एकेकाळी दर्जेदार राजकारणासाठी देशात नाव असलेले महाराष्ट्र राज्य आज या राजकारणात इतके रसातळाला गेले आहे की देशातील सर्वात बरबटलेले राज्य अशी आज आपली ओळख होत आहे, हे भूषणावाह नक्कीच नाही. आज दिल्लीने बटण दाबले की इथे ढेकळे फुटावीत तसे पक्ष फुटत आहेत, हा या राज्याने भाजपाला नाकारले म्हणून घेतला जाणारा सूड आहे. इथे जनतेने निवडून दिलेले पक्षाचे आमदार फोडले जातात ते काही राज्याचा विकास व्हावा म्हणून नाही, तर भाजपाचे लोकसभेतील खासदार वाढावेत म्हणून चाललेला हा आटापिटा आहे. पण दिल्लीच्या या खेळात देशातील हे महत्वाचे राज्य कायमच्या राजकीय अस्थैर्याकडे जात आहे त्याचे काय? शिवसेनेसोबतच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गद्दारीनंतर महाविकास आघाडीतील बरीच कीड निघून गेली आणि अजित पवार व इतर आठ जणांच्या शपथविधीनंतर आता ही कीड समूळ नष्ट होऊन एक निकोप महाविकास आघाडी जनतेसमोर येत आहे. त्याचवेळी भाजपा मात्र हिंदुत्वाचे नाव घेत स्वतःची गंगा मैली करून घेत आहे. या पक्षाची अशी गटारगंगा झालेली पाहून या पक्षाच्या उभारणीसाठी झटलेल्या रामभाऊ म्हाळगींसारख्या नेत्यांच्या आत्म्याला महाक्लेष होत असतील. जो भाजप राष्ट्रवादी काँग्रेसला भ्रष्टवादी म्हणत गेली तीस वर्षं महाराष्ट्रात त्या पक्षाविरोधात राजकारण करत होता, तो आजच्या तारखेला त्यातील भ्रष्टाचाराचे सर्वात जास्त आरोप असलेल्या नेत्यांना आज मांडीवर बसवून घेतो, तेव्हा हा पक्ष यापुढे बेभरवशाचा, भ्रष्टाचाराला अभय देणारा, सत्तांध पक्ष अशी मलीन प्रतिमा घेऊन जनतेसमोर जात आहे. प्रत्येक वेळी हे सत्तेचे राजकारण आहे, त्यात सगळेच क्षम्य आहे म्हणून भाजपाने या अनैतिकतेचे समर्थन करायचे आणि जनतेने निमूटपणे सत्तेचा हा नंगानाच सहन करायचा हे आता अति झाले. आधीच्या महाविकास आघाडीला तीन चाकी रिक्षा म्हणून हिणवणारे आज स्वतः तीन चाकी बिना टपाच्या, विना परमिट रिक्षात उरले सुरले कपडे फेडून उघडे बसले आहेत, हे जनता पाहते आहे. महाराष्ट्रात भाजपा म्हणजे निर्लज्जम् सदासुखी.
राजकारण आज इतके रसातळाला जावे की महाराष्ट्रात सुतक असताना शपथविधी व्हावेत?
समृद्धी महामार्गावर नुकताच जो भीषण अपघात झाला त्यातील पंचवीस मृतांची कुटुंबे शोकसागरात बुडालेली असताना इकडे राजभवनात सत्तेचे भिकारी शपथ घेण्याची घाई करत होते. काय बिघडले असते कोणी दोन दिवस उशिराने मंत्री झाले असते तर? जे आधीपासून मंत्री आहेत, ते असे काय दिवे लावत आहेत? समृद्धी महामार्गावर मृत्यूने जे भयंकर तांडव केले त्याला बसचालक जबाबदार होता की त्या खासगी बसच्या मालकाने सदोष वाहन रस्त्यावर आणले होते, हे चौकशीत समजेल; पण गेल्या सहा महिन्यांतच या महामार्गावर लहान मोठे चारशे अपघात झाले व ९७ बळी गेले असतील, तर मात्र या महामार्गाची चाचणी काटेकोर झाली आहे का, यावरच प्रश्नचिन्ह उभे राहते. कोणकोणत्या चाचण्या या महामार्गावर घेतल्या गेल्या होत्या, याची देखील चौकशी करावीच लागेल. एक कोटीपेक्षा जास्त रुपयांच्या गाडीत बसून उपमुख्यमंत्री क्रमांक एक (कारण आता दोन नंबरचे उपमुख्यमंत्री देखील आहेत) आणि मुख्यमंत्री या महामार्गावरून उद्घाटनाच्या वेळी फेरी मारून आले, हीच एकमेव चाचणी आजवर जनतेला माहिती होती. या महामार्गाच्या आराखड्यात आणि बांधकामात काही दोष आहेत का याकडे देखील संशयाची सुई वळतेच. या महामार्गाचा पहिला टप्पा अत्यंत घाईत बनवला गेला असावा, अशी शंका