संपादक ज्ञानेश महाराव यांच्या `देवाधर्माच्या नावानं` या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलेल्या प्रबोधनकारांच्या आठवणींचा दुसरा भाग.
– – –
एक गंमत म्हणून सांगतो. दादा सकाळी साडेआठला त्यांचा टाइपरायटर घेऊन साडेआठला सकाळी जी भट्टी टाकून बसायचे, ते दुपारी एकपर्यंत. त्याचा मराठी कीबोर्ड बनवलेला होता. एक वाजला की दादा पत्नीला म्हणायचे, सरू, जे काय असेल ते घेऊन ये. जेवायचं आहे. त्यादरम्यान नऊ-साडेनऊला एक बाई आली, टिंग टिंग. आमचा दरवाजा सतत उघडा. इथेसुद्धा त्या कलानगरला कधी कुलूप वगैरे लागत नाही. टिंग झाली की दादा उठायचे. कोण आहे? मग ती बाई आली. (हात जोडून) दादा, सत्यनारायण घातलाय. मग हिने आपला सव्वा रुपया दिला. सत्यनारायणाला सव्वा रुपयाच देतात; आता काही दर वगैरे वाढलाय का मला माहीत नाही. मग आठवडा झाला परत टिंग. त्यांना असं काही सहन व्हायचं नाही. ताडकन् तिथल्या तिथे एक फटका मारला की झालं. आता तो गुण आमच्यात किती आलाय ते मला माहीत नाही. काही लोकांना अनुभव आला असेल. तर पुन्हा टिंग. म्हणे, दादा सत्यनारायण घातलाय. दादा : काय गं, सत्यनारायण घातलायस? गेल्या वेळी आली होतीस ना, मग आता पुन्हा काय? ती म्हणे पुन्हांदी घातलाय सत्यनारायण. दादांनी पुन्हा विचारलं, का गं, पुन्हा का? ती म्हणे सुनेला पोर व्हत नाय. त्यावर दादा म्हणाले, सुनेला पोर होत नाही म्हणे! मग आम्ही मेलो काय?
असे तोंडाळ आणि फटकळ होते की, दया, माया, क्षमा काही नाही तिकडे! याचं कारण त्यांना पुण्यानं घडवलं. बरं इतरही किस्से आम्हाला सांगायचे. आमची जी काही मडकी होती, त्यात भर दादांनी टाकली. उदाहरणार्थ, हे पूर्वी एडिटर हा शब्द वापरायचे. लोकमान्य टिळकसुद्धा एडिटर हा शब्द वापरायचे. संपादक हा शब्द काशिनाथ मित्र यांनी आणला. पूर्वीची माणसं ही अनुभवाने त्यांना जे भोगावं लागलं, त्यातून तयार झाली होती. सोनंसुद्धा असंच उजळून निघतं. अशी माणसंही उजळून निघाली होती. आगरकरही असेच. आगरकरसुद्धा बामण होते आणि पुण्यामधली खडूस माणसंसुद्धा तीच होती. प्रबोधनला विरोध करणारी माणसं पुण्यातच. एक दिवशी त्या लोकांनी आगरकरांची प्रेतयात्रा काढली. ठेवली त्यांच्या दारात. आगरकर आले. काय म्हणे पहा आपली प्रेतयात्रा. आता इथे तुम्ही असता तर च्यायला कोकणातल्या, नाहीतर सातारच्या शिव्या घालून मोकळे झाला असता. संयम कसा ढळू द्यायचा नाही आणि उत्तराने कशी मात करायची, याचं उदाहरण म्हणजे आगरकर. म्हणाले, फार उत्तम, मला काय वाटत होतं की माझ्या प्रेतयात्रेला चार माणसंसुद्धा जमणार नाहीत. एवढी तरी जमतात. वा! वा! धन्य झालो आणि वरती निघून गेले. खाड्कन् मुस्काटात बसली. शहाणे होते! शब्दांचा मार पुरा झाला. पण अशी उत्तरं देण्याला सुद्धा तयारी लागते. ही प्रसंगातून माणसं तयार झालेली आहेत.
