सोमीताई म्हणजे सोशल मीडिया ताई. सगळ्या जगाला व्यापून दशांगुळे वर उरलेल्या सोशल मीडियाच्या संदर्भात जे काही प्रश्न पडतील, ते आमच्या सोमीताईंना विचारा… त्यांच्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरं तयार असतात… ‘सोमी’तज्ज्ञ आहेत ना त्या!
– – –
जाहिरात आणि संस्कार
प्रश्न : सोशल मीडियावर गेल्या काही काळापासून अनेक जाहिरातींमध्ये लहान मुले आणि संस्कृती यांचा वापर वाढलेला दिसतो. त्याचे कारण काय?
उत्तर : खूप वर्षापूर्वी जगातील एका आघाडीच्या कॉफी उत्पादक कंपनीने जपानच्या बाजारपेठेत शिरण्याचा निर्णय घेतला. मात्र या कंपनीला म्हणावा असा प्रतिसाद काही मिळेना. विविध माध्यमाद्वारे जाहिराती करण्यात आल्या, प्रसिद्धीसाठी विशेष मोहिमा आखल्या गेल्या, पण प्रतिसाद काही वाढेना. शेवटी थकलेल्या कंपनीने एका तज्ज्ञ कंपनीची सल्लागार म्हणून नेमणूक केली. या तज्ज्ञ कंपनीने बाजारपेठेचा, जपानी ग्राहकांचा पूर्ण अभ्यास केला आणि काही निष्कर्ष मांडले.
१) जपानी संस्कृतीमध्ये कॉफी नाही. जपानमध्ये चहा जास्त महत्त्वाचा आहे तोच प्यायला जातो.
२) जपानमध्ये सध्या जो संभाव्य ग्राहक आहे, त्याने लहानपणापासून कधी कॉफी पिताना कोणाला पाहिलेले नाही आणि तिची चवदेखील त्याने कधी घेतलेली नाही.
३) कॉफी कंपनीने यासाठी जपानी संस्कृतीत शिरकाव करायला हवा आणि त्यासाठी लहान मुले हा सर्वात उत्तम पर्याय आहे. जगातील कोणताही देश असा नाही, जिथे आईबाप मुलांचे हट्ट पुरवत नाहीत.
कॉफी कंपनीने हा सल्ला ऐकला आणि लहान मुलांसाठी कॉफीच्या चवीची विविध उत्पादने बनवणे सुरू केली.
चॉकलेट, कॅडबरी, बिस्किटे, कॉफीची चव असलेली विविध पेये त्यांनी बनवायला सुरुवात केली. हळूहळू आधी लहान मुले आणि त्यांच्यामुळे घरातले पालक हे कॉफीच्या चवीकडे ओढले जाऊ लागले. आज कॉफी पिणे हे अनेक जपानी तरुणांसाठी स्टेटस सिम्बॉल बनलेले आहे. एकेकाळी लहान असलेल्या याच तरुणांच्या माध्यमातून कॉफी कंपनीने जपानी संस्कृती आणि नंतर घरामध्ये प्रवेश केला होता. आज परिस्थिती अशी आहे की २०१४ साली तिथे कॉफी पिणार्यांची संख्या सर्वात जास्त होती. तर आजच्या घडीला जपान पाच लाख टन कॉफी आयात करतो आहे आणि हीच कंपनी जपानची सर्वात मोठी निर्यातदार आहे.
आता लक्षात आले ना, जाहिरातींमध्ये संस्कृती आणि लहान मुले किती महत्त्वाची आहेत ते? कंपनीने स्वत:च्या उत्पादनासाठी जे तंत्र वापरले त्याचाच थोडा वेगळा वापर करून तुम्हालाही मुलांमध्ये संस्कार बिंबवणे अवघड जाणार नाही.
– संस्कारी सोमी
जशी मानसिकता, तसा कंटेंट
प्रश्न : सोशल मीडियावर इतका चांगला कंटेट उपलब्ध असताना, भिकार, टाकाऊ आणि रद्दी मालच एवढा कसा प्रसिद्ध होतो?
