अॅडॉल्फ हिटरलनं १.५ कोटी ज्यू मारले. हिटलर जर्मनीचा चॅन्सेलर होता. निवडणुकीच्या वाटेनं तो हुकूमशहा झाला होता. १९३९ ते १९४४ या सहा वर्षात हा उद्योग हिटलरनं केला. मारले गेलेले ज्यू जर्मनीतले होते, पोलंडमधले होते, युक्रेनमधले होते, ऑस्ट्रियातले होते, झेकोस्लोवाकियातले होते, युरोपीय होते.
हिटलरला जर्मनीचा विशाल जर्मनी आणि शुद्ध आर्य जर्मनी करायचा होता. त्यासाठीच त्यानं दुसरं महायुद्ध केलं.
पहिलं महायुद्दानंतर जर्मनीची परिस्थिती बिघडत गेली. या बिघाडाला एक मोठ्ठं कारण ज्यू होते असं हिटलरचं म्हणणं होतं. ज्यू हे अशुद्ध लोक असल्यानं ती जमात पृथ्वीवरून नष्ट केली पाहिजे असं हिटलरचं मत होतं.
– – –
ज्यूंचा संहार आणि दुसरं महायुद्ध या दोन घटनांचा अप्रत्यक्ष संबंध होता.
हिटलरच्या व्यक्तिमत्वात आणि इतिहासात वरील दोन्ही घटनांची मुळं पसरलेली आहेत.
पहिल्या महायुद्धात जर्मनी हरला. जर्मनीची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली. जर्मन लोक अपयशाची कारणं शोधत होते, राजकीय पक्ष आणि पुढारी एकमेकांवर आरोप करत होते, खापर फोडत होते. अराजक झालं.
अशा गोंधळाच्या परिस्थितीत लोकांना भावनात्मक, एका ओळीची उत्तरं आकर्षित करतात. लोकांना नवं काही तरी हवं असतं, ते शक्य आहे की नाही याचा विचार लोक करत नाहीत. लोक वैचारिक जुगार करायला तयार असतात. चक्रम विचार मांडला तर तो लोक आउट ऑफ बॉक्स या नावाखाली स्वीकारायला तयार होतात. जर्मनीच्या बाबतीत तेच घडलं.
हिटलरनं सांगितलं की जर्मनी हा आर्य देश आहे. हे आर्यत्व जर्मन राजकारणानं घालवल्यामुळं जर्मनीचा पराजय झाला. हे आर्यत्व गेलं ते ज्यू या अशुद्ध समाजामुळं. ती जर्मनीतून नाहीशी व्हायला हवी, जर्मनीतूनच नव्हे जगातून नाहीशी व्हायला हवी. (अर्थात हेही खरं की हिटलरनं समाजवादी इत्यादींनाही जबाबदार ठरवलं होतं.) माझ्या हाती सत्ता द्या, मी चुटकीसरशी ज्यूंचा (इतर शत्रूंचाही) नायनाट करतो असं हिटलर म्हणत असे. हिटलरनं नाना वाटांनी समाजावर भुरळ घातली होती. भाषणाची पद्धत. गुडांचा वापर करून दहशत निर्माण करणं. परेड, झेंडे, बँड, रोषणाई, लाखोंच्या सभा, चित्रपट अशी सर्व माध्यमं हिटलरनं वापरली.
जर्मनीला लोकशाहीचा इतिहास होता, जर्मनीतल्या संस्थांची मुळं समाजात रुतलेली होती, जर्मनी हा अभ्यासू लोकांचा देश होता. तरीही समाजात अगदीच अल्पसंख्य लोक देशाची वाट लावू शकतात या मांडणीला लोक भुलले. खरोखरच भुलले की हिटलच्या दंडेलीनं त्यांची विचारशक्ती थिजली? ज्यू नष्ट केले पाहिजेत हे लोकाना कसं पटलं? हिटलरच्या व्यक्तिमत्वानं लोक भारले की ज्यूंच्या बद्दल ख्रिस्ती मनामध्ये शेकडो वर्षांपासून चालत आलेली अढी प्रभावी ठरली?
