जयेश कार्यालयात आला आणि कोणालाही आत न सोडण्याचा कार्यकर्त्यांना हुकूम देत, जयश्रीला घेऊन केबिनमध्ये शिरला. जयश्रीसमोर पाण्याचा ग्लास ठेवत त्याने तिच्या शेजारच्या खुर्चीत बैठक मारली आणि आपली भेदक नजर तिच्यावर रोखली. जयश्रीचा हात पाणी पिताना देखील थरथरत होता, चेहरा काळवंडला होता. ती कशाला तरी प्रचंड घाबरलेली वाटत होती. एखाद्या अत्यंत विदारक अनुभवातून ती जात असावी, असे तिच्याकडे पाहताना त्याला आता जाणवू लागले होते.
—-
कॉलेजच्या दिशेने निघालेली जयश्री सरळ अंबाबाईच्या देवळाकडे वळलेली पाहून जयेश चमकला. आज काय तो सोक्षमोक्ष लावायचाच, या विचाराने त्याने चालण्याचा वेग वाढवला. स्वत:च्या बहिणीचा पाठलाग करताना त्याला देखील मन खात होते, शरम वाटत होती, पण पर्याय नव्हता. जयश्री जयेशपेक्षा वयाने लहान. बारावी पास करून आताशी कुठे
कॉलेजच्या पहिल्या वर्षाला जायला लागली होती. जयश्री अभ्यासात खूप हुषार. आपण बरे आणि आपले काम बरे अशा वृत्तीची. अगदी स्पष्टच सांगायचे तर नाव ठेवायला देखील जागा नसलेली. पण गेले दोन दिवस तिचे वागणे प्रचंड बदलले होते. कधी नव्हे ते ती मोबाइल बंद ठेवायला लागली होती. सतत धास्तावलेली कावरी बावरी जयश्री काल कॉलेजला देखील गेली नव्हती. जयश्रीच्या वागण्यातला बदल जयेशच्या पटकन लक्षात आला होता. जयेश स्वत: सत्ताधारी पक्षाचा शहर संघटक होता, दुनियादारी जाणून होता; त्यामुळे बहिणीच्या वागण्यातला बदल लक्षात यायला त्याला वेळ लागला नाही.
विचारांच्या नादात जयेश आणि जयश्रीमधले अंतर झपाट्याने कमी होत होते. जयेश पटकन सावध झाला आणि त्याने चालण्याचा वेग थोडा मंद केला. खरेतर सकाळपर्यंत त्याचा निश्चय पक्का होत नव्हता, पण सकाळी सकाळी राधाचा फोन आला आणि त्याने या प्रकरणाचा काय तो निकाल लावायचे ठरवून टाकले. जयश्रीचा फोन सतत बंद लागत होता म्हणून तिच्या मैत्रिणीने, राधाने जयेशला फोन लावला होता. तिच्याकडून त्याला जयश्री काल कॉलेजला गेली नव्हती हे देखील कळाले. मग सकाळी कॉलेजला म्हणून बाहेर पडलेली जयश्री गेली तरी कुठे होती? आज सकाळी मग जयश्री जेव्हा कॉलेजला म्हणून बाहेर पडली, तेव्हा जयेश तिच्या मागावर निघाला.
जयेशला वाटले होते तसे काहीच घडताना दिसत नव्हते. जयश्री एकटीच शांतपणे देवीच्या मंडपात बसून राहिली होती. तास, दोन तास उलटले, पण ना तिला कोणी भेटायला आले, ना ती कोणाची वाट बघते आहे, असे जाणवले. त्याने तिच्या नंबरवर फोन लावला; मात्र अपेक्षेप्रमाणे तिचा फोन ‘स्विच ऑफ’ लागला. जयेशला काही सुचेना. शेवटी त्याने मनाशी निश्चय केला आणि सरळ जाऊन जयश्रीसमोर उभा राहिला. जयश्री विचारात इतकी गुंगली होती की जयेशचे अस्तित्व जाणवायला देखील तीन-चार मिनिटे जावी लागली. सहज तिचे लक्ष जयेशकडे गेले आणि ती प्रचंड दचकली. आधीच कावर्या बावर्या असलेल्या चेहर्यावर आता भीतीची पांढरी छाया पसरली. जयेशने काही न बोलता जयश्रीला हाताला धरले आणि बाहेर आणले. कोणतीही चौकशी न करता त्याने सरळ रिक्षाला हात केला आणि पक्ष कार्यालयाचा पत्ता सांगितला.
