हार्दिक पंड्याला ‘बीसीसीआय’च्या ‘अ’ श्रेणीच्या करारात कायम ठेवल्यामुळे क्रिकेटविश्वात धुरळा उडाला आहे. हार्दिकने गेल्या वर्षभरात अशी कोणती कामगिरी केली, जी ‘बीसीसीआय’ला महत्त्वाची वाटली. श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांचे नेमके काय चुकले? ‘गुजरातनो छोकरो’ हार्दिकला नेहमीच विनासायास यश कसे मिळते. याचाच घेतलेला वेध.
– – –
अष्टपैलू हार्दिक पंड्याला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वार्षिक करारबद्ध क्रिकेटपटूंमध्ये ‘अ’ श्रेणीमध्ये कायम ठेवण्यात आले आहे. मात्र, मुंबईकर श्रेयस अय्यर आणि झारखंडच्या इशान किशनला देशांतर्गत क्रिकेटमध्ये न खेळल्याचा ठपका ठेवून वगळण्यात आले आहे. या घटनेमुळे देशाविदेशातील सर्वच क्रिकेटरसिकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तसे काही महिन्यांपूर्वी रोहित शर्माकडून मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाची धुरा काढून हार्दिककडे दिली, तेव्हाही सर्वांना आश्चर्य वाटले होते. समाजमाध्यमांवर त्याचे जे काही पडसाड उमटायचे, ते उमटले. अनेक मोटिवेशनल गुरू म्हणतात की, तुमच्या मेहनतीला नशिबाची जोड मिळाली की, यश नक्की मिळते. पण हार्दिकचे नशीब इतके बलवत्तर की जणू यशाने त्याचे मांडलिकत्वच पत्करले आहे. हार्दिकचे यशाचे रहस्य काय? या प्रश्नाचे ‘नेशन्स वाँट टू नो?’ या धर्तीवर उत्तर शोधायचे झाले तर, ते ‘गुजरातनो छोकरो’ या दोन शब्दांत सामावले आहे.
हार्दिक बडोद्याचा म्हणजेच गुजरात जिल्ह्याचा. गेल्या १० वर्षांत गुजरात ही देशाची अघोषित राजधानी बनू पाहते आहे. देशातले जे काही चांगले ते गुजरातमध्ये असायला हवे. मुंबई गुजरातचा प्रवास अधिक सोपा व्हावा म्हणून वंदे भारत नव्हे, तर बुलेट ट्रेन हवी. असे अनेक अद्वितीय निर्णयांतून गुजरातच्या सुबत्तेला खतपाणी घातले गेल्याची उदाहरणे आणि दाखले आपल्याला सापडतात. त्यामुळे जसे एखाद्या मातीचे गुण असतात. तिथे तुम्ही कोणतेही पीक लावले तरी ते डौलाने पिकते. तसेच या गुजरातच्या मातीचे सध्या झाले आहे. हार्दिक गुजरातचा आहे… बस् एवढेच पुरेसे आहे!
काही वर्षांपूर्वी हार्दिकच्या अष्टपैलूत्वावर भारावून एका नामांकित क्रिकेटपटूने त्याची कपिल देव यांच्याशी तुलना केली होती. पण कपिल यांना ते अजिबात आवडले नाही. ‘‘माझ्याशी हार्दिकची तुलना करू नका. तो कसोटी क्रिकेट खेळत नाही. गोलंदाजी करेल याची खात्री नाही. सारखा दुखापतग्रस्त असतो,’’ अशा शब्दांत त्यांनी हार्दिकला त्याची जागा दाखवली होती. कपिल यांना १६ वर्षांच्या कारकीर्दीत फक्त एकाच कसोटी सामन्याला मुकावे लागले होते. इतकी तंदुरुस्ती त्यांनी आयुष्यभर जोपासली. सुनील गावस्कर आंतरराष्ट्रीय दौर्यावरून परतले, तरी दुसर्या दिवशी रणजी किंवा कांगा लीगचे सामने खेळायला मैदानावर उतरायचे. आतासारखी खेळाच्या ताणाचे व्यवस्थापन (वर्कलोड मॅनेजमेंट) किंवा कौटुंबिक कारणास्तव सुटी घेण्याची मुभा त्या काळात नव्हती. हार्दिक सप्टेंबर २०१८मध्ये इंग्लंडविरुद्ध कारकीर्दीतील अखेरचा कसोटी सामना खेळला होता. कसोटी खेळून आता सहा वर्षे उलटली आहेत. ‘बीसीसीआय’च्या करारासाठी तीन कसोटी किंवा आठ एकदिवसीय किंवा दहा ट्वेन्टी-२० सामने खेळणे क्रमप्राप्त असते. पण फक्त मर्यादित षटकांचे सामने खेळणार्या हार्दिकला ‘अ’ श्रेणी कशासाठी? ‘क’ श्रेणी का नाही? पूर्वपुण्याईच्या बळावर तर नक्कीच नाही. मुंबईविरुद्ध रणजी उपांत्यपूर्व सामन्यात बडोद्याचा संघ हरला. या सामन्यात हार्दिक खेळला नाही?
