दोन जिवांचा विवाह हा एकमेकांशी एकनिष्ठ प्रामाणिक राहण्याचा वायदा असतो. हिंदुस्थानी जीवनशैलीत त्याला महत्वाचे स्थान आहे हे खरे, पण तरीही घटस्फोट का होतो? कसा होतो? सुखी संसारात अचानक घटस्फोट कदापि होत नाही आणि हा निर्णयही दोन्ही बाजूंनी तेवढा सहज सोपाही नाही. त्यासाठी काही ठोस कारणे असतात. परपुरुषाचे किंवा परस्त्रीचे आकर्षण वाटले तर दुरावा होतो. अनैतिक संबंधातूनही दोघेजण दूर जातात. मूल होणारच नसेल तर त्यातूनही घटस्फोट होतो. पूर्वी हुंडा आणि आता काही प्रॉपर्टी, पैसे यात अपेक्षाभंग झाला तरी नाती तुटतात. सासू-सुनेचा संघर्षही त्याला कारणीभूत ठरतो. पण एका अजब कारणामुळे घटस्फोट होऊ शकतो. जो बदलत्या लाइफस्टाइलमध्ये काही प्रमाणात सुसंगतही वाटू शकेल. तो म्हणजे बायको अंगकाठीने ‘जाडी’ आहे म्हणून घटस्फोट!!! आता बोला.
या नाटकाचे नावच आहे ‘वजनदार!’ त्याभोवती सारा कथानकाचा डोलारा उभा केलाय… पडदा उघडतो आणि पाठमोरी लठ्ठ बाई उड्या मारून वजन कमी करण्याचे प्रात्यक्षिक करतेय. एक केअरटेकर तिला मदत करतेय. या बाई म्हणजे या घरातल्या मालकीणबाई मीना! आणि मदतनीस मुलीचं नाव सुरू. हे एक पॉश घरकुल. त्यात जागोजागी वजन कमी करण्याची यंत्रसामुग्री. ‘८० किलो’ची ठळक अक्षरातली कॅलेंडर! ‘वजनदार’ या ‘टायटल’ला अनुरूप सारी यंत्रसामुग्री.
या दोघींमध्ये ‘मालकीण-नोकर’ या नात्यापेक्षा या घराशी सुरुचं भावनिक नातं पक्कं जुळलेलं आहे. मीनाचा घटस्फोट झालेला आहे. वजन प्रमाणाबाहेर वाढल्यामुळे तिचा नवरा ‘तिला’ जाडी हे विशेषण लावायचा. तिला कुठेही घेऊन जाण्यास त्याची कायम नकारघंटा होती. वादविवादानंतर अखेर प्रकरण घटस्फोटापर्यंत आलं. आणि दोघेही वेगळे झालेत. ही या कुटुंबाची पार्श्वभूमी. मीनाचा विवाहित तरुण मुलगा, पत्नी प्राजक्तासोबत अमेरिकेला आहे. तो आईच्या कायम संपर्कात. घटस्फोट दिल्याने जन्मदात्या बापावर मनात राग. मुलगा-सून हे दोघे अमेरिकेत, मीना तशी एकाकी.
मीनाचा जुना मित्र डॉ. आजगांवकर या घराचा फॅमिली फ्रेंड. त्याच्या सल्ल्यानुसार आता मीनाचं वजन कमी करण्याचा प्रयत्न कम् प्रयोग सुरू आहेत. ‘वेट लॉस्ट रनिंग मशिन’ही तो आणतो. रोज तपासणीसाठी या घरात येतो. बिझी असूनही तो मीनासाठी वेळ राखून ठेवतो. तिच्या आरोग्याची पुरेपूर काळजी घेतोय. मीनाचे खाणं-पिणं, व्यायाम सारं काही नियमितपणे सुरू आहे, पण काही केल्या अपेक्षेप्रमाणे वजन कमी होत नाही. याची कायम तिला चिंता सतावतेय.
