नकाशावरच्या सीमा तुमच्याआमच्यासाठी आहेत. मुक्ताई त्या सगळ्यापासून मुक्त आहेत. त्यांचा प्रभाव महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून मध्य प्रदेशातही आढळतो. मुक्ताई-बुर्हाणपूर.
– – –
माणसं कागदावर रेषा ओढतात आणि दोन भाग पाडतात जमिनीच्या तुकड्याचे, राज्याचे, देशाचे आणि त्यासोबतच्या जोडलेल्या माणसांचेही. पण माणसाचे हे कोरडे व्यवहार, जमिनीवरून आणि जमिनीखालून वाहणार्या संस्कृतीच्या प्रवाहाला कुठे कळतात? संस्कृतीचा हा प्रवाह अखंड वाहत राहतो दोन देशांमधून, दोन राज्यांमधून तसाच वर्षानुवर्षं. या संस्कृतीच्या प्रवाहीपणाचा नितांतसुंदर अनुभव येतो तो बुर्हाणपूरचा परिसर फिरताना. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशाच्या सीमेवरील या परिसरात संत मुक्ताबाईंचा ठाव घेत आम्ही फिरत होतो. तापीच्या प्रचंड प्रवाहासारख्या मुक्ताई अशाच मुक्तपणे वाहत होत्या. कधी अहिराणी साजाची मराठी बोलत तर कधी माळव्यातील खानदानी हिंदी बोलत.
बुर्हाणपूर. दिल्लीकडे जाणार्या कोणत्याही ट्रेनने रावेरनंतर महाराष्ट्राची सीमा ओलंडली की बुर्हाणपूर येतं. त्याची ओळख होती मुघलांचा दक्षिणेतील दरवाजा म्हणून. या शहराच्या गल्ल्यागल्ल्यांमध्ये मध्ययुगीन इतिहास ओसडून वाहतोय. जुन्या दिल्लीत फिरावं तसा माहोल. पण या शहराची मुख्य भाषा मराठी. नावाला मध्य प्रदेश, अन्यथा बहुसंख्य वस्ती मराठी. महाराष्ट्राशी रोटीबेटीसह सगळे व्यवहार आजही तेवढेच घट्ट आहेत. पण या सगळ्या व्यवहाराहून घट्ट असणारी नाळ कोणती, तर ती मुक्ताईची.
मुक्ताईला इथे मुक्ताई म्हणण्याऐवजी आईसाहेब म्हणतात. यावरूनच हे नातं किती जिव्हाळ्याचं आहे, याची प्रतीती येते. इथल्या बहुसंख्य मराठी घरांत मुक्ताईंचा फोटो दिसतो. अनेकजण तर मुक्ताईनगरची महिन्याची वारी करणारेही आहेत. गावागावात विठ्ठल मंदिरं आहेत. तिथे वर्षभर कार्यक्रम सुरू असतात. कीर्तनाचे फड रंगतात, भजनाच्या बार्या होतात. एखाद्या मराठी मुलखातल्या गावात होतं ते ते सारं इथे होतं. फरक एवढाच की अहिराणी मराठीला अस्खलित हिंदीची फोडणी पडते आणि ‘नेहमी’ होणारी गोष्ट इथे ‘हमेशा’ होत राहते.
भाषेची सरमिसळ ही कोणत्याही सीमावर्ती भागाची ओळख. बेळगाव-कारवारातील मराठी-कानडीचे कॉकटेल जसे पुलंनी ‘रावसाहेब’मध्ये अजरामर केले. तसंच हिंदीमिश्रित मराठीचे भन्नाट कॉकटेल बुर्हाणपुरात ऐकायला मिळतं. गेल्या काही दशकांत मराठी शाळा कमी झाल्या. शिक्षणाचं माध्यम हिंदी किंवा इंग्रजी बनलं. त्यामुळे मराठी घरात बोलायची भाषा ठरली आणि तिचा लहेजा अधिकाधिक हिंदी होत गेला. तरीही इथलं मराठीपण ठाशीव आहे. हळूहळू ते बदलेल, पण मुक्ताईवरील भक्ती मात्र वाढत राहील. किंबहुना मुक्ताईला नव्या जगापर्यंत नेण्यासाठी भाषेची ही सरमिसळ कामी येईलही.