गेल्या १६ वर्षांत ‘आयपीएल’ स्थिरस्थावर झाल्यापासून रेड बॉल (लाल चेंडू) आणि व्हाइट बॉल (पांढरा चेंडू) असे दोन पंथ तयार होऊ लागले आहेत. व्हाइट बॉल म्हणजेच मर्यादित षटकांचे (एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२०) क्रिकेट खेळून आंतरराष्ट्रीय कीर्ती, पैसा, मानमरातब मिळत असेल, तर चार दिवसांचे रणजी आणि पाच दिवसांचे कसोटी क्रिकेट खेळण्यात वेळ का वाया घालवावा, अशी मानसिकता गेल्या १० वर्षांत क्रिकेटपटूंमध्ये निर्माण झाली आहे. भारतीय क्रिकेट संस्कृतीत या ट्रेंडनुसार जीवनशैली आखण्याचे धारिष्ट्य दाखवले, ते हार्दिकने. गेल्या काही वर्षांत दीर्घ क्रिकेटपासून दूर राहिलेल्या आणि लघुक्रिकेटमध्येही फारशी लक्षवेधी कामगिरी न करणार्या हार्दिकला ‘अ’ श्रेणी कशासाठी? कराराच्या घोषणेनंतर हार्दिक टीकेच्या लक्ष्यस्थानी आल्यानंतर ‘बीसीसीआय’चे सचिव, गुजरातचे जय शाह यांनी काही विश्वासू क्रीडा पत्रकारांकडे सारवासारव केली म्हणे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने नसतील तेव्हा त्याला विजय हजारे, मुश्ताक अली करंडकांचे मर्यादित षटकांचे देशांतर्गत सामने खेळावे लागतील, अशी तंबी हार्दिकला करार करताना देण्यात आली आहे. पण हार्दिकला एक न्याय आणि श्रेयस-इशानला दुसरा न्याय कशासाठी?
हार्दिक गतवर्षी एकदिवसीय विश्वचषकात पायाला दुखापत झाल्यापासून राष्ट्रीय संघात दिसलेला नाही. पण अनेक नामांकित ब्रँडच्या जाहिरातींमध्ये दिसतो. आगामी ‘आयपीएल’साठी मुंबई इंडियन्सच्या नेट किंवा सराव सामन्यांत तो खेळतो आहे. कारण गुजरात टायटन्सकडून तो आता मुंबई इंडियन्सकडे आला आहे, तेही कर्णधार म्हणून. रोहितने मुंबई इंडियन्सला मिळवून दिलेले यश, नेतृत्वक्षमता आणि विश्वचषकातील वादळी फॉर्म या सर्वांपेक्षा हार्दिकचे कोणते मोठेपण संघाला अधिक परिपक्व वाटले? याच संघात ३६० अंशात खेळण्याची क्षमता असलेला सूर्यकुमार यादवसारखा धडाकेबाज फलंदाज आहे. मुंबई इंडियन्सची मालकी रिलायन्सकडे म्हणजेच मुकेश अंबानी यांच्याकडे आहे. हार्दिकला तेव्हाही पायघड्या घातल्या गेल्या होत्याच…
मर्यादित षटकांच्या कामगिरीचे विश्लेषण केले, तरी हार्दिकचे दुखापतीमुळे नेहमीच भारतीय संघातून आत-बाहेर सुरू असते. असा हा ‘नादुरुस्त’ क्रिकेटपटू जूनमध्ये होणार्या ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात नक्की आहे. पण कामगिरी सिद्ध करणारे अनेक क्रिकेटपटूंना स्थान मिळवण्यासाठी झगडावे लागते आहे. सर्फराज खान गेले अनेक वर्षे रणजी स्पर्धांचे धावांचे इमले बांधल्यावर आता कुठे त्याच्या कारकीर्दीत यशाचा सूर्योदय झाला आहे.
