नरेंद्र मोदी
राजकीय क्रिकेट खेळणे
माझ्यासाठी सोपे असते
षटकाराच्या सहा थापांत
जनता मात्र अलगद फसते
अंपायरला चिक्की देणे
ही तर आमची जुनी सवय
आयोग असो कोणताही
तो तर आमचा लाडका जावय
मॅनेज करता आले पाहिजे
राजकारण किंवा खेळ
एकदा पकड सुटली की
मिळते पराजयाची भेळ
—– —–
अमित शहा
मी पक्षाचा विकेटकीपर
केले कितीतरी कॅच आऊट
निमूटपणे आले पक्षात
त्यांच्याविषयी नो डाऊट
गंगेसारखे सगळे शुद्ध
कपडे त्यांचे अगदी स्वच्छ
बॅटिंग जरी असली कंडम
आमच्या हातात त्यांचे पुच्छ
आम्ही सांगू तसंच वागणार
आमच्या पुढे माना झुकणार
म्हणू नका बाजारबुणगे
पुढ्यात टाकू ते ते खाणार
—– —–
एकनाथ शिंदे
राजकीय प्रदूषण वाढले
पैशाचाही पाऊस पाडू
पक्षामधला धुरळा आधी
पाण्याने त्या मातीत गाडू
श्वास कोंडता होते घुसमट
सध्या तेच भोगत आहे
तरीही धूर सोडत आहेत
तोंडाची वाफ नडत आहे
पैसे अडवा, पैसे जिरवा
आम्ही म्हणतो, पक्ष वाढवा
तुम्हीच गाफील राहिलात तर
होईल आपला पक्ष आडवा
—– —–
अजितदादा पवार
कितीही सोंगे ढोंगे केली
तरीही हेतू लपत नाही
पाठीत खंजीर खुपसला तर
मतदारांना खपत नाही
काका जरीही असले मोठे
सोडण्याशिवाय पर्याय नव्हता
तात्पुरती तरी झाली सुटका
भाजप वाट पाहातच होता
पुढचे सगळे वाटले सोपे
तरीही मार्गात आहेत काटे
आताच मजा मारून घ्यावी
नंतर टोचून दुखतील बोटे
—– —–
देवेंद्र फडणवीस
विठ्ठलाकडे काय मागितले
कुणालाच सांगणार नाही
मनातले गुपित माझ्या
वेशीवर टांगणार नाही
जनतेसमोर जाहीर बोलणे
ते तर फक्त नाटक असते
मनातले मनात ठेवतो
जणू ते बंद फाटक असते
लोक फक्त टिंगल करतात
‘पुन्हा येईन’ गृहित धरतात
माझ्या मनात वेगळेच आहे
जपून ठेवण्यात दिवस सरतात