शिवसेनेने ज्यांना रस्त्यावरून उचलून मोठे केले, पदे, प्रतिष्ठा, सन्मान असे सगळे दिले, शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्यांच्यावर विश्वास टाकला, अशा अगदी जवळच्या माणसांनीच दगा केला आणि महाविकास आघाडीचे सरकार कोसळले… कोरोना संकटाचा मजबुतीने सामना करून देशात आदर्श घालून देणारे, घराघरात घरचा वडीलधारा माणूस म्हणून पोहोचलेले, देश जातीय विद्वेषाच्या वातावरणात ढकलला जात असताना महाराष्ट्र शांत, दंगलमुक्त ठेवणारे आणि काँग्रेस, राष्ट्रवादीच्या साथीने राज्याच्या विकासाचे अनेक निर्णय घेणारे मुख्यमंत्री पायउतार झाले आणि महाराष्ट्र हळहळला… नवे सरकार बनवणारे, त्यात मंत्री बनलेले सगळे शिवसेनेचेच जुने नेते, आमदार पाहून सर्वसामान्य माणूस गोंधळात पडला… आता शिवसेनेचे काय होणार, असा प्रश्न शिवसेना संपावी यासाठी देव पाण्यात घालून बसलेल्या ‘हितचिंतकां’ना पडला आणि शिवसैनिक संभ्रमात असल्याचा शोधही त्यांना लागला… त्यांच्या हे लक्षात येत नाही की अशी अनेक बंडे, फितुर्या आणि वादळी संकटे यांचा सामना करून शिवसेना अडीग उभी राहिली आहे आणि खचलेल्या मराठी मनाला उभारी देत राहिली आहे… संकट आलं, आव्हान आलं की रस्त्यावरचा प्रत्येक शिवसैनिक उसळी घेतो, त्याचं रक्त सळसळू लागतं… त्याच्या मनातलं शिवबंधन अतूट आहे, तोवर शिवसेनेला कसली भीती आणि कसली क्षिती? आता सामोरे आलेल्या संकटालाही शिवसेना लोळवल्याशिवाय राहणार नाही.