• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

संक्रमणानंतरचे ‘शुभ’वर्तमान!

- प्रशांत केणी (खेळियाड)

Nitin Phanse by Nitin Phanse
August 7, 2025
in खेळियाड
0

शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडविरुद्धची मालिका अतिशय थरारक पद्धतीने २-२ अशी बरोबरीत सोडवली. वेगवान गोलंदाजांना अनुकूल मैदानावरील ही कामगिरी तशी प्रेरणादायीच. ट्वेंटी-२० क्रिकेटच्या भाऊगर्दीत कसोटी क्रिकेट अद्याप टिकून आहे, याची ग्वाही देणारी ही मालिका भारतीय क्रिकेटरसिकांसाठी पर्वणीच ठरली.
– – –

कसोटी क्रिकेट संपत चालले आहे, ही बोंब तशी कायमचीच. विराट कोहली, रोहित शर्मा या तारांकित फलंदाजांच्या निवृत्तीनंतर तर क्रिकेट अभ्यासकांनी ही बोंब आणखी मोठ्याने ठोकली. रविचंद्रन अश्विन, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे ही मंडळी भारतीय कसोटी संघापासून दूर ठेवण्यात आली. पण पंचविशीचा संघनायक शुभमन गिल याने नव्या चमूसह इंग्लिश दौर्‍यावर चमत्कार घडवला. खूप कमी वयात मिळालेल्या नेतृत्वाचे ओझे शुभमन गिलवर मुळीच जाणवले नाही. काही सामन्यांत इंग्लिश खेळाडूंना डिवचण्याची ‘विराटनीती’ही त्याने उत्तम वापरली. ही नीती मग भारतीय खेळाडूंकडून पदोपदी दिसल्यामुळे इंग्लंडचे खेळाडू हैराण झाले. भारतीय संघाने इंग्लंडच्या बॅझबॉलच्या बागुलबुवाची तमा मुळीच बाळगली नाही. यातून गिलचा कणखरपणा दिसून आला. त्यामुळे हे संक्रमणानंतरचे ‘शुभ’वर्तमान आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
पाच कसोटी सामन्यांच्या अँडरसन-तेंडुलकर मालिकेतील पाचही सामन्यांची रंगत अखेरच्या दिवसापर्यंत टिकून होती. खच्चून भरलेल्या स्टेडियममध्ये होणारा प्रत्येक सामना कसोटी क्रिकेट संपले नाही, याची ग्वाही देत होता. हेच या मालिकेचे सर्वात मोठे यश म्हणता येईल. भारताने इंग्लंड दौर्‍यावर १९७१, १९८६ आणि २००७ असे तीनदा मालिका विजय मिळवले होते. तर २००२ आणि २०२१-२२ अशी दोनदा मालिकेत बरोबरी साधली होती. यात या मालिकेच्या २-२ बरोबरीनंतर आणखी एक भर पडली. सलग दुसर्‍या इंग्लंड दौर्‍यात इंग्लंडला मालिकाविजयापासून वंचित राखण्याची किमया भारताने साधली.

रोहित-विराट नव्हे, राहुल-गिल!

