तुम्ही ‘नया है वह’ म्हणता, ते माहिती आहेच, पण, तुम्ही ‘पुराना है वह’ असं कुणाला म्हणाल?
– नितीन रांगणेकर, धानोरा
आज जे जे म्हणून ‘नया है वह’ म्हणता ते ते सगळं…
तुमच्या यशामागे कोणती महाशक्ती आहे?
– यशश्री येरूणकर, जामखेड
आईचा आशीर्वादाचा हात आणि बायकोची साथ!
तुम्हाला कोणी राज्यपाल बनवले तर काय कराल आणि काय करणार नाही?
– विनय सोनार, पारनेर
बंगल्यात बसून आराम… आणि कुणालाही शपथ देणार नाही…
झिम्माड पाऊस सुरू आहे, मस्त ब्लँकेटमध्ये गुरफटून बसून राहावं, गरम पेय (वेळेनुसार वेगवेगळं) प्यावं, झणझणीत काहीतरी खावं, नाटकाच्या प्रयोगाला दांडीच मारावी, असं कधी वाटतं का तुम्हाला?
– प्राप्ती जाधव, महाड
नाही… नाटक केलं तरच हे सगळं करता येईल…
तुम्ही आयुष्यात कुणाला गुरू मानता का? का मानता?
– रामचंद्र जोशी, गुहागर
परेश मोकाशी… त्याचा स्थितप्रज्ञ भाव.
तुम्हाला आम्ही बाहेरून पाठिंबा देतो, असं म्हणालो, तर तुम्ही सरकार बनवाल का?
– दिलीप भेंडे, रानगाव
नाही… ते कधीही पाडू शकतात…
अमेरिकेत कोणीतरी सहा सेकंदात एक लिटर सोडा पिण्याचा विक्रम केला आहे म्हणे- तुम्ही असा कोणता विक्रम करु शकाल?
– राजेश भोसले, भांडुप
कशासोबत तरी सोडा असेल तर मी कितीही आणि कितीही वेळ पिऊ शकतो…
तुम्ही एक निर्णय घेतलात आणि नेमका एक फोन आला आणि कितीही इच्छा असली तरी तो निर्णय मागे घेण्याची वेळ आली, असं कधी होतं का तुमच्या बाबतीत? कोण आहे तो रिमोट कंट्रोल?
– सुगंधा शेवडीकर, सांगली
मी काही राजकारणी नाही…
जग ही एक रंगभूमी आहे, तर आयुष्याच्या नाटकाचा नाटककार कोण आहे?
– जयंत कुलकर्णी, चिंचवड
आपण स्वत:!
एक तरी ओवी अनुभवावी, असं म्हणतात… तुम्हाला आयुष्यात अशी भावलेली एखादी ओवी आहे का?
– पांडुरंग साखरे, देहू
नाही.
दाम करी काम असं म्हणतात, सगळ्या गोष्टी पैशानेच साध्य होतात का हो?
– आर्चिस गोडबोले, सोलापूर
होय… सध्या तेच महत्वाचं आहे
आपल्या देशात अनेक निसर्गरम्य राज्ये अनेक आहेत. महाराष्ट्र सोडून कोणत्या राज्यात गेल्यावर तुम्हाला ‘काय डोंगार, काय झाडी, काय हाटेल, एकदम ओक्केमधी हाये’ असं म्हणावंसं वाटतं?
– शिवाजी पाटील, चंदगड
आता तरी आसामच.
पंढरीच्या पांडुरंगाला महाराष्ट्राच्या वतीने साकडं घालण्याचा मान तुम्हाला दिला, तर काय साकडं घालाल त्याला?
– विनोद परब, चेंबूर
सगळ्यांना सुबुद्धी दे.