आज भारतातील अनेक शहरात ग्राहकांच्या मागणीनुसार गणेश शिंदे आणि त्याची टीम मशीनला सॉर्टरसाठी बसविण्यासाठी जात असते. पुण्याला ३००० स्क्वेअर फूट जागेत त्याचे काम सुरू आहे. प्लास्टिक इंजेक्शन मोल्डींग मशीनमधे इतकं परफेक्ट हाय स्पीड कस्टमाइझ ‘सॉर्टर‘ बनवणारा गणेश भारतातील एकमेव माणूस आहे हे मला गणेशच्या एका ग्राहकाने सांगितलं.
– – –
गणेश शिंदे… हे नाव व्यासपीठावर पुकारलं गेलं आणि खाली बसलेल्या शेकडो कामगारांनी गणेशला टाळ्यांच्या गजरात मानवंदना दिली. एक वर्ष उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल, मॅन्य्युफॅक्चरिंग क्षेत्रातील एका जर्मन कंपनीने पहिल्यांदाच कंपनीबाहेरील माणसाला पुरस्कार दिला होता… कोण होते हे गणेश शिंदे? त्यांना हा पुरस्कार कशासाठी आणि का दिला गेला?
जिने पुरस्कार दिला ती होती पुण्यातील एक प्लॅस्टिक कंपोनंट निर्मिती करणारी कंपनी. तिथे एक वर्षापूर्वीपर्यंत दर महिन्याला एखादा तरी अपघात होण्याचा रेकॉर्ड होता. काही अपघातांमध्ये तर मशीनमध्ये हात जाऊन हात गमावत होते कामगार. जर्मनीच्या एका कंपनीने ही कंपनी टेकओव्हर केली, तेव्हा जागतिक मानकानुसार सेफ्टी ऑडिट (सुरक्षा उपायांची पडताळणी) करून तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. हे सेफ्टीचे काम गणेश शिंदे यांना मिळाले. मशीनवर कामगाराचे दोन्ही हात बिझी राहावेत अशा पद्धतीने मशीन डिझाईन केली होती; पण, कामगारांचा कल मात्र एका हाताने काम करत मशीनच्या दुसर्या बटणाला एखादे लाकडी फळकूट लावून दुसरा हात फ्री ठेवण्याकडे असायचा. याच चुकीच्या सवयीमुळे अनवधानाने मोकळा हात मशीनमध्ये जाऊन अपघात होत असत. यावर उपाय म्हणून गणेशने हाताच्या दाबाने एकाच वेळी दोन्ही बटण दाबली तरच मशीन सुरू राहील, चुकून हात मशीनमध्ये गेला तर सेन्सरद्वारे मशीन ताबडतोब बंद पडेल, असे सेफ्टी डिझाईन बनविले. कंपनीचे उत्पादन, कामगारांची मानसिकता, उपलब्ध सोयीसुविधा यांचा बारकाईने विचार करून, गणेशनी १२ उपाययोजना आखल्या. त्याच्या या नावीन्यपूर्ण सुरक्षा उपायांमुळे नंतरचे तीनशे पासष्ट दिवस या कंपनीत शून्य अपघात झाले आणि याच कामगिरीबद्दल त्यांना गौरविण्यात आलं. यानंतर गणेशना या कंपनीच्या रेफरन्सने विविध कंपन्यांमध्ये काम मिळालं. गणेश शिंदे यांचा मशीन सेफ्टी सर्व्हिसेससोबतच, प्लॅस्टिक इंजेक्शन मोल्डिंग मशीनमधे हाय स्पीड क्वालिटी रिजेक्शन ‘सॉर्टर‘ बनवविण्याचाही उद्योग आहे.
हे सॉर्टर प्रकरण म्हणजे नक्की काय आहे हे समजून घ्यायला आपण आपल्या रोजच्या जीवनातील उदाहरणे घेऊ. भाजी विकत घेताना आपण चांगल्या क्वालिटीची भाजी निवडतो आणि डाग असलेली, खराब दिसणारी भाजी वेगळी करता. हेच वर्गीकरण (सॉर्टिंग) कोणत्याही वस्तूनिर्मितीत आवश्यक असतं. आधी हे वर्गीकरण माणसे डोळ्यांनी पाहून करत असत. पण, जसजशी टेक्नॉलॉजी प्रगत होत गेली, तसतसा वस्तूनिर्मितीचा वेग प्रचंड वाढला. त्यामुळे मशीनद्वारे अत्यंत जलदगतीने निर्मिती होणार्या वस्तूंचे डोळ्यांनी पाहून हाताने वर्गीकरण करणे हे काम माणसाच्या आवाक्याबाहेरचे झाले… आणि माणसाची जागा मशीन सॉर्टरने घेतली.