एक ख्रिस्ती या नात्यानं ज्यूंबद्दलचा पूर्वग्रह हिटलरमध्ये असणार. हिटलर ख्रिस्ती (कॅथलिक) होता. युरोप ख्रिस्ती होतं. ख्रिस्त आणि ख्रिस्ती धर्म स्थापन होण्याच्या आधी साताठ शतकांपासून युरोपात ज्यूंवर राग होता असं दिसतं. याचं एक कारण ज्यू धर्म, इस्रायली लोकांचा धर्म. ख्रिस्तपूर्व काळात युरोपात आणि मध्यपूर्वेत (मेसोपोटेमिया, इजिप्त) अनेक देव असलेल्या उपासना पद्धती होत्या. ज्यू एकच देव मानत. आपला धर्म आणि संस्कृती ज्यूंनी सभोवतालच्या लोकांपासून जाणीवपूर्वक वेगळी ठेवली. त्यामुळं ज्यू नसलेल्या लोकांपासून ज्यू दुरावले होते. पुढं चालून ख्रिस्ताचा खून झाला. ख्रिस्त हा मुळात ज्यू होता, त्याला मारलं तेही ज्यू होते. ख्रिस्त जिवंत होता त्या काळात ख्रिस्ती धर्म स्थापन झालेला नव्हता. ख्रिस्ती धर्म ख्रिस्ताच्या अनुयायांनी स्थापला आणि तीनेकशे वर्षांनी ख्रिस्ती धर्म संघटित झाला, चर्च तयार झालं, पोप वगैरे संस्था पक्क्या झाल्या. चौथ्या शतकानंतर ज्यूंना युरोपात कोणताही राजा थारा देईना. ज्यूंची भटकंती सुरू झाली.
विसाव्या शतकापर्यंत ज्यूंबद्दलच्या समजुती निराधार आहेत हे जगाला खरं म्हणजे कळलं होतं. पण वर्षानुवर्ष बसलेल्या अढ्या जात नसतात हे खरं. सभोवतालच्या अगदी नॉर्मल माणसांबरोबर जगत असताना ते ज्यू आहेत हे कळत असूनही लोकांच्या मनात ज्यू राक्षस असतात, दुष्ट असतात असं खोलवर शिल्लक असतं. ज्यू लोक त्यांच्या धार्मिक विधीमध्ये ख्रिस्ती मुलांचं रक्त पितात असं आजही अनेक ख्रिस्ती मानतात.
एक अशीही वदंता होती की हिटलरचा एका ज्यू वेश्येशी संबंध होता, तिच्याकडून हिटलरला रोगप्राप्ती झाली, म्हणून त्याचा ज्यूंवर राग होता.
१९३३ साली चॅन्सेलर झाल्यापासून हिटलरनं ज्यूंच्या विरोधात विषारी प्रचार सुरू केला. हिटलर प्रत्येक भाषणात ज्यूंचा उद्धार करत असे. जर्मनीच्या दुरवस्थेला ज्यू जबाबदार आहे असं पेपरांतून, जाहीर सभांतून, शाळा कॉलेजातून सतत सांगितलं गेलं. प्रचाराची झोड उठवली. जर्मन तरुणांना चिथावण्यात आलं. ज्यू माणसांना हेरून जर्मन तरुण त्यांच्यावर हल्ला करत. ज्यू अस्वस्थ झाले. प्रतिकार करत नव्हते, पण नाराजी व्यक्त करू लागले होते. आपलं खरं नाही हे त्यांच्या लक्षात येऊ लागलं होतं.
चॅन्सेलर झाल्यावर हिटलर दर महिन्याला एक ज्यूविषयक कायदा करे. कोणी विरोध करत नाही, प्रतिक्रिया व्यक्त करत नाही असं लक्षात आलं की दुसरा कायदा. काही नोकर्यांत ज्यूंना बंदी. सरकारी नोकरीत ज्यूंना प्रवेश नाही. वकिली आणि डॉक्टरकी करायला परवानगी नाही. शाळेत शिक्षकी करायला परवानगी नाही. ज्यूना नज्यूंशी लग्न करायला परवानगी नाही. प्रत्येक ज्यूला तो ज्यू आहे हे दाखवणारं ओळखपत्र बाळगावं लागेल. प्रत्येक ज्यूनं पिवळा तारा हे चिन्हं असणारं फडकं बाहीवर किंवा शर्टावर लावलं पाहिजे. ज्यूच्या घरावर आणि दुकानावर पिवळा तारा चिन्ह मोठ्या आकारात लावलं, चितारलं पाहिजे. ज्यू जर्मनीचे नागरिक नाहीत.