भोपटकरांचा वाद झाला खर्या ब्राह्मणवरनं. दादा जिंकले. ब्रिटिश न्यायमूर्ती होते. त्यांनी सांगितलं, मि. भोपटकर, मि. ठाकरे इज डुइंग द इंडियन सर्विस. को-ऑपरेट विथ हिम, हेल्प हिम. गप्प बसले सगळे. नंतर त्या पडव्या असायच्या छोट्या. त्या ओटीवरती सकाळी दादा उभे राहिले आणि भोपटकरांना म्हणाले, अहो केशवराव, म्हटले काय आहे? ‘तुमचा म्हणे ब्राह्मणांवरचा राग गेलेला दिसत नाही?’ दादा म्हणाले का? ‘आजही प्रबोधनमध्ये तुमची टीका आलीय ब्राह्मणांवर, ‘ दादा म्हणाले नाही. माझं भांडण ब्राह्मणांशी नाही, बामणांशी. बामण, भटा- भिक्षुकांसाठी आहे; ज्याकरिता पंडिता रमाबाईना सुद्धा भांडावं लागलं.
मग एकेक बंडखोर लग्नाची हुंडे आणि हुंड्याचे पैसे वसूल कसे केले हे सगळं आलं त्यामध्ये. जिथे जिथे हुंडा घेतला जायचा आता तिथे त्या वेळी दादांकडे मोजून ५० माणसं होती. सगळे काळ्या कपड्यांमध्ये. काळे कपडे. अमेरिकेत ती संघटना आहे ना तसे डोळे फाडलेले, नाक फक्त उघडं श्वास घेण्यासाठी. तोंडाचा प्रश्न नाही, कारण त्या वेळी खाण्याचे धंदे नव्हते आणि गाढव, त्याला मुंडावळ्या लावलेल्या. त्याच्यावरती एक झूल आणि त्यावर लिहिलेलं, हुंडेबाज गधडा लग्नाला चालला. हे गाढव घेऊन लग्नाला जायचे, जिथे हुंडा घेतला जात असे तिथे. एकदा अशी त्यांची वरात चालली होती. अक्षरश: सुवासिनींनी आरत्या ओवाळल्या. म्हणाल्या आम्हाला हेच पाहिजे होतं. हुंडेबाजांनी आमची अक्षरश: वाट लावली आहे. माझे वडील गरीब. कुठून आणायचे पैसे? विकत घेता पोरगी तुम्ही आणि पैसेही त्यांनीच द्यायचे. लग्नाच्या मंडपात एक न्यायमूर्ती होते. म्हणाले, हे बघा ठाकरे, हे तुम्ही करता ते योग्य नाही, मी न्यायमूर्ती आहे, कोर्टात खेचेन. ते बघू हो नंतर म्हणे, तुम्ही आम्हाला आमंत्रण दिलंत. हो दिलं; पण हे करायला नव्हे. हे गाढवबिडव काय? गाढवबिडव काय नाही म्हणे, आण रे ती पत्रिका. काय लिहिलंय पत्रिकेत अमुक अमुक माझं नाव लिहिलंय आणि आपण आपल्या परिवारासहित… आलो आहे. घेता की नाही आत? बाबा हात जोडतो. हुंडा परत करतो. केला!
