आज माझा परमप्रिय मानलेला मित्र पोक्या उड्या मारतच सकाळी सकाळी माझ्या घरी आला. मी त्याने मुलाखतीसाठी निवडलेली त्याच्या मनातली व्यक्ती ओळखली आणि कागदावरच लिहिले- महामहोस्वाध्याय, अखिल ब्रह्मांड जाणकार, खाकी हाफ चड्डीधारकांचे महागुरू, संघदक्षकारक, पांढर्याशुभ्र झुबकेदार महामिशांचे धारक, अखिल विश्वविजेते भाजपाचे भाग्यविधाते, ब्रह्मचर्याधिष्ठित, सर्वव्यापी, सर्वज्ञानी मंबाजीराव भिडेश्वर… हे वाचून पोक्या चाट झाला आणि निघाला. ही त्याने घेतलेली मुलाखत…
– नमस्कार, साक्षात्कारी संत-महंत भिडेश्वर गुरूजी महाराज.
– नमो नम: संघ दक्ष, नको तिथे लक्ष.
– असं का म्हणता गुरुजी?
– मला म्हणतात, मी राईचा पर्वत केला. अरे पर्वताची राई करणारा माणूस मी. बघ त्या रवींद्रनाथ टागोरांना त्यांची जागा दाखवून दिली. माझ्या आजोबांचे जुने मित्र भो पंचम जॉर्ज यांच्या स्वागतासाठी गायलेलं गीत राष्ट्रगीत होऊ शकतं का? त्यात हिंदुस्थानचा हिंदुराष्ट्र म्हणून उल्लेख आहे का? मग ते राष्ट्रगीत कसं होऊ शकतं? त्यांना कसले नोबेल पारितोषिक देता. ते आमच्या देशासाठी शहीद झालेल्या गोडसेंना मिळायला हवे होते. भागवतांची जिनांबरोबर शांततेची बोलणी चालू असतानाच गांधींनी काड्या घातल्या आणि फाळणी झाली. १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिवस होऊच शकत नाही. हे हांडगे स्वातंत्र्य आहे. दांडगे नव्हे. हा काळा दिवस आहे. दुखवट्याचा दिवस. त्या दिवशी सर्वांनी काळे झेंडे लावून तोंडाला काळे फासून दुखवटा पाळावा. उपवास करावा.
– आपण राष्ट्रध्वजाबद्दलही वादग्रस्त विधान केलं होतं.
– मी या तिरंग्याला राष्ट्रध्वज मानायला अजिबात तयार नाही. आपला राष्ट्रध्वज हा हिंदुराष्ट्राचा भगवाच असायला हवा होता.
– असं बोलून आपण संविधानाचा अपमान करत आहात. ‘जन गण मन’ हे राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोर यांनी ११ डिसेंबर १९११ रोजी लिहिले असून ते पहिल्यांदा २७ डिसेंबर १९११ रोजी कलकत्ता येथे भरलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात गायले गेले. हे गीत भारताच्या विविधतेतील एकतेचे प्रतीक आहे. या विविधतेला विरोध करून केवळ हिंदूराष्ट्राची पुंगी वाजवत आपण राष्ट्रगीताचा अपमान केला आहे. ‘जन गण मन’ची नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जर्मनीमध्ये असताना राष्ट्रगीत म्हणून निवड केली होती. पंचम
जॉर्जसाठी हे गीत टागोरांनी लिहिले, असे म्हणणे म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी देशासाठी केलेल्या बलिदानाचा अपमान आहे. स्वातंत्र्यदिनाचा व राष्ट्रगीताचा असा अपमान करणे योग्य नव्हे.
– १५ ऑगस्टला देश स्वतंत्र झाला, हे मी मानतच नाही. देशाचे, भाजपाचे, संघाचे लाडके नेते नरेंद्रजी मोदी ज्या दिवशी पंतप्रधान झाले, त्या दिवशीच देश स्वतंत्र झाला. त्यानंतर देशाची किती पटीने प्रगती झाली, माझे व भारतीयांचे जीवन किती सुसह्य झाले, चीन-पाकिस्तान आपल्याला घाबरू लागले, मोदींनी जगात देशाचे नाव उज्ज्वल केले.
