‘रिमझिम गिरे सावन’ असं गाणं मैत्रिणीच्या स्टेटसला बघितलं आणि लक्षात आलं आता नक्की पाऊस आलेला आहे. काय आहे की ‘रिमझिम गिरे’, ‘टिप टिप बरसा पानी’ अशी गाणी स्टेटसला लावल्याशिवाय पावसाळा आला असे अधिकृतपणे वेधशाळा घोषितच करत नसावी.
माझी एक मैत्रीण जूनच्या पहिल्या आठवड्यातच अस्वस्थ झालेली होती. तिचा चेहरा बघून मी विचारले, ‘अगं काय झालं?’ तर म्हणाली, ‘अगं मागच्या वर्षीचं ‘रिमझिम गिरे सावन’ डिलीट झालंय. आता कसं करू?’ मीदेखील मनात म्हटलं, ‘हो ना. आता पावसाळा कसा येणार?’
काही गाण्यांचं आणि पावसाळ्याचं नातं जसं पक्कं आहे तसंच पावसाळी सहल आणि पावसाचं नातं आहे. आमच्या ऑफिसमध्ये तर आम्हाला जानेवारी महिन्यापासूनच पावसाळ्याच्या सहलीच्या सुट्ट्या सांगून ठेवाव्या लागतात. एकाच वेळी सगळ्यांची सुट्टी चालत नाही, आलटून पालटून घ्यावी लागते. त्यामुळे वर्षाच्या सुरुवातीलाच त्या मंजूर करून घ्याव्या लागतात. मग, सुट्टीच्या दिवशी पाऊस आलेला असो वा नसो. तो ऑफिसचा दोष नाही. पावसाळी सहलीसाठी सुट्टी घेतली आणि जर सहलीला गेला नाहीत तर ती बिनपगारी रजा होते. त्यामुळे सहलीचे स्टेटस ठेवणे, सहलीचे फोटो सोशल मीडियावर शेयर करणे हे अत्यंत गरजेचे असते. फक्त स्टेटस आणि फोटोच पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाऊ शकतात.
पावसाळ्यात जशी सहल अत्यंत गरजेची समजली जाते तसेच भजी बनवून त्याचे फोटो सोशल मीडियावर टाकणे हेदेखील गरजेचे असते. ‘लव्ह रेन’, ‘लव्ह कांदा भजी’ असेही लिहिणे अगदी मस्टच असते. एका पावसाळ्यात शेजारच्या काकूंनी कांदा भजी बनवली नाहीत तर काकूंची तब्येत हल्ली बरी नसते असे काका सगळीकडे सांगत फिरत होते. आमच्या सुलतानला (आमचा बोका) देखील कांदा भजी खूप आवडतात. सोसायटीच्या बायकांनी नुकताच पावसाळ्यापुरता ‘कांदा भजी’ ग्रुपदेखील बनवला आहे. शिवाय पावसाळा संपेपर्यंत या ग्रुपच्या सगळ्या सभासदांनी आपला प्रोफाइल फोटो म्हणून आपण बनवलेल्या कांदा भज्यांचा फोटो लावायचे एकमताने ठरले आहे.
पावसाळी सहल एवढी गरजेची आहे की त्याशिवाय पावसाळा खराच वाटत नाही. आमच्या सोसायटीतील ज्येष्ठ नागरिकांना पावसात सहलीला जाणे शक्य नसते. तसे ते काही वर्षापूर्वीपर्यंत जात असत. पण, एकदा एक आजोबा पावसाळी सहलीत जोरात नाचत असताना कोणाचा तरी धक्का त्यांच्या तोंडाला लागला आणि आजोबांची कवळी पाण्यात पडली. धबधब्यात ती वाहून गेली. तेव्हापासून पावसात नाचणे हे कोवळ्या लोकांचे काम आहे, कवळीवाल्यांचे नव्हे असे सगळ्यांचे म्हणणे पडले. मग हल्ली पावसाचा आनंद लुटण्यासाठी सगळ्या जेष्ठ नागरिकांनी सामूहिक वर्गणी काढून बागेत शॉवर लावून घेतला आहे. पावसाळा सुरु होण्याच्या थोडेसे आधीच ते या शॉवरखाली नाच करून मग कांदा भजी खाण्याचा रिच्युअल पार पाडतात म्हणजे पुन्हा पावसात भिजणे नको.