पेपरबोट या प्रसिद्ध कंपनीच्या ज्यूस पाऊचचे झाकण गणेश यांचे एक क्लायंट बनवतात. ती मशीन सात सेकंदात चाळीस झाकणं बनवते. एखाद्या झाकणामध्ये अगदी सूक्ष्म गडबड झाली तरी ते झाकण ज्यूस पाऊचला नीट बसणार नाही आणि ज्यूस इतर मालावर सांडून नुकसान होऊ शकतं. मालाची गुणवत्ता कायम राखणे हे वस्तूनिर्मिती क्षेत्रासाठी मोठे चॅलेंज असते. असे अनेक पार्ट एक्स्पोर्ट देखील होतात, त्यात काही पार्ट खराब आढळले तर कंपनीचं नाव खराब होऊन संपूर्ण ऑर्डर कॅन्सल होऊ शकते. असे प्रकार घडू नयेत यासाठी कोणतीही वस्तू बनवताना हायस्पीडवर त्यातील खराब वस्तू अचूकपणे बाजूला काढून टाकणं हे ‘सॉर्टर’चे काम आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार वेगवेगळ्या पार्टसाठी वेगवेगळे तंत्रज्ञान वापरून गणेश त्या मशीनसाठी सॉर्टर बनवतात.
पर्यावरणाच्या दृष्टीने आपण कितीही नको म्हटलं तरीही प्लास्टिकने आज आपलं जीवन व्यापले आहे. खाद्य, वैद्यकीय, वाहन, विमान, संगणक, वीज… असं कोणतेही क्षेत्र नाही ज्यात प्लास्टिकने बनलेले भाग वापरले जात नाहीत. प्लास्टिकचे अनेक लहान मोठे भाग बनवण्यास कठीण, गुंतागुंतीचे असतात. ते इंजेक्शन मोल्डिंग मशीनने बनवले जातात. या मशीन्स बनवणार्या जपान, जर्मनीमधील कंपन्या आपल्या मशिनला बाहेरील माणसाला कधीच हात लावायला देत नाहीत. परंतु, भारतात त्यांनी कोणालाही मशीन विकली की सॉर्टर गणेशकडून विकत घ्या हे सांगितलं जातं. देशभरात अनेक औद्योगिक शहरांतील कंपन्यांना गणेश सेवा पुरवत आहेत. हे प्रॉडक्ट डेव्हलप होण्यासाठी गणेश यांचा अनेक वर्षांचा अनुभव आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत घेतलेलं शिक्षण कामी आलं आहे.
गणेशचा जन्म सोलापूर येथे २३ सप्टेंबर १९८५ रोजी झाला. वडील वसंत शिंदे हे लक्ष्मी-विष्णू मिलमध्ये कामगार होते. १९९२ला मिल बंद पडली, घरची परिस्थिती हलाखीची होती. तेव्हा त्यांनी कुटुंबाची जबाबदारी पेलताना रोजंदारीवर अनेक कष्टाची कामे केली. २००१ साली गणेश दहावी झाला. गव्हर्नमेंट डिप्लोमा कॉलेज इंजिनियरिंगला सहज प्रवेश मिळेल इतके चांगले मार्क होते. वडिलांसोबत जाऊन त्याने दीडशे रुपयांचा डिप्लोमाचा फॉर्म विकत घेतला. दुसरा फॉर्म आयटीआय संस्थेचा विकत घेतला, त्याची किंमत होती फक्त पंधरा रुपये. या प्रसंगाबद्दल गणेश म्हणतात, ‘त्या एका शून्याने माझं आयुष्य बदलून गेलं, शून्याची काय ताकद असू शकते हे त्यामुळे कळलं. घरी आल्यावर वडील म्हणाले, फॉर्मच्या किंमतीमधेच दहा पट फरक आहे तर डिप्लोमा शिक्षणाचा खर्च किती पटीत जास्त असेल? खरं तर मला स्कॉलरशिप मिळून डिप्लोमा शिक्षण मोफत झालं असतं; पण तेव्हा ही माहिती देणारं कुणी आजूबाजूला नव्हतं. पंधरा रुपयांचा फॉर्म मला आयटीआयमध्ये (इलेक्ट्रॉनिक्स) घेऊन गेला.
घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे शिक्षण घेत असताना बाहेर वायरिंगची कामं केली. २००३ साली आयटीआय कोर्स पूर्ण झाला. दोन वर्षाचं आयटीआयचे शिक्षण आणि प्रॅक्टिकल नॉलेजसाठी कोणत्याही कंपनीत एक वर्षाची अप्रेंटिसशिप असा तीन वर्षाचा हा कोर्स असतो. त्यानंतरच आयटीआय सर्टिफिकेट हातात मिळतं. चांगल्या कंपनीत अप्रेंटिसशिप करायला मिळाली, तर कायमस्वरूपी नोकरी मिळवण्यासाठी खूप फायदा होतो, त्यामुळेच सोलापूरपेक्षा मुंबई किंवा पुणे अशा ठिकाणी जाऊन अप्रेंटिसशिप करण्याचा आमच्या भागातील मुलांचा कल असायचा.
मला काही सिनिअर विद्यार्थ्यांकडून कळलं की ‘सेंचुरी एन्का‘ या पुण्यातील कंपनीत सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण फुकट मिळतं. त्यामुळे जर इथे काम मिळालं तर आपल्या दोन वेळच्या जेवणा-खाण्याचा प्रश्न सुटू शकतो. मी पुण्याला एका सख्ख्या नातेवाईकाकडे उतरलो, पण तिथे फार चांगला अनुभव आला नाही. आणि सेंचुरी एन्का या कंपनीत इंटरव्ह्यूसाठी गेल्यावर पाहतो तर काय, ग्रामीण भागातून माझ्यासारखे शेकडो मुलं इथं इंटरव्ह्यूला आली होती. नोकरीसोबत दोन वेळच्या मोफत जेवणाची स्कीम गावागावांतील आयटीआय झालेल्या मुलांना इथे रांगा लावायला भाग पाडत होती. मी अर्ज देऊन घरी परतलो. काही दिवसांनी मला कंपनीतून इंटरव्यूचं लेटर आलं. भोसरीला लांबचे नातेवाईक राहात होते, त्यांच्याकडे गेलो. नानासाहेब राऊत आणि काकूंनी मोठ्या मनाने माझं स्वागत केलं. त्या म्हणाल्या, अरे तू आमच्या मुलासारखाच आहेस, इथे कितीही दिवस राहा. सेंचुरी एन्कामधे इंटरव्ह्यू चांगला झाला. मी सोलापूरला परतलो. काही दिवसांनी सेंचुरी एन्कामधून जॉयनिंग कॉल आला. मी सोलापूरहून एसटीच्या टपावर सायकल टाकून निघालो. बालाजी हॉटेलमध्ये कॉट बेसिसवर ३०० रुपये महिना देऊन जागा घेतली आणि सेंचुरी एन्कात रुजू झालो. हजार रुपये स्टायपेंड मिळत होतं. ज्या हॉटेलला रहायचो, तेथील मालकाचा मुलगा रोज दारू पिऊन पैसे मागायचा. मी मालकांकडे तक्रार केली पण काही उपयोग झाला नाही. मी कंपनीत काही मित्रांना सागितलं की मला कमी पैशात राहायला जागा हवी आहे. एका मित्राने सल्ला दिला, हॉटेलमध्ये काम कर. तुझ्या रात्रीच्या जेवणाचा खर्च भागेल, वर पगारही मिळेल. भोसरीमधील एका हॉटेलमध्ये भांडी घासायची नोकरी धरली. हॉटेलची साफसफाई करून झोपायला रात्रीचा एक वाजायचा. हे काम १५ दिवस केलं. एक दिवस हॉटेलचा कचरा टाकत असताना त्या कचर्याच्या डब्याचा पत्रा माझ्या पायाला लागला आणि पायाला दीड इंचाची जखम झाली. मी विचार केला, बरं झालं थोडक्यात निभावलं; काही मोठा अपघात झाला तर इथे आपली काळजी घेणारं कुणी नाही. पगार कमी मिळाला तरी चालेल, पण इजा होईल असं काम करायचं नाही. हॉटेलची पार्ट टाईम नोकरी सोडून, जुगाड करून औंधच्या आयटीआय हॉस्टेलमध्ये राहण्यासाठी जागा मिळवली. संध्याकाळच्या जेवणाचा खर्च काढण्यासाठी पॅनल लॅम्प सोल्डरिंग करायचा एक पार्ट टाइम जॉब शोधला, तिथे सातशे रुपये पगार मिळायचा.
