कौरव-पांडवांचे महायुद्ध संपले. श्रीकृष्णाची रणनीती यशस्वी झाल्याने पांडवांचा प्रचंड मोठा विजय झाला. ऐन युद्धाच्या प्रारंभी युद्धभूमीवर आपलेच सख्खे आप्त, नातेवाईक समोर युद्धासाठी उभे ठाकलेले पाहून अर्जुन गळपटला. पण अर्जुनच्या रथाचे सारथ्य करणार्या श्रीकृष्णाने प्रसंगावधान राखत गीता सांगून अर्जुनाला युद्धासाठी तयार केले. हीच गीता अखिल विश्वात लोकप्रिय झाली. श्रीकृष्ण विश्वगुरू म्हणून प्रसिद्ध झाले.
एवढे जगप्रसिद्ध होऊन देखील श्रीकृष्णांना लहानपणीच्या सवंगडी व बालमित्रांचा विसर पडला नव्हता. त्यांनी त्यांना कधीही अंतर दिले नाही. मागच्या भेटीत कृष्णाने सुदामाला दारिद्र्यातून बाहेर काढले होते. त्याच्या सार्या आर्थिक विवंचना संपवून टाकल्या होत्या. त्यानंतर कौरव-पांडवांचे आपापसातील दीर्घकाळ चाललेले वादविवाद, कृष्णशिष्टाई, उद्भवलेले महायुद्ध यामुळे कृष्ण-सुदामा यांची दीर्घकाळ भेट झालेली नव्हती. त्यामुळे श्रीकृष्णाची प्रत्यक्ष भेट घेऊन ख्यालीखुशाली विचारावी असे ठरवून सुदामा एके दिवशी भल्या पहाटे निघाला. नव्याने सुरू झालेल्या वातानुकुलित वंदे भारत एक्स्प्रेसचे सर्वसामान्य रेल्वेप्रवास भाड्याच्या दहापट महागडे तिकीट काढून त्याने द्वारका नगरीकडे प्रस्थान केले. जागतिक दर्जाच्या सुखसुविधा असलेले सुसज्ज द्वारका रेल्वेस्टेशन पाहून सुदामा आश्चर्यचकित झाला. तेथून अत्याधुनिक मेट्रो लोकल ट्रेनने प्रवास करून तो द्वारकानगरीत मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गर्द वनराईतील पंचतारांकित शासकीय अतिथीगृहात उतरला. तिथल्या वायफायला स्मार्टफोन कनेक्ट करून, गुड मॉर्निंग वगैरे इमेज मेसेजसोबत सेल्फी काढून सुदामाने आपण सुखरूप पोहोचल्याचे श्रीकृष्णाला व्हॉट्सअपवरून कळवले. कृष्णाने रात्री एकत्रच जेवण गप्पागोष्टी करू या, असा रिप्लाय केला.
दिवसभर श्रीकृष्णाने राजदरबारातील कामांचा निपटारा केला. त्यानंतर आपले लाडके दहा बारा टीव्ही न्यूज चॅनेल पत्रकार आणि विशेष फोटोग्राफर यांना सोबतीला घेऊन भगवान श्रीकृष्ण सायंकाळी शासकीय अतिथिगृहाकडे निघाले. सर्वप्रथम श्रीकृष्णाने सुदामाचा हात हाती घेऊन त्याला कडकडून मिठी मारली. बर्याच काळाने ते समक्ष भेटत असल्याने दोघांच्याही डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते.
दोघांच्या भेटीचे पत्रकारांना खास पोझ देत फोटोसेशन करुन घेतले. हे फोटो व्हिडिओ लगोलग दोघांनीही आपापल्या एक्स ट्विटर वगैरे सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केले. सर्व टीव्ही न्यूज चॅनेलवर दोघांच्या भेटीची ब्रेकिंग न्यूज झळकू लागली.
