(ढिसाळवाडीचे वै. चरमळकर नाट्यगृह. एक पायतुटक्या लाकडी खुर्चीला काही सजावट चाललेली, आजूबाजूला रंगमंचावर सेट उभारणीचं काम चाललेलं. फळ्या, खिळे वगैरे गोष्टी अस्ताव्यस्त पडलेल्या. दिग्दर्शक एम. एम. खुळे, नाट्यलेखक पै. दा. भाट, रंगभूषाकार बी. झी. वाटलावे व युवा कल्लाकार के. जे. टोकले प्रयोगापूर्वीच्या तयारीचा आढावा घेताना.)
खुळे : (तीन पायाच्या खुर्चीवर बसत) भाट, हे चहापन्हा नौरंगजेबावर नाटक सादर करायचं शिवधनुष्य घ्यायला नको होतं वाटतं.
वाटलावे : (तिरसटपणे) गांडीव आपटायला नको म्हणजे झालं. (सगळे शंकेनं वाटलावेकडे बघतात.) अहो, गांडीव धनुष्य आपटायला नको ब्वा, असं म्हणलो मी!
टोकले : वाटलावे, बोलताना जपून बोला हो! आपण आहोत कुठे, बोलतो काय? याचं भान असुद्या!
भाट : तर तर!! आपण एक युगपुरुषावर असं ऐतिहासिक नाट्य सादर करणार आहोत. तेव्हा आपल्या सर्वांवर…
खुळे : (मध्येच बोलणं तोडत) ते राहूदे हो! आवळवीर नौरंगजेब यांच्या कार्याच्या गौरवार्थ त्यांच्यासमोरच त्यांच्याच जीवनपटाचं एक छोटेखानी नाट्य सादर करायला सांस्कृतिक मंत्रालयानं आपल्याला बोलावलंय खरं! पण एकाचवेळी नाटकाचे ड्राफ्ट लिहीत असताना त्याच्या तालमी करायच्या नि सादरीकरणाच्या तयारीला लागायचं. सगळं घाईचं झालं हो!
भाट : घाय? मी दोन दिवसांपासून एकआडएक डोळ्याने झोप काढतोय. पण सांगू कुणाला? आज तर आवरलंय सगळं! आज मस्त ताणून देणार मी!
खुळे : अहो भाट! टोकल्यांच्या तोंडी ब्यादश्या सलामत यांच्या कामाची उजळणी करवून घ्यायचीय. विसरलात? एक पंधरा मिनिटांचा पॅच जोडायचा आहे. असं ठरलंय ना आपलं?
वाटलावे : (दात कोरत) कसलं हो? यांना टाईमपास करायला सांगा. प्रयोगाच्या दिवसापर्यंत यांच्याकडून काही लिहून होणार नाही. बघाच तुम्ही!
टोकले : (मटकन खाली बसत) मला तर टेन्शन आलंय! ह्या भाटांनी संवाद अपूर्ण ठेवलेत. ह्या भाटांना संवाद लिहायचं सुचेना! वाटलावेला सेट उभारायचं जमेना. खुळे, खुळे घ्या खुळे! …नाटक!!!
खुळे : तुझ्याने एक संवाद वा प्रसंग नीट बसेना! चार वाक्यं तरी नीट पाठ करावी ना? प्रत्येक प्रसंगात प्रॉम्टिंग करावी लागते.
वाटलावे : तो नवखाय हो! त्यात पहिल्याच युध्दात तुमचं धनुष्य की गांडीव उचलायला दिलंय. गांडीव पडायला नको, म्हणजे झालं!
खुळे : वाटलावे, तुमचं गांडीव आवरून ठेवा! (बसल्या खुर्चीवरून हात फिरवत) मी तुम्हाला एक सिंहासन तयार करायला लावलं होतं! आपल्याला पहिल्याच प्रसंगात दरबार-ए-खास उभारायचा आहे, पण तुम्ही आणलीत ही पाय तुटलेली लाकडी खुर्ची!! आता भरतवर्षाचा सम्राट चहापन्हा नौरंगजेब पाय तुटलेल्या खुर्चीवर बसलेला कसा दिसेल? काही विचार केलात तुम्ही?
