कल्याण लोकसभा मतदार संघाची निर्मिती २००८ साली झाली व पहिली निवडणुक २००९ साली झाली होती. शिवसेनेचे दिवंगत खासदार प्रकाश परांजपे यांचे सुपुत्र आनंद परांजपे यांना या मतदार संघातून शिवसेनेने उमेदवारी दिली आणि ते बहुमताने निवडूनही आले होते. याच दरम्यान एकनाथ शिंदे हे त्यावेळी शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख होते. तसेच शिवसेनेचे विधानसभेत नेतृत्व करीत होते.आनंद परांजपेंची खासदारकीची कारकिर्द बहरत असताना एकनाथ शिंदे यांचे पुत्रप्रेम उफाळून येत होते. परंतू आनंद परांजपे यांचे तिकिट कापुन ते आपल्या पुत्रास कसे मिळेल? याची आखणी ते करीत होते. यातूनच आनंद परांजपे यांना पदोपदी अपमानीत करून जेरीस आणण्याचे रितसर प्रयत्न सुरू होते. खासदार या नात्याने परांजपेंना जो मानसन्मान मिळणे अपेक्षित होते, तो जाणीवपूर्व न देता योजनाबद्धरित्या अपमान करण्यात येत होता.
`मी शिवसेनेसाठी घरादाराकडे कुटुंबाकडे लक्ष देऊ शकलो नाही, मी श्रीकांतला न्याय देऊ शकलो नाही,’ असे म्हणणारे व त्यांचीच रि ओढून `मी पप्पांना बघू शकत नव्हतो,’ अशी नाट्यमय संवादांची जुगलबंदी पिता पुत्र जाहीर सभेत करून जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठी भावनिक साद घालणारे किती खोटे आहेत हे दिसून येते. श्रीकांत एमबीबीएस झाला तो लक्ष न देताच का? पुढे तो ऑर्थो सर्जन झाला हे कसे? चाळीतून पंचकारांकित बंगल्यात कसे गेले? भाऊ नगसेवक कसा झाला? हे घरदार कुटुंबाकडे लक्ष न देता शक्य होऊ शकते, यावर अंधभक्तही विश्वास ठेवणार नाही.
श्रीकांत शिंदे हा मेडिकलच्या शेवटच्या वर्षाला असतानाच एकनाथ शिंदे यांनी खासदार आनंद परांजपेंना त्राही भगवान करून सोडल्याने पक्ष सोडण्यास भाग पाडले. नंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे शिष्टाई करून माझा मुलगा मोकळाच आहे, त्याला कल्याणमधून उमेदवारी दिली तर मी निवडून आणेन, अशी मखलाशी करून २०१४ साली शिवसेनेकडून उमेदवारी पदरात पाडून घेतली, तरी ते म्हणतात, मी माझ्या मुलासाठी काहीच करू शकलो नाही. श्रीकांत शिंदेला त्यापूर्वी कोणी पाहिलेही नव्हते व ओळखतही नव्हते. फक्त शिवसेनेचा अधिकृत उमेदवार व शिंदे साहेबांचा मुलगा याच कारणास्तव शिवसेना व भाजपाच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी २०१४ साली प्रचंड मताधिक्याने निवडून आणले व शिवसेना सोडण्यास भाग पाडल्याने राष्ट्रवादीकडून निवडणुक लढवणार्या आनंद परांजपेंवर गद्दारीचा शिक्का पडल्याने आनंद परांजपेंना २ लाख ५० हजार ७४९ मतांनी पराभूत करून डॉ. श्रीकांत शिंदे हे विजयी झाले होते. कल्याण लोकसभेतील मतदारांनी आनंद परांजपेंना गद्दार म्हणून पराभवाची धूळ चाटायला लावून अद्दल घडवली होती.
२०१९ साली युतीचे उमेदवार म्हणून श्रीकांत शिंदे पुन्हा एकदा ३ लाख ४४ हजार ३४३ मतांनी राष्ट्रवादीचे बाळाजी पाटील यांचा ३ लाख ४४ हजार ३४३ मतांनी पराभव करून विजयी झाले. यावेळी तर राज्यात युतीची सत्ता होती व एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री व पालकमंत्री असल्याने श्रीकांत शिंदेंचा प्रचंड मताधिक्याने विजय झाला. यावरून श्रीकांत शिंदे यांना जी खासदारकी मिळाली त्याचे श्रेय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व त्यांच्या आदेशांचे पालन करणार्या निष्ठावंत शिवसैनिकांकडेच जाते. पिता एकनाथ शिंदे जर शिवसेनेचे मंत्री, पालकमंत्री व जिल्हाप्रमुख नसते तर डॉ.श्रीकांत शिंदे कुठेतरी ऑर्थोपेडिक सर्जन ऑपरेशन थिएटरमध्ये दिसले असते.