उत्तर : सोशल मीडियावर वावरणार्या एका मोठ्या समूहाची मानसिकता ही टीव्ही मालिका बनवणार्या लोकांच्या मानसिकतेशी जुळणारी असल्याने हे लोक शक्यतो काही चांगले घडू देत नाहीत किंवा घडवत नाहीत. मालिकावाले, मग ते कोणतेही भाषिक असोत, कधी मालिकेतल्या एखाद्या स्त्रीला सुखाने मूल जन्माला घालताना दाखवताना कधी पाहिले आहे का? बाई गर्भवती झाली रे झाली की एकतर कोणीतरी तिच्या गाडीचे ब्रेक फेल करतो, कोणीतरी जिन्यावर तेल सांडून तिला खाली कोसळवतो, नाहीतर दोरी बांधून झुंबर खाली पाडतो. असले काही जमले नाही तर कोणाला तरी वाचवताना ही बाई खाली पडते किंवा तिच्या पोटात गोळी शिरते.
चांगल्या सद्गुणी बाईचा नवरा हा कायम व्यसनी, दुराग्रही आणि बाहेर लफडे असणारा असतो. तो बायकोचे तोंड बघत नसतो किंवा बघितले तरी तोंडावर फक्त अपमान फेकून मारत असतो. सद्गुणी नायिका ही कायम दुःखात, संकटात असते आणि दुर्लक्षित राहते. उलट ज्या बाईबरोबर अवगुणी नायकाचे लफडे असते, ती सतत प्रत्येक वाईट गोष्टीत यश मिळवत असते. ती दिसायला नायिकेपेक्षा देखणी आणि हुशार असते. प्रसंगावधानी आणि हजरजबाबी असते. एकूणात काय तर नायिकेत आवश्यक असणारे गुण खलनायिकेत ठासून भरलेले असतात आणि तिचा स्क्रीन टाइम देखील नायिकेपेक्षा जास्त असतो.
आणि आणि आणि… यदाकदाचित नायक आणि नायिका दोघेही समंजस, सद्गुणी आणि एकमेकांवर प्रेम करणारे दाखवलेच तर मग लग्नानंतरही काही कारणाने दोघे एकमेकांच्या जवळ येऊ न शकणे, दोघांचे प्रेमप्रकरण ते लग्न या १०० एपिसोडच्या कालावधीत कधी न दिसलेली, उल्लेख देखील न आलेली एखादी कजाग आत्या किंवा मावशी त्यांच्या घरात येऊन आदळणे असे उद्योग हे उलट्या मानसिकतेचे लोक घडवत असतात. आता अशी मानसिकता घेऊन लोक सोशल मीडियावर आले, तर ते त्यांच्या मानसिकतेला साजेशा कंटेंटलाच लोकप्रिय करणार ना? मग एकमेकांच्या मुस्कटात मारण्याचे व्हिडिओ, जमेल तेवढे कमीत कमी कपडे घातलेल्या बायकांचे रील्स आणि मस्तरामच्या कथा याच प्रसिद्ध होत राहणार ना?
– ननायिका सोमी
निरुपयोगी संन्यास
प्रश्न : सोमी, सोशल मीडियावरून संन्यास घेऊन निघून जावे असे वाटते आहे. पण पूर्ण संन्यास घेण्यापेक्षा एकच कुठलातरी प्लॅटफॉर्म जसे की फक्त फेसबुक किंवा फक्त व्हॉट्सअप चालू ठेवावे असा देखील एक विचार मनात येतो आहे. नक्की काय करावे?
उत्तर : लाडक्या भावा, तुझ्याकडे पाहून मला एका गावात राहणार्या सदा नावाच्या माणसाची गोष्ट आठवते आहे. हा सदा तसा जरा आळशी आणि रिकामटेकडा. घरात एक गाय असते तिच्या रतीबावर घर कसेतरी चालत असते. त्या गायीचेही सगळे बायकोला करावे लागत असते. त्यामुळे बायकोची सतत भुणभुण आणि त्रागा त्याला सहन करावा लागत असतो. एके दिवशी या सगळ्या त्रासाला कंटाळून हा संन्यास घेण्याची घोषणा करतो. बायको फक्त हसते आणि मान डोलवते. दुसर्या दिवशी पहाटे उठून सदा जंगलाच्या दिशेने प्रयाण करतो. मोठ्या कष्टाने एक झोपडीवजा खोपटे उभे करतो आणि त्यात दिवस घालवायला लागतो.
दिवसभर जंगलात फिरावे, मिळेल ती फळे खावीत, ओढ्यावर बसावे असे करीत दिवस घालवायचा आणि रात्री खोपटाकडे परतावे असा दिनक्रम चालू होतो. रोज घरचे खायची सवय असल्याने नुसत्या फलाहाराने काही भागत नसते, रात्री अपरात्री मग भूक लागायला लागते. यावर उपाय म्हणून मग तो रात्री फळांचा साठा उशाशी घेऊन झोपायला लागतो. या साठ्याच्या वासाने उंदीर खोपट्यात शिरतो. खोपट्यात शिरलेला हा उंदीर मग याचे जिणे हराम करून टाकतो. वैतागलेला सदा पुन्हा घरी जातो आणि घरातले मांजर खाकोटीला मारून जंगलाकडे परततो.