हे सगळं करणं मला तरी आपल्या दैनंदिन गरजेइतकं महत्वाचं वाटतं. किंबहुना अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजेइतकंच स्टेटसचं पावसाळी गाणं, पावसाळी सहल आणि कांदा भजी हे गरजेचं असतं.
सिनेमात दाखवलेला पावसाळा केवढा रोमँटिक असतो. त्यात नायक-नायिका एकमेकांच्या अंगावर पाणी उडवतात. नाचतात, गातात. त्यांना असं भिजताना बघून माझा सर्वसामान्यपणा नेहमीच जागृत होतो. मला नेहमी प्रश्न पडतो की यांचे आतले कपडे पावसात ओले होत नसतील का? असतील तर किती जास्तीचे जोड त्यांनी पावसाळ्यासाठी ठेवले असतील? आमच्यासारखं इस्त्री करून ते चड्डी-बनियन वाळवत असतील का? ते वाळवण्यासाठी निर्माता त्यांना वेगळा पावसाळी भत्ता देत असेल का? रोमँटिक झालेले हे नायक-नायिका पावसात भिजून आल्याने घरी आईची बोलणी खात असतील का? पावसामुळे त्यांना सर्दी, पडसं होत असेल का? पावसाळ्याच्या सुरुवातीला छत्री, रेनकोट, पावसाळी चपला, अशी आम्हा मुंबैकरांसारखी खरेदी ते करत असतील का? पावसाळ्यात लागतात म्हणून दोन कॅज्युअल लिव्ह ते राखून ठेवत असतील का? नायिका पावसात भिजताना कोणत्या कंपनीची उत्पादने वापरते ज्यामुळे तिचा मेकअप भिजून निघून जात नाही? ‘भिडे पूल पाण्याखाली गेला’, किंवा ‘मिलन सबवेला पाणी भरलं’, ‘मुंबईची तुंबई झाली’ अशा बातम्या नायक-नायिकेला महत्वाच्या वाटतात का?
शाळकरी मुलांची तर पावसाळ्याच्या नावाखाली केवढी तरी फसवणूक होते. ‘माझा आवडता ऋतू’ म्हणून पावसाळ्यावर निबंध लिहिला जातो. त्यात निसर्ग कसा हिरवागार होतो याचे वर्णन असते, धरणीमाता कशी नवीन वस्त्रे ल्यायल्यासारखी प्रफुल्लित होते वगैरे लिहिलेलं असतं. जिथे निबंधात सगळीकडे प्रफुल्लित निसर्ग दिसतो तिथे मला बापुडीला मात्र चिखल दिसत असतो, जिथे हिरवी वनराई दिसत असते तिथे मला पावसामुळे महाग झालेल्या हिरव्या भाज्या दिसत असतात. जिथे पावसामुळे दुथडी भरून वाहणार्या नद्या दिसतात तिथे मला मात्र पावसामुळे कपडे वाळणार नाहीत ही वस्तुस्थिती दिसत असते. लोकांना जिथे मातीचा सुगंध येतो तिथे मला पावसामुळे तुंबलेली गटारं वाहताना त्याचा सर्वत्र पसरलेला वास येत असतो. लोकांना उगवलेलं हिरवंगार गवत दिसतं, मला सगळीकडे उगवलेले कवी आणि त्यांच्या पावसाळी कविता दिसतात.
हल्ली पाऊससुद्धा सरकारी ऑफिसमधील अधिकार्यासारखा झाला आहे. आपण त्याची वेळ घेऊन भेटायला जावं आणि साहेब येणार येणार म्हणून ते लंचटाईमनंतर येतात. तसं आमच्या लहानपणी न चुकता ७ जूनला येणारा पाऊस हल्ली येतो येतो म्हणून जुलैमध्ये उगवायला लागलाय. शाळेत तपासणी करायला येणार्या अधिकार्यासारखा अचानकच तो वर्षातून कधीही उगवत असतो. पण ऑफिशियल पावसाळ्यातील पावसात जी मजा आहे ती अशी जानेवारी फेब्रुवारीमध्ये येणार्या पावसाला नाही. मार्चमधील परीक्षा पास न झाल्याने ऑक्टोबरमध्ये हजेरी लावल्यासारखा तो वाटतो.