अप्रेंटिसशिप संपत आली होती. सेंचुरी एन्काच्या आवारातच ‘वॉर्टसीला’ नावाच्या फिनलंडमधील कंपनीचे वर्कशॉप होते. या कंपनीत नोकरी मिळते का याची चाचपणी सुरू केली आणि रोज तेथील साहेबांना भेटायला लागलो. माझ्या प्रयत्नाला यश लाभून तिथे मला मोठ्या आकाराच्या (४ मेगावॉट) डिझेल जनरेटरवर ऑपरेटर म्हणून नोकरी मिळाली. जनरेटरचा आवाज इतका कर्णकर्कश्श होता की कानठळ्या बसू नयेत म्हणून कानात कापूस घालूनच मशीनजवळ जावं लागायचं. खिशात कॉटन वेस्ट, हातात डायरी पेन घेऊन दर तासाला मशीनचे रीडिंग घेणे हे माझं काम होतं. जनरेटरमध्ये कुठे डिझेल गळती तर होत नाही ना याची खातरजमा करणं आणि छोटी मोठी मेंटेनन्सची कामं मी तिथे करत होतो. इथे मला पगार होता ३२०० रुपये. यावर वडिलांचं म्हणणं होतं की सोलापूरला तुला तीन हजार पगाराची नोकरी सहजच मिळेल, मग तू पुण्याला दोनशे रुपयांसाठी हालअपेष्टा सहन करून काम का करतोयस? पण आपल्याला सोलापूरमध्ये भविष्य नाही हे माझ्या डोक्यात फिट होतं, त्यामुळे पैसे किती मिळतायत यापेक्षा शिकायला काय मिळणार आहे हे माझ्यासाठी जास्त महत्वाचे होते. त्यामुळे वडिलांशी वाद न घालता मी नोकरी सुरूच ठेवली.
फक्त आयटीआय कोर्सवर आपल्याला कधीच मोठं पद मिळणार नाही, आपण आयुष्यभर कामगारच राहू, हे कंपनीत काम करताना लक्षात आलं. कामगार ते कंपनी स्टाफ हा पल्ला गाठण्यासाठी डिप्लोमा करण्याचा निर्णय घेतला, पण शिक्षणासाठी नोकरी सोडणे शक्य नव्हतं, त्यामुळे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला चार वर्षं कालावधीच्या पार्टटाईम डिप्लोमा कोर्ससाठी प्रवेश घेतला. मी आयटीआय करताना इलेक्ट्रॉनिक्स शिकलो होतो. आता नवीन विषयाची माहिती करून घ्यावी म्हणून जाणीवपूर्वक डिप्लोमाला इलेक्ट्रिकल हा विषय निवडला.
नोकरी सांभाळून शिक्षण सुरू होतं. कामावर अनेक अनुभवी लोकांकडून ‘मेन्टेनन्स’ डिपार्टमेंटला खूप शिकायला मिळतं हे ऐकायला मिळायचे. एका मित्राकडून इंडोरंस या कंपनीत इलेक्ट्रेशिअनच्या पोस्टसाठी वेकन्सी आहे हे कळलं. ही बजाज मोटर्सची सप्लायर कंपनी होती. यांचे भारतात २२ प्लॅन्ट होते. इथे नोकरी करण्यात दोन अडचणी होत्या. एक तर ही कंपनी माझ्या डिप्लोमा कॉलेजपासून चौतीस किलोमीटर लांब होती आणि आधीच्या तुलनेत पगार चारशे रुपये कमी होता. इंटरव्ह्यू झाल्यावर डायरेक्टर साहेबांकडे मला नेण्यात आलं. त्यांनी माझे पेपर्स पाहून मॅनेजरला विचारलं, याचं शिक्षण तर इलेक्ट्रॉनिक्स विषयात झालंय आणि ही पोस्ट तर इलेक्ट्रिकलमधली आहे, याला नोकरी कशी देणार? मॅनेजरने सांगितलं, ‘मी गणेशला जनरेटरबद्दल काही तांत्रिक प्रश्न विचारले. आपल्याकडे इंटरव्ह्यू द्यायला आलेल्या इलेक्ट्रिक इंजिनिअरना उत्तर देता आलं नाही, ते या मुलाने दिलं…‘ आणि माझी निवड झाली (मी दीड वर्ष जनरेटरवर ‘डोळसपणे‘ काम केलं असल्यामुळे मला उत्तरं देता आली). एवढ्या मोठ्या कंपनीत ‘मेन्टेनन्स’ करायला मिळणार आहे म्हणून पगार कमी असूनही मी हो म्हटलं.