जयेश कार्यालयात आला आणि कोणालाही आत न सोडण्याचा कार्यकर्त्यांना हुकूम देत, जयश्रीला घेऊन केबिनमध्ये शिरला. जयश्रीसमोर पाण्याचा ग्लास ठेवत त्याने तिच्या शेजारच्या खुर्चीत बैठक मारली आणि आपली भेदक नजर तिच्यावर रोखली. जयश्रीचा हात पाणी पिताना देखील थरथरत होता, चेहरा काळवंडला होता. ती कशाला तरी प्रचंड घाबरलेली वाटत होती. एखाद्या अत्यंत विदारक अनुभवातून ती जात असावी, असे तिच्याकडे पाहताना त्याला आता जाणवू लागले होते.
‘जयू… काय झालंय?’
‘काही तर नाही..’ आवाजात उसना उत्साह आणत ती उत्तरली.
‘बाळा, तुला चालता देखील येत नव्हते ना, तेव्हापासून तुला कडेवर घेऊन फिरलोय मी. अशी कोणती गोष्ट आहे जी तुला माझ्यापासून लपवता येईल? गेले दोन दिवस मी तुझ्यातला बदल बघतोय. हा साधा बदल नाहीये. तू अस्वस्थ आहेस, भेदरलेली आहेस, साधी फोनची रिंग वाजली, तरी किती दचकते आहेस.’
जयश्रीने काहीतरी बोलायला तोंड उघडले, पण पुन्हा निर्धाराने ओठ मिटून ती गप्प झाली.
‘जयू, काय झालंय? कोणी मुलगा तुला त्रास देतोय का? कॉलजमध्ये काही घडलंय का? तुझ्या हातून काही चूक झालीये का? सांग ना रे बाळा… तुला कल्पना नाही, मी कालपासून किती अस्वस्थ आहे. नको नको ते हजारो विचार माझी पाठ सोडायला तयार नाहीयेत,’ बोलता बोलता जयेशचा स्वर कातर झाला आणि मग मात्र जयश्रीच्या संयमाचा बांध फुटला आणि ती हमसून हमसून रडायला लागली.
जयेशने तिला जवळ घेतले आणि मोकळेपणाने रडू दिले. काही वेळाने ती जरा शांत झाली आणि तिने मोबाईल जयेशच्या हातात दिला. बंद असलेला फोन जयेशने चालू केला आणि काही मिनिटातच दहा बारा मेसेजेसचा पाऊस मोबाइलमध्ये पडला. जयेशने एका मागे एक ते मेसेज वाचायला सुरुवात केली. वेगवेगळ्या नंबरवरून आलेले असले, तरी सर्व मेसेजेसची भाषा एकाच प्रकारची होती… गलिच्छ! जयेशच्या डोक्याची शिर रागाने नुसती तटतटली होती आणि त्याचवेळी जयश्रीचा फोन व्ााजला. अनोळखी नंबर होता, पण आवाज पुरुषाचा होता.
‘जयश्री है क्या?’
‘आप कौन?’ जयेशने आवाजात थंडपणा आणत विचारले.
‘मॅडम आज फ्री है क्या? घर पे आयेगी क्या? क्या लॉज बुक करना पडेगा? फुल नाइट का कितना?’
समोरचा माणूस काय संदर्भात बोलतोय हे लक्षात आले आणि जयेशने एक शिवी हासडली. त्याबरोबर समोरून फोन कट झाला…
क्षणाचाही विचार न करता जयेशने जयश्रीला घेतले आणि थेट पोलिस स्टेशन गाठले. जयेश तसाही राजकारणात असल्याने चार चांगल्या ओळखी राखून होता. आत-बाहेरचा स्वभाव नसल्याने त्याला मान-सन्मान देखील तेवढाच मिळत होता. त्यामुळे तो चौकीत शिरताच, स्वत: इन्स्पेक्टर कदमांनी उठून त्याचे स्वागत केले.
‘या जयेशशेठ, बसा ताई… आज इकडे कसा काय मोर्चा वळवलात?’
