राज्यसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातून सहाजण बिनविरोध निवडून आले. सहापैकी मेधा कुळकर्णी वगळता अशोक चव्हाण, प्रफुल्ल पटेल, मिलिंद देवरा, डॉ. अजित गोपछेडे, चंद्रकांत हंडोरे हे पाचजण तसे पाहता काँग्रेसचेच असल्याचे दिसून येते. चंद्रकांत हंडोरे हे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार होते, तर मिलिंद देवरा आणि अशोक चव्हाण यांनी निवडणुकीच्या काही काळापूर्वीच अनुक्रमे शिवसेना शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मेधा कुळकर्णी यांना भारतीय जनता पक्षाने कोथरूड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याऐवजी कोल्हापूरहून आलेल्या चंद्रकांतदादा पाटील यांना उमेदवारी दिली आणि मेधाताईंवर अन्याय करण्यात आला. त्याचप्रमाणे मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने टिळक परिवारातील कुणालाही उमेदवारी दिली नाही. तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत लोकमान्य टिळक पुरस्कार देऊन पंतप्रधानांच्या डोईवर पुणेरी पगडी देत त्यांना सन्मानित करण्यात आले.
टिळक, कुळकर्णी परिवार निष्ठेच्या गुळण्या गिळून गप्प बसला. निष्ठावंत ब्राह्मण संतप्त झाले, परंतु दिल्लीश्वरांनी डोळे वटारताच त्यांना गप्प बसावे लागले. केंद्र सरकारने काढलेल्या श्वेतपत्रिकेत ‘आदर्श’ उल्लेख आला आणि आदर्शमुळे २००८ साली मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागलेल्या अशोक यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तसेच आमदारकीचा राजीनामा दिला. अशोकराव भारतीय राजकारणातील अतिशय नशीबवान नेते. पहिल्या दिवशी पक्षाचा त्याग, दुसर्या दिवशी भारतीय जनता पक्षात प्रवेश, तिसर्या दिवशी राज्यसभेची उमेदवारी आणि चौथ्या दिवशी राज्यसभेवर बिनविरोध निवड. या सहा जागांपैकी मेधाताई कुळकर्णी या एकमेव मूळ भाजपच्या नेत्या राज्यसभेवर निवडून आल्या.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शेकडोंनी नेते २०१४पासून कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करते झाले. इतकेच काय मंत्री, खासदार, आमदार सुद्धा झाले. या आयारामांच्या गर्दीत बिच्चारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून आलेले भाजप नेते कार्यकर्ते पार हरवून गेले. अशा वंचित नेते कार्यकर्ते यांची तद्वतच आयारामांची यादी केली तर त्यानेच पाने भरतील.
अवघ्या दोन महिन्यांवर देशातल्या सार्वत्रिक निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. त्यापाठोपाठ महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची तयारी सुरू होईल. त्यासाठी आत्तापासूनच राजकीय पक्षांमध्ये चर्चा आणि तिकिटासाठी सुंदोपसुंदी पाहायला मिळत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भाजपामध्ये मोठ्या प्रमाणावर इतर पक्षांमधून नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकारी दाखल होत असल्याचे दिसत आहे. येणार्यांना दिलेल्या संधींमुळे पक्षातल्या निष्ठावंतांवर अन्याय होत असल्याची टीकाही विरोधकांकडून केली जात आहे. अशा वेळी निष्ठावंत कार्यकर्ते आणि नेते बिच्चारे दबक्या आवाजात प्रतिक्रिया देताहेत. परंतु माधवराव भांडारी या एका निष्ठावंत नेत्यांचे चिरंजीव चिन्मय यांनी ज्या चिडीतून बाबांची बाजू दणदणीतपणे माध्यमातून मांडली आहे ती तमाम निष्ठावंत नेते कार्यकर्ते यांची प्रातिनिधिक प्रतिक्रिया म्हणावी लागेल.
काय आहे पोस्टमध्ये?