आमची कंपनी बजाजची व्हेंडर होती. त्या काळात बजाजचे अनेक नवीन मॉडेल लॉन्च होत होते. वेगवेगळ्या मॉडेल्सचे असंख्य प्रकारचे लहान मोठे पार्ट तिथे एकत्र करून बाईकचे शॉकअॅब्झॉर्बर बनवले जायचे. कोणत्याही औद्योगिक कारखान्यात असेंब्ली लाइन (सरकता पट्टा) आणि स्टेशन (जिथे पार्ट जोडले जातात) हे दोन प्रमुख भाग असतात. इंडोरंस कंपनीत एक असेंब्ली लाइन आणि २० स्टेशन्स होते. या स्टेशनवर एका शॉकअॅब्झॉर्बरचा पार्ट चुकून दुसर्या शॉकअॅब्झॉर्बरला लागला अशा घटना घडायच्या. मीटिंगमधे माझ्या मॅनेजरला हे प्रॉब्लेम सांगून त्यावर उपाय शोधायला सांगितलं जायचं. नेहमीच्या कामाव्यतिरिक्त नवीन काम अंगाला लावून घ्यायचं नाही अशी त्यांची पद्धत होती, त्याप्रमाणे हे काम आम्हाला जमणार नाही असं ते मीटिंगमधे सांगायचे. नवीन कामगारांकडून एखादं काम काढून घ्यायला साहेब लोक फार गोड बोलतात. मी नाईट ड्युटीमध्ये काम करत असताना क्वालिटी मॅनेजर खांद्यावर हात ठेवून मला विचारायचे, ‘गणेश, हा असा असा प्रॉब्लेम आहे, यावर काही उपाय करता येईल का?‘ मॅनेजरने मीटिंगमध्ये यांना काय सांगितलं आहे हे मला माहीत असण्याचा प्रश्नच नसायचा. ‘मी प्रयत्न करून बघतो सर‘, असं म्हणून मी त्या अडचणीवर मात करण्यासाठी काहीतरी जुगाड शोधायचो. मशीन बिघडलं की मशीनखाली जाऊन त्याची तपासणी करायचो. शक्य झालं तर ती लगेच दुरुस्त करून द्यायचो. दुसर्या दिवशी मॅनेजर माझी खरडपट्टी काढायचा. ‘या लाखो रुपयांच्या ‘कॉम्प्युटराइज्ड न्युमरिकल कंट्रोल‘ (सीएनसी) मशीनचे फंक्शन मला कळत नाही, तर तू कशाला यात हात घालतोयस? उद्या काही कमी जास्त झालं तर काय करशील‘. पण त्या वयात आपण कशालाच भीत नसतो. रोज मला वेगवेगळ्या विभागातून कॉल यायचे, इलेक्ट्रॉनिक असो की इलेक्ट्रिकल की मेकॅनिकल- जो प्रॉब्लेम दिसेल त्याला भिडायला लागलो.
खरं तर, मोठ्या मशीनमधे काहीही प्रॉब्लेम आला तर सर्व्हिस इंजिनिअरला बोलावण्याची पद्धत आहे. पण बर्याचदा तो दोन दिवसांनी यायचा. तोपर्यंत त्या मशीनद्वारे होणारे उत्पादन बंद राहायचे आणि याची जबाबदारी यायची क्वालिटी मॅनेजरवर. तो मला सांगायचा की तुला जमतं का बघ. मी काही मदतीसाठी आमच्या मॅनेजरकडे गेलो की तो रागावून बोलायचा, ‘तुला भारी हौस आहे ना तूच ते काम कर, माझ्याकडून तुला काहीही मदत मिळणार नाही.‘ गुरुवारी फॅक्टरी बंद असताना
शॉपमधून काही टाकाऊ सामानातून पार्ट शोधून, मदतीला फिटरला घेऊन मी इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल अशी वेगवेगळी कॉम्बिनेशन्स करून त्या मशीन्समधील अडचणी शोधून मशीन दुरुस्त करायचो. या कंपनीत तंत्रज्ञ म्हणून माझा सर्वांगीण विकास झाला. मी काम करत होतो तोपर्यंत माझ्या शिफ्टमध्ये कधीही काम अडलं म्हणून मॅनेजरला बोलवायला लागलं नाही.
