चोरावर मोरच का, लांडोर का नाही?
– विनोद पवार, चिंचपोकळी
लांडोर गरीब स्वभावाची. शिवाय चोराला अद्दल घडवायला मोरच हवा.
स्त्रियांनी रंगमंचावर पाऊल ठेवून एवढी वर्षं झाली तरी अजून बाप्ये पडद्यावर, रंगमंचावर साड्या का नेसतात?
– योगिनी नेवाळकर, भंडारा
त्यातून हमखास विनोदनिर्मिती होते, असा भ्रम असल्यामुळे.
खाली मान करून चालणार्या मुलींना वर कसा मिळतो?
– प्रवीण घोडेस्वार, मूल
मुली कुठे पाहतात, तसंही मुलगेच ‘पाहतात’ आपल्याकडे.
अल्कोहोल प्यायले की आतड्याला होल पडतं हे खरं आहे का?
– अविनाश कोल्हापुरे, सांताक्रूझ
तुम्हीच अनुभव घ्या आणि सांगा… म्हणजे सांगायला शिल्लक राहिलात तर.
काजूच्या फळाची बी खाली लटकलेली का असते?
– समीर शहापूरकर, डोंबिवली
तुम्हाला चांगलं माहितेय… बीज खालीच असतं.
उन्हाळ्यात अंगाची लाही लाही झाली की काय खावं?
– राधिका नवरे, चिंचवड
बायकोचं डोकं.
केसाने खरंच गळा कापला जातो का?
– ऑल्विन डिमेलो, कणकवणी
तशी संधी द्या लोकांना… म्हणजे कळेल.
एप्रिल फूल का असतो? हाफ का नाही?
– आर्यन दळवी, विन्हेरे
तुम्ही अर्धवट आहात म्हणून.
भूतकाळात भुतं होती का?
– नरेंद्र फणसे, बदलापूर
असतील… तुमच्यावरून सिद्ध होतंय…
गुढीपाडव्याला नीट बोल गाढवा म्हणण्याची परंपरा कोणत्या शतकापासून आली असेल?
– गोरक्षनाथ साळवी, सासवड
जेव्हा यमक जुळवायला मराठी माणूस शिकला त्या शतकापासून.
सैन्यात शिरा, अशी जाहिरात वाचली… सैन्यात पोहे, उप्पीठ मिळत नाही का?
– नयना ताटवे, सोलापूर
जाऊन पाहा तेही असेल… शिरा हे फक्त आमिष असेल कदाचित.
‘बुगडी माझी सांडली गं जाता सातार्याला’ या गाण्यातली नायिका सातार्याला का चालली असेल? कोल्हापूरला जात असती तर सांडली नसती का?
– रामदास कदम, कराड
कराडला आली असती तर नसती सांडली खरं तर.
पुणे तिथे काय उणे?
– गायत्री पेठे, सांगली
सौजन्य.
मास्कची सक्ती संपली, पण हेल्मेट सक्ती सुरू झाली, यामुळे पुणेकर संतापले आहेत, त्यांना काय सल्ला द्याल?
– प्रथमेश लवंदे, खडकी, पुणे
सक्ती केली पुणेकरांवर?… शक्य नाही हे…
नट म्हटला की व्यसन असणारच अशी समजूत असते लोकांची, तुम्हाला कसलं व्यसन आहे?
– शोभा सुरवसे, नागपूर
या एकदा बसूया!
तुम्हाला कुणी नाटकात गांधीजी किंवा नथुराम असा भूमिकेचा चॉईस दिला तर तुम्ही कोणती भूमिका स्वीकाराल?
– मोनिका कारखानीस, दादर
कुणाचीच नाही…