इंग्लंड दौर्‍यावर जाण्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत मालिकेत सर्वाधिक धावा काढण्याचे ध्येय गिलने व्यक्त केले होते. यात एका द्विशतकासह चार शतके साकारणार्‍या गिलच्या खात्यावर सर्वाधिक एकूण ७५४ धावा जमा होत्या. कसोटीत सचिन तेंडुलकर चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करायचा. सचिनच्या निवृत्तीनंतर विराट कोहली चौथ्या क्रमांकावर उतरायचा. विराट युग संपल्यावर गिलने याच स्थानावर शिक्का उमटवला. सातत्य आणि मोठी खेळी उभारून फलंदाजीला स्थैर्य देणे हे त्याचे गुण संघासाठी प्रेरक ठरले.
त्याने केलेले गोलंदाजीतले बदल काही वेळा टीकेचे धनी ठरले. फिरकी गोलंदाजांकडे चेंडू देण्यात त्याने बर्‍याचदा उशीर केल्याचे पाहायला मिळाले. या सगळ्या अनुभवातून तो आणखी काही शिकेल, अशी आशा मात्र नक्की करता येईल.
ज्या पद्धतीने विराटची जागा गिलने घेतली, त्याच पद्धतीने रोहितच्या रिक्त झालेल्या सलामीच्या स्थानावर केएल राहुलने छाप पाडली. पाच कसोटीत दोन शतके आणि दोन अर्धशतकांसह ५३२ धावा ही राहुलची धावांची पुंजी. भारताच्या नव्या ट्वेंटी-२० संघापासून दूर असलेला राहुल एकदिवसीय आणि कसोटी संघात मात्र हमखास स्थान मिळवतो. कसोटी संघात त्याचा क्रमांक अनिश्चित होता. खेळाच्या ताणामुळे विराट किंवा रोहितने विश्रांती घेतल्यावर तो ठरायचा. पण या मालिकेने परदेशी मैदानांवरही समर्थपणे उभा राहणारा सलामीवीर ही ओळख राहुलला दिली.
यष्टिरक्षण करताना इंग्लंडच्या फलंदाजांना नाउमेद करण्यासाठी सदैव ‘बोलंदाजी’ करणार्‍या उपकर्णधार ऋषभ पंतने आक्रमक फलंदाजीने मधल्या फळीचा भार इमानेइतबारे वाहिला. या मालिकेत त्याने दोन शतके आणि तीन अर्धशतके नोंदवली. पहिल्याच कसोटीत शतक झळकावल्यानंतर कोलांटउडी घेत मने जिंकणार्‍या पंतने दुसर्‍या डावातही शतक साकारले. पण पुढे त्याला दुखापतीचे ग्रहण लागले. परिणामी ध्रुव जुरेलनेच यष्टीची जबाबदारी सांभाळली. लॉर्ड्स कसोटीत पंत अनवधानाने धावचीत झाला नसता तर सामन्याचे चित्र वेगळे असले असते. पण पाय फ्रॅक्चर असतानाही त्याने निर्धाराने मैदानावर उतरून केलेल्या झुंजार अर्धशतकामुळे त्याने पुन्हा क्रिकेटजगताची वाहवा मिळवली.
सलामीवीर यशस्वी जैस्वालने पहिल्या आणि शेवटच्या सामन्यात शतके झळकावली. या व्यतिरिक्त दोन अर्धशतके काढणार्‍या यशस्वीच्या फलंदाजीत सातत्याचा अभाव जाणवला. पण मोठी निराशा केली ती करुण नायरने. देशांतर्गत क्रिकेटमध्ये वर्षानुवर्षे धावा काढणार्‍या करुणला तब्बल नऊ वर्षांनंतर भारतीय क्रिकेट संघात पुनरागमन करता आले. पण चार सामन्यांत एकमेव अर्धशतक आणि २५ धावांची सरासरी त्याला पुन्हा संधी मिळेल, याची अजिबात शास्वती देत नाही. हीच गत संधीचे सोने करण्यात अपयशी ठरलेल्या साई सुदर्शनची. दोघांना अपेक्षेपेक्षा अधिक संधी मिळाली. त्यापेक्षा एखाद्या सामन्यात तरी अभिमन्यू ईश्वरनला आजमावता आले असते.

सिराजचा धाक; बाकीच्यांची दमछाक!

इंग्लंड दौर्‍यावर वेगवान गोलंदाजी हेच बलस्थान ठरणार, हे अपेक्षेप्रमाणे सिद्धही झाले. या मार्‍याची धुरा जसप्रीत बुमराच्या (३ सामन्यांत १४ बळी) खांद्यावर होती. पण दौर्‍याआधीच तीन सामने खेळू शकेन, ही अट घालणारा बुमरा शब्दाला जागला. चौथ्या कसोटीत तो नाईलाजाने गोलंदाजी करतो आहे, असेच जाणवत होते. येत्या काही दिवसांत त्याने विराट-रोहितचा कित्ता गिरवत कसोटी क्रिकेटला अलविदा केला, तरी आश्चर्य वाटू नये. पाच दिवसांचे पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणे एकंदरीतच भारताच्या वेगवान मार्‍यासाठी दमछाक करणारे ठरले. त्यामुळे दुखापतींनी त्यांचा वारंवार पिच्छा पुरवला. बुमरा, आकाशदीप, नितीशकुमार रेड्डी आणि पदार्पणापासून वंचित राहिलेला डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग यांना दुखापतीची चिंता भेडसावली. यापैकी अष्टपैलू-गोलंदाज नितीशकुमार आणि शार्दुल ठाकूर पूर्णत: अपयशी ठरले. प्रसिध कृष्णाने तीन सामन्यांत १४ बळी मिळवले. अखेरच्या सामन्यात टिच्चून गोलंदाजी करणार्‍या कृष्णाचा आवेश पाहण्याजोगा होता.
या सर्वांच्या तुलनेत लक्ष वेधले, ते मोहम्मद सिराजने. उत्तम तंदुरुस्तीच्या बळावर पाचही सामने खेळलेला तो एकमेव भारतीय वेगवान गोलंदाज. वर्कलोड म्हणजेच खेळाचा ताण त्याने कधीच व्यक्त केला नाही. बुमराच्या उपस्थितीत साशंक मनस्थितीत खेळत असताना सिराजने भारतीय मार्‍याचे नेतृत्व करताना १८५.३ षटके (१११३ चेंडू) गोलंदाजी करीत २३ बळी मिळवले. त्याची आक्रमकता आणि फलंदाजांना खिजवणे हे भारतासाठी अनुकूल ठरले. सिराजला तोलामोलाची साथ लाभली ती आकाशदीपकडून. सिराज-आकाशदीपने दुसरी कसोटी जिंकताना बुमराची अनुपस्थिती जाणवू दिली नाही. आकाशदीपने तीन सामन्यांत १३ बळी मिळवत आपली कामगिरी चोख बजावली. चौथ्या वेगवान गोलंदाजाची उणीव भारताला तीव्रतेने भासली. हरयाणाचा अंशुल कंबोज पदार्पणात निष्प्रभ ठरला. वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व राहिलेल्या या मालिकेत फिरकी गोलंदाजांपैकी कुलदीप यादवला संधीच मिळू शकली नाही.
क्षेत्ररक्षणाचे विश्लेषण केल्यास पहिल्या सामन्यातील पराभव हा प्रकर्षाने लक्षात राहतो. या सामन्यात सोडलेल्या बर्‍याच झेलांपैकी चार झेल हे एकट्या यशस्वीने सोडले. अगदी पाचव्या कसोटीत सिराजने सीमारेषेला पायाचा स्पर्श होत असताना हॅरी ब्रूकचा घेतलेला झेल (जो षटकार ठरला) धोकादायक ठरला. १९ धावांवर जीवदान मिळालेल्या ब्रूकने मग शतक साकारले आणि जो रूटसोबत भारतीय गोलंदाजांना झगडायला लावले. असेच काही झेल शेवटच्या दिवशीही सुटले. पण सामना हातून निसटला नाही.