ज्यू जर्मनीतल्या शहरात होते, तिथंच त्याना वेगळं करण्यात आलं. घेट्टो. युरोपनं ज्यूंचे घेट्टो पाहिले होते. तसेच घेट्टो जर्मनीत तयार केले. सुमारे १००० घेट्टो तयार झाले. त्याचे अनेक प्रकार होते. एक घेट्टो उघडा असे. म्हणजे ज्यू जिथं एकत्र राहात त्या विभागाला ज्यू वस्ती (ज्युईश क्वार्टर) असं म्हटलं जाई, ती वस्ती पाट्या लावून डि मार्केट करणं. दुसरं घेट्टो म्हणजे ज्यू वस्तीत प्रवेश करणारे रस्ते भिंत आणि कुंपण घालून बंद करणं. या घेट्टोमधून ज्यूंना बाहेर जाता येत नसे. तिसरं घेट्टो म्हणजे पूर्णपणे एक नवीनच वस्ती तयार करणं.
या घेट्टोचा कारभार पहाणारं एक ज्यू मंडळ एका कायद्यानं तयार करण्यात आलं. प्रत्येक घेट्टोसाठी स्वतंत्र मंडळ. या मंडळात २१ नामवंत ज्यू असत. राबाय आणि उद्योगी त्यात असत. समाजात मान असल्यानं त्यांचं नेतृत्व ज्यू समाज मान्य करत असे. घेट्टोच्या नागरी सुविधा त्यांनी सांभाळायच्या, वीज-पाणी-शाळा इत्यादी. मंडळाचं बजेट अगदीच तुटपुंजं होतं, खर्च खूप असे, सरकार अगदीच अपुरी तुटपुंजी रक्कम मंजूर करत असे. मंडळातली लोकं कुरबूर करत, सरकार ऐकत नसे.
तिथंच संघर्ष सुरू झाला. ज्यूंना घेट्टोतच व्यापार करायला परवानगी होती. ते बाहेरून कोणतीही वस्तू विकत आणू शकत नव्हते, कोणती वस्तू बाहेर विकू शकत नव्हते. रेशनिंग होतं. चारशे ते सातशे कॅलरीचं अन्न त्यांना दिलं जात असे. सर्वसामान्य जर्मन माणसाचा आहार २४०० कॅलरीचा होता. ज्यूंनी तक्रारी केल्या. उपयोग झाला नाही. तक्रारी, घेट्टोतल्या घेट्टोत मोर्चे काढणं, घेट्टोबाहेर जाऊन निदर्शनं करणं हे सनदशीर मार्ग ज्यूनी वापरले. पोलीस बदडून काढत असत. मंडळाच्या पदाधिकार्यांना पोलीस अटक करत, काहींचे खूनही झाले.
– – –
गोअरिंग, हेन्रिख, हिमलर यांच्यासह हिटलरचा ज्यूंचं काय करायचं या विषयावर खल चाले.
जर्मन साम्राज्यात ज्यू शिल्लक नसणं हा अंतिम क्षण त्याच्या डोक्यात होता. त्या बिंदूपर्यंत पोहोचणं खूप कठीण होतं, कसं पोहोचणार आणि केव्हां पोहोचणार ते ठरवायला हवं होतं. जे काही करायचं ते कायद्यामागं लपून करावं लागणार होतं. एका बैठकीत विचार निघाला की ज्यू गोळा करायचे आणि मादागास्कर या बेटावर पाठवून द्यायचे. गोळा कसे करायचे? इतक्या दूरवर न्यायचे कसे? तिथं त्यांना पाठवल्यावर त्यांची जबाबदारी कोणी घ्यायची? की त्यांना सोडून मोकळं व्हायचं? ते पुन्हा जर्मनीत परतले तर? मादागास्करमध्येही ते जिवंत राहतीलच, कारवाया करत राहतील, त्यावर उपाय काय? काही काळानं तो विचार सोडून देण्यात आला.
