी न ये ऐकता ।
‘अर्धी रात्र कि रे’ म्हणे उलटली
गोष्टी पुरे! जा पडा ।
लागे तो धिडधांग पर्वतिपरी
वाजावया चौघडा ।।
सांग वेळ, तशाच वार-तिथीही
आजी घड्याळातुनी
थंडी पाऊस ऊनही कळतसे
सारे तिला त्यातुनी
मौजेचे असले घड्याळ दडुनी
कोठे तिने ठेविले?
गाठोडि फडताळ शोधुनि तिचे
आलो तरी ना मिळे ।।
– केशवकुमार (प्र. के. अत्रे)
– – –
खाली आणि वर (कविता)
उंच पाटी पालथी उशाखाली
हात दोन्हीही आडवे कपाळी
फरसबंदीची शेज गार-गार
शांत घोरत वर पहुडला मजूर
दिवस टळलेला बरा त्यात वाटे
उद्या स्मरता परी ऊर आत फाटे
जरी असला भोवती त्या महाल
तरी चिंतेचा आत तो हमाल
– केशवकुमार (प्र. के. अत्रे)
– – –
अशा एकापेक्षा एक सहज, सोप्या, सुंदर, विविध विषयांवरच्या कवीने एक फार मोठा दीर्घ काव्यरचनेचा उत्स्फूर्त प्रयत्न केला होता. तो प्रसंग असा –
१ ऑगस्ट १९२०. मुंबईच्या सरदारगृहामध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे निधन झाले. सारा देश शोकसागरात बुडाला. या कवीचे लोकमान्यांवर अनन्य भक्ती-प्रेम! लोकमान्यांच्या निधनाची वार्ता ऐकून या कवीला अनावर दुःख झाले. अतिशय उत्स्फूर्तपणे त्यांनी लोकमान्यांची कीर्ती सांगणारे दीर्घकाव्य लिहिले. मुंबईच्याच खेतवाडी भागातील मुद्रणालयात त्याची पुस्तिका छापली आणि त्याचे दुसर्या दिवशी वितरण केले. (मूल्य होते ४ आणे.) अशी या कवीची उत्स्फूर्त प्रतिभा आणि तत्परता. असा हा अत्यंत प्रतिभावान कवी म्हणजेच कवी केशवकुमार म्हणजेच आचार्य प्रल्हाद केशव अत्रे!
आचार्य अत्रे कोण होते? हा प्रश्न विचारण्यापेक्षा ते कोण नव्हते हाच प्रश्न अधिक सोयीस्कर आहे. उत्तम शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ, नाटककार, चित्रपट लेखक-दिग्दर्शक, निर्माते, पत्रकार, वक्ते, समाजकारणी, राजकारणी, संयुक्त महाराष्ट्राचे लढवय्ये अशी एक ना अनेक विशेषणांची बिरुदावली त्यांच्या नावामागे आहे. सर्वत्र अत्रे! सर्वज्ञ अत्रे! भारताचे पहिले राष्ट्रपती बाबू राजेंद्र प्रसाद यांनी अत्र्यांचे वर्णन केले होते, ‘अत्रे म्हणजे रायटर आणि फायटर!’
हे सर्वसंचारी अत्रे, विडंबनकार अत्रे कसे झाले आणि ‘झेंडूची फुले’ हा अजरामर असा विडंबनपर कवितासंग्रह का? कसा? आणि केव्हा? ‘झेंडूच्या फुलांचे’ हे शतकमहोत्सवी वर्ष आहे.