– कसली प्रगती झाली? लोकशाही मूल्यांची विटंबना, दोन अहंकारी नेत्यांची हडेलहप्पी, देशातील वाढते अत्याचार, बलात्कार, शिगेला पोहोचलेली महागाई, सामान्य लोकांचे असहाय्य झालेले जीवन, भाजपाच्या हुकूमशाही प्रवृत्तीने घेतलेले बळी, जनतेची धाकदपटशाने चिरडलेली न्याय्य आंदोलने, नोटबंदीचा मनमानी निर्णय, त्यामुळे नागरिकांचे झालेले हाल आणि मृत्यू, एकेक राज्य कटकारस्थाने करून भाजपच्या घशात घालण्याचा डाव, वाढती गुन्हेगारी, व्यसनांचा आणि मादक पदार्थांचा व्यापार, ईडीची भीती दाखवून भाजपातील आयारामांची भरती, आदिवासी-मागास भागात पाण्याला मोताद झालेले स्त्री-पुरुष, मोडके पूल, साकव, पैशाने गब्बर झालेले भाजप नेते, खोक्यांचे राजकारण, रिझर्व्ह बँकेचे केलेले कळसूत्री बाहुले, बँका लुटणार्यांना अभय आणि परदेशी पलायनासाठी मदत, सर्वत्र माजलेला भ्रष्टाचार यालाच हिंदूराष्ट्र म्हणतात का?
– ही तर सुरुवात आहे. हिंदू राष्ट्राची गोड फळे भविष्यकाळात चाखण्यासाठी केलेली ही कडू बियांची पेरणी आहे. आम्हाला या देशाचा इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र आणि विज्ञान बदलायचे आहे. मी पाच हजार वर्षांपूर्वी झालेले संशोधन आणि पाच हजार वर्षांनंतर होणारे संशोधन याचा अचूक मेळ घालून हे हिंदूराष्ट्र भौतिक प्रगतीत दहा हजार वर्षे पुढे नेऊ शकतो.
– न्याल बाबा न्याल.
– एक गोष्ट लक्षात ठेवा. जोपर्यंत भगवा हा हिंदुस्थानचा राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारला जात नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही.
– गुरुजी, भगव्याचा तुम्हा-आम्हा सर्वांनाच सार्थ अभिमान आहे. शिवरायांचा भगवा हा तर आम्हाला प्राणाहून प्रिय आहे. याचा अर्थ असा नव्हे की देशाचा अधिकृत तिरंगा राष्ट्रध्वज खाली उतरवून त्या जागी हट्टाने भगव्याचे ध्वजारोहण करणे. या तिरंग्याची शान राखण्यासाठी आजवर हजारोंनी प्राणांचे बलिदान दिले त्यांचा तो उपमर्द आणि अपमान असेल.
– मला हे पटत नाही. भगव्याशिवाय हिंदूराष्ट्राला शोभा नाही.
– हा देश केवळ हिंदूंचा नाही. सर्व जातीधर्म व पंथांचे लोक इथे गुण्यागोविंदाने राहतात. या देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्व धर्म, पंथ, जातींच्या लोकांनी आपले प्राण दिले आहेत. तुम्ही संघवाले फाळणीच्या वेळी काय चणे-कुरमुरे खात बसला होतात काय?
– तो मोठा इतिहास आहे.
– म्हणजे खोटा इतिहास आहे. तुम्ही संघवाले दामटून खोटे बोलण्यात हुशार आहात. थाळ्या वाजवणे, मेणबत्त्या पेटवणे, हर हर मोदी अशा घोषणा देणे हे तुमचे राष्ट्रीय कार्यक्रम. तिकडे ते मणिपूर पेटलेय, अनेक राज्ये तुमच्या पक्षाने केलेल्या अन्यायामुळे धुमसतायत याची मोदी-शहांना खंत नाही, पर्वाही नाही. बुडाखाली आग जळतेय याची फिकीर नाही. २०२४ साली तुमची सत्ता जाणार हे विधिलिखित आहे आणि तुम्ही कसल्या हिंदूराष्ट्राच्या गमजा करता?
– अरे वेड्या, असे काही चित्रविचित्र बोलल्याशिवाय कोण मला विचारणार? हिंदू राष्ट्राचा भावी राष्ट्रपती आहे मी. आहात कुठे?