‘धर्मवीर’ चित्रपट काढून कुणी धर्मवीर होत नाही. त्याचप्रमाणे होर्डिंग्जवर चेल्याचपाट्याने नावापुढे ‘हिंदुहृदयसम्राट’ लिहिले म्हणून कुणी हिंदुहृदयसम्राट होत नाही. हिंदुहृदयसम्राट हा मान म्हणजे गद्दारी करून मिळवलेले मुख्यमंत्रीपद नव्हे. राजस्थानमधील विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी गेले असता काही विधानसभा क्षेत्रांत त्यांच्या नावापुढे ‘हिंदुहृदयसम्राट’ असे लिहिले होते. हा या वर्षाचा सर्वात मोठा विनोद आहे. कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे डॉ. हेडगेवार, गोळवलकर गुरुजी आणि संघाचे तत्सम नेते, प्रविण तोगडिया, अशोक सिंघल, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी किंवा अगदी विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जनतेने ‘हिंदुहृदयसम्राट’ कधीही म्हटले नाही, कुणीही म्हणत नाही. पण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना महाराष्ट्रातीलच नव्हे, देशातीलच नव्हे तर जगातील हिंदू ‘हिंदुहृदयसम्राट’ म्हणून संबोधतात ते ओळखले जातात. कारण गेल्या पन्नास वर्षात हिंदूंच्या संरक्षणार्थ, हिंदुत्वाच्या मुद्यावर आणि हिंदुस्थानसाठी विरोधकांशी दोन हात करणारे, रस्त्यावर उतरून लढणारे, परिणामाची तमा न बाळगता हिंदूंची रोखठोक भूमिका मांडणारे. हिंदू हाच श्वास म्हणून जगणारे बाळासाहेब ठाकरे हे एकमेव ‘हिंदुहृदयसम्राट’ आहेत. ‘होय हे हिंदूराष्ट्र आहे’ असे जगाला ठणकावून सांगण्याची हिंमत बाळासाहेबांमध्ये होती. ‘गर्व से कहो हम हिंदू हैं’ अशा गगनभेदी घोषणा देऊन त्यांनी हिंदूंमध्ये चैतन्य निर्माण केले. ‘अब हिंदू मार नहीं खाएंगे’ अशी फक्त राणा भीमदेवी थाटाची वल्गना करणार्या, पण वेळ आली की शेपूट घालणार्या भाजप नेत्यांसारखे ते नव्हते. तर कठीण प्रसंगी हिंदू विरोधकांना व धर्मांधांना भीमटोला हाणणारे तसेच हिंदूंमध्ये लढाऊ वृत्ती निर्माण करणारे ते खर्या अर्थाने ‘हिंदुहृदयसम्राट’ होते. बाळासाहेबांनी जन्मभर हिंदुत्वासाठी दिलेला लढा तेच अधोरेखित करतो.
१९६८ साली कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावरून वाद उपस्थित झाला होता. या किल्ल्यावर हिंदूंना पूजाअर्चा करण्यावर प्रशासनाने बंदी घातली होती. सरकारच्या या हिंदूविरोधी धोरणाचा स्थानिक शिवसेना पदाधिकार्यांनी विरोध केला. तेव्हा पोलिसांनी १४४ कलम पुकारले आणि शिवसैनिकांना मज्जाव केला. तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना नेते मनोहर जोशी, ठाण्याचे नगराध्यक्ष वसंतराव मराठे हे पोलिसांना न जुमानता कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर पोहोचले. बाळासाहेबांनी स्पष्ट भूमिका घेतली की, ‘कल्याणमधील दुर्गाडी किल्ला ही हिंदूंची वास्तू असून या ठिकाणी बांधकामासाठी लावलेले १४४ कलम आम्ही ऐतिहासिक कागदपत्रांच्या आधारे दूर करू. या राज्यात सर्वांना आपापला धर्म पाळण्याची सोय आहे, फक्त हिंदूंना नाही. ज्यांचा जन्म हिंदुस्थानातच झाला तो प्रथम भारतीय आहे. सगळे भारतीय असतील तर मग सुवतेसुभे कशाला? मुरादाबादेत मुस्लिमांनी क्षुल्लक कारणावरून वाहतूक बंद केली. तारा कापल्या हे नुकसान का? हिंदूंची सनई बंद, भजन बंद हे शिवसेना खपवून घेणार नाही.’ हिंदुहृदयम्राटांनी रोखठोकपणे भूमिका मांडली. ‘सर्वधर्मीयांनी येथे राहायचे तर प्रथम भारतीय म्हणूनच राहिले पाहिजे. वेगळे हक्क मागण्याचे खूळ डोक्यातून काढून टाकले पाहिजे.’ दुर्गाडीवरच्या घटनेमुळे मराठी माणसाबरोबर हिंदूंमध्येसुद्धा जागृती होण्याचे महान कार्य शिवसेनाप्रमुखांनी केले म्हणून ते ‘हिंदुहृदयसम्राट’ आहेत.