हे सगळं सांभाळून डिप्लोमा शिक्षण देखील सुरू होतं. डिप्लोमाची फायनल परीक्षा पार पडली, तेव्हा मी या नोकरीचा राजीनामा देऊन बाहेर पडलो. कंपनीने थांबवण्याचा प्रयत्न केला पण इथे जे शिकण्यासारखं होतं, ते शिकून झालं होतं. नवीन नोकरी शोधायला वेबसाइटवर नोंदणी केली. मला इंटरव्ह्यूसाठी कॉल आला. मी कोरेगाव पार्कमध्ये ‘डायमेन्शन
टेक्नोलॉजी’ कंपनीच्या पॉश ऑफिसमध्ये मुलाखत द्यायला गेलो. त्यांनी वेगवेगळ्या विषयांचे बरेच प्रश्न विचारले, मी उत्तरे देत होतो. मध्येच त्यांनी टेक्निकल डायरेक्टरना बोलावून घेतलं, त्यांनी काही आकृत्या काढायला सांगितल्या. मी त्याही काढून दाखविल्या. एका तासानं मुलाखत संपली. ते म्हणाले, ‘तू सगळ्या प्रश्नांची उत्तरं बरोबर दिलीस, मेकॅनिकल इंजिनिअरिंग तू कोणत्या कॉलेजमधून केलं आहेस?. मी म्हणालो सर, मी इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स या विषयात शिकलो आहे. हे ऐकून त्यांना शॉकच बसला, ते म्हणाले, ‘आधी इंटरव्ह्यू देऊन गेलेले, अनुभवी मेकॅनिकल इंजिनिअर उत्तरं देऊ शकले नाहीत, ती उत्तरे तू कशी दिलीस हे मला आधी सांग.‘ मी त्यांना माझ्या आधीच्या कामाची माहिती देऊन सांगितलं की मला हे काम येत असलं, तरीही मला असेंब्ली कामाची नोकरी करायची नाही. मला पीएलसी (प्रोग्रामेबल लॉजिक कंट्रोलर) प्रोग्रामर बनायचं आहे. आजवर बंद पडलेली मशीन मी दुरुस्त करत होतो. पण आता मला मशीनचे प्रोग्राम कसे बनवायचे हे शिकायचं होतं. हे काम देणार असाल तरच मी इथे नोकरी करेन. ते म्हणाले, ‘तुला एचआर डिपार्टमेंटने चुकून कॉल पाठवला होता, पण मला तू आमच्या कंपनीत हवा आहेस.’ त्यांनी कंपनीतील जागा नसतानाही पद निर्माण करून मला नोकरी दिली. माझ्या हातात नियुक्तीपत्र देताना ते म्हणाले, ‘इंडस्ट्रीत खरं तर नोकर्या मुबलक आहेत, उपलब्ध जागांवर काम मागायला पुस्तकी शिक्षण घेतलेली मुलं येतात आणि स्किल असलेली मुलं आम्हाला मिळत नाहीत, हा खरा प्रॉब्लेम आहे.‘
या कंपनीत मी वर्करमधून स्टाफ मधे गेलो. पगार वाढल्यावर थोडं फार राहणीमान बदललं. आधी वर्करसोबत राहात होतो, आता चार इंजिनिअरसोबत रूम शेअर करायला लागलो. चारपैकी दोन जण मेकॅनिकल डिझाईन इंजिनिअर होते. त्यांच्याकडून मेकॅनिकल डिझाईन शिकून घेतलं. मेकॅनिकल कामं मी करतच होतो आता डिझाईनही करता आल्यामुळे मी दिवसेंदिवस ‘टेक्निकली साऊंड‘ होत गेलो.
आमची कंपनी स्कोडा, कमिन्स या कंपन्यांसाठी सेमी ऑटोमेशन सिस्टम बनवून द्यायची. कंपनीत जे काम आधी बाहेरून केलं जात होतं ते काम हळूहळू कंपनीतच करायला सुरुवात झाली. मशीनचा प्रोग्राम डिझाईन करताना अनुभवात रोज नवीन भर पडत होती. साहेब कामावर खूष होते. पण काही महिन्यांनी कंपनीच्या डायरेक्टर्समध्ये भांडणं सुरू झाली. पगार थकायला लागला, कंपनीत वाद वाढायला लागले तशी मी नोकरी सोडली. घरापासून लांब एकटा राहत असताना माझे चुलत चुलते राजाभाऊ शिंदे यांनी मला वडिलांच्या मायेनं संभाळून घेतलं, घरची आठवण आली की मी खूप वेळा त्यांच्याकडे राहायला जायचो. काकूंनी स्वतःच्या लेकरांपेक्षा जास्त मायेने मला भरपूर खाऊ घातलं आहे.