याचं उत्तम उदाहरण म्हणजे, खामनीचे संदीप महाराज. संदीप महाराज आज बुर्हाणपूरपासून इंदूर, भोपाळपर्यंत कीर्तनं, भागवत कथा करतात. ते म्हणतात, जसा गाव तशी भाषा. संदीप महाराज नुकतेच फैजपूरवरून कीर्तनसेवा करून आले होते. ते म्हणाले, `हा सगळा मराठी सरदारांचा प्रदेश. ग्वाल्हेरचे शिंदे, धारचे धार पवार आणि सर्वात मुख्य म्हणजे इंदूरचे होळकर. अहिल्याबाई होळकरांच्या एका मुलीचे नाव मुक्ताबाई होते. मध्य प्रदेशात शिंदेचे सिंदिया झाले, होळकर होलकर झाले. या सरदारांची आडनावंही बदलली, तिथे भाषेचं काय घेऊन बसलात. अवघा रंग एक झालाय. आज आम्ही कीर्तन करताना मराठी अभंगाचं निरुपण हिंदीतून करतो. त्यामुळे आज अनेक अमराठी कुटुंबंही मुक्ताईंच्या सेवेत आलीत. मुक्ताई या सीमांच्या पलीकडे आहे.`
बुर्हानपूर हे नाव बुर्हान-उद-दीन या सुफी संतावरून पडले. पण काहीजणांच्या मते मूळ नाव ब्रह्मपूर. त्यामुळे तिथेही नामांतराचा आग्रह आहेच. बोहरी मुस्लिम समाजाचं पवित्र धर्मक्षेत्र असलेलं दर्गा-ए-हकिमी बुर्हाणपुरात आहे. मध्ययुगातील फारुखी साम्राज्यात या शहराने इतिहासातील अनेक पानं लिहिली. त्यामुळे इथल्या गल्लीगल्लीत नांदणारा इतिहास गंगाजमनी तहजबीचा इतिहास आहे. इथल्या एका मशिदीमधे तर फारसी आणि संस्कृत अशा दोन्ही भाषेत लिहिलेली कुराणातील वचनं आहेत. मुक्ताई ही या गंगजमनीमधली सुप्त सरस्वती आहे. ती कोणताही संघर्ष न करता या प्रवाहातून अखंडपणे वाहत आहे.
निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई ही भावंडं तीर्थयात्रेसाठी बुर्हाणपूरामार्गे ओंकारेश्वराच्या दिशेने गेल्याचा दावा मुक्ताईंचे काही आधुनिक चरित्रकार करतात. सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये त्यांनी हरपाल भिल्लाकडे भोजन करून त्याला विठ्ठलदर्शन घडविल्याची कथा प्रचलित आहे. पुढे ओंकारेश्वर, धार, उज्जैन करत पुढे द्वारकेच्या दिशेने गेल्या, असं म्हणतात. त्याच्याशी जोडलेल्या कथाही आता रूजल्यात.
कापड उद्योग ही बुर्हाणपूरची आणखी एक ओळख. एकेकाळी मुस्लिम शासकांनी देशातील कुशल विणकर इथे वसवून हा उद्योग आणला. नंतर सरकारी सूतगिरणी एनटीसीची ताप्ती मिल आली. अनेक खासगी मिलही येथे वाढल्या. त्यातून हे ऐतिहासिक शहर उद्योगनगरी बनू लागले. पण आता या उद्योगालाही घरघर लागली आहे. बुर्हाणपूरची दिशा बदलते आहे. ती केळ्याच्या शेतीसह पर्यटनाच्या दिशेने जाते आहे. मुक्ताईचा, पर्यायाने वारकरी विचारांचा हिंदी भागातील आणि हिंदी भाषेतील प्रभाव कदाचित भविष्यात बुर्हाणपूरला नवी ओळखही निर्माण करून देऊ शकेल.
इथल्या अनेक गावांमध्ये मुक्ताई भजन मंडळं आहेत. देवळात, घरगुती कार्यक्रमात, सणासमारंभाच्या वेळी या भजनी मंडळांचे कार्यक्रम होतात. संध्याकाळी मुक्ताईचा हरिपाठ म्हटला जातो. वर्षातून एकदा हरिनाम सप्ताह होतो. त्यामुळे गावागावात मोठ्या प्रमाणात व्यसनमुक्ती झाली आहे. एकंदरीतच खानदेश सल्तनतीची एकेकाळची राजधानी असलेल्या बुर्हाणपूर परिसरावर वारकरी सांप्रदायाचा प्रभाव मोठा आहे.
हाच प्रभाव शोधण्यासाठी आम्ही दापोरा या गावात गेलो. दापोर्यात काशीबाई पाटील या आज्जींनी पतीच्या स्मरणार्थ मुक्ताईंचं देऊळ बांधलंय. या देवळामुळे दापोर्यात मुक्ताईभक्तांची गर्दी वाढतेय. इथे प्रामुख्याने गुर्जर समाज मोठ्या प्रमाणात आहे. ते हिंदी-गुजरातीमिश्रित मराठी बोलतात. केळ्यांची शेती आणि व्यापार यामुळे समृद्धी आहे. पैसा असला तरी त्यांच्या वागण्याबोलण्यातला वारकरी संस्कार ठायीठायी जाणवत राहतो.