घेट्टोत ज्यू प्रतिकार करत. घेट्टो हा तुरुंग नव्हता. त्यामुळं एका हद्दीनंतर घेट्टोचं नियंत्रण हिटलरला जमत नव्हतं. कधी काळी घेट्टो नष्ट व्हावेत आणि सर्व ज्यू मंडळी एका तुरुंगात असावीत असा विचार हिटलरच्या चर्चांमध्ये येत असे. अशांततेचं कारण दाखवून ज्यूंना तुरुंगात पाठवता आलं असतं. पण दोन कोटी लोकांना पुरतील एवढे तुरुंग असणार नव्हते. शिवाय या तुरुंगांची व्यवस्थाही खूप खर्चिक ठरली असती.
कॉन्संट्रेशन कँप ही वाट निघाली. मोकळ्या जागेवर वस्ती उभारायची. बराकींच्या रूपात. सभोवताली भिंत उभारली, कुंपण उभारलं की झालं काम. या छावणीत गोळा झालेल्या ज्यूंना (व इतरांनाही) काही तरी काम करायला लावायचं. त्यातून मिळणारं उत्पन्न सरकारचं. छावणीत इतका त्रास द्यायचा की छावणीवासी मरून जातील. ज्यूंची संख्या कमी होईल.
१९३३च्या मार्च महिन्यात म्युनिख शहराच्या जवळ दाकाव शहरात पहिला कँप उघडण्यात आला. तिथून कँपचं पेवच फुटलं. पुढे महायुद्ध संपेपर्यंत जर्मनीत आणि पोलंडमध्ये ४३ हजार कँप उघडले.
१९३८च्या नोव्हेंबरमध्ये अचानक जर्मनी-ऑस्ट्रियात ज्यूंच्या वस्त्यांत दंगली उसळला. दंगली एकतर्फी होत्या. ज्यूंची घरं, दुकानं, फोडण्यात आली, जाळण्यात आली. सिनेगॉग उद्ध्वस्त करण्यात आले. दुसर्या दिवशी ज्यूंना नोटिसा आल्या, तुम्ही घरं जाळलीयत, नुकसानभरपाईची रक्कम सरकारजमा करा. जर्मनीची लोकसंख्या होती ६.७ कोटी. ५.२३ लाख ज्यू होते. दंगली झाल्यावर ३७ हजार ज्यू जर्मनी सोडून गेले. अनेकांना बाहेर जाणं शक्य नव्हतं. अनेक स्वतःला जर्मन मानत, ज्यू असणं आणि जर्मन असणं यात फरक काय असं त्याना वाटे, जर्मनीतच आपलं भविष्य आहे असं अनेकांना वाटे, ते थांबले. अनेकांना वाटे की परिस्थिती निवळेल, हिटलर आज आहे उद्या नसेल, आपण उद्याची वाट पाहूया. तेही थांबले.
१९३८ सालच्या नोव्हेंबर महिन्यातली ९ तारीख. जर्मनीभर दंगलखोर रस्त्यावर उतरले. ज्यूंची १ हजार मंदिरं (सेनेगॉग), ७५०० दुकानं उद्ध्वस्त करण्यात आली. ज्यूंची घरं हुडकून त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली. घरं, दुकानं, काचा फोडण्यात आल्या. दोन दिवस धिंगाणा चालला होता. ३० हजार ज्यूंना अटक झाली. पोलिस या घटना पाहात शांत उभे होते. बंब आले. त्यानी ज्यूंच्या जळत्या घरावर पाणी फेकलं नाही, ज्यूंच्या शेजारी राहणार्या ‘आर्य’ घरांना झळ पोचणार नाही याची दक्षता घेतली गेली. दंगल केली हिटलर यांच्या एसएसच्या कार्यकर्त्यांनी. घरं कोणाची उद्ध्वस्त झाली ज्यूंची? अटक कोणाला झाली? ज्यूंना. सरकारनं जाहीर केलं की दंगल ज्यूंनी केली. नष्ट झालेल्या मालमत्तेची भरपाई म्हणून करोडोचा सामूहिक दंड ज्यूंवर बसवण्यात आला. दंगलग्रस्त विभागातल्या ज्यूंना कॉन्सन्ट्रेशन कँपमध्ये पाठवण्यात आलं. ज्यू राहात होते ती घरं ‘आर्य’ जर्मनांनी बळकावली.