एक दिवस ओळखीतील तीन मित्रांची नवीन कंपनी सुरू करण्याची चर्चा कानावर पडली. आजूबाजूच्या परिसरातील कंपन्यांची लहान मोठी कामं घ्यायला हवीत असा त्यांचा विचार सुरू होता. माझा डिप्लोमा पूर्ण झाला होता आणि सध्या हाताशी नोकरीही नव्हती. त्यामुळे मी त्यांना जॉइन झालो. तीनपैकी दोन मित्र नोकरी सांभाळून हा व्यवसाय पाहणार होते. एका मित्राच्या कंपनीत मागील महिन्यात एक अपघात झाला होता, मित्राकडून तेथील कामाची, जागेची माहिती घेऊन कंपनीच्या साहेबांना भेटलो. तिथे फोर क्लिपमधे सेफ्टी फीचर अॅड करायचं काम होतं. मी प्रोजेक्ट आणि डिझाईनचं पंचवीस हजार रुपयाचं कोटेशन दिलं. कोटेशन पास झाल्यावर ते काम एका आठवड्यात पूर्ण करून दिलं. या कामात फक्त पाच हजार रुपये खर्च झाला. पहिल्याच कामात आम्हाला वीस हजार रुपये प्रॉफिट मिळाला. या यशामुळे आपण योग्य दिशेने जात आहोत याची खात्री पटली. माझ्या कामातील व्यावसायिक गुणवत्ता कंपनीला इतकी भावली की त्यांनी त्यांच्या ओळखीतील अनेक माणसांना आमच्या कंपनीचं नाव सुचवलं. गुजरात आणि दिल्लीतून कामं येऊ लागली. पण दोन पार्टनर नोकरी करत असल्यामुळे प्रत्यक्षात काम करणारे आम्ही दोघेच होतो, त्यामुळे कामाचा ताण येत होता. तसेच चार पार्टनर्सचे चार विचार कामात अडथळा निर्माण करत होते. त्यामुळे काही दिवसांनी मी भागीदारी सोडून वेगळा झालो. आता यापुढे नोकरी करायची नाही हे ठरवून मिळालेल्या अनुभवातून, आपला स्वतः चा व्यवसाय सुरू करावा असा निश्चय करून ‘परफेक्ट ग्रुप‘ या नावाने कंपनी रजिस्टर केली. इंडोरन्स कंपनीत मी असेंब्ली लाइनचे एक काम केलं होतं, त्या लाइन संबंधित छोटी मोठी कामं सुरवातीला मिळाली. ही कामं करताना, आयटीडब्ल्यू कंपनीची एक सेमीऑटोमॅटिक असेम्ब्ली आणि टेस्टिंग मशीन बनविण्याची सात लाखांची ऑर्डर मिळाली. मी आयुष्यात पहिल्यांदाच इतकी मोठी ऑर्डर घेतली होती. याआधी वीस पंचवीस हजार रुपये खर्च येईल अशाच ऑर्डर्स मी करायचो. पण हे काम मला चॅलेंजिंग वाटलं आणि अनुभवाच्या जोरावर ते पूर्ण करू शकतो असा आत्मविश्वास वाटत होता.