इन्स्पेक्टर कदम अगदी जवळचे असले तरी त्यांच्या उपस्थितीत अन् जयश्री तिथे हजर असताना जयेशला पटकन कशी सुरुवात करावी तेच कळेना. त्याची अवस्था इन्स्पेक्टर कदमांच्या अनुभवी नजरेने बरोबर ओळखली आणि त्यांनी महिला पीएसआय नंदा कामठेंना डोळ्यानी खुणावले. नंदा मॅडम सहजपणे आल्यासारख्या त्यांच्या टेबलकडे आल्या आणि अगदी जुनी ओळख असल्यासारख्या चेहर्यावर स्मित आणत जयश्रीशेजारी बसल्या. त्यांच्या त्या वागणुकीने नाही म्हणले तरी जयश्री जरा सावरली. पहिल्यांदाच पोलिसांशी असा थेट संपर्क येत असल्याने ती जरा बावरलीच होती, पण आता थोडी मोकळी झाली.
‘कधीपासून असे मेसेजेस आणि फोन येतायत तुला?’ जयेशची हकिगत ऐकल्यावर आता नंदा मॅडमनी लीड घेतले होते.
‘काल सकाळी मी कॉलेजला निघाले तेव्हापासून.’
‘चल, आपण बाहेर एक चक्कर मारून येऊ,’ जयश्रीचा हात हातात घेत नंदा मॅडम म्हणाल्या आणि जयश्रीला घेऊन बाहेर पडल्या.
‘मॅडम, ते लोक सरळ माझे नाव घेऊन बोलतात हो. मला एका रात्रीचा रेट विचारतात. घरी येते का
लॉजला असे विचारतात. सगळे नंबर वेगवेगळे असतात. मला काय चालले आहे काहीच कळत नाहीये.’
‘हे बघ, घाबरू नको. आम्ही सगळे आहोत तुझ्याबरोबर. आता तू सगळी काळजी आणि भीती सोड आणि खंबीर हो!’
त्यांचे बोलणे चालू असतानाच जयश्रीचा फोन खणखणला आणि नंदा मॅडम लगबगीने जयश्रीला घेऊन चौकीत शिरल्या.
‘फोन स्पीकर फोनवर टाक जयश्री. तुझ्याऐवजी मी बोलते.’
‘जयश्री का?’
‘बोलतीये…’
‘मॅडम आज फ्री आहे का?’
‘आहे की. पण बोलतोय कोण? किती पैसे फेकायची ताकद आहे तुझी?’
‘तुम्ही शब्द टाका मॅडम.. तुमचा फोटो पाहिल्यापासून जिवाला थाराच राहिला नाही बघा. असला माल बाजारात आलाय हे लैच उशिरा कळले!’
‘अय्या! खरंच? पण तुम्ही पाहिला कुठे माझा फोटो आणि नंबर कुठे मिळाला?’
‘बास का मॅडम? अहो तुमच्या नावासकट ‘येसबुक’वरती खाते उघडलंय की तुम्ही. वेड्यात काढता काय आम्हाला?
नंदा मॅडमने खाडकन फोन बंद केला आणि कदमांकडे पाहिले…
‘जोसेफ, मला ह्या खात्याची पूर्ण माहिती पाहिजे. खाते कुठे उघडले गेले, शेवटचे कुठून ऑपरेट झाले हे मला सगळे हवे आहे. तुला कुठल्या परवानग्या लागतील, कोणाशी बोलायला लागेल ते मला सांग. मी सगळे करून देतो. पण मला लवकरात लवकर या केसच्या मुळाशी जायचे आहे!’
‘जयश्री काळजी करू नकोस. जोसेफ आमच्या सायबर क्राइम डिपार्टमेंटचा नावाजलेला तत्ज्ञ आहे. तो अशी बघता बघता सगळी माहिती काढेल. तुझ्या नावाने हे खाते कोणी उघडले, तुझा नंबर तिथे कसा आला हे सगळे आम्ही शोधून काढू. बरं, मला सांग, तुझे कॉलेजमध्ये कधी कोणाशी वाद? किंवा तुझ्यावर कोणाचा राग?’
‘नाही हो सर. मी, राधा अन वैशाली असा आमचा तीन मैत्रिणींचा ग्रुप सोडला, तर मी वर्गात देखील कोणाशी फारसे बोलत नाही. अभ्यासाच्या पलीकडे कुठे लक्ष देखील नसते आमचे. अगदी पिक्चरला जायचे तरी आमच्या रोबर जयेशदादा असतो किंवा त्याचा कोणी कार्यकर्ता.’
‘ठीके जयेश, तुम्ही आता गेलात तरी चालेल. आमची कशी प्रगती होते, ते तुम्हाला कळवत राहूच. फक्त जयश्रीचा फोन इथेच ठेवून जा. आम्हाला काही तांत्रिक तपासासाठी त्याची गरज लागेल.’