ही बंडखोरी प्रत्येक तरुणाच्या रक्तात आली पाहिजे. बरं… अन्याय-न्यायाची अशी निवड करा की अन्याय म्हटल्यानंतर ठोक. कितीही ताकद असो. पण एक माणूस सुद्धा काय करू शकतो, हे माझ्या वडिलांनी शिकवलंय. म्हणून त्या वेळेला आमच्याकडे दादांमुळे बरीच माणसं यायची. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ मला जवळून बघायला मिळाली. मागे मी एक उदाहरण दिलं होतं, माहिती आहे का तुम्हाला? संयुक्त महाराष्ट्राच्या वेळी श्रीकांत राहतो तिथे बाजूला एक हॉल आणि किचन आहे. तिथे आम्ही राहत होतो. तिथे मग अशी गर्दी व्हायची. मग ते चपला, जोडे असा बाहेर खच असायचा. दादा घेऊन आले बाहेर मला आणि म्हणाले, हे काय आहे. मी म्हटलं, चपला जोडे. नाही म्हणे हे चपला जोडे नाहीत. हे आपलं ऐश्वर्य आहे, बरं. लाभत नाही हे कोणाला. लोकांना चपला जोडे मिळतात; पण ते वेगळे. हे आपलं ऐश्वर्य आहे हे जप. आजही त्या मातोश्रीमध्ये तेच जपत आलो आहे! अजूनही लोकांचं प्रेम आहे म्हणून मला कसली पर्वा नाही.
माझ्या वडिलांनी शिकवलं की म्हणे बाहेर काहूर माजलाय तुमच्या विरोधात. इतकं काहूर माजल्यानंतर तुम्ही म्हणे थंड कसे घरात? म्हटलं, हीच वेळ आहे. ज्या वेळेला बाहेर वादळ असतं, त्या वेळेला तुम्ही शांत राहा आणि ज्या वेळेला बाहेर शांत असतं तेव्हा तुम्ही वादळासारखे उभे राहा. नाही तर बाहेर थंड, मी थंड. नाही जमत, बरं… कुठे काय पावलं कशी टाकायची ही महत्त्वाची बाब आहे. ही मुत्सद्देगिरी महत्त्वाची. बरं, काल काय मनोहर जोशींवर टीका झाली. अभिमानाने सांगतो, या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा बामण, ब्राह्मण म्हणा वाटल्यास, मुख्यमंत्री मी केलाय. शिवसेनेने केलाय. करायचा नाही का? जातीची मोनोपॉली आहे तिथे? याच जातीने तिथे बसलं पाहिजे असं नाही आहे. आमच्याकडे आला, चांगला माणूस दिसला, बसवलं त्याला. एरव्ही जातीय वाद गाडणारे तुम्ही महाराष्ट्रात जातीयवादाचे राजकारण करता. महाराष्ट्रात शिवसेनेने जातीयवाद गाडला आहे. मला माहीत नाही की हे कोण आहेत किंवा ते कोण आहेत ते. कधीही कोणाही शिवसैनिकाने मला येऊन सांगावं, होय बाळासाहेब, मला तुम्ही जात विचारलीत. आणि माझ्या जातीचा कोणीही नाहीए. ना आमदार आहे ना खासदार आहे, ना मंत्री आहे ना कोणी आहे. हे कोण महाराव म्हणजे काय जातीचे आहेत कोणास ठाऊक. आम्हाला त्याची गरज नाही. महाराष्ट्रामध्ये आम्ही मराठी आणि हिंदुस्थानामध्ये आम्ही हिंदू! याखेरीज जातपात आम्हाला माहीत नाही. त्यातून खोलात शिरायचं असेल तर गरीब आणि श्रीमंतीखेरीज मी दुसरी जात मानीत नाही.