खासदार श्रीकांत शिंदे हे गद्दार एकनाथ शिंदेंचे पुत्र असून या गद्दारीच्या मोहिमेत सातत्याने अग्रभागी होते व आहेत. त्यांनी खासदार फोडण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे तेही गद्दारच ठरतात. आणि महाराष्ट्र कधीही गद्दारांना क्षमा करीत नाही. परंतु श्रीकांत शिंदे हे खासदारकीचे अढळपद लाभल्याच्या भ्रमात वल्गना करीत आहेत. मला कोणीही पराभूत करू शकत नाही, कोणीही माझ्या विरोधात निवडणूक लढवून दाखवावी, अशी गर्विष्ठपणाची भाषा करीत सुटले आहेत. कल्याण लोकसभेने जसा २०१४ साली गद्दारीच्या मुद्यावरून आनंद परांजपेंचा पराभव झाला तसाच यावेळी डॉ. श्रीकांत शिंदेंचा पराभव अटळ आहे.
या पार्श्वभूमीवर आगामी लोकसभा निवडणूकीत डॉ. श्रीकांत शिंदेंची खासदारकी टिकणार की जाणार? याची चर्चा जोरात सुरू आहे. या चर्चेला खतपाणी घातले ते भारतीय जनता पार्टीने. यावेळी बाहेरचा उमेदवार चालणार नाही, भाजपचाच उमेदवार असेल, असे भाजपने जाहीर केले. त्यात आघाडीवर होते मंत्री रवींद्र चव्हाण. याच चव्हाणांनी सुरत, गुवाहाटी मोहीमेत महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. स्थानिक उमेदवारच हवा; यावेळी उपरा उमेदवार चालणार नाही! असे ठणकावून सांगत डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीसच आव्हान दिले आहे. हा मतदार संघ आत्ता भाजपला हवा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पुत्र खासदाराची उमेदवारी धोक्यात आली आहे. त्यामुळे या शिंदे पुत्रास ठाण्यातील लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी लागेल, मात्र तिथे आनंद दिघेंचे खरेखुरे पट्टशिष्य व निष्ठावंत खासदार राजन विचारेंपुढे त्यांचा निभाव लागणे शक्य नाही. ठाणेकर गद्दारांना कधीच कौल देणार नाहीत.
कल्याण लोकसभा मतदारसंघात मिंधे गट विरूद्ध भाजपा आमदार गणपत गायकवाड असे गँगवॉर सुरू झाले आहे, त्यामुळे भाजपाचे कार्यकर्ते व विशेषत: गणपत गायकवाड समर्थकांच्या मतांना शिंदेंना मुकावे लागेल. गेल्या वेळी २०१९च्या निवडणुकीत शिवसेना अखंड होती व भाजपाशी युती असल्याने श्रीकांत शिंदे यांना ६३ टक्के मतं मिळाली होती. दुसर्या क्रमांकाची २४ टक्के मतं राष्ट्रवादीस मिळाली होती. यावेळी जर श्रीकांत शिंदेला उमेदवारी मिळाली तर स्थानिक उमेदवारास डावलल्यामुळे भाजपात जी नाराजी आहे ती भोवणार तसेच गणपत गायकवाड समर्थक तरी विरोधात (क्रॉस वोटींग) मतदान करतील. यामुळे भाजपाच्या ५० टक्क्याहून अधिक मतांना शिंदे पुत्रास मुकावे लागेल. या शिवाय मूळ शिवसेनेची ८० टक्के मतं उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या अधिकृत उमेदवारास मिळतील. त्यामुळे श्रीकांत शिंदे यांना ३२ टक्क्यांपेक्षा अधिक मतं मिळू शकत नाहीत.
या उलट उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या मूळ शिवसेनेची एकगठ्ठा सर्व मतं मिळतील. शिवसेनेचे निष्ठावंत व शिवसेना समर्थक तसेच मिंध्यांच्या गद्दारीची चीड असलेले खुद्दार मतदार ठाकरे यांच्या अधिकृत उमेदवारीस मतदान करतील. त्याच्या जोडीला शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या २३ टक्के पैकी १५ टक्के मतं वाढतील. त्यात प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाची मतं निर्णायक ठरणार आहेत. एकीकडे मिंधे गटाच्या मतांत भाजपा व मूळ शिवसेनेची मतं घटणार आहेत, स्थानिक आगरी कोळी समाजात असलेली नाराजी भोवणार असून ठाकरे गटास मूळ निष्ठावंत शिवसैनिक व समर्थकांप्रमाणेच राष्ट्रवादी शरद पवार गट व प्रकाश आंबेडकर समर्थक बहुजनांच्या मतांची बेगमी मिळणार असल्याने विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदेसमोर कोणताही उमेदवार दिला तरी तो त्यांचा दारुण पराभव करू शकेल. शिवसेना उमेदवारास वैध मतांपैकी किमान ५२ टक्के म्हणजेच ४.५ लाख मतं मिळतील. जर चर्चेनुसार सुषमा अंधारेंना उमेदवारी मिळाली तर डॉ. श्रीकांत शिंदेंची अनामत रक्कमही जप्त होण्याइतका दारुण पराभव होईल.