—-
‘सर जयश्री अगदी सरळ वळणाची मुलगी आहे. ती, राधा आणि संगीता असा शाळेपासूनचा ग्रुप. सहसा बाहेरचा कोणी त्या त्यांच्यात घेत नाहीत. तिघी चांगल्या घरातल्या मुली आहेत. मी कॉलेजमध्ये देखील चौकशी केली. सर्व शिक्षकांचे, वर्गातल्या मुला-मुलींचे देखील मत या मुलींविषयी अत्यंत चांगले आहे. पण जयश्रीचे असे खोटे सोशल मीडिया प्रोफाईल बनल्यापासून तिच्या इतर दोघी मैत्रिणी देखील चांगल्याच धास्तावल्या आहेत. मी त्यांना बरेच समजावले आहे, पण त्यांची भीती काही कमी व्हायला तयार नाहीये.’
‘मला सांगा नंदा मॅडम, जयश्रीची कोणा मुलाशी जवळीक वगैरे? किंवा एखादा एकतर्फी प्रेमाचा मामला?’
‘नाही कदम साहेब! जयश्री ही जयेशची बहीण आहे हे सर्व
कॉलेज ओळखते. तो त्याच कॉलेजचा जुना विद्यार्थी आणि यूथ लिडर देखील होता. तिच्याबाबतीत असे धाडस कोणी करेल असे वाटत नाही. पण एक गोष्ट आहे सर, जयश्री आणि तिच्याच वर्गातला कुमार या दोघांना बरेचदा लायब्ररीत बोलताना मुलांनी पाहिलंय. ते कधी कधी अभ्यासाच्या नोटस देखील शेअर करत असत. मी या कुमारचा नंबर मिळवलाय अन आपल्या सायबर टीमकडे निगराणीसाठी दिलाय. पण मी इतरांकडे केलेल्या चौकशीत या कुमारबद्दल वाईट बोलताना कोणीच दिसले नाही. कुमार देखील आपण बरे आणि आपला अभ्यास बरा अशा वृत्तीचा आहे. मुख्य म्हणजे आई-बापाच्या कष्टाची त्याला जाणीव आहे, असे त्याच्या मित्रांशी बोलताना जाणवले.’
‘जयश्री किंवा तिच्या मैत्रिणींना कोणाचा संशय? किंवा जयश्री या दोघींपैकी कोणाची बाजू घेऊन कोणाशी भांडली वगैरे होती का?’
‘तसे काही तपासात आढळले नाही साहेब. तिघी सरळमार्गी. घर ते कॉलेज अन कॉलेज ते घर हाच त्यांचा प्रवास. त्यातून बरेचदा तर राधाचे वडील यांना त्यांच्या गाडीतून
कॉलेजला सोडतात आणि परत येताना बरेचदा जयेश सोबत असतो. अर्थात मुलींना बंधने आहेत अशातला भाग नाही. त्यांची सोशल मीडियावर खाती आहेत, त्या देखील चित्रपट, बगीचे, खरेदी, मॉल्स हे तिघी मिळून एंजॉय करत असतात.’
‘मॅडम एक काम करा, कुमारसोबत या मुलींचे मोबाईलदेखील स्कॅनरखाली घ्या. कदाचित या मुलींना देखील त्रास देण्याचा प्रयत्न होईल असं वाटतंय. आपण यावेळी आधी सावध असलेले बरे. राहून राहून काल झालेल्या ‘रोझ डे’चा आणि या प्रकरणाचा काही संबंध असावा असं मला सारखं वाटतंय.’
—-
‘सर, सायबर एक्सपर्टचा रिपोर्ट आलाय. जयश्रीच्या नावाने बनवलेलं प्रोफाइल मिश्रानगर भागातून बनवण्यात आले होते. आपण त्याच्या आयपी अॅड्रेस ट्रेस केला आहे, तो तिथल्याच एका सायबर कॅफेचा आहे. तीन दिवसांपूर्वी दुपारच्या सुमाराला हे प्रोफाइल बनवण्यात आलंय.’
‘चला तर मग. या प्रकरणावरचा पडदा आता उघडायची वेळ आलीये.’