एके दिवशी अचानक कुठलीही पूर्वसूचना न देता मुलगा रोहन पत्नीसह अमेरिकेतून येतो. आईच्या वाढदिवसाचा योग त्याला साधायचा आहे. या दोघांच्या अचानक येण्यानं इथे मीना आणि सुरू गोंधळून जातात. दोघींची एकच तारांबळ उडते. वजन कमी करण्याच्या यंत्रसामुग्रीचा लपवाछपवीचा प्रयत्न होतो. ‘घटस्फोटाला कारणीभूत ठरलेलं वजन कमी करण्याचा प्रयत्न जराही करू नये. बापाला घाबरण्याची आता गरज नाही!’ असं रोहनचं ठाम मत आहे. त्यासाठी तो आग्रही आणि आक्रमकही आहे. आणि इथे घरात तर वजन कमी करण्याचा प्रयत्न होतोय. ही लपवाछपवी एके दिवशी अखेर उघड होते.
रोहन आईला कुणातरी अज्ञात व्यक्तीसोबत कॅफेत बघतो. सूनबाईची तब्येत बिघडते. तिला उलट्या होतात. आईला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्याचा फोन, या घटनांनंतर नाट्याला कलाटणी मिळते. धक्कातंत्राने थक्क होणं भाग पडतं. शेवट त्यागमूर्ती आईचा निर्णय चक्रावून सोडणारा आणि लक्षवेधी ठरतो. अर्थात शेवट प्रत्यक्ष रंगमंचावर बघणं उत्तम… नाहीतर उत्कंठा संपेल.
लेखन, निवेदन आणि अभिनय याचा अनुभव गाठीशी असलेल्या अभिनेत्री संपदा जोगळेकर-कुळकर्णी यांची ही संहिता. त्यांनी या गमतीशीर कौटुंबिक नाट्यात चांगले रंग भरलेत. प्रसंगांची मांडणी नेटकी असून शेवट कळसापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न नोंद घेण्याजोगा आहे. पण आईने वजन कमी करायला मुलाने केलेला विरोध मनाला पटत नाही. त्यासाठी आईने केलेली पळापळ, लपवाछपवीही योग्य वाटत नाही. अर्थात ‘कथानकाची गरज!’ असो.
राज्य नाट्यस्पर्धेच्या मांडवाखालून आजवर अनेक नाटके व्यावसायिक रंगभूमीला मिळाली आहेत. ‘वेट लॉस्ट’ या नावाने या स्पर्धेत, ठाणे केंद्रात या नाटकाचाही प्रयोग झाला होता. स्पर्धेतलं विजेतेपद नाटकाने पटकविले होते. आता व्यावसायिकतेची जोड मिळाल्याने कथानक अधिक ‘वजनदार’ झालंय.
ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल म्हणजे महिलाप्रधान सिनेमांच्या सम्राज्ञी. ‘माहेरच्या साडी’तली लक्ष्मी, किंवा ‘लेक चालली सासरला’ यातली मुक्ता, ‘चार दिवस सासूचे’ यातली शालू, ‘माहेरचा आहेर’मधली उमा, हे चित्रपट आणि त्यातली स्त्रीप्रधान किंवा ‘सून’प्रधान भूमिका विसरता येणं शक्य नाही. कुटुंबप्रधान मराठी चित्रपटांत या सूनबाई महाविक्रमी ठरल्यात. मराठीतील सर्वाधिक कमाई करणार्या, १९९१च्या सुमारास आलेल्या ‘माहेरची साडी’ने महिलांना अक्षरशः ओक्साबोक्षी रडविले, तर निर्मात्याला दोन वर्षे बुकिंगच्या आकड्यांनी सुखाविले. तो गाजवणार्या अलका कुबल चक्क २८ वर्षानंतर पुन्हा एकदा रंगमंचावर ‘वजनदार’ रुपात प्रगटल्या आहेत. पण सूनबाई म्हणून नव्हे, तर ‘हेवीवेट’ घटस्फोटित मॉर्डन मम्मी म्हणून. आणि हेच या नाटकाचं प्रमुख आकर्षण आहे. त्यांची भूमिकेतली सहजता नजरेत भरते. तणावपूर्ण प्रसंगांना त्यांनी पुरेपूर न्याय दिलाय. ‘मॉर्डन मम्मी’च्या रूपात त्या शोभून दिसतात. त्यांच्या निवडीमुळे नाट्य एका उंचीवर पोहचते. महिला प्रेक्षकांची प्रयोगानंतर ‘सेल्फी’साठी उसळणारी गर्दी खूप काही सांगून जाते. ‘माहेरच्या साडी’चे ग्लॅमर अजून कायम असल्याचे दिसते.