वाटलावे : त्याला मी काय करू? प्रयोग झाल्याशिवाय सांस्कृतिक खातं प्रयोगाला पैसे देणार नाही. तोवर निर्माता निव्वळ टोकल्यांच्या कपडेपटानं भिकारी झालाय. दर प्रवेशात नवा पोशाख म्हणजे त्याला झीट आलीय…
खुळे : (काही आठवल्यागत) अरे त्या कापडीला बोलवा कुणी! त्या गाढवाकडं विश्वासानं वेशभूषा करायला दिली तर त्यानं चहापन्हा नौरंगजेबांसाठी निव्वळ नेहरू शर्टांचा भरणा आणून ठेवलाय! कुणी पाहिलं तर आपल्याला थेट पाकिस्तानचं तिकीटच देतील. देशविदेशातले उंची अंगरखे आणायचे तर…
भाट : का अंगरखे शर्टांपेक्षा स्वस्त मिळतात?
खुळे : नाही त्यानं आवळवीर नौरंगजेबांना अॅलर्जी होत नाही ना? आणि दिल्लीपतींच्या अवकृपेपेक्षा ते केव्हाही स्वस्तच की! काय? (वाटलावेकडे बघत) बरं, तुमचं सेट लावणं कुठवर आलंय? नाही, म्हणजे इथं मोडक्या खुर्चीखेरीज फक्त खिळे नि फळ्याच दिसताय! आपल्याला फळीवर गणपती बसवायचा नाहीय, दरबार-ए-खास दाखवायचा आहे.
वाटलावे : त्याची काळजीच नको हो! (खुळे बसलेल्या खुर्चीकडे बोट दाखवत) हे मध्यभागी सिंहासन ठेवलंय की!
खुळे : ही खुर्ची आधी फेक कचर्यात. धर! (खुर्चीतून उठत खुर्ची ढकलतो) आणि मला प्रॉपर सिंहासन लागेल! कळलं?
टोकले : पण निर्माते आताच कफल्लक झालेत, आणखी किती खर्च करायला लावताय?
खुळे : चहापन्हा नौरंगजेब म्हणजे श्रीमंती थाट आलाच! त्यांना पेलताना जनता भिकेला लागली, तिथे निर्मात्यांची काय बात? त्यांना कळायला नको? ते कुठं हात घालताय ते?
वाटलावे : अहो, पण…?
खुळे : (मूळ विषयावर येत) सिंहासनाचं झालं, पुढचं बोला! बाकी दरबाराचं काय नियोजन आहे?
वाटलावे : (कंटाळ्याने) काय चारपाच खुर्च्या लावल्या का झालं!
भाट : (मध्येच) वाटलावे त्याला आसनं म्हणतात! या आधी तुम्ही कधी दरबार बघितला नाहीत का?
वाटलावे : खुर्च्या, आसनं वा बैठक काहीही म्हंटलं तरी टेकवायचं तर बूडच असतं ना? आणि इथं ती व्यवस्था झाली म्हणजे बास ना?
भाट : आणखी मागे…?
खुळे : (मध्येच भाटांचं बोलणं तोडत) हां, दरबाराचा फील यायला पडदे लावावे लागतील. तसंही चहापन्हा नौरंगजेब यांच्या जिंदगीत पडद्याचं महत्त्व खूपच आहे!
भाट : नाही हो! पूर्वीच्या काळी राणीवसा पडद्याआडून दरबार बघायचा…!
टोकले : (मधूनच) नीट बोला हो! तुम्हाला चहापन्हा तसे वाटलेत का?
भाट : (चिडून) माझं कुणी पूर्ण ऐकणार आहे का?
वाटलावे : (दातात काडी घालत निवांतपणे) हां, बोला बोला!! (खुळे आणि टोकले नवलाने पाहतात.)
भाट : तर मागे बरोबर ह्या बाजूला अब्दानीवसा असेल..!
खुळे : (संभ्रमात) अब्दानीवसा? राणीवसा समजू शकतो. हे काय नवीन?
भाट : (छताच्या फॅनकडे बघत) कुठल्या अडाण्यांना माझ्या भाग्यात लिहिलंस रे दिल्लीश्वरा!? अहो, अब्दानीवसा म्हणजे आवळवीरांचे यार-दोस्त यांचे पडद्यामागून दरबार निरीक्षणाचे ठिकाण वा जागा!
खुळे : हे होय? तुमच्या नाटकाच्या पहिल्या ड्राफ्टात याचा काही उल्लेख नाहीय काही?