उगीच दिखाऊ बडेजाव दिसणार नाही, पण एखाद्या सप्ताहात जर दापोर्याची पंगत असेल, तर तिथले पदार्थ फक्त बघूनच लोक खूष होतात, अशी त्यांची ख्याती आहे. नियमित कोथळी-मुक्ताईनगरची वारी, सामाजिक कार्यक्रम आणि लोकांना मदत हे या गोष्टी सतत होतात. अर्थशक्ती आणि अध्यात्म एकत्र आल्यावर काय घडू शकते हे दापोर्यात दिसते. एकमेकांचे पाय ओढण्याच्या आजच्या जगात एकमेकांच्या पाया पडणारी माणसं दिसली आणि मन निवून गेलं.
दापोर्यात आमच्यासोबत बंबाळा गावचे राजू महाराज होते. तेही गेली कित्येक वर्ष कीर्तन करताहेत. ते सांगतात की हा परिसर मुक्ताईच्या पावलांनी पवित्र झालेला आहे. हजारो वर्षं विविध सत्तांच्या प्रभावामळे इथे सांस्कृतिक सरमिसळ दिसते, तरी माणुसकीचा मूळ प्रवाह वारकरी शिकवणुकीचा आणि भागवतप्रेमाचा आहे. मुक्ताई या येथील वारकरी संप्रदायाचं शक्तिपीठ आहेत. त्यांनी ज्ञानेश्वरांना प्रेरणा दिली, तशी ती आम्हालाही देतात. म्हणूनच इथल्या घराघरांत तुम्हाला मुक्ताई दिसल्याशिवाय राहणार नाही.
राजू महाराज आम्हाला तुरक गोर्हाळ्याला तुकाराम पाटील गोराडेकर यांच्याकडे घेऊन गेले. तुकारामकाका हे पाहताक्षणी सात्विकतेचे भाव उमटावेत असे व्यक्तिमत्त्व. राजू महाराजांनी त्यांची ओळख ज्येष्ठ गायक म्हणून करून दिली. पण तुकारामकाकांनी इतर शास्त्रीय गायकांसारखं गुरूजवळ बसून गाणं शिकलं नाही. केवळ गाण्याचा ध्यास घेऊन ते शेती सांभाळून एकलव्यासारखं गाणं शिकले. आज त्यांचे आकाशवाणी, दूरदर्शनवर कार्यक्रम होतात. विशेष म्हणजे त्यांनी अनेक रागांची निर्मिती केली आहे. या रागांना विविध संगीतसंस्थांनी मान्यता दिली आहे. त्यातल्या एका रागाचे नाव आहे, `राग मुक्ताई`.
मुक्ताई रागाची गोष्टही ते अगदी मनापासून सांगतात. राग हा निर्माण करता येत नाही, तो आतमधून स्फुरतो. मी अनेक रागांची निर्मिती केली होती, त्यांना मान्यताही मिळाली होती. पण ज्या मुक्ताईच्या कुशीत आम्ही राहतो, तिच्या नावाचा एक राग निर्माण करावा असं मनापासून वाटत होतं. तशा धाटणीचे आणि तिच्या नावाला साजेसे सूर एकदा समोर दिसले आणि त्यातून राग मुक्ताई जन्माला आला. यात माझं काहीच श्रेय नाही, जे आहे ते त्या मुक्ताईंचं आहे.
तुकारामकाकांनी ताटीच्या अभंगांना संगीत दिलंय. विविध संतांचे अनेक अभंग संगीतबद्ध केलेत. या संगीतरचनांवरील त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. ती वारकरी संप्रदायातील गायक, वादकवर्गात सुपरिचित आहेत. या कामगिरीबद्दल त्यांना विविध पुरस्कार मिळाले आहेत. पण या सगळ्या पुरस्कारांमध्ये त्यांच्यासाठी मुक्ताईरत्न पुरस्कार विशेष अभिमानाचा असून, त्यांनी तो घराच्या दर्शनी भागात ठेवला आहे.
बुर्हाणपूर परिसरात अशा मुक्ताईच्या खाणाखुणा शोधत फिरताना आम्ही नाचणखेड्यात पोहचलो. तिथे राजेश पाटील यांचं सारं कुटुंब मुक्ताईच्या सेवेत होतं. या कुटुंबाकडे कोथळी मुक्ताईनगर संस्थानाच्या संत मुक्ताबाई पालखी सोहळ्यातल्या रथाच्या बैलाचा मान आहे. गेली कित्येक वर्षे त्यांचे बैल मुक्ताईची पालखी पंढरपुराकडे वाहून नेतात. या परंपरेचा राजेश पाटील आणि त्यांच्या परिवाराला प्रचंड अभिमान आहे. तो त्यांच्या शब्दाशब्दातून जाणवत राहतो.