‘मार्मिक’ साप्ताहिकाला २४ वर्षे पूर्ण झाली तेव्हा १२ ऑगस्ट १९८४च्या अंकात ‘स्वातंत्र्य टिकवणारी पिढी उभी केली’ या अग्रलेखात त्यांनी स्पष्टपणे हिंदुत्वाची भूमिका विशद केली. आज आम्ही हिंदुत्वाचे, हिंदूधर्म रक्षिण्याचे पाऊल उचलले आहे. आम्ही त्याचा प्रचार सभांमधून करतो. आमच्या हिंदुत्वाचे भजन काहींना कानठळ्या बसवणारे वाटते. पण देशातील हिंदू एक दिवस एकटवणारच. विराट शक्ती जेव्हा जन्म घेते तेव्हा भल्याभल्यांना दाती तृण धरून शरण यावे लागते. हा इतिहासाचा दाखला आहे. हिंदू धर्म टिकला तरच देश टिकेल, देश टिकला तरच हिंदू म्हणून आपल्या न्याय्य हक्कांचे रक्षण बंधुभावाने होईलच होईल. म्हणून टीकेचे धोंडे तुडवीत सैनिकांच्या चालीने आगेकूच करा असे आवाहनही केले. मराठी माणसाच्या हितरक्षणाबरोबरच राष्ट्ररक्षणार्थ व्यापक हिंदुत्वाचा प्रसार सतत केला म्हणून ते खर्या अर्थाने ‘हिंदुहृदयसम्राट’ आहेत.
डिसेंबर १९८७ साली मुंबईतील विलेपार्ले विधानसभा पोटनिवडणूक शिवसेनेने हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढवली आणि जिंकलीही. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणूक जिंकता येते हे बाळासाहेबांनी प्रथम दाखवून दिले. या आधी हिंदू महासभा, जनसंघ यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणुका लढविल्या, परंतु शिवसेनेसारखे देदीप्यमान यश त्यांना मिळाले नाही. पार्ल्याच्या पोटनिवडणुकीतील विजयानंतर तत्कालीन भाजप नेते प्रमोद महाजन यांनी बाळासाहेबांची भेट घेऊन शिवसेना-भारतीय जनता पक्षाच्या युतीची गळ घातली. पुढे काय घडले हा इतिहास आहे.
या निवडणूक प्रचारात बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा विषय सभांतून मांडला. दोन धर्मात तेढ निर्माण होईल अशी भडकावून भाषणे केली आणि हिंदू धर्माच्या नावावर मते मागितली म्हणून बाळासाहेबांवर केस दाखल करण्यात आली. हा खटला तब्बल बारा वर्षे चालला. मग १९९९ साली बाळासाहेबांचा मतदान करण्याचा हक्क हिरावून घेतला गेला. बाळासाहेबांना सहा वर्षे मतदान करण्यास बंदी घालण्यात आली आणि निवडणूकही लढवता येणार नाही असा अध्यादेश राष्ट्रपतींनी काढला. हिंदुत्वाच्या नावावर मते मागितली म्हणून एखाद्या व्यक्तीचा संविधानाने बहाल केलेला मतदानाचा हक्क हिरावून घेण्याची ही पहिलीच आणि एकमेव घटना होती. हिंदुत्वाच्या लढ्यासाठी न्यायालयाचा निर्णय, एक शिस्तप्रिय, देशप्रेमी, जागरूक नागरिकाप्रमाणे बाळासाहेबांनी शिरसावंद्य मानला म्हणून तेच एकमेव ‘हिंदुहृदयसम्राट’ आहेत.
१९९० साली अयोध्येत राममंदिर उभे राहावे म्हणून भाजपासह इतर हिंदू संघटनांनी मागणी केली. रामजन्मभूमीसाठी रथयात्राही निघाली. २५ सप्टेंबर १९९० रोजी ‘सौगंध राम की खाते हैं, मंदिर अयोध्या में बनाऐंगे’ अशी घोषणा देत विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी सोमनाथ मंदिराच्या परिसरातून रथयात्रेची सुरुवात केली. मुंबईत जेव्हा रथयात्रा पोहचली, त्यावेळी शिवसेनाप्रमुखांनी इतर हिंदू संघटनांप्रमाणे मुळमुळीत भाषणे न करता हिंदूंमध्ये अंगार फुलवणारे, नवचैतन्य निर्माण करणारे जाज्ज्वल्य हिंदुत्वाची मशाल पेटवणारे भाषण केले. अयोध्यातील प्रभू श्रीरामचंद्राच्या मंदिराला विरोध कराल, तर सारा हिंदुस्थान पेटून उठेल असा इशारा दिला. राममंदिराची उभारणी म्हणजे हिंदू राष्ट्राची पायाभरणी. हिंदूंच्या वाटेला जाल तर खबरदार, असा इशारा धर्मांध मुस्लिमांना देण्यास ते विसरले नाहीत. असा खणखणीत इशारा फक्त एक ‘हिंदुहृदयसम्राट’च देऊ शकतो.