भाट : कसली घाई आहे मग ही? एका बाजूला लेखन, दुसरीकडे तालीम नि तिसरीकडे पहिल्या प्रयोगाची घाई. त्यामुळे काही गोष्टी प्रयोगाच्या आदल्या दिवशीही सुचू शकतात…
खुळे : तेही खरंय म्हणा! (वाटलावेकडे बघत) बघितलंत का? आता हेही अॅड करा यात! नवीन सेट अब्दानीवशासह उभारा!
वाटलावे : (तिरकसपणे) हा त्या निर्मात्याने घरदार गहाण टाकलंच आहे, आता लिव्हर-किडनी विकायला सांगू त्यात काय? तुमची लिष्ट हनुमानाच्या शेपटासारखी वाढतच चाललीय…
खुळे : मी म्हणतो, त्याला विकायच्या असतील तर दोनच गोष्टी विकाव्या एक स्वादुपिंड वा दुसरा मेंदू. ह्याच गोष्टी त्याच्या निरुपयोगाच्या असतील. तो ब्यादश्या नौरंगजेबांवर नाटक करण्याचं धाडस करतो म्हणजे… कमाल!!
टोकले : (पुढे होत) तुमचं सेटचं फायनल झालं का? आता पहिल्या ड्राफ्टप्रमाणेच प्रसंग नि प्रवेश करायचेत ना?
खुळे : हो! अगदी! आपल्याला आता फक्त शेवटात काही वाक्यं वाढवायचीत. बाकी सगळं अनचेंज राहील.
भाट : (लटक्या रागाने) असं दहावेळा म्हणता आणि मागाहून, हे बदल, ते बदल करत डोके पिकवतात..! माझा पार कोपर्यावरला झेरॉक्सवाला केलात तुम्ही. बदल किंवा पाणी ओतून वाढव!
टोकले : मग आपला पहिला प्रवेश वजीर शहजाद्याच्या सांत्वनाने सुरू होईल ना?
भाट : सोबत सर्व चेंडू-फळी टीमसुद्धा असेल, हे ध्यानी घ्या!
खुळे : तर तर! आवळवीर नौरंगजेब सर्वांना कवेत घेतील नि दरबार भावुक होईल…
वाटलावे : (शंकेने) पण तुमच्या चेंडूफळी टीमचे जे डॉक्टर आहेत ते थोडेही रडत नाहीत हो?
खुळे : एवढंच ना? इथे दस्तुरखुद्द आतडं-ए-हिंद ब्यादश्या नौरंगजेब स्वतः प्रयोग बघायला बसणार आहेत, जिथं त्यांना बघून अख्खा देश नाकाला रूमाल लावतो, तेव्हा दोन मिनिटं डोळ्याला रुमाल लावण्याची काय बात?
वाटलावे : तसं असेल तर मी एक सोय केलीय.
भाट : (चमकून) काय? माझ्या संहितेबाहेरचं घुसडत नाही आहात ना तुम्ही? ऐन प्रसंगात?
वाटलावे : नाही, नाही. फक्त १५ अधिक सात ते आठ जणं चहापन्हांच्या खांद्यावर अश्रू ढाळणार म्हणजे पाचेक लिटरचा मिनी पाऊसच पडणार की?
खुळे : मग?
वाटलावे : ही कापडी पिशवी दिसतेय? पाण्याची?
टोकले : (अजीजीने) ज्यादाचे कष्ट करायला नका हो लावू मला!
भाट : (गोखल्याकडे दुर्लक्ष करत) तिचं काय? पुढं सांगा!
वाटलावे : आपण ती ब्यादश्या सलामत यांच्या खांद्याला अडकवून देऊ. म्हणजे सगळ्यांचे अश्रू त्यात पडतील, खांदा भिजणार नाही. कशी वाटली आयडिया?
खुळे : (स्वगत बोलल्याप्रमाणे) मित्रों, इस दुःख की घड़ी में हम सब डेढ़सौ करोड़ देशवासी आपके साथ खड़े हैं। और…
भाट : या नाटकाचा शेवट सुचला बघा!
टोकले आणि वाटलावे : काय?
भाट : थोडी फिल्मसारखी लिबर्टी घेत एक प्रसंग जोडुयात…
खुळे : कुठला?
भाट : देशभरातील दंगलपीडितांचं सांत्वन करण्याचा व मरणाशी झुंज देऊन आलेल्या ४१ जणांना धीर देण्याचा…!