अत्रे यांची गणना नाकासमोर चालणारा, शिस्तीने वागणारा, अभ्यासात अत्यंत हुशार, अशी कुणीच केली नाही आणि त्यांनाही ती मान्य नव्हती. उपद्व्यापी, व्रात्य, टवाळखोर असेच त्यांचे वर्णन करावे लागेल. शालेय जीवनात त्यांनी काय काय पराक्रम केले, याचे साग्रसंगीत वर्णन त्यांनीच ‘आम्ही फार चावट होतो’ या लेखात केलेले आहे. रसिकांनी तो लेख आावर्जून वाचावा. मात्र, त्यांचे साहित्याचे प्रेम अगदी बालपणापासूनचेच होते. कवितेची गोडी आणि कविता करण्याची आवड ही प्रथमपासूनच. सासवडला असताना एका स्वयंपाकीण बाईंचे विनोदी वर्णन त्यांनी कसे केले आहे, ते बघा-
सीताबाई! काय वर्णू तव गुण ।
डोळा चकणा, दात वाकडे
बधिर तव कर्ण
एकादशीला खाशी खुशाल कांदा लसूण
सीताबाई काय वर्णू तव गुण ।।
याचाच अर्थ, विडंबनकाव्याचा गुण बाळ प्रल्हादात उपजतच असावा! अगदी बालपणापासूनच असावा. त्याचेच रूपांतर पुढे ‘झेंडूची फुले’मध्ये झाले.
बालकवी, गोविंदाग्रज-राम गणेश गडकरी-तांबे, केशवसुत अशा त्या काळाच्या अनेक कवींच्या उत्तम संस्कारांचा पगडा त्यांच्यावर होता. ‘विडंबनकार अत्रे’ होण्यापूर्वी ‘केशवकुमार’ या नावाने त्यांच्या अनेक कविता त्या काळच्या मासिकांमधून, वृत्तपत्रांतून प्रसिद्धही झाल्या होत्या आणि त्यांना उत्तम प्रतिसादही मिळत होता. ‘केशवकुमार’ या नावाला महत्त्व प्राप्त होत होतं. अत्रे म्हणतात, ‘ज्या काळात मी कविता लिहू लागलो, तो नवकवितेचा वैभवाचा काळ होता. केशवसुतांच्या तुतारीच्या ललकार्या त्यावेळी वातावरणात एकसारख्या उचंबळत होत्या. बालकवींच्या प्रतिभेचा अरुण महाराष्ट्राच्या क्षितिजावर नुकताच उगवलेला होता. पंचप्राणांचा पंचम लावून गोविंदाग्रज कोकिळाच्या उन्मादाने प्रेमाची रागदारी आळवीत होते. कवीच्या चौघड्याने नि तांबे कवीच्या सनईने शारदेच्या मंदिरात माधुर्याबरोबर एक प्रकारचे मांगल्यही निर्माण झाले होते. नवकवितेची एक विलक्षण धुंदी त्यावेळी आमच्या डोळ्यांवर चढली होती. डोक्यामध्ये एक प्रकारची मस्ती भरून राहिली होती. (मी विडंबनकार कसा झालो?, पान क्र. १५०)
या धुंदीमधून आम्हाला वीस-एकवीस साली पुण्याच्या रविकिरण मंडळाने जागे केले. नुसते जागे केले नाही, तर गार पाण्याची बादली घेऊन ती आमच्या डोक्यावर अक्षरशः भडाभडा ओतली. त्याचा परिणाम माझ्या स्वतःवर असा झाला की भावकाव्यांचे गंभीर अवगुंठन झुगारून देऊन माझ्यामधला व्रात्य विडंबनकार डरकाळी फोडून एकदम बाहेर पडला. माझ्या प्रतिभेला आलेली ‘दुपारीची फुले’ एकदम गळून पडली आणि तिच्यावर सरासरा ‘झेंडूची फुले’ फुलून आली. रविकिरण मंडळ जर प्रगट झाले नसते तर माझ्या बुद्धीच्या खोल खोल कपारीमधून विनोदाचा चांगला मनगटासारखा झरा वाहतो आहे, याचा मला मुळीच सुगावा लागला नसता. हो, अगदी खरे आहे. रविकिरण मंडळाने मला विडंबनकार बनविले, ही माझ्या दृष्टीने विशेष महत्त्वाची गोष्ट आहे. (पान क्र. १५०-१५१)