राजेशजी म्हणाले, जे बैल रथासाठी वापरले जातात त्यांना आम्ही वर्षभर दुसरं कोणतंच काम देत नाही. यावर्षी आम्ही दीड लाखाचे दोन बैल घेतले. या नव्या बैलजोडीच्या खांद्यावरून मुक्ताईसाहेब यंदा पंढरपूरला जाणार आहेत. आमच्याकडे असलेल्या परंपरेमुळे आमच्या घरात आजवर काहीही कमी पडलेलं नाही. ही फक्त परंपरा नसून आमचं भाग्य आहे. मुक्ताईची ही सेवा आमच्याकडून वर्षानुवर्षे होत राहो, एवढीच तिच्याचरणी प्रार्थना आहे.
अशी मुक्ताईंबद्दलची कृतज्ञतेची भावना आम्हाला बुर्हाणपूर आणि आसपास सतत जाणवत राहिली. वाटेत लालबागला नंदू महाराज आणि स्टेशनजवळ संजय महाराज हे वारकरी संप्रदायाचे कीर्तनकार भेटले. ते म्हणाले, इंटरनेट वाढत चाललं आहे, तशी मुक्ताईंची भक्तीही विस्तारते आहे. आज मुक्ताईच्या पालखीत चालणार्या माणसांएवढीच माणसं डिजिटल स्वरूपात मुक्ताईंच्या फेसबूक पेजवर येत आहेत. आपल्याला वाटतं माणसं अध्यात्मापासून दूर जातात, पण प्रत्यक्षात एकटी पडत चाललेली माणसं पुन्हा एकदा मुक्ताईच्या पायाशी आधार शोधू पाहताहेत.
हे दोघेही गावातील स्थानिक मंदिरांमध्ये पूजा करतात. ते सांगतात, आम्ही रोज कितीतरी लोकांना भेटतो. लोकांचे मानसिक प्रश्न वाढताहेत. त्यांना मुक्ताबाईंच्या चरित्रामध्ये, अभंगामध्ये मानसिक आधार मिळतोय. मुक्ताईसाहेबांनी जे हाल सोसले त्या तुलनेत आपले हाल काहीच नाहीत, याची त्यांना जाणीव होते. याही परिस्थितीत मुक्ताईसाहेबांनी ज्ञानेश्वरांसाठी महायोगी घडविला. त्याला ताटीचे अभंग सांगून पुढे ज्ञानेश्वरी लिहायला उद्युक्त केले. आईसाहेबांची ही प्रेरणा पिढ्यानपिढ्यांसाठी पुरेशी आहे. फक्त आपण ती योग्य पद्धतीने लोकांपर्यंत पोहचवायला हवी.
महाराष्ट्रात मराठीतून बोलणारी मुक्ताई आज हिंदी प्रभावामुळे बुर्हाणपुरात हिंदी बोलू लागली आहे. हिंदी ही देशातील महत्त्वाची भाषा आहे. या हिंदी भाषेच्या माध्यमातून मुक्ताईंचे अभंग आणि वारकरी परंपरा जगभर पोहचू शकते. मुक्ताई आपल्या भावंडांना घेऊन बुर्हाणपूरमार्गे उत्तरेला गेल्या, तशी वारकरी विचारधाराही हिंदी भाषेच्या माध्यमातून देशभर पसरवण्याचे काम बुर्हाणपूरने करायला हवं.
संतपरंपरेचा सामाजिक सांस्कृतिक मागोवा घेणारं वार्षिक रिंगण दरवर्षी आषाढी एकादशीला येतो. दरवर्षी आषाढीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात याचं प्रकाशन होतं. प्रत्येक अंकात एका संतावर समग्र माहिती असते. २०१२ पासून संत नामदेव, संत चोखामेळा, संत जनाबाई, संत निवृत्तीनाथ, संत विसोबा खेचर, संत गोरा कुंभार, संत सावता माळी, संत सोपानदेव, संत नरहरी सोनार यांच्यावर नऊ अंक प्रकाशित झालेत. यंदा संत मुक्ताबाईंवरील विशेषांक प्रकाशित होतोय. त्यातील हा एक महत्त्वाचा लेख खास मार्मिकच्या वाचकांसाठी.
अंकासाठी संपर्क : प्रदीप पाटील ९८६०८३१७७६ / ९४२१०५५२०६