श्रेयसचे काय चुकले?
श्रेयस अय्यरचा ‘ब’ श्रेणीचा करार होता. तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये त्याने उपयुक्तता सिद्ध केलेली होती. एकदिवसीय विश्वचषकात तर दोन शतके आणि तीन अर्धशतकांसह त्याने ५३० धावांचे योगदान भारताच्या विश्वचषक उपविजेतेपदात दिले होते. इतकेच नव्हे, तर जानेवारीत तो आंध्र प्रदेशविरुद्धचा रणजी सामनासुद्धा खेळला. इंग्लंडविरुद्धच्या दुसर्या कसोटीनंतर दुखापतीमुळे तो तिसर्या सामन्यात खेळला नाही. पण काही दिवसांतच ‘बीसीसीआय’च्या तज्ज्ञांनी तो तंदुरुस्त असल्याचे प्रमाणित केले. पण दुखापत हे कारण दाखवून तो मुंबईच्या बाद फेरीच्या सामन्यांत खेळला नाही. श्रेयसच्या करारस्थगितीमागे हे तात्कालिन कारण आता समोर येते आहे. पण प्रत्यक्षात आणखी काय घडले हे अद्याप तरी उजेडात आलेले नाही. परंतु श्रेयसच्या कामगिरीकडे तर डोळेझाक करून चालणार नाही. त्याचे इनाम म्हणून त्याला बढती देणे चुकीचे ठरते का? पुन्हा हार्दिकची मागील वर्षीची कामगिरी श्रेयसपेक्षा नक्की कोणत्या मापदंडात सरस होती?
इशानला वेगळा न्याय का?
इशानकडे गतवर्षी ‘क’ श्रेणीचा करार होता. दक्षिण आफ्रिका दौर्यावर तो गेलाही होता. तिथून वैयक्तिक कारणास्तव त्याला दौर्यावरून माघार घ्यावी लागली. मात्र मायदेशातून परतल्यापासून तो हद्दपारीची शिक्षा भोगतो आहे. इशान आंतरराष्ट्रीय स्तरावरही दिसला नाही. सध्या डीवाय पाटील स्टेडियमवर सुरू असलेल्या कॉर्पोरेट क्रिकेटमध्ये खेळून त्याने ‘आयपीएल’साठी सज्ज असल्याची ग्वाही दिली आहे. इशानलाही हार्दिकप्रमाणे फक्त ‘व्हाइट बॉल’ क्रिकेट संस्कृती आपलीशी करावीशी वाटते. पण ‘बीसीसीआय’ला हे मान्य नाही. ‘बीसीसीआय’ला त्याला तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये पाहायचे आहे. त्यामुळेच इशानचे भवितव्य काय, असा प्रश्न क्रिकेटवर्तुळात पडू लागला आहे. पण हार्दिकच्या कारकीर्दीत्मक धोरणाचा आदर करणारी ही यंत्रणा इशानचा अनादर का करते आहे?
गुजरातचे वैभव
गेल्या काही वर्षांत कोणत्याही क्रीडास्पर्धांचे अंतिम सामने किंवा यजमानपद हे गुजरातलाच मिळाल्याचे दिसून आले आहे.
अगदी विश्वचषकाचा अंतिम सामनाही अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पंतप्रधानांच्या साक्षीने झाला. त्यामुळे मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असा टेंभा गेली अनेक दशके मिरवते आहे, तशाच प्रकारे जागतिक नकाशावर गुजरातचे नाव मोठे करण्याचे प्रयत्न इमाने इतबारे केले जात आहेत. दी इका एरिना बाय ट्रान्सस्टेडिया हे जागतिक दर्जाचे क्रीडा संकुल, खेलो इंडियाचे यजमानपद, अर्थसंकल्पात गुजरातच्या क्रीडा विकासाठी सर्वाधिक तरतूद अशा अनेक उदाहरणांतून हे गुजरातलक्ष्यी उपक्रम दृष्टिपथास येतात. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला हार्दिक हासुद्धा गुजरातचेच वैभव आहे. त्यामुळेच त्याची जोपासना केली जाते आहे, इतकेच.
त्याचे हार्दिक अभिनंदन!