• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

नामयाची जनी

- ह.भ.प. ज्ञानेश्वर बंडगर (अभंगबोध)

Nitin Phanse by Nitin Phanse
August 7, 2025
in धर्म-कर्म
0

– ह.भ.प. ज्ञानेश्वर बंडगर

स्त्री जन्म म्हणवूनी न व्हावे उदास।
साधुसंता ऐसे केले मज ।।१ ।।
संतांचे घरची दासी मी अंकिली।
विठोबाने दिली प्रेमकळा ।।२ ।।
विदुर सात्विक माझिये कुळीचा।
अंगीकार त्याचा केला देवे ।।३ ।।
न विचारिता कुळ गणिका उद्धरिली।
नामे सरती केली तिही लोका ।।४ ।।
ऋषीची कुळे उच्चारिली जेणे।
रौरवी तेणे वस्ती केली ।।५ ।।
नामयाची जनी भक्तीते सादर।
माझे ते साचार विटेवरी ।।६ ।।
जनाबाई माऊली या वारकरी संप्रदायातील महान संत. तेराव्या शतकात वारकरी संतांची जी मांदियाळी उदयाला आली होती त्यातील प्रमुख संत म्हणून जनाबाईंचा उल्लेख करावा लागतो. त्या नामदेवांच्या घरच्या दासी होत्या. दासी असूनही त्या संतपदाला पोचल्या. मुळात वारकरी संप्रदायाचे नेतृत्वच समाजाच्या तळातले लोक करत होते. त्यामुळे वारकरी संप्रदाय हा सामाजिक न्यायाचा एक प्रयोगच होता. जनाबाई माऊली त्याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. त्या स्त्री होत्या. दासी होत्या. त्यांच्या जातकुळाचाही ठावठिकाणा नव्हता. पण वारकरी संतांमुळे यापैकी एकही बाब त्यांच्या न्यूनगंडाला कारणीभूत ठरली नाही. या तीनही बाबींवर त्यांनी मात केलेली होती. त्याचे वर्णन जनाबाई या अभंगात करतात.
स्त्री जन्म हा परमार्थदृष्ट्या प्रतिकूल मानला गेला असला तरी साधुसंतांनी त्याला छेद दिला. स्त्रियांनाही पुरुषांच्या बरोबरीने समान अधिकार आणि प्रतिष्ठा दिली. वेदांच्या परंपरेत स्त्रियांना दुय्यमभाव होता. त्यांना वेदांचा अधिकार नव्हता. ‘अधिकार नाही वेदार्थश्रवणी। गायत्री ब्राह्मणी गुप्त केली।।’ असं बहिणाबाई म्हणतात. स्त्रियांना वेदार्थश्रवणाचा अधिकार नाही. त्याचप्रमाणे वेदशास्त्रात आणि पुराणात स्त्रियांना हीन मानलं गेलेलं आहे. ‘वेद हाका देती पुराणे गर्जती। स्त्रियांच्या संगती हित नोहे ।।’ अशी वेदपुराणांची स्त्रियांविषयीची धारणा आहे. त्याचबरोबर धर्मशास्त्रात स्त्रियांना दुर्गुणी म्हटलेलं आहे. त्या मायावी, खोटारड्या आणि आत्मकेंद्रित असतात असं सांगितलं गेलं आहे. महाभारतातल्या ‘स्त्रीस्वभावकथनम’ वगैरे प्रकरणांत स्त्रियांची बदनामी केलेली आहे. त्याचबरोबर स्त्रियांना परावलंबी बनवल्यामुळे त्यांचं स्वातंत्र्यही हिरावलं गेलं आहे. ‘स्त्रियेचे शरीर पराधीन देह। न चले उपाय विरक्तीचा ।।’ स्त्रीदेह पराधीन बनवला गेल्यामुळे विरक्तीचा उपायही चालत नाही. त्यामुळेच अनेकार्थांनी स्त्रीजन्म परमार्थाला प्रतिकूल ठरवला गेला. ‘बहिणी म्हणे ऐसा स्त्री देह घातकी। परमार्थ या लोकी केवी साधे।।’ साधुसंतांच्या वारकरी परंपरेत मात्र तसं नाही. त्यांनी स्त्रियांनाही परमार्थाचा अधिकार पुरुषांच्या बरोबरीने दिला आहे. त्यामुळेच ‘स्त्री जन्म म्हणवूनी न व्हावे उदास। साधुसंता ऐसे केले मज ।।’ असं जनाबाई ठामपणे म्हणतात.
