दोन भाऊ एकत्र आले, एकाने दुसर्याला वाढदिवसाला विश केले, तेव्हापासून महाराष्ट्रात बरनॉल आणि कैलास जीवन यांचा खप फार वाढला आहे म्हणे!
– प्रमोद सावंत, कुर्ला
मग बरनॉल आणि कैलास जीवन यांनी सुद्धा कमावायचं नाही का? त्यांचा ‘खप’ वाढला तरी तुम्ही ‘चुप’ रहा ना. की दोन्ही कंपन्यांकडून इलेक्शन फंड उकळण्याची ही आयडिया आहे? की दोन्ही कंपन्या बंद पाडून, त्या नाममात्र दरात आपल्या मुलाच्या नावाने विकत घेण्याचा तुमचा प्लॅन आहे? भावाने भावाला विश केलं म्हणून बरनॉल आणि कैलास जीवनचा खप वाढला असं कोणी म्हणत असेल, तर जेव्हा दोन्ही भाऊ एकमेकांना विश करत नव्हते, तेव्हा नात्यात कालवल्या जाणार्या विषाचा खप फार वाढला होता, असं कोणी म्हणायचं का? अहो काहीही म्हणायला पुरावा लागत नाही हल्ली.
मी कॅरम सॉलिड खेळतो आणि माझा मित्र गण्या नवा व्यापार खेळण्यात एक्स्पर्ट आहे… आम्हाला दोघांना राज्याच्या मंत्रिमंडळात संधी मिळू शकते का हो पवार काका?
– अनंत गोजमगुंडे, बीड
नवा व्यापार खेळता येतो म्हणून कोणीही चकाट्या पिटणारे फोकाटे आले आणि त्यांना मंत्रिमंडळात संधी मिळाली, तर मग जुना व्यापार खेळणार्यांनी काय फक्त रमी खेळायची? पवार काकांना विचारलं तरी काकांच्या हातात काही नाही हो, एखाद्या पुतण्याला विचारून बघा…
एखादा मित्र खोटारडेपणा करून आपली सतत बदनामी करत असेल, तर त्या मैत्रीला काय अर्थ? असली प्रें०âडशिप तोडून टाकायला नको का?
– मंदाकिनी पोफळे, गुहागर
आपला मित्र हुशार असेल तर आपली कितीही बदनामी केली तरी चालेल… पण आपला मित्र अडाणी असेल आणि आपली बदनामी करणार्याच्या हातात आपल्या त्या अडाणी मित्राच्या नाड्या असतील तर? नाड्या खेचल्या आणि मित्र उघडा पडला तर? म्हणतात ना… उघड्यापाशी नागडं गेलं आणि रात्रभर थंडीने मेलं… तसं काहीतरी आपलं व्हायचं, त्यामुळे बदनाम हुवा तो हुवा, पर नाम तो हुवा असा विचार करून, आपल्या मित्राने आपली कितीही बदनामी केली तरी त्याचा अभिमान बाळगा… आणि जाहीरपणे सांगा आपल्याला रोज किती किलो शिव्या पडतात ते!
काका, मी १८ वर्षांचा झालोय तरी मला मिसरूड फुटलेलं नाहीये, दाढीही आलेली नाहीये, त्याला पं. जवाहरलाल नेहरू हे जबाबदार आहेत, अशी माझी तरी खात्री पटली आहे… तुमचं काय मत?
– युवराज मोहिले, चंदगड
तुमच्यासारख्या दाढीही न आलेल्या माणसाने जवाहरलाल नेहरू यांना जबाबदार धरणं म्हणजे दाढीवाल्या माणसाने, नेहरूंनी आपली दाढी केली नाही म्हणून आपली दाढी वाढली असं म्हणण्यासारखं आहे. त्यातूनही नेहरूंना जबाबदार धरायचंच असेल तर आधी चेक करा की नेहरूंना जबाबदार धरण्याचं कॉपीराईट कोणी घेतले आहेत का? उगाच त्यांचा भंग नको.
स्वत: विमानापासून गाडीपर्यंत, घड्याळापासून गॉगलपर्यंत, बुटांपासून कोटापर्यंत सगळ्या परदेशी वस्तू वापरणारे सर्वोच्च नेते देशवासीयांना मात्र स्वदेशीला प्राधान्य देण्याचं आवाहन करतात, ते कोणत्या तोंडाने?
– सीताकांत पाध्ये, दादर
आहे त्याच तोंडाने आवाहन करतात, तुम्हाला आम्हाला एक दुसरं तोंड असतं जे लाज वाटल्यावर दाखवायचं नसतं… शरम वाटत असेल तर त्या तोंडाने बोलायचं नसतं.. नेत्यांना अशा दुसर्या तोंडाची गरजच नाही. बरं समजा नेत्यांना दुसरं तोंड असेल ज्या तोंडाने ते असं बोलतात, ते तुम्हाला कळल्यावर तुम्ही त्या तोंडाला लागणार आहात का?
दहशतवादाचा रंग कोणता असतो?
– संतोष मांजरेकर, वाशी
जो रंग डोळ्यांना खुपतो तोच रंग दहशतवादाचा असतो… हे झाले सर्वसामान्य व्याख्या, पण खरं पाहता दहशतवादाचा रंग बघण्यासाठी विशिष्ट प्रकारचा गॉगल असतो… तो समाजात फुकट वाटला जातो… तुम्हाला जो गॉगल मिळेल, त्यातून जो रंग दिसतो तोच दहशतवादाचा रंग असतो.