‘श्रीयुत विश्वासराव’ – रवींद्र जडेजा

इंग्लंड दौर्‍यावर भारतीय संघातील सर्वात अनुभवी खेळाडू म्हणजे ३६ वर्षांचा ‘सर’ रवींद्र जडेजा. जड्डू सध्या कसोटी क्रिकेटच्या अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत अग्रस्थानावर आहे. वयानुसार आणि परिस्थितीनुरूप परिपक्वतासुद्धा त्याच्या खेळात पाहायला मिळाली. कठीण काळात तळाच्या फलंदाजांना हाताशी घेऊन किल्ला कसा लढवतात, हेच त्याने दाखवून दिले. या मालिकेत त्याने पाच सामन्यांत एक शतक आणि पाच अर्धशतकांसह त्याने एकूण ५१६ धावा काढल्या. भारताकडून ह्या चौथ्या क्रमांकाच्या. त्यामुळेच कारकीर्द अस्ताकडे जात असताना ‘श्रीयुत विश्वासराव’ (मिस्टर डिपेंडेबल) ही ओळख त्याने निर्माण केली. तिसरी कसोटी भारताने २२ धावांनी गमावली. या सामन्याच्या पहिल्या डावात ३१ आणि दुसर्‍या डावात ३२ अतिरिक्त धावा भारतीय गोलंदाजांनी दिल्या. अवांतर फरक थोडा कमी केला असता तरी हा पराभव टळला असता. या सामन्यात जडेजाने बुमरा आणि सिराज या तळाच्या फलंदाजांना हाताशी घेऊन सामना जिंकण्यासाठी केलेले शर्थीचे प्रयत्न संस्मरणीय ठरले. सिराजचा अनपेक्षित त्रिफळा उडाला नसता तर कदाचित सामन्याचा निकाल अनुकूल लागला असता. मग चौथ्या कसोटी जडेजा अधिक त्वेषाने मैदानावर उतरला. धावांचा डोंगर उभारल्यानंतर सामना डावाने जिंकू, अशी योजना इंग्लंडने आखली. पण जडेजा खेळपट्टीवर खंबीरपणे उभा राहिला.
वॉशिंग्टन सुंदरलाही पटवून दिले की या दौर्‍यावर फिरकीपेक्षा आपली फलंदाजी उपयुक्त ठरणार आहे. दोघांनी शतके झळकावून इंग्लिश गोलंदाजांना झगडायला लावले आणि कसोटी अनिर्णित राखली. पाचव्या कसोटीतही अन्य फलंदाज टिकाव धरत नसताना जडेजा आणि वॉशिंग्टननेच आत्मविश्वासाने खेळत अर्धशतके झळकावली. यावेळी नाइट वॉचमन म्हणून संधी मिळालेल्या आकाशदीपनेही अर्धशतक नोंदवून उपयुक्तता सिद्ध केली.
तात्पर्य : अँडरसन-तेंडुलकर कसोटी मालिकेतील पाचही रंगतदार सामन्यांची अनुभूती कसोटी क्रिकेट टिकून राहील याची ग्वाही देणारे ठरले. इंग्लंडविरुद्ध मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली, हे गिलच्या नेतृत्वाखालील भारतासाठी संक्रमणानंतरचे आश्वासक ‘शुभ’वर्तमान आहे. बुमराचा ताण, करुण, साईसुदर्शनचे अपयश हे जरी चिंताजनक असले तरी सिराज, राहुल, पंत, जडेजा, आकाशदीप, वॉशिंग्टन यांची कामगिरी सकारात्मक ठरली.

[email protected]

Previous Post

करारा जवाब!

Next Post

बाळासाहेबांचे फटकारे…

Next Post

बाळासाहेबांचे फटकारे...

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.