जनाबाईंनी साधुसंतांच्या मदतीने स्त्रीजन्माच्या न्यूनगंडावर मात केली. त्याचप्रमाणे दासी म्हणून येणारी जी न्यूनत्वाची भावना असते तिलाही छेद दिला. मी संतांच्या घरची दासी आहे असं अभिमानाने जनाबाई सांगतात. दासी असूनही त्यांना विठोबाने प्रेमकळा दिली. देवाचं प्रेम जनाबाईंना मिळालं. त्याच बळावर त्यांनी दासीभावावर मात केली. त्याचबरोबर त्यांना पूर्वपरंपरेतही एक आधार मिळाला. तो होता विदुराचा. विदुर दासीपुत्र असूनही भगवंतांचे प्रेम मिळवू शकला. त्याचप्रमाणे दासी असूनही मला विठोबाची प्रेमकळा मिळाली असं जनाबाई सांगतात. जनाबाईंनी त्यांच्या कुळाचं नातं विदुराशी जोडताना त्यांना सात्विक असं विशेषण लावलं आहे. विचित्रवीर्याच्या पत्नीला नियोगाने दोन मुलं झाली. त्यातला पहिला धृतराष्ट्र आणि दुसरा पंडू. या नियोगासाठी व्यासांना बोलवण्यात आलं होतं. त्यावेळी व्यासांपासून राजदरबारातील एका दासीलाही मुलगा झाला. तो मुलगा म्हणजे विदुर. त्यामुळे विदुर दासीपुत्र ठरले. विदुर हे राजनितीज्ञ होते, त्याचबरोबर ते ब्रह्मज्ञानीही होते. वास्तविक पाहता ब्रह्मज्ञानाचा अधिकार फक्त उच्चवर्णीय पुरुषांना आहे. विदुर उच्चवर्णीय नसतानाही त्यांनी प्रयत्नाने ब्रह्मज्ञान मिळवलं. धृतराष्ट्रांनी एकदा विदुरांना ब्रह्मज्ञान देण्याची विनंती केली. ब्रह्मज्ञानाच्या उपदेशाचा अधिकार विदुरांना नव्हता. तो फक्त ब्राह्मणांना होता. त्यामुळे सनत्सुजात या ब्राह्मणांना विदुरांनी आमंत्रित केलं. त्यांनीच धृतराष्ट्रांना ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला. याप्रकारे विदुरांना जन्माधिष्ठित अधिकारभेदाचा सामना करावा लागत होता. ब्रह्मज्ञानाच्या मार्गातल्या या अधिकारभेदाचे लचांड भक्तीमार्गात मात्र नव्हते. त्यामुळेच भक्तीमार्गात विदुरांना मोठा अधिकार मिळाला. त्यांच्या भक्तीप्रेमाला प्रत्यक्ष कृष्णही भाळला. त्यामुळेच भगवान श्रीकृष्णानी विदुरांच्या म्हणजे एका दासीपुत्राच्या घरी आवडीने कण्या खाल्ल्या. देवाजवळ कोणताही भेदभाव नाही. उच्चनीचता नाही. स्वाभाविकच वारकरी संतांना विदुराविषयी आत्मीयता होती. बहुतेक संत शूद्रातिशूद्र जातवर्णातून आणि त्याचप्रकारच्या खालच्या मानल्या गेलेल्या सामाजिक प्रवर्गातून आलेले होते. त्यामुळे वारकरी संतांच्या साहित्यात पुराणकाळातील अशा खालच्या मानल्या गेलेल्या जातवर्णातील भक्तांचा सतत उल्लेख येतो. संतांनी दैत्यकुळातील प्रल्हाद, अजामेळा, वैश्य तुळाधार, गोपाळ, गोपिका, गणिका, वाल्ह्या कोळी आणि भिल्लीण शबरी अशा अनेक भक्तांची उदाहरणं दिलेली आहेत. त्यात विदुरांचंही उदाहरण सतत दिलं गेलेलं आहे. ‘उच्चनीच काही नेणे भगवंत। तिष्ठे भावभक्त देखोनिया ।।’ अशी सुरुवात असणारा तुकोबारायांचा एक अभंग आहे. त्यात पुराणकाळातल्या, वारकरी संप्रदायातल्या आणि उत्तर भारतातल्या काही संतांचे उल्लेख आहेत. त्यात पहिलाच उल्लेख विदुरांचा आहे. ‘दासीपुत्र कण्या विदुराच्या भक्षी।’ असा विदुरांच्या घरी कण्या खाल्ल्याचा संदर्भ येतो. वास्तविक पाहता उच्चवर्णीयांनी खालच्या मानल्या गेलेल्या लोकांच्या घरी अन्नपाणी खाऊ-पिऊ नये असा धर्मशास्त्राचा दंडक आहे. तो वारकरी संप्रदायाला मान्य नव्हताच. त्यामुळेच दासीपुत्र विदुरांच्या घरी कृष्णाने कण्या खाल्ल्या ही बाब वारकरी संतांसाठी महत्त्वाची होती. त्यांनी हे उदाहरण देत आंतरजातीय सहभोजनाचा आणि त्यानिमित्ताने सामाजिक समतेचाच विचार मांडला. विदुराच्या घरी कृष्णाने कण्या खाल्ल्या त्या नाईलाजाने नव्हे तर जाणीवपूर्वक. मुळात उपासमारीने मरण्याची वेळ आली तरी खालच्या मानल्या गेलेल्या जातीतल्या व्यक्तींच्या घरी अन्नपाणी घेऊ नये असं धर्मशास्त्र सांगतं. त्याची काटेकोर अंमलबजावणीही होत होती. कृष्णानी विदुरांच्या घरी कण्या खाल्ल्या त्या उपासमारीची वेळ आली म्हणून नव्हे तर प्रेमभाव प्रकट करण्यासाठी. तोच धागा पकडून तुकोबाराय लिहितात, ‘काय उपवास पडिले होते। कण्याभोवते विदुराच्या ।।’
जनाबाई दासी होत्या तर विदुर दासीपुत्र होते. दोघेही भक्तीच्या बळावर समाजात वंदनीय ठरले. विदुरांच्या घरी कृष्णाने जेवण केलं तसं जनाबाईंच्या घरीही पंढरीरायाने जेवण केलं अशी कथा आहे. त्यामुळेच वर्णाभिमानाचा फोलपणा सांगताना तुकोबाराय विदुरांघरी कृष्णाने कण्या खाल्ल्याचा दाखला देतात, तसाच जनाबाईंच्या घरी विठ्ठल जेवल्याचाही दाखला देतात. ‘नामयाची जनी कोण तीचा भाव। जेवी पंढरीराव तिच्यासवे।।’ असं तुकोबाराय म्हणतात. स्वाभाविकच जनाबाईंना त्यांच्या कुळाचं नातं विदुरांशी जोडावं वाटलं. त्यामुळेच त्यांनी ‘विदुर सात्विक माझीये कुळीचा। अंगीकार त्याचा केला देवे ।।’ असं म्हटलं. त्यांचं दासीपण त्यांच्या कर्तृत्वाला आणि विठ्ठलभक्तीला अडसर ठरत नाही हे त्या दाखवून देतात.
अभंगाच्या पहिल्या चरणात जनाबाईंनी स्त्रीत्वाच्या न्यूनत्वावर मात केल्याचं सांगितलं. दुसर्‍या आणि तिसर्‍या चरणात विदुराच्या कुळाशी नातं जोडत कर्तृत्वाचा संबंध ‘दास-स्वामी’ या उच्चनीचभावाशी नाही हे दाखवून दिलं. चौथ्या आणि पाचव्या चरणात त्यांनी जातकुळाची माहिती नसलेल्या कर्तृत्ववान भक्तांची यादी सादर केली आहे. त्यातून जनाबाईंनी त्यांचे अकुळीपणही कर्तृत्वाच्या आणि भक्तीच्या आड येत नाही, हे दाखवून दिलं. अकुळी म्हणजे जातकूळ माहित नसलेला. जनाबाईंना बालपणी त्यांच्या आईवडिलांनी पंढरपुरात सोडून दिलं होतं. त्यामुळे त्यांना त्यांच्या जातकुळाचा पत्ताच नव्हता. जनाबाईंनी अशा अकुळी भक्तांच्या यादीत एका गणिकेचं उदाहरण दिलं आहे. गणिकेला जातकूळ नसतं. पुराणात एक गणिका भक्तीमुळे उद्धरून गेल्याचा उल्लेख आहे. तेच उदाहरण जनाबाईंनी दिलंय. त्याचबरोबर त्यांनी ऋषीमुनींच्या अकुळीत्वाचा निर्देश सूचकरीतीने केला आहे. बहुतेक ऋषीमुनी हे अकुळीच आहेत. त्यांना जातकूळ नाहीच. जनाबाईंनी त्यांचा नामनिर्देश केला नसला तरी इतर संतांनी केलाय. सोपानकाकांनी ज्ञानेश्वर माऊलींना हेच सांगितलं होतं. ज्ञानदेवादी भावंडांना ‘संन्यासाची पोरं’ म्हणत हिणवलं जात होतं. त्यापासून सुटका करून घेण्यासाठी मुंजीची गरज होती. अशा मुंजीला आळंदीचे तत्कालीन ब्रह्मवृंद परवानगी देत नव्हते. त्यांनी त्यासाठी पैठणच्या धर्मपीठाकडून शुद्धीपत्र आणण्याचा आदेश दिला होता. कुळाचे शुद्धीपत्र आणण्यासाठी ज्ञानदेवांनी पैठणला जाण्याची तयारी दाखवली, तेव्हा सोपानकाकांनी शुद्धीपत्राची गरज नसल्याचं ज्ञानदेवांना सांगितलं. त्यासाठी त्यांनी अशा अकुळी ऋषीमुनींची यादी दिली. नामदेवरायांनी हा सगळा प्रसंग आणि त्यावेळी सोपानकाकांनी दिलेली यादी नोंदवून ठेवली आहे. ‘दुर्वास वसिष्ठ अगस्ती गौतम। हे ऋषी उत्तम कुळीचे कैसे ।।’ असा प्रश्न सोपानकाकांनी केला. शेवटी ‘व्यास आणि वाल्मिकी कोण कुळ तयांचे। तैसेची आमचे सोपान म्हणे ।।’ असं म्हणून सोपानकाकांनी अकुळी ऋषीमुनींशी नातं जोडलं. अशीच यादी महात्मा बसवण्णांनीही दिली आहे. बसवण्णा म्हणतात ‘कोळीणीचा पुत्र नाव त्याचे व्यास। मार्कंडेय खास मातंगिचा। मंडूकाची कन्या असे मंदोदरी। जातीची थोरी काय किजे। बेरडाचे पोटी अगस्तीचा जन्म। चांभार उत्तम ते दुर्वास। कश्यप लोहार कौंडिण्य तो न्हावी। तिही लोकी बरवी प्रसिद्धी ती। म्हणे कुडलसंगमदेवा जातीश्रेष्ठत्व हाची वेडाचार ।।’ बसवण्णांनी या वचनात विविध ऋषीमुनींची उदाहरणं देत जात्याभिमान हा वेडपटपणा आहे असं म्हटलं आहे.
आपल्याकडे ‘नदीचं मूळ आणि ऋषीचं कूळ शोधू नये’ असं म्हणतात. बहुतेक ऋषी हीन मानल्या गेलेल्या कुळात जन्मलेले होते असं म्हटलं जातं. ज्या कुळांचं नाव उच्चारलं तरी ते पापमूलक मानलं जातं त्याच कुळात जन्मलेल्या ऋषीमुनींनी आपल्याला धर्माची शिकवण दिली. ‘ऋषींची कुळे उच्चारली जेणे। रौरवी तेणे वस्ती केली।।’ असं म्हणून जनाबाई तेच सांगत आहेत. स्त्री, दासी आणि अकुळी जन्म अशा तीन पातळ्यांवर जगतानाही जनाबाईंना त्याचा कोणताही न्यूनगंड वाटत नव्हता. साधुसंतांच्या प्रेरणेने त्यांनी वारकरी संप्रदायात तर अधिकार मिळवलाच, पण समाजातही त्या लोकप्रिय झाल्या. जनी हे जन या शब्दाचं स्त्रीवाचक रूप आहे. जन म्हणजे लोक. त्यामुळे जनी या शब्दाचा अर्थ डॉ. गेल ऑमवेट म्हणतात त्याप्रमाणे ‘लोकप्रिय स्त्री’ असा आहे. ‘दया करणे जे पुत्रासी। तेच दासा आणि दासी ।।’ असं तुकोबाराय म्हणतात. आपल्या मुलांवर ज्या तळमळीने दयाभाव दाखवतो तोच भाव दासदासींबद्दलही हवा, ही वारकरी संप्रदायाची भूमिका आहे. ती भूमिका तुकोबारायांच्या अभंगात आलेली आहे, ती नामदेवरायांकडे पाहूनच आली असणार, असं मला वाटतं. दासी असलेल्या जनाबाईंनाही नामदेवरायांनी सन्मान, अधिकार आणि प्रेरणा दिली. त्यामुळेच जनाबाई दुय्यमत्वभावावर मात करत उभ्या राहिल्या. आज शेकडो वर्षानंतरही त्या ‘अभंग’ आहेत.

Previous Post

गरीबांच्या शिक्षणासाठी भिक्षांदेही

Next Post

दिल्लीचे तख्त राखण्याची संधी गडकरींना मिळणार का?

Next Post

दिल्लीचे तख्त राखण्याची संधी गडकरींना मिळणार का?

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.