अतिथिगृहाचे राजआचारी (ऊर्फ स्वयंपाकी खानसामा रसोईया बटलर शेफ) यांनी दालबाटी चुरमा, पराठा, मशरूम, लस्सी, थंडाई, सरबत वगैरे फक्कड शाही मेजवानीचा बेत केला होता. भरपेट जेवणे आटोपून दोघा बालमित्रांनी अतिथिगृहाच्या बाहेर उद्यानातल्या हिरवळीवर शतपावली करत गुरुकुलातील बालपणीच्या मौजमस्तीच्या आठवणी जागवत रात्री उशिरापर्यंत गप्पागोष्टी केल्या. सकाळी उठल्यावर दोघांनी भरपेट नाष्टा केला. कृष्णाने राजआचारी यांना सांगून लाडू, खाकरा, खमण, ढोकळा, जिलेबी, फाफडा, मिष्टान्न पार्सल बांधून सुदामाच्या घरी कुटुंबीयांसाठी दिले.
राजआचारी कृष्ण-सुदाम्याचे स्नेहार्द्र मित्रप्रेम भारावून कौतुकाने बघत होता. कृष्णाने स्मार्टफोनने तिथला क्यूआर कोड स्कॅन करून भीमअॅपद्वारे जीएसटीसह बिल ऑनलाइन भरून टाकले आणि तो एका बाजूला जाऊन व्हॉट्सअप-ट्विटरवरचे अपडेट चेक करत बसला. सुदाम्याने राजआचार्याला बोलावून सर्वोत्कृष्ट चवदार स्वयंपाकाचे तोंड भरून कौतुक केले. आपल्या सदर्याच्या आत असलेल्या कोपरीच्या तिरप्या खिशातून दोनशेच्या नोटाची चळत बाहेर काढली. अतिथिगृहातील आचारी, नोकरचाकर या सर्वांना जवळ बोलावून प्रत्येकाच्या हाती एकेक नोट ठेवत टिप दिली.
राज आचार्याने वाकून सुदाम्याचे आभार मानले आणि अत्यंत नम्रपणे विचारले, रागावणार नसाल, वाईट वाटून घेणार नसाल तर दोन शब्द बोलू का? सुदाम्याने संमती देताच तो बोलला, ‘मागच्या महिन्यात तुमचा मुलगा अन् श्रीकृष्णाचा मुलगा युवराज हे दोघे इथेच रात्रभर मुक्कामी राहून भेटले होते. त्या दोघांनी जातांना आम्हा सर्वांना प्रत्येकी दोन-दोन हजाराची टिप दिली होती. ते तर केवळ राजपुत्र आणि धनवान पित्याचे पुत्र असूनही त्यांनी आम्हा सर्वांना मोठी रक्कम टिप दिली होती. तुम्ही दोघे तर स्वत: राज्यकर्ते आणि धनाढ्य व्यापारी असूनही केवळ दोन-दोनशेच्या एकेका नोटेवर आमची सर्वांची बोळवण करत आहात, हे काही पटत नाही.
सुदामा त्यांना बोलला, ‘हे बघा, आमच्या दोघांची मुले ही अनुक्रमे एका एका मोठ्या धनाढ्य, बलाढ्य द्वारकाधीश राजाची आणि श्रीमंत व्यापार्याची मुले आहेत. त्यामुळे त्यांना मोठमोठ्या रकमांची टिप देणे, खैरात वाटणे परवडते. त्यांनी तसे वागणे स्वाभाविक आहे, अपेक्षित आहे. पण मी स्वत: गरीब कुटुंबात आणि दारिद्र्यात वाढलेला गरीब ब्राम्हणाचा मुलगा आहे आणि माझे परममित्र राजे श्रीकृष्ण हेही गायीगुरे राखणार्या गरीब गवळी कुटुंबात लहानाचा मोठा झालेले आहेत. आम्ही दोघेही अत्यंत गरीब आईवडिलांचे मुले आहोत. त्यामुळे हाती असलेला पैसा काटकसरीने वापरणे हा आमच्या दोघांचाही जन्मगुण आहे. आमच्या मुलांसारखी पैशाची उधळपट्टी करणे आम्हा दोघांना शक्य नाही. आज आम्ही कितीही यशस्वी धनवान असलो, तरी भूतकाळात त्यासाठी केलेला संघर्ष विसरून उधळपट्टी करू शकत नाही.’ एवढे बोलून सुदामा सर्वांचा निरोप घेत आपल्या गावाकडे परत निघाला. राजे श्रीकृष्ण हा प्रसंग पाहून एका कोपर्यात गालातल्या गालात हसत उभे होते, ते पाहून राजआचारी आणि सेवकवर्ग खजील झाला आणि आतमध्ये आपल्या कामांकडे वळला.