१९१८-१९ साली बालकवी आणि गडकरी वारले. त्यामुळे मराठी कविता एकदम मंदावल्यासारखी झाली. अशा वेळी पुण्यातील सात-आठ कवी एकमेकांचा आधार घेत, हात धरून, भीतभीतच एका ठिकाणी जमले. दर रविवारी ते एकत्र जमत आणि आपण लिहिलेल्या कविता ते एकमेकांना वाचून दाखवत. त्यावर चर्चा करीत. चहा पिता पिता त्यांचा हा कार्यक्रम चाले. या मंडळाचे नाव रविकिरण मंडळ! या रविकिरण मंडळात त्यावेळी तरी एकच व्यक्ती रवि होती. बाकीची अजून किरणेच होती. ती व्यक्ती म्हणजे माधव त्रिंबक पटवर्धन उर्फ कवी माधव ज्युलियन! या रविकिरण मंडळाचे ते प्रमुख सभासद होते. यशवंत (यशवंत दिनकर पेंढरकर), गिरीश (शं. के. कानेटकर), मनोरमा रानडे, श्री. बा. रानडे असे इतर सदस्य. माधवरावांना त्यावेळी फर्ग्युसन कॉलेजमध्ये फार्शी भाषेचे प्राध्यापक म्हणून नुकतेच नेमण्यात आले होते. त्यांच्या विचारांत आणि भाषेत अनेक चमत्कारिक खोडी भरलेल्या होत्या. त्याचा परिणाम रविकिरण मंडळाच्या सभासदांवर इतका झाला की त्यांपैकी पुष्कळसे माधव ज्युलियनच्या दृष्टीने काव्याकडे पाहू लागले आणि जवळजवळ, त्यांच्याच वृत्तांत आणि भाषेत काव्ये लिहू लागले.
तो बावीस सालचा मे महिना होता. शाळेला सुट्टी होती. आम्ही चार-पाच शिक्षक एके ठिकाणी जमत असू. आमचं हे टोळकं ‘पठाण क्लब’ या नावानं प्रसिद्ध होतं. रविकिरण मंडळाच्या कवितांचा एक चिमुकला संग्रह त्याच सुमारास प्रसिद्ध झाला होता. त्याची एक प्रत कोणीतरी आमच्या मंडळात आणली. पुढे सात-आठ दिवस त्या संग्रहाखेरीज आमच्या तोंडात दुसरी भाषा नव्हती. त्यामधल्या कोणत्याही कवितेची अंगावरची साल आम्ही काही शिल्लक ठेवली नाही. आमची पद्धत अशी असे, कोणीतरी एखादी कविता घ्यायची आणि तिच्यातील दोष उघडकीस येतील अशा अतिशयोक्त स्वराने आणि अंगविक्षेपाने ती मोठ्याने वाचून दाखवायची. रविकिरण मंडळाच्या तर्हेवाईक काव्याचे वाचन करता करता एके दिवशी मला स्फूर्तीचा असा काही जबरदस्त झटकाच आला आणि मी विडंबनकाव्याच्या ओळीच्या ओळी एकामागून एक बडबडू लागलो आणि त्यामुळे आमच्या मंडळात हास्याचा महापूर आला आणि त्यावेळी मला जाणीव झाली, की काहीतरी निराळी ‘वल्ली’ आपल्याला लाभली आहे. त्या मानसिक अवस्थेतून ‘झेंडूची फुले’चा जन्म झाला. (पान क्र. १५४)