– – –
दुसरं महायुद्ध सुरू होण्याआधी हिटलरनं रशियाबरोबर अनाक्रमण करार केला. रशियाबद्दल हिटलरचं वाईट मत होतं. रशिया कम्युनिस्ट होतं. हिटलरचा कम्युनिझमला विरोध होता, जर्मनीच्या अवनतीला कम्युनिस्ट जबाबदार आहेत असं त्याचं मत होतं. सत्तेवर आल्यापासून, १९३३पासून हिटलरनं कित्ती तरी वेळा कम्युनिस्टविरोधी मोहीम चालवली होती, हजारो कम्युनिस्टांना तुरुंगात घातलं होतं, गोळ्या घातल्या होत्या. मनात लबाडी ठेवूनच हिटलरनं हा करार केला होता. अनाक्रमण करार कधी मोडायचा ती तारीख ठरलेली नव्हती एवढंच. पश्चिम युरोपमधल्या देशांशी लढत असताना रशियाची आघाडी थंड ठेवणं आवश्यक होतं. एकदा का फ्रान्स इत्यादी देश जिंकले की रशियावर आक्रमण करायचं असा विचार हिटलरनं केला होता.
शेवटी तो क्षण आला. हिटलरनं जर्मन फौजा रशियात घुसवल्या. जर्मन फौजांबरोबरच ज्यूंचं निर्दालन करणारी फौजही हिटलरनं पाठवली. या फौजेत अनेक दलं होती. एका दलात ४००० सैनिक होते. हे दल मोबाईल होतं, फिरतं होतं. वाहनातून फिरत राहायचं, जागोजागी जाऊन ज्यूंना गोळ्या घालायचं हेच या दलाचं काम होतं.
दल गावात जायचं. स्थानिक लोक त्यांना ज्यू कुठं राहतात ते दाखवायचे. वस्तीत जायचं. ज्यू कुटुंब, मुलाबाळाम्हातार्यांसकट, गोळा करायची. त्यांना व्हॅनमध्ये घालून गावाबाहेर नेऊन गोळ्या घालायच्या. दल एखाद्या उंच जागेवर माणसाना घेऊन जायचं. खाली खोलवर दरीसारखा खड्डा. नैसर्गिक खड्डा सापडला नाही तर पटापट डोझर लावून खड्डा तयार करायचा. खड्ड्याच्या काठावर ज्यू माणूस उभा करायचा किंवा बसवायचा. गोळी घातली की तो माणूस आपोआप खड्ड्यात पडत असे. खड्डा भरला की दुसरीकडं जायचं. काही काळ ही मोहीम चालली. एका क्षणी रशियन सैन्यानं प्रतिकार सुरू केला. गोळ्या घातलेल्या माणसांमध्ये ज्यू होते आणि कम्युनिस्टही होते. मेलेली माणसं कम्युनिस्ट आहेत हे समजलं तर रशियन सैन्य चवताळेल असा हिशोब करून हे दल मागं फिरलं. खड्डे उकरले, प्रेतं बाहेर काढली, जाळली. पुरावे नष्ट करण्यासाठी.
या दलाला स्थानिक लोकांनीही मदत केली. रशियामध्ये ज्यूद्वेष होताच. झारशाहीत राजानं ज्यूंच्या विरोधात दंगली उचकवल्या होत्या. एकोणिसाव्या शतकात ज्यूंवर फार अत्याचार झाले, त्यांना रशियात रहाणं अशक्य झालं. तेव्हां हज्जारो ज्यू रशिया सोडून पॅलेस्टाईनमध्ये गेले होते. त्यामुळं स्थानिक रशियन ज्यूद्वेष्टे उत्साहानं वरील मोहिमेत भाग घेत होते. कित्येक लोक जर्मनांच्या धमक्यांना घाबरून त्यांना सहकार्य देत होते.
पोलंडमध्येही हे खास दल पोचलं होतं. पोलंडमध्ये ज्यूद्वेष होताच. तिथल्या गावातल्या लोकांना जर्मन मारेकरी पोचत असल्याची बातमी कळल्यावर ते तयारच होते. त्यांनी आपणहून अनेक ज्यू मारले. युक्रेनमधल्या कीव या शहरात या दलानं ३४ हजार ज्यू मारले. लाटवियात २८ हजार मारले. लिथुआनियात ९ हजार ज्यू मारले. या दलाचा एकूण स्कोअर होता ४ लाख. त्यात काही ज्यू नसलेले कम्युनिस्ट कार्यकर्तेही होते.