हा प्रोजेक्ट सुरू असतानाच मला रुपाली शेलार या मुलीचं स्थळ चालून आलं. माझ्याकडे घर नसताना, स्वतःचे वर्कशॉप नसताना केवळ माझा मेहनती स्वभाव आणि वेगळं काहीतरी करण्याची धडपड पाहून तिने लग्नाला होकार दिला. लग्न झाल्यावर आम्ही पुण्यात रेंटवर फ्लॅट घेतला. एकीकडे माझ्या वैवाहिक जीवनाची सुंदर सुरुवात झाली होती तर दुसरीकडे माझा प्रोजेक्ट काही केल्या संपायचं नाव घेत नव्हता. सात लाखाच्या ऑर्डरला आतापर्यंत बारा लाख रुपये खर्च झाला होता. या प्रोजेक्टवर पूर्ण वेळ काम करत असताना इतर कामांसाठी वेळ मिळत नव्हता. मालवाल्यांची उधारी वाढत होती. एका चक्रव्यूहात अडकल्यासारखं वाटत होतं. कसाबसा एकदाचा प्रोजेक्ट पूर्ण झाला. या अनुभवानंतर यापुढे आवाक्याबाहेरचे काम घ्यायचं नाही असं ठरवलं. मशिनरी सेफ्टी प्रॉडक्ट्स आणि त्याच्या सर्व्हिसची कामं घेतली. प्रत्यक्ष फ्लोअरवर काम करताना काय अडचणी येतात हे मी नोकरी करताना अनुभवलं होतं आणि प्रत्येक ठिकाणी मी झोकून देऊन काम केलं होतं, नवे प्रयोग केले होते. त्या अनुभवाचा आता व्यवसाय करताना फायदा मिळत होता. एका कंपनीने जपानहून एक प्लास्टिक इंजेक्शन मोल्डिंग मशीन मागवली होती. त्यात बनणार्या भागांचे वर्गीकरण करणारा सॉर्टर योग्य पद्धतीने काम करत नव्हता. मी त्या कंपनीला अनेक वर्ष प्रॉडक्ट सर्व्हिस देत होतो. त्यांनी मला सॉर्टरचे काम दिले, काही दिवस अभ्यास केल्यावर, वेगवेगळे प्रयोग केल्यावर, त्या मशीनला योग्य सॉर्टर बसवण्यात मी यशस्वी झालो. या प्रयोगानंतर व्यवसायाचं एक मोठंच दालन माझ्यासाठी खुलं झालं. अनेक कंपन्यांनी संपर्क साधून मला काम द्यायला सुरुवात केली.‘
आज मुंबई, दिल्ली, कोलकाता, अहमदाबाद, चेन्नई… भारतातील अनेक शहरांत ग्राहकांच्या मागणीनुसार गणेश आणि त्याची टीम मशीनला सॉर्टरसाठी बसविण्यासाठी जात असते. पुण्याला ३००० स्क्वेअर फूट जागेत त्याचे काम सुरू आहे. प्लास्टिक इंजेक्शन मोल्डिंग मशीनमधे इतकं परफेक्ट हाय स्पीड कस्टमाइझ्ड सॉर्टर बनवणारा गणेश भारतातील एकमेव माणूस आहे हे मला गणेशच्या एका ग्राहकाने सांगितलं. गणेशला मिळालेलं यश पाहून, गेली अनेक वर्षे या इंडस्ट्रीमधील अनेक लोकांनी त्याच्या प्रॉडक्टची कॉपी करायचा प्रयत्न केला, पण आजवर त्यांना यश लाभलं नाही. तरुण वयात नोकरी करताना जास्तीचं काम अंगावर पडतंय, भरपूर काम आहे असा त्रागा करणार्या मुलांना गणेशची नोकरी ते धंदा ही वाटचाल प्रेरणादायी ठरू शकते. धंद्यात यशस्वी होऊ पाहणार्या नवउद्योजकांना गणेश, दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स (डिक्की) या राष्ट्रीय स्तरावर काम करणार्या संस्थेच्या माध्यमातून व्यवसाय मार्गदर्शन आणि पाठबळ देण्याचं काम गेली अनेक वर्षे करीत आहेत.
काही महिन्यांपूर्वी बंगलोरमधील एका कंपनीत गणेश त्याच्या टीमसोबत गेले होते. तिथे काम करताना, ‘आयआयटी’मधून इंजिनीअरिंग केलेल्या कंपनीच्या जनरल मॅनेजरसोबत बोलताना त्यांची अनेक तांत्रिक विषयांवर चर्चा झाली. या चर्चेनंतर त्यांनी गणेशना प्रश्न केला, तू कुठून आयआयटी केलं आहेस?‘ त्यावर गणेश म्हणाले, ‘सर मी ‘आयआयटीयन’ नाही, मी सोलापूरमधून ‘आयटीआय’ केलं आहे‘. ‘थ्री इडियट’ सिनेमात एक फेमस डायलॉग आहे, ‘सक्सेस के पीछे मत भागो, एक्सलन्स का पिछा करो, सक्सेस तुम्हारे पीछे आयेगा‘… मला वाटतं गणेश यांनी ते सिद्ध करून दाखवलं आहे.