लहानपणी आमच्या वर्गात एक मुलगा होता. तो एके दिवशी आपल्या भुवया भादरून आला. त्याबरोबर मुलांमध्ये मोठा हशा पिकला. शिक्षकांनी विचारले, ‘काय रे, हे काय भलतेच करून आलास?’ तो मुलगा म्हणाला, ‘मग! भुवया राखल्याच पाहिजेत असे कोणी सांगितले आहे? सगळे ज्या अर्थी त्या राखतात, त्या अर्थी मी त्या काढून टाकण्याचे ठरविले आहे.’ माधव ज्युलियनांचे बंड जवळजवळ अशाच प्रकारचे होते. त्यात विक्षिप्तपणाचा भाग विशेष होता. त्यांची ‘वन्दे त्वमेकम् अल्लाहु अकबर’ ह्या डोक्यावर पगडी आणि कमरेला लुंगी नेसलेल्या त्यांच्या त्यावेळच्या काव्याचा एकच विक्षिप्त नमुना माझ्या म्हणण्याची सत्यता पटवून द्यावयास पुरेसा आहे. (पान क्र. १५२-१५३) माधव ज्युलियन यांच्या कवितेचे प्रारंभीचे स्वरूप इतके बेंगळूर आणि धेडगुजरी होते, की ते बघून आमच्यासारख्या शब्दसंगीताच्या आणि ध्वनिसौंदर्याच्या उपासकांना विलक्षण हादरा बसला. माधव ज्युलिअन यांची वृत्ती आणि प्रतिभा बंडखोरीची होती, यात मुळीच संशय नाही, पण –
नव्या मनूतील, नव्या दमाचा
शूर शिपाई आहे
कोण मला वठणीवर आणू
शकतो ते मी पाहे
असे म्हणणार्या केशवसुतांच्या वैचारिक बंडासारखे बंड नव्हते.
त्यामुळेच अत्र्यांनी त्यांच्या शैलीचे झकास विडंबन श्यामले या कवितेत केले आहे. श्यामले –
(वृत्त : तुङ्भद्रा, मिथुनराशी, राक्षसगणी)
तू छोकरी, नहि सुन्दरी ।
मिस्कील बाल चिचुन्दी,
काळ कडा मी फत्तरी ।
तू काश्मिरातिल गुल्-दरी!
पाताळिचा सैतान मी ।
अल्लाघरीची तू परी,
तू मद्रदेशि श्यामला ।
मी तो फकीर कलन्दरी!
मैदान मी थरपार्करी ।
तू भूमि पिकाळ गुर्जरी,
अरबी समुद्रहि मी जरी ।
तू कुद्रती रसनिर्झरी!
आषाढिचा अन्धार मी ।
तू फाल्गुनी मधुशर्वरी!
खग्रास चंद्र मलीन मी ।
तू कोर ताशिव सिल्व्हरी!
बेसूर राठ सुनीत मी ।
कविता चतुर्दश तू खरी!
हैदोस कर्कश मी जरी ।
‘अल्लाहु अक्बर’, तू तरी!
माजूम मी, तू याकुती ।
मी हिंग काबुलि; तू मिरी
अन् भांग तू, चण्डोल मी, ।
गोडेल मी, तू मोहरी!
मी तो पिठ्यातील बेवडा ।
व्हिस्कीतली तू माधुरी,
काडेचिराइत मी कडू ।
तू बालिका खडिसाखरी
पॅटीस तू, कटलेट मी, ।
ऑम्लेट मी, तू सागुती,
कांदे-बटाटे-भात मी ।
मुर्गी बिर्यानी तू परी!
चल श्यामले, म्हणूनी घरी ।
बसु खेटुनी जवळी तरी!
घे माडगे, घे गाडगे ।
घे गुलचमन् घे वाडगे,
ताम्बूल घे, आम्बील घे, ।
घे भाकरी, घे खापरी!
किति थाम्बु मी? म्हण ‘होय’ ना ।
खचली उमेद बरे उरी,
झिडकारुनी मजला परी ।
मत्प्रीतिचा न ‘खिमा’ करी!
(क्रमश:)