अयोध्येतील बाबरी मशीद ६ डिसेंबर १९९२ रोजी उद्ध्वस्त झाली. ७ डिसेंबरपासून देशात सर्वत्र हिंसाचाराचा आगडोंब उसळला. मुंबईत तणाव निर्माण झाला. नंतर दंगल उसळली. कारसेवकांनी बाबरी मस्जिद पाडली. पण जबाबदारी कुणी घेत नव्हते. भाजपचे नेते सुंदरसिंह भंडारी यांना पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर त्यांनी उत्तर दिले की, शिवसैनिकांनी मस्जिद पाडली. मुंबईत पत्रकारांनी शिवसेनाप्रमुखांना यासंबंधी खुलासा विचारला तेव्हा क्षणाचाही विलंब न लावला ते ताडकन् उत्तरले, ‘शिवसैनिकांनी बाबरी मस्जिद पाडली असेल तर अशा शिवसैनिकांचा मला सार्थ अभिमानच आहे.’ देशभर ही बातमी पसरली. देशातील एकमेव ‘हिंदू नेते’ म्हणून हिंदूंनी आणि वृत्तपत्रांनी संबोधले. असे निर्भीडपणे उत्तर एक ‘हिंदुहृदयसम्राट’च देऊ शकतो हे पुन्हा अधोरेखित झाले.
१९९२-९३ साली मुंबईत हिंदू-मुस्लीम दंगली झाल्या. भीषण बॉम्बस्फोट झाले. जोगेश्वरीतील राधाबाई चाळ पेटवून देण्यात आली. तेव्हा ‘हिंदूंनी आता तिसरा डोळा उघडण्याची वेळ आली आहे’ असे बाळासाहेबांनी सांगितले. मग हिंदूंच्या रक्षणासाठी शिवसैनिक रस्त्यावर उतरले. हिंदूंच्या वस्त्यांचे, मालमत्तेचे रक्षण केले. त्यावेळी शिवसेनाप्रमुखांनी जर कठोर भूमिका घेतली नसती तर मुंबईतील हिंदूंचे शिरकाण झाले असते असे मुंबईतील मराठी माणसांसह गुजराथी, मारवाडी, उत्तर भारतीय, दाक्षिणात्यांचेही म्हणणे होते. आजही ही सर्व मंडळी शिवसेनाप्रमुखांचे आभार मानतात. हिंदूंचा रक्षणकर्ता म्हणून बाळासाहेबांना ‘हिंदुहृदयसम्राट’ मानतात, ते उगीच नाही.
हिंदुत्वाचे ‘बाळकडू’ बाळासाहेबांना घरातूनच मिळाले आहे. प्रबोधनकारांच्या बहुजनवादी हिंदुत्वाने सामाजिक परिवर्तनाचा धडा घालून दिला. १९२१ साली त्यांनी मुंबईतील गजानन वैद्य यांच्या ‘हिंदू मिशनरी चळवळीत’ ख्रिस्ती मिशनरींच्या धर्मपरिवर्तनाला विरोध करून आळा घातला. नंतर त्यांच्या ‘प्रबोधन’ पाक्षिकातून हिंदूंमधील बहुजनांना जागृत केले. मुंबईतील दादर येथील मारूती मंदिर अस्पृश्यांसह अठरापगड हिंदू जातींसाठी खुले करण्यात पुढाकार घेतला. तिथे मारूती स्तोत्र म्हटले. भाजपवाल्यांसारखे ‘हनुमान चालिसा’ म्हणण्याचे फक्त नाटक केले नाही. सार्वजनिक नवरात्रौत्सव सुरू केला. हुंडाविरोधी चळवळ केली. अंधश्रद्धा व बालविवाह अशा हिंदू धर्माच्या अनिष्ट प्रथांवर प्रहार केला.
शिवसेनाप्रमुखांचे हिंदुत्व हे शेंडी जानव्यात अडकणारे नव्हते. त्यांना मंदिरात घंटा बडविणारा हिंदू नको तर धर्मांधांना बडवणारा हिंदू हवा होता. हिंदू धर्म हा देशाचा प्रधान धर्म आहे याची जाण हिंदूंसह अहिंदूंनीही ठेवावी, ‘हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व’ असे त्यांचे ठाम मत होते. प्रबोधनकार ठाकरे यांनी बहुजनवादी हिंदुत्वाचा पाया रचला, तर त्यावर शिवसेनाप्रमुखांनी कडवट हिंदुत्वाचा कळस चढवला. म्हणून देशातच नव्हे तर जगातील एकमेव ‘हिंदुहृदयसम्राट’ बाळासाहेब ठाकरे हेच आहेत हे निर्विवाद सत्य आहे.