काही दिवसात मांजर त्या उंदरांचा बंदोबस्त करते. पण आता मांजरीच्या भुकेचा त्रास सुरू होतो. तिच्या उपाशीपोटीच्या म्याव म्यावने आता सदा हैराण होतो. शेवटी सदा परत घराकडे कूच करतो आणि घरातली गाय घेऊन पुन्हा जंगलात परततो. आता मांजरीच्या भुकेचा प्रश्न तर मिटतो, पण गायीचा चारा, पाणी, स्वच्छता या सगळ्याचा प्रश्न उभा राहतो. थकलेला सदा पुन्हा घरी येतो आणि बायकोला विचारतो, ’काय गं, माझ्याबरोबर जंगलात राहायला येतेस का?’
– संन्यस्त सोमी
सोशल मीडियाची क्रांती
प्रश्न : सोमी ताई, सोशल मीडियामुळे देशात फार मोठा बदल होत आहे असे तुला वाटते का?
उत्तर : हो हो अगदी. खरे सांगायचे तर सोशल मीडियामुळे देशात आमूलाग्र बदल घडला आहे. फक्त हा बदल वास्तविक पातळीवर दिसत नाही एवढाच वांदा आहे. म्हणजे देशात २०१४नंतर लाखो किलोमीटरचे रस्ते बनल्याचे आम्हाला समजते, पण वर्तमानपत्रात आम्ही शिक्षणासाठी जीव धोक्यात घालून होडीने प्रवास करणार्या विद्यार्थ्यांचे फोटो बघतो. देशातल्या प्रत्येक नागरिकाला आरोग्य सुरक्षा पुरवण्यात आल्याची आकडेवारी आम्ही सोशल मीडियावर बघतो आणि दुसर्या दिवशी आरोग्य सुविधेच्या अभावामुळे तालुक्याकडे नेत असताना वाटेतच प्रसूत झालेल्या स्त्रीची बातमी ऐकत असतो. स्वच्छ आणि पारदर्शक कारभाराची महती सोशल मीडियावर वाचत असतो आणि जास्तीचे भाडे देण्यास नकार दिल्याने मृतदेह नेण्यास नकार देणार्या रुग्णवाहिका चालकाची बातमी कान कुरतडत असते. पण सोशल मीडिया सांगते म्हणजे देशात क्रांती नक्की घडलेली असणार. आम्हीच करंटे उगाच काहीतरी शंका काढत असतो.
सोशल मीडियाने किती किती बदल घडवला आहे. पूर्वापार आम्ही एखाद्या गोष्टीचा करिश्मा ’काश्मीर ते कन्याकुमारी’ या शब्दात वर्णन केलेला ऐकायचो आता तेच वर्णन आम्ही ’गुजरात ते अरुणाचल’ अशा शब्दात वाचतो. समाज, पर्यावरण अशा सगळ्यासाठी घातक असलेल्या एखाद्या उद्योगाच्या बांधणीला विरोध होतो तेव्हा आम्हाला तो स्थानिकांचा आक्रोश वाटत असे. पण हा आक्रोश स्थानिक नाही, तर बाहेरून गावात आलेले आणि विरोधी पक्षांनी डोके फिरवलेले लोक करतात हेदेखील आम्हाला सोशल मीडियामुळे कळले. अगदी प्रामाणिकपणे सांगायचे तर २०१४पूर्वी आम्ही ज्याला हिंदुस्थान समजत होतो तो एक अत्यंत मागासलेला, जनसुविधांचा अभाव असणारा, कोणतेही राजकीय धोरण नसलेला अत्यंत नेभळट असा काही राज्यांचा समूह होता. पण आता २०१४नंतर खरा देदीप्यमान हिंदुस्थान जन्माला आला आहे, हे देखील सोशल मीडियामुळे आम्हाला समजले. सोशल मीडियाचे सर्वात महत्त्वाचे वरदान म्हणजे, माणूस, पक्षी, प्राणी, कीटक अशा विविध प्रजातींनी नटलेल्या या देशात सोशल मीडियाने ’भक्त’ ही एक नवी असाधारण प्रजाती निर्माण केली. मानवाची उत्क्रांती आता खर्या अर्थाने पूर्ण झाली असे म्हणायला हरकत नाही.
– आभारी सोमी