मालिकांमधून घराघरात पोहोचलेला अभिषेक देशमुख आणि दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्या ग्रुपमधले रंगकर्मी अभय जोशी हे दोघे या ‘टीम’मधले रसिकांना परिचित अभिनेते. आईवरले प्रेम, बापाबद्दल तिरस्कार अभिषेकने ‘रोहन’च्या भूमिकेत शिरून नेमकेपणाने दाखविला आहे. एका घटस्फोटित आईचा मुलगा म्हणून असणारा तणाव काहीदा स्पष्ट दिसतो. भूमिकेची पक्की समज ‘रोहन’मध्ये दिसते. डॉ. आजगावकरच्या भूमिकेत अभय जोशी यांचाही वावर सहजसुंदर आहे. त्यांनी संयमाने प्रसंग केलेत. मीनासोबतचे संवाद बोलके झालेत. ‘डॉक्टर’ म्हणून ते फिट्ट. केअरटेकर सुरू बनलेली पूनम सरोदे यांचं हे पहिलंच व्यावसायिक नाटक आणि त्यातही अलका कुबलसारख्या ज्येष्ठ अभिनेत्रीसोबत वावर. असे असले तरी दोघींचे ट्युनिंग चांगले जुळले आहे. मॉर्डन सूनबाई प्राजक्ता ही साक्षी पाटील यांनी चांगली पेश केलीय. ती परदेशातून आलीय हे रंगभूषा, वेशभूषा यातून दिसते.
यात एकूण पाच पात्रे. याचा उल्लेख नाटककार संपदा कुळकर्णी यांनी वैशिष्ट्यपूर्ण व परिपूर्ण ‘पंचतत्वे’ असा केलाय. व्यक्तिरेखांची वैशिष्ट्ये लक्षात घेता, हे विशेषण पुरेपूर पटते. कलाकारांचे टीमवर्क उत्तम. अभिनयाचे वजनदार दर्शन त्यातून होते.
दिग्दर्शक संतोष वेरुळकर यांची या नाटकाशी स्पर्धेपासूनची साथसोबत आहे. नाटकाने हौशी रंगभूमीवर विजेतेपद पटकावले, आता व्यावसायिकवरही नाटकाने पूर्ण तयारीत पदार्पण केलंय. पहिला अंक दुसर्याच्या तुलनेत संथगतीने आहे. व्यायामाच्या तालमींना जरा कात्री लावणे आवश्यक आहे. प्रसंग चांगले बांधले आहेत. कुठेही भडकपणा नाही. काही विनोदाच्या जागाही हशे वसूल करतात. गंभीर विषयाला हलकीफुलकी हाताळणी सुयोग्य ठरते. दिग्दर्शकांनी तांत्रिक बाजू चांगल्या जमविल्या आहेत. भव्यता भासविणारा फ्लॅट, त्यात वजन कमी करण्याची यंत्रसामुग्री, भिंतींना पूरक रंगसंगती आहे. सचिन गावकर यांनी नेपथ्यरचना उत्तम केलीय. अमोघ फडके याची प्रकाशयोजनाही प्रसंगांना ‘प्रकाशात’ आणणारी. गाण्यांचा वापर दुसर्या अंकात अर्थपूर्ण केलाय.