हहह
‘काय रे ए बिनडोक! तुम्हा सायबर
कॅफेवाल्यांना कानी कपाळी ओरडून, हात जोडून विनंती करत असतो की येणार्या प्रत्येक कस्टमरचं ओळखपत्र तपासा, त्याच्या नोंदी ठेवा, फोटो काढा पण तुम्ही ऐकत का नाही रे? ही काय कस्टमरची लिस्ट आहे? गणेश, हगवणे, चंदू, निधी या नावावरून कस्टमर कसे ओळखणार आणि सापडणार?’
‘सर ते ओळखीचेच आहेत सर.’
‘अरे पण ओळखीच्या लोकांना कायदा लागू नसतो का? घे बोलावून या सगळ्यांना ताबडतोब.’
‘लगेच बोलवतो सर, समोरच्या बिल्डिंगमध्ये राहतात हे विद्यार्थी.’
—-
‘सर पोरं क्लीन आहेत. आधी वेगवेगळे मग एकत्र बसवून सगळ्या प्रकारे उलट-सुलट चौकशा केल्या, पण कोणाच्याच माहितीत विसंगती नाही. पोरं असले काही करणारी नक्की नाहीत!’
‘काहीतरी चुकतंय मॅडम… त्या दुपारी हे कस्टमर सोडले, तर कोणी आले नाही असे कॅफेवाला शपथेवर सांगतोय. पण आपल्याकडचे पुरावे काही वेगळेच सांगत आहेत…’
‘एक मिनिट… एक मिनिट सर… आपण एक मोठी चूक केलीये सर! आपण फक्त पुरुष कस्टमरवर लक्ष केंद्रित केले सर. तिथे यादीत निधी नावाची एक मुलगी देखील होती,’ बोलता बोलता मॅडमनी सायबर कॅफेचा नंबर लावला.
‘काय रे, त्या दिवशी यादीत निधी नावाची एक मुलगी देखील होती. तिची माहिती दे जरा.’
‘अहो मॅडम ती इथे पलिकडच्या बिल्डिंगमध्येच राहते. तुम्ही आलात तर लगेच घर दाखवतो तिचे.’
‘सर त्या कॅफेशेजारच्या इमारतीत राहते ती. आपण लगेच तिकडे निघायला हवे,’ नंदा मॅडम घाई करत म्हणाल्या, पण इन्स्पेक्टर कदम मात्र डोळे मिटून कसला तरी सखोल विचार करत होते. मध्येच त्यांच्या चेहर्याोवर एक गूढ हास्य आले आणि त्यांनी डोळे उघडले!
‘मॅडम सायबर कॅफे मिश्रानगरमध्ये, उरलेली एकमेव संशयित मिश्रानगरमध्ये… आणि राधाने तिचा पत्ता काय नोंदवलाय हो आपल्याकडे?’
कदमांचा प्रश्न संपला आणि नंदा मॅडम खाडकन उभ्या राहिल्या, ‘सर तिचा पत्ताही मिश्रानगरच, निधी बिल्डिंग… ओह माय
गॉड!!’
—-
‘कोवळ्या वयातला मूर्खपणाच हा जयेश! याला प्रेम तरी कसे म्हणावे? राधाला कुमार हवाहवासा वाटायचा, पण तिचा कधी पुढाकार घेण्याचा धीर झाला नाही. त्यात कुमार आणि जयश्रीची वाढती जवळीक तिला अस्वस्थ करायला लागली होती. या अस्वस्थपणाचे रागात रूपांतर व्हायला वेळ लागला नाही. त्यात कधी नाही ते जयश्रीने गेल्या आठवड्यात ‘रोझ डे’चा उल्लेख केला आणि राधाच्या संतापात भार पडली. जयश्री कुमारला किंवा कुमार जयश्रीला ‘रोझ’ देणार अशी काही एक समजूत तिच्या मनाने करून घेतली आणि काही करून भविष्यातली ही घटना घडू द्यायची नाही, असा तिने निश्चय केला. आणि एकदा संतापाने आणि रागाच्या भरात निश्चय केल्यावर योग्य-अयोग्य असे काही उरलेच नाही. पण कुमारला थांबवायचे कसे? रोजच्या पेपरातल्या बातम्या अन् पडद्यावर पाहिलेले काही प्रसंग तिच्या मेंदूला चालना देऊन गेले आणि ‘जयश्री बदनाम झाली तर?’ या वाईट विचाराचा उगम तिच्या मेंदूत झाला. पुढे काय घडले आपण जाणतोच…’
– प्रसाद ताम्हनकर
(लेखकाचे गुन्हेगारी कथालेखनावर प्रभुत्व आहे)