बरं इतका बेभरवशाचा की जोरदार पाऊस आहे म्हणून आपण सदाशिव पेठेतून रेनकोट वगैरे घालून बाहेर पडावं आणि लक्ष्मी रस्त्यावर आपण पोचतो तेव्हा तो कोरडा ठक्क असावा. कोरड्या रस्त्यावर रेनकोट घालून निघाल्याने आजूबाजूच्या लोकांनी आपल्याकडे वेड्यागत बघावं.
यावर्षी पाऊस कमी होणार असल्याने कोरड्या दुष्काळाची शक्यता आहे असा अंदाज वेधशाळेने वर्तवावा आणि महिन्याभरातच उच्चांकी पाऊस व्हावा. या पद्धतीने जर पाऊस वागत राहिला तर राजकारणी लोकांचे बेभरवशाचे विक्रम तो लवकरच मोडीत काढेल.
बरं या चित्रपटवाल्यांनासुद्धा काय पाऊस आवडतो कुणास ठाऊक? नायिका तर चक्क नायकाला पावसामुळे ऑफिसला जाऊ नको म्हणते. ‘हाय हाय ये मजबुरी’ असं म्हणत ती त्याची निंदा करते. पण तो जर ऑफिसला गेला नाही तर तिच्या झुळझुळीत शिफॉनच्या साड्या येणार कुठून असा प्रश्न त्यांना पडत नसावा काय?
‘टिप टिप बरसा पानी’ हे गाणं म्हणजे तर शुद्ध खोटारडेपणा आहे. या नायक-नायिकेला विज्ञानात अजिबात गती नाही असे मला खेदाने म्हणावे लागेल. पाण्यात आग लागलेली यांनी कधी बघितली होती का? बरं लागली असेलच आग, तर लगेच त्यावर चहा वगैरे बनवून घ्यावा की नाही? ‘रिमझिम रिमझिम’ गाणं लिहिणार्या गीतकाराने मुंबईचा धबाधबा कोसळणारा पाऊस बघितला नसावा.
पावसाळी छत्र्यांप्रमाणे सगळीकडे जागोजागी उगवलेले पावसाळी पत्रकारदेखील आपल्याला बघायला मिळतात. एकदा तर पावसात भिजून थंडीने कुडकुडत घरी येत असताना मला एक पत्रकार भेटला आणि त्याने मला विचारले, ‘कसं वाटतंय मॅडम पावसात भिजून?’
रागातच मी उत्तर दिलं, ‘एकदम गरम गरम वाटतंय.’
त्याने लगेच बातमी केली, बघा, यावर्षी नवीन सरकार निवडून आल्याने पाऊसदेखील उबदार पडू लागलेला आहे.
अगदी दोनचार सरी येऊन गेल्या तरी लगेच निवेदक मागचा कुठला तरी प्रलयाचा व्हिडीओ दाखवून ‘पावसाचे संकट’ या मथळ्याखाली कडकडाट करून बातम्या देतात. मी तर कित्येकदा खर्या पावसाला घाबरण्यापेक्षा या बातम्यांमधील पावसाला घाबरून घरी बसलेली आहे.
पाऊस असो, उन्हाळा असो वा हिवाळा. जोवर आपल्याला चांगलं वाटतंय तोवर तो ऋतू आपल्याला हवा असतो, थोडासा त्रास झाला की सगळंच नकोसं वाटू लागतं. उबदार पांघरुणात बसून दिसणारा खिडकीबाहेरचा पाऊस नेहमीच चांगला वाटतो. पण अशा भर पावसात गटारं स्वच्छ करणारी कष्टकरी माणसं आपल्याला दिसत नाहीत. उघड्या राहिलेल्या गटाराचे तोंड न दिसल्याने त्यात वाहून गेलेली माणसे दिसत नाहीत. आपल्या इथे तुडुंब पाऊस असताना गावाकडे मात्र अजूनही शेते कोरडी असतात आणि आपल्या गैरसोयींमुळे आपल्याला हा पाऊस बंद व्हायला हवा असतो. आपण मिलिमीटरमध्ये पाऊस मोजत असतो आणि गावाकडे मात्र विहिरीत उरलेलं पाणी मिलिमीटरमध्ये मोजायची वेळ आलेली असते. आपल्या जगण्यासारखेच आपले ऋतूदेखील आपल्याला सोयीप्रमाणे हवे असतात.