प्रशांत दामले म्हणजे धमाल… त्यात जोडीला प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री वर्षा उसगावकर… म्हणजे दुधात साखरच… ही भावना साधारण ३६ वर्षांपूर्वी ‘ब्रह्मचारी’ हे नाटक पाहणार्या आम्हा तरुणांच्या (तेव्हाच्या) मनात असायची. काळ झरझर पुढे गेला, पण ही मजा काही विसरता आली नाही. आता इतक्या वर्षांनी नेमकी हीच जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसणार यासारखा दुसरा आनंद कोणता असू शकतो? होय मंडळी, प्रशांत दामले आणि वर्षा ‘सारखं काहीतरी होतंय’ या नाटकात एकत्र येत आहेत. गौरी थिएटर्स निर्मित आणि प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन प्रकाशित हे नाटक नुकतंच रंगभूमीवर आलंय.
आपलं आयुष्य म्हणजे सुग्रास व्यंजनांनी भरलेलं ताट.. त्यात प्रत्येक पदार्थाची जागा ठरलेली आणि प्रत्येक पदार्थाला वेगळी चव असते. तशीच आपल्या हृदयात आपल्या माणसांची, आपल्या नात्यांची, बदलत्या काळानुसार नातेसंबंधांची जागा असते, पण ती बदलत असते. अशा बदलांना कधी प्रेमानं, कधी रागानं, कधी हक्कानं आपलंसं करायचं असतं. नात्यातल्या याच गोडव्याची आणि थोड्या तिखटपणाची मजेशीर नोंकझोंक या नाटकात पाहायला मिळेल, असं प्रशांत दामले म्हणाले. या नाटकाचे लेखन-दिग्दर्शन संकर्षण कर्हाडे यांचे आहे.
प्रशांत म्हणाले, ही घराघरात घडणारी गोष्ट आहे. घराघरात आईवडील स्वतःच्या आवडीनिवडी, परिस्थिती, त्रास सगळं बाजूला ठेवून मुलांना आनंदाच्या आणि सुखाच्या वातावरणात वाढवण्याचा प्रयत्न करत असतात. पण मुलं मोठी झाल्यानंतर त्यांचा आयुष्य जगण्याचा आणि आयुष्याकडे बघण्याच्या वेगळा दृष्टिकोन तयार झालेला असतो. तो स्वाभाविकपणे आईवडिलांच्या दृष्टिकोनापेक्षा भिन्न असतो. या भिन्नतेचा एकमेकांशी वागण्यावर आणि संवादावर कायम परिणाम होत असतो. यावर उपाय म्हणून दोन्ही पिढ्या आपापल्या पद्धतीने आणि ‘पॉइंट ऑफ व्ह्यू’ने मार्ग काढण्याच्या प्रयत्न करत असतात आणि घरात सारखं काहीतरी घडत असतं, हीच या नाटकाची गोष्ट आहे.
वर्षा उसगावकर म्हणाल्या, नात्यातील गमती-जमती, दोन पिढ्यांच्या विचारांतील विसंगती, करिअर आणि प्रेम यांचा सुरेख मिलाफ करत गुंफलेली ही कथा प्रत्येक घराची असून प्रत्येकजण या कथेशी एकरूप होईल, असा मला विश्वास आहे. रुसवे-फुगवे यातच नात्याची खरी मजा दडली आहे. आमच्या केमिस्ट्रीमधून हीच मजा प्रेक्षकांना घेता येईल हे नक्की, असेही त्यांनी सांगितले. अभिनेता-लेखक संकर्षण कर्हाडे याने या नाटकाद्वारे दिग्दर्शकीय पदार्पण केले आहे. पदार्पणातच दोन दिग्गजांसोबत काम करण्याचा आनंद आणि नाटकाची धमाल मेजवानी याचं समाधान संकर्षणने व्यक्त केले. नाटकात पूर्णिमा अहिरे-केंडे, सिद्धी घैसास, राजसिंह देशमुख यांच्याही भूमिका आहेत.