घ्यायला बराच वाव आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या महामार्गाच्या अर्धवट टप्प्याचे जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले त्यावरून तर ही शक्यता अगदीच नाकारता येत नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे अत्यंत संयमी शब्दांत टीका करतात. पण त्यांना देखील उद्विग्न होत या महामार्गावर अपघातात मृत्युमुखी पडल्यावर लोक तो ‘देवेंद्रवासी’ झाला असे म्हणतात, अशी कठोर टीका करावी वाटली. यावरून फडणवीस बोध घेतीलच, असे मात्र नाही. कारण, ते सध्या मी पवारांच्या नाकावर टिच्चून अजितदादांना घेऊन आलो, या आनंदात मश्गुल असतो. खोल विहिरीत उतरताना गळ्यात आधीच एक दगड बांधलेला असताना आपखुशीने दुसरा दगड बांधून घेणार्याला व्हावा, तसा हा आनंद आहे. सतत सुडाचे सत्ताकारण करणारे स्वतःला महाराष्ट्राने काय म्हणून ओळखावे याची फारशी फिकीर बाळगत नाहीत. राजकीय श्रेयाच्या हपापलेपणामुळे आणि निवडणुकीवर डोळे ठेवून अनेक उन्नत मार्ग, महामार्ग, पूल, वंदे भारत रेल्वेगाड्या, अर्थवट विमानतळे, जेट्टी, भवने, इमारती यांच्या उद्घाटनाचा जो सपाटा सत्ताधारी पक्षानी लावला आहे तो पाहता सुरक्षा नियम, तांत्रिक कसोटी याची संपूर्ण दक्षता घेऊन मगच ही उद्घाटने होत असतील का नुसती डेडलाइन अर्थात निवडणुकीची तारीख जवळ येत आहे, म्हणून नियमांना फाटा देऊन तर हे सारे उरकले जात नसेल ना, हा प्रश्न समृद्धी महामार्गावरच्या अपघातमालिकांनंतर उपस्थित होतो आहे. महामार्गाची, पुलांची घाईत केलेली उद्घाटने म्हणजे मृत्यूचे सापळे बनत असतील तर असे प्रचारकी उद्घाटन जीवघेणे आहे. ही उद्घाटने म्हणजे मोदी सरकारने जनतेला गुंतवून ठेवायला उडवलेले फुगे आहेत. असे अजून बरेच फुगे नव्या दमाने फुगवले जात आहेत. उदा. सेन्सेक्सने आजवरचा उच्चांक नोंदवल्याचा एक फुगा, पंतप्रधानांना अमेरिकेतील स्टेट डिनर व संयुक्त संसदीय सभेला संबोधन करण्याचा सन्मान मिळाला, असा एक भलामोठा फुगा… समान नागरी कायदा नावाचा एक पंचाहत्तर वर्ष जुना फुगाही आता फुगवला जात आहे.
सेन्सेक्स उच्चांकी गेला हे अर्धसत्य आहे. शेयर बाजाराचा निर्देशांक हा आंतरराष्ट्रीय स्तरावर डॉलरसोबत जोडूनच पाहिला जातो. डॉलर वधारला असताना रुपयांत सेन्सेक्स उच्चांकी गेला तर तो उच्चांक नसून आधीच्या उच्चांकावेळच्या डॉलरच्या किंमतीसोबत पाहता त्याहून खालीच आहे. मग हा असला बनावट उच्चांक खरा मानायचा का? शेयर बाजार तेजीत असल्याने देशाची आर्थिक पत वाढते हे खरे; पण आज सवाल आहे तो सामान्य जनतेची आर्थिक पत कधी आणि कशी वाढणार याचा. गरिबाने बाराशे रुपयांचा घरगुती गॅस सिलेंडर विकत घ्यायचा, टोमॅटो शंभर रुपये किलोने विकत घ्यायचा, पण फुगे उडवले जातात ते सेन्सेक्सच्या फसव्या उच्चांकाचे.
असाच अजून एक फुगा उडवला गेला मोदींच्या स्टेट डिनरचा. भारतीय पंतप्रधानाना अमेरिकेत सन्मान मिळत असेल तर तो क्षण अभिमानास्पदच आहे. या दौर्यातून मोठी गुंतवणूक देशात आली असेल तर ती देखील नक्कीच स्वागत करण्यासारखी गोष्ट आहे. पण त्याचवेळी तिथे मोदींवर लोकशाहीचा गळा घोटणारे पंतप्रधान अशी जी टीका झाली आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय लोकशाहीच्या अस्तित्त्वावर प्रश्न उपस्थित केले गेले, त्याकडे दुर्लक्ष कसे करता येईल? व्हाइट हाऊससमोरील निदर्शने आणि मोदींच्या चुकीच्या इंग्रजी संभाषणाने हा स्टेट डिनरच्या फुग्यातील हवा गेली.