चिन्मय यांनी या पोस्टमध्ये माधव भांडारी यांच्या आजपर्यंतच्या राजकीय प्रवासाविषयी आणि त्यांनी पक्षासाठी केलेल्या संघर्षाविषयी सांगितले आहे. त्याचबरोबर माधवरावांनी आयुष्यभर पाळलेल्या तत्वांविषयीही त्यांनी नमूद केले आहे. माधवरावांनी भाजपचे प्रदेश प्रवक्ते म्हणून एक दशक गाजवले. पक्षाची बाजू भरभक्कमपणे माध्यमांसमोर मांडली. अशा नेत्याची प्रदेश उपाध्यक्षपदावर बोळवण करून त्यांना अडगळीत टाकण्यात आले. पक्षाकडून माधवरावांना अपेक्षित फळ मिळायला हवे होते, ते मिळाले नसल्याचा मुद्दा चिन्मय यांनी उपस्थित केला आहे. माधवरावांचे नाव आजपर्यंत १२ वेळा विधानसभा किंवा विधान परिषद उमेदवारीसाठी चर्चेत आले, पण बाराही वेळा त्यांना तिकीट मिळाले नसल्याची खंत या पोस्टमध्ये मांडण्यात आली आहे.
‘माझ्या वडिलांनी १९७५ साली जनसंघ किंवा जनता पक्षात प्रवेश केला. आता त्या गोष्टीला ५० वर्षे उलटली आहेत. त्यानंतर फक्त पाच वर्षांत, म्हणजे १९८० साली जनसंघाचे रूपांतर भारतीय जनता पक्षात झाले. माझ्या वडिलांना अनेकजण भाजपाचे एक आक्रमक प्रवक्ते म्हणून ओळखतात. पण ते याहून खूप काही आहेत आणि त्यांनी याहून खूप काही केले आहे,’ असे या पोस्टमध्ये म्हटले आहे.
‘पक्षासाठी, जनतेसाठी काम करत असताना ते प्रसिद्धीच्या वलयापासून लांब राहिले. त्यांनी कधीच त्यांच्या पदाचा वैयक्तिक लाभासाठी गैरवापर केला नाही. पण दुर्दैवाने त्यांना कायमच केलेल्या कामाचे अत्यंत कमी फळ मिळाले,’ असा मुद्दा या पोस्टमध्ये उपस्थित करण्यात आला आहे.
मला आजघडीला नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा कोणताही अधिकार नाही. मला ते करायचेही नाही. कारण माझ्या वडिलांप्रमाणेच माझाही त्यांच्यावर विश्वास आहे. पण मला या सगळ्यातून वारंवार आशाही वाटते आणि त्याच्या वेदनाही होतात. पुन्हा पुन्हा, अशा शब्दांत चिन्मय भांडारी यांनी पोस्टमध्ये खंत व्यक्त केली आहे.
‘मी सार्वजनिक आयुष्यापासून लांब राहतो. त्यामुळे असं काही मी याआधी कधीच बोललेलो नाही. त्याचबरोबर मला याचीही जाणीव आहे की मी त्यांनी उभ्या केलेल्या कर्तृत्वामध्ये फारशी भर टाकू शकत नसताना माझ्या एका कृतीमुळे ते उद्ध्वस्त होऊ शकेल. पण मी आयुष्यभर या सगळ्यावर मौन बाळगून होतो. पण आज बोलण्याची वेळ आली आहे असे मला वाटले’, असेही चिन्मय यांनी पोस्टमध्ये नमूद केलं आहे.
भाजपमध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या असंतोषाची वाफ मोठ्या प्रमाणावर साचली असून या असंतोषरूपी प्रचंड मोठ्या वाफेमुळे पक्षरूपी कुकरचा स्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते असताना त्यांनी काँग्रेसवर टीका करताना म्हटले होते की, काँग्रेस पक्षाची परिस्थिती अशी आहे की ओरिजिनल गोडाऊन में आणि ड्युप्लिकेट शो रूम में! मग आता भारतीय जनता पक्षाची परिस्थिती काय आहे? भाजपमध्ये सामील झालेल्या आयारामांसाठी निष्ठावंत कार्यकर्त्यांनी भाईंदर येथील केशवसृष्टीतील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या सभागृहात प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्याची तसेच पक्षाची विचारधारा, भूमिका समजावून सांगण्याची गरज आहे, असे म्हटले तर ते अनाठायी ठरणार नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून तयार झालेले भाजपचे निष्ठावंत नेते आणि कार्यकर्ते यांना सध्याचे त्यांच्या पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकार आपलेसे वाटत नाही. यापेक्षा आम्ही विरोधी पक्षात होतो तेच बरे होतो, अशीही भावना व्यक्त करताना दिसतात. ‘आयाराम उपभोगताहेत आणि निष्ठावंत भोगताहेत’ ही आजची परिस्थिती आहे!