– – –
ऑक्टोबर १९४०. जर्मनीनं पोलंडचा ताबा घेतला होता. पोलंडच्या गव्हर्नरनं आदेश काढला की वॉर्सामध्ये एक घेट्टो उभं केलं जाईल. या वस्तीत आधी नज्यू पोलीश माणसं वसलेली होती. त्यांची संख्या होती १.१३ लाख. त्यांना हटवून दूरवर वसवण्यात आलं, त्यांच्या मोकळ्या झालेल्या घरांमध्ये वॉर्सामधले १.३८ लाख ज्यू पाठवण्यात आले. नंतर पोलंडमध्ये इतरत्र पसरलेले, जर्मनीतले, ज्यू वॉर्सा घेटोत धाडण्यात आले. संख्या झाली ४.६० लाख. त्यात ८५ हजार मुलं होती. सुमारे ३ चौ.किमी जागेत कोंबण्यात आली. एका खोलीत ८ ते १० माणसं राहू लागली.
काही दिवसांतच घेट्टो भरलं. मग वस्तीभोवती एक उंच भिंत बांधण्यात आली. भिंतीवर काटेरी तारा लावल्या होत्या. भिंतीत मोजकेच दरवाजे असत, त्यावर पोलिसांचा पहारा असे. ज्यू माणसाला घेट्टोच्या बाहेर जायला परवानगी नव्हती. परवानगीशिवाय घेट्टोच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न केला तर तात्काळ गोळ्या घातल्या जात. बाहेरून कोणतीही वस्तू घेट्टोत जात नसे. सरकारनं घेट्टोचा अन्नपुरवठा मर्यादित केला होता. सरकार परवानगी देत असे तेवढाच ब्रेड आत जात असे. दर माणशी फक्त १८० कॅलरीज दिल्या जात असत. एक वाटी डाळीत तेवढ्या कॅलरी असतात.
घेट्टोतल्या माणसांना उत्पन्नाचं कोणतंही साधन नव्हतं, ना नोकर्या ना उत्पादनं. घेट्टोत जाताना लोकं सोबत वस्तू आणि पैसे घेऊन गेली होती. त्या वस्तू विकण्यासाठी दुकानं तयार झाली. ब्रेड मिळत नसे. उपासमार होई. माणसं सोबत आणलेल्या वस्तू विकून ब्रेड घेत. अंगावरचे कपडेही विकले गेले. रस्त्यावर हाडाची काडं झालेली मुलं माणसं वस्तू विकताना दिसत. कधी कधी माणसं वस्तू विकता विकता कोसळत, मरत. स्वयंसेवक ती प्रेतं उचलून नेऊन रस्ता, फुटपाथ मोकळा करत.
बाहेरून येणारा ब्रेड अगदीच मर्यादित असे. मग जास्तीचा ब्रेड कुठून यायचा? घेट्टोतल्या काही लोकांकडं पैसे होते. भिंतीला पाडलेल्या खिंडारातून माणसं जात. तिथं जर्मन सैनिक असत. त्यांना पैसे देत, बदल्यात ब्रेड घेत. सांडपाणी आणि पावसाचं पाणी वाहून नेणारी भूमिगत गटारं होती. तिच्यातून घेट्टोबाहेर जाता येत असे. तिथून वस्तूंचा चोरटा व्यापार व्हायचा. काही स्त्रिया तरुण होत्या, त्यांच्या अंगावर मांस शिल्लक होतं. त्या वेश्याव्यवसाय करत. जर्मन सैनिक त्यासाठी घेट्टोत येत, स्त्रिया गटारातून बाहेर जात. अशुद्ध ज्यूंशी शुद्ध आर्य बिनधास्त रक्तसंबंध ठेवत.
चोरटी देवाणघेवाण वगळता एक वाहतूक मात्र दररोज नियमानं होत असे. हातगाड्यांवरुन प्रेतं बाहेर आणली जात आणि दूरवरच्या नाल्यात फेकली जात. प्रेतं फेकल्यांतर रिकामी झालेली गाडी वस्तीत परतत असे.
(क्रमश:)