आता देशभर एक नवा फुगा आता फुगवला जातो आहे तो समान नागरी कायद्याचा. केंद्रातील भाजपा सरकारने देशात समान नागरी कायदा लागू करण्याच्या हालचाली सुरू केल्या, पण त्याआधीच भाजपाने जणू काही आता देशात समतेचे नंदनवनच अस्तित्त्वात येणार अशीच हवा भरायला सुरू केली. काही कायदे आजवर झाले नाहीत ते बहुमत नव्हते अथवा राज्यकर्ते नाकर्ते होते म्हणून नव्हे, तर जनतेमध्ये संघर्ष निर्माण न होता ते आणणे ही तारेवरची कसरत ठरत होती म्हणून. शिवाय देशात फौजदारी कायदा तर समान होताच. समाजातील सर्वच घटकांना आधी समान संधी या टप्प्यावर आणणे हे जास्त महत्वपूर्ण होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींना नऊ वर्षानी या कायद्याची आठवण झाली ती देखील निवडणुकीत मुद्दा हवा म्हणून. आज देशामध्ये मुस्लिम, ख्रिश्चन व पारसी समाजासाठी स्वतंत्र पर्सनल लॉ आहे, तर हिंदू, शीख, जैन व बौद्ध समाजासाठी हिंदू सिव्हिल लॉ आहे. देशात जर समान नागरी कायदा लागू झाला तर सर्व धर्मांना एकच सिविल कायदा लागू होईल. हा कायदा भाजपा वरवर जरी समान नागरी कायदा म्हणत असला तरी त्याचा अंतिम मसुदा पाहिल्यावरच भाजपाचा खरा हेतू स्पष्ट होईल. इतरधर्मीय तसेच हिंदूमधील दक्षिण भारतीय, ईशान्य भारतीय आणि आदिवासी भागातील भारतीय यांच्या चालीरीती, विवाहविषयक नियम आणि वारसाहक्काचे अधिकार भिन्न आहेत. समाजातील कोणत्याही घटकाला समान नागरी कायद्याने त्यांच्या धार्मिक बाबींमध्ये हस्तक्षेप होतो आहे असे वाटत असेल, तर त्याबाबत त्या समाजघटकाशी चर्चा करावीच लागेल. निवडणुका तोंडावर आल्या आहेत म्हणून आले मोदींच्या मनी आणि केला समान नागरी कायदा असा आक्रस्ताळेपणा या कायद्याबाबत केला गेला, तर त्याचे परिणाम हे मागे घ्यावे लागलेल्या कृषी कायद्यापेक्षा भयंकर होतील. अल्पसंख्याक समुदायामध्ये जी संभ्रमाची स्थिती आहे ती आधी दूर केली पाहिजे. पण, तसे होणार नाही. कारण मोदींना तेच हवे आहे. किंबहुना समान नागरी कायदा आला की मुसलमानांची चार बायका करण्याची सोय जाणार, याच आनंदात बहुतेक हिंदू अब्दुल्ला दीवाने आहेत. या कायद्यामुळे हिंदू अविभक्त कुटुंब दाखवून कर वाचवण्याची जी सोय होती, तीही जाणार आहे, याची त्यांना कल्पना नाही. अर्थात, मुस्लिमद्वेषाने आंधळे झालेले सनातनी लोक मोदींनी चड्डी फेडल्यावर स्वहस्ते अंतर्वस्त्रंही उतरवायला तयार होतात, तिथे या सवलती गेल्या तर काय बिघडतं, असं ते म्हणतीलच.
सोलापुरात पाकिस्तानचा झेंडा छापलेले फुगे सापडले, तेव्हा पोलिसांनी तो खोडसाळपणा वेळीच थांबवला. नाही तर या फुग्यावरून समाजात तेढ निर्माण झाली असतीच. सगळेच फुगे करमणूक म्हणून उडवले जात नाहीत तर काहींमधे विघातक हेतू देखील असतो. दिल्लीतून एक फुगेवाला या वर्षात नवनवीन फुगे फुगवून उडवतो आहे, आणखी बरेच फुगे उडणार आहेत, कारण निवडणुका आपल्याला वाटतात त्याहून जवळ आहेत. जनता बालबुद्धीने या रंगबीरंगी आकर्षक फुग्यांना भुलणार की फुग्यात फक्त हवा असते, फुग्याने पोटाचा खड्डा भरता येत नाही, या वास्तवाचे भान ठेवून त्या फुग्यांना वेळीच टाचणी लावून ते फोडणार हे २०२४च्या निवडणुकीत स्पष्ट होईल. तोपर्यंत तरी भारताच्या आणि महाराष्ट्राच्या राजकीय आकाशात हे रंगबीरंगी आकर्षक फुगे उडत राहणारच.