व्यावसायिक नाटकांच्या दुनियेतले जाणकार आणि ‘अष्टविनायक’चे ज्येष्ठ निर्माते दिलीप जाधव यांची या निर्मितीत संध्या रोठे, प्रांजली रोठे-मते यांच्यासोबत ‘युती’ आहे. त्यांच्या चाणाक्ष नजरेतून त्यांनी हे नाटक पुरते हेरले. विविध कथानकांची शैलीदार नाटके ‘अष्टविनायक’ने आजवर सुपरहिट केली आहेत; त्यामुळे हे नाटक कितीही ‘वजन’ पडले तरी ते समर्थपणे पेलवून वेगात नेतील यात शंकाच नाही. या निर्मितीमुळे २८ वर्षानंतर अलका कुबल रंगभूमीवर दिसत आहेत, हा रंगेतिहास ठरतोय, हेही नसे थोडके! निर्मितीमूल्ये श्रीमंती थाटाची आहेत. जराही कुठेही तडजोड केलेली नाही.
एक योगायोग असा की रंगभूमी-चित्रपट गाजविणार्या तिघा बुजुर्ग अभिनेत्रींची नाटके आज रंगभूमीवर गाजत आहेत. त्यात नीना कुलकर्णी यांचे ‘असेन मी, नसेन मी’, वंदना गुप्ते यांचे ‘कुटुंब किर्रतन’ आणि अलका कुबल यांचे ‘वजनदार’. तिघींचा हक्काचा रसिकवर्ग तसेच कुटुंबप्रधान नाटकांचे आकर्षण, यामुळे बुकिंगची नवी समीकरणे साकार होताना दिसत आहेत.
या नाटकात अलकाताईंना वजन कमी करण्यासाठी देण्यात आलेली सारी यंत्रसामुग्री ही अस्सल आहे. त्यांचा त्यावरला वारंवार होणारा अभिनय केवळ अभिनयापुरता शिल्लक उरत नाही, तर पूर्ण एनर्जीसह शरीराला आपोआप व्यायाम होतोय. त्यामुळे नाटकाचे प्रयोग असतील तेव्हा घरी व्यायाम करण्याची त्यांना आता गरजच उरणार नाही (एखाद्या व्यायामशाळा उर्फ ‘जिम’चं प्रायोजिकत्व याला निश्चित मिळू शकेल.)
चित्रपटांची नावे नाटकांना आणि नाटकांची नावे चित्रपटांना दिल्यास त्याचा सकारात्मक परिणाम होतो काय? हा एक अभ्यासाचा विषय ठरावा. आता या नाटकाचे पहिले मूळ नाव ‘वेट लॉस्ट!’ आणि आता ‘वजनदार’ हे आहे. ‘वजनदार’ या नावाचा एक मराठी चित्रपट २०१६-१७च्या सुमारास चित्रपटगृहात झळकला होता. तो बर्यापैकी चालला. त्यात सई ताम्हणकर, प्रिया बापट, सिद्धार्थ चांदेकर यांच्या भूमिका होत्या. सचिन कुंडलकरचे दिग्दर्शन होते. वजन वाढल्यामुळे आलेला शारीरिक व मानसिक ताणतणाव, वजन आणि तरुणींनी घेतलेली एक जोखीम त्यात होती. शेवटी विषय हा वाढलेल्या वजनाचाच! असो.
‘वजनदार’ मीनाची रंगमंचावरली गोष्ट ही आगळी-वेगळी, आजच्या काळातली. पराकोटीची सहनशक्ती असणारी सोशिक, त्यागी. एक हृदयस्पर्शी व्यक्तिरेखा बनली आहे, जी सुन्न करून सोडते. वजनदार अभिनेत्रीने यातील नाट्य सर्वार्थाने वजनदार केलंय.
वजनदार
लेखन : संपदा जोगळेकर-कुलकर्णी
दिग्दर्शन : संतोष वेरुळकर
नेपथ्य : सचिन गावकर
संगीत : मंदार देशपांडे
प्रकाश : अमोध फडके
रंगभूषा : कमलेश बीचे
वेशभूषा : हर्षदा बोरकर
निर्माते : दिलीप जाधव / संध्या रोठे / प्रांजली रोठे-मते
निर्मिती संस्था : अष्टविनायक / विप्रा क्रिएशन
सूत्रधार : प्रणित बोडके