ते राशीचक्रवाले आहेत कोणी शरद उपाध्ये. त्यांनी मला एकदा कार्यक्रमाला बोलावलं. माझ्या पत्नीला अशा गोष्टींचं खूप वेड. गेलो तिकडे आणि त्या बाया. बायाच असतात जास्त करून. त्या बाया केस सोडलेल्या. मध्ये ते अग्निकुंड पेटतंय आणि सगळ्यांच्याच अंगात आलेलं. ही एक देवी आहे की अनेक देव्या आहेत, मला माहीत नाही. पण सगळ्यांचं हूं हूं हूं चाललंय. सगळे गोलगोल. आम्ही वेड्यासारखे बघतोय. कधी उठायचं, किती वेळ बसायचं काही पत्ता नाही. ते घुमताहेत, आम्ही बसलोय आणि हा राशीचक्रवाला काहीतरी बोलत होता. आता तो करून करून भागला आणि राशीचक्राला लागलाय, ते सोडून द्या! एक बाई माझ्या पुढ्यात आली आणि हं हं हं बसलास काय? अरे उभं राहिलं तर म्हणेल, उभा राहिलास काय? एक राऊंड झाल्यावर पुन्हा ती माझ्याकडे आली. हं हं हं, बसलास काय? म्हटलं नमस्कार. हं हं हं, माझं काम करशील? मी म्हटलं, देवी तू, तू माझं काम करणार की मी तुझं काम करणार? म्हटलं बरं सांगा. काय काम आहे? हं हं हं, माझ्या भाच्याला नोकरी लावशील? काय हो, म्हटलं ही थट्टा आहे की काय? इथे दादा तडकायचे. अगदी तू देवी, तर तू दे ना नोकरी त्याला. हा बघ हा लाव अंगारा आणि लाव त्याला कोण बघूया तुला नोकरी देत नाही ते.
इथे आमचा मतभेद आहे. असं लोकांना फसवू नका. त्यांच्या भाबडेपणाचा फायदा घेऊ नका. तुम्ही जागतेपणानं वागा. लिमये मास्तरांकडे दुसरा कोणी बुवा यायचा. तो बुवा असा झब्बा धोतर लेंगा घालून आणि मत तो आळोखेपिळोखे द्यायचा. मूठभर खडीसाखरेचा खडा आणि सब्जा हाताने काढून द्यायचा. च्यायला काढतो कुठून एवढा. काय म्हटलं धोतरात आलाय घेऊन की काय? मी त्याला खिशातनं तो गोटा काढताना पाहिला! खिशात लपवला होता गोटा त्यानं. ही हातचलाखी तुम्हाला आली पाहिजे. तो आमच्या तायड्यांचा मुलगा म्हणतो, मी तुम्हाला दाखवतो उदी काढायचं तंत्र. म्हटलं अरे शिकव ना. उद्या शिवसेनाप्रमुख म्हणून बाजूला झालो तर या धंद्याला लागेन. जास्त वेडे जमतील माझ्याकडे तुमच्यापेक्षा!
हे सगळं झूठ आहे. या दुनियेला फसवू नका. धर्म समजून घ्या. धर्माचे अर्थसुद्धा अलग आहेत. गाडगेबाबांनी सांगितल्यानुसार तहानलेल्याला पाणी, भुकेलेल्या अन्नवस्त्र नसेल त्याला वस्त्र हा धर्म.मध्ये ते गाणं आलं, आती क्या खंडाळा? आणि कोणीतरी म्हटलं की काय हो गर्दी वाढली खंडाळ्याची त्या गाण्यामुळे. हे असं असतं? मग तुम्हीसुद्धा गाणं काढा तुमच्या गावावरून. आती क्या चिपळूण? चिपळूणला गर्दी वाढेल! खंडाळ्याला केव्हापासून मी तरूण-तरुणींची गर्दी पाहतोय. पावसाळ्यात कितीतरी तरूण-तरुणी येतात आणि भिजून घेतात. कारण आता ओलं होण्याचा तो एकमेव मार्ग. बाकी कोरडेपणाच आहे आयुष्यात सगळा!
बरं ते जाऊ द्या. आज या पुस्तकरूपाने दादांचे चिरंजीव म्हणून किंवा वंशज म्हणून काही फटकळपणे विचार मांडण्याची संधी आम्हाला दिली त्याबद्दल ज्ञानेशराव तुमचे आभार. आपणही आलात आणि तन्मयतेने माझे विचार ऐकले. पटलं असेल, नसेल ताे तुमचा प्रश्न. पटलंच पाहिजे असं काही नाही. पण आम्ही ठाकरे हे असे आहोत, एवढं सांगून तुमची रजा घेतो. जय हिंद! जय महाराष्ट्र!!
हर्षल प्रधान संपादित `विचारांचं सोनं` या पुस्तकातून (समाप्त).