पाऊस आताच कुठे थांबला होता. एकतर तो मुंबईचा पाऊस, रेंगाळला तर असा रेंगाळेल की माणसांचा दम काढेल; नाहीतर असा पिसाळून कोसळेल की अर्ध्या तासात मुंबईच्या रस्त्यांवर नाले वाहायला लागतात. पण आता जरा त्याने दम घेतला होता. अध्येमध्ये एखादी लहानशी सर कोसळून जात होती, पण त्यात काही फार दम नव्हता. अंधार मात्र चांगलाच दाटलेला होता. गरम गरम कॉफीचा मूड आता व्हिस्कीच्या दिशेने सरकायला लागला होता. जरा विचार करून सारंग उठला आणि त्याने रमचा खंबा बाहेर काढला. आता प्रश्न फक्त राजाची मस्त गरमागरम मूग भजी मागवावीत का खानचाचाकडून कबाब मागवावेत एवढाच होता. विचार करता करता त्याने पेग भरायला घेतला आणि तेवढ्यात दारावरची बेल कर्कशली. हात तिथेच थांबला आणि त्याच्या कपाळावर एक नापसंतीची आठी उमटली. मरू दे… जो असेल तो बेल वाजवेल वाजवेल आणि आपण घरात नाही असे समजून निघून जाईल. इतका मस्त मूड आलाय, त्याची माती व्हायला नको.
चौथ्यांदा बेल वाजली तसा तो वैतागला. बाहेरचा माणूस दार उघडायला लावायचेच या निश्चयाने आला असावा. बरोबरच आहे म्हणा, सेफ्टी डोअर आतून बंद असल्यावर घराचा मालक घरात असणार हे उघड आहे की. स्वत:च्या मूर्खपणाला चार शिव्या घालत त्याने वैतागाने सगळा पसारा परत बार काऊंटरमध्ये सारला आणि तो दरवाजा उघडायला गेला.
दारात एक पस्तिशीच्या आसपासची स्त्री आणि १६-१७ वर्षाची एक नवयौवना उभी होती. दोघींच्या चेहर्यावर काहीशी खिन्नतेची सावली डोकावत होती. या दोघींचे आपल्याकडे काय काम असेल बरं, असा नवलाने विचार करत सारंगने सेफ्टी डोअर उघडून दोघींना आत घेतले.
’नमस्कार, सुप्रसिद्ध गुप्तहेर सारंग दर्यावर्दी इथेच राहतात ना?’ बरोबरच्या बाईने प्रश्न केला.
’हो. तुमच्यासमोर उभा आहे तो इसम…’ सारंग मिश्किलपणे म्हणाला आणि दोघी एकदम दचकल्या.
’तुमचे माझ्याकडे काही काम होते का?’
’हो. आम्हाला तुमची मदत हवी आहे एका प्रकरणात,’ नवयौवना खालच्या आवाजात पुटपुटली.
’मिस…’
’सॉरी, मी ओळख करून द्यायला विसरले. मी अपर्णा खरात आणि ही माझी आई सुपर्णा. आम्ही फार मोठ्या आशेने तुमच्याकडे आलो आहोत.’
’नक्की काय झाले आहे, ते सांगाल का?’
’साधारण सहा महिन्यांपूर्वी माझ्या आई आणि वडिलांवर खुनी हल्ला झाला होता. आई वाचली पण वडील नाही वाचू शकले.’
’खुनी हल्ला? दोघांवर एकदम?’
’एक्च्युअली दोघांना विष टोचण्यात आले होते.’
सारंगला आता तिच्या बोलण्यात चांगलाच इंटरेस्ट यायला लागला होता. त्याने तिला दोन मिनिटे थांबवले आणि आत जाऊन पाण्याचे ग्लास घेऊन आला. तिने एका दमात अर्धा ग्लास रिकामा केला आणि पुन्हा बोलायला लागली.
’मी तुम्हाला पहिल्यापासून सगळे सांगते. माझ्या वडिलांची रमेश खरात यांची एक छोटीशी टायर रिमोल्डिंगची फॅक्टरी आहे कर्जतला. घरात मी, आई आणि बाबा फक्त. आम्हाला फारसे नातेवाईक नाहीत आणि कोणाकडे जाणे येणे देखील नाही. आमच्या शेजारच्या जोशी काकू आणि काका हेच आमचे सगळे काही. दोन वर्षापूर्वी बाबांची अकाऊंटट मेघा आंटी आम्हाला भेटली आणि तेव्हापासून ती देखील आमच्या फॅमिलीचा हिस्सा बनली. बाबांची फॅक्टरी छोटीशी, त्यामुळे शत्रुत्व निर्माण होईल अशी कोणाशी व्यावसायिक स्पर्धा देखील नव्हती. आमच्या परिसरात देखील बाबांचे सर्वांशी चांगले संबंध होते. अगदी बँकेत, दुकानात, कुठेही जा, सगळे बाबांचा आदर करायचे. सहा महिन्यापूर्वी आम्ही तिरुपतीला जायचा बेत केला. आमची फॅमिली, जोशी काका काकू आणि मेघा आंटी असे सर्व जण जायचे ठरले. दुपारच्या २.३० वाजताच्या एमजीआर ट्रेनचे रिझर्वेशन देखील झाले. आम्ही दीडच्या सुमारास रेल्वे स्टेशनला पोहोचलो. जिना उतरताना झालेल्या गर्दीत कशीतरी वाट काढत आम्ही प्लॅटफॉर्मला पोहोचलो आणि पाच दहा मिनिटांत बाबांना एकदम अस्वस्थ वाटायला लागले. त्यांना दरदरून घाम सुटला, हात पाय वाकडे झाले, चेहरा वेडावाकडा व्हायला लागला आणि अचानक त्यांची मान कलंडली अन्…’ बोलता बोलता अपर्णा एकदम भावुक झाली आणि ओंजळीत चेहरा खुपसून रडायला लागली.
सुपर्णाने पुढे होत तिला जवळ घेतले आणि शांत करू लागली. अर्थात सुपर्णाच्या डोळ्यात तरळत असलेले पाणी सारंगपासून लपले नव्हते. थोडे पाणी प्यायल्यावर अपर्णा जरा सावरली.
’आमची आरडाओरड ऐकून रेल्वे पोलीस आणि काही हमाल धावले, पण तोवर उशीर झाला होता. बाबा गेलेत हे मेंदूत शिरायच्या आता एकदम आई कोसळली आणि तिनेही हात पाय वाकडे करायला सुरुवात केली. देवाच्या कृपेने तिला वेळेत हॉस्पिटलमध्ये नेऊ शकलो आणि म्हणून तिचा जीव वाचला. नाहीतर एकाच दिवशी मी आई आणि बाबा दोघांनाही…’
’तुम्ही विष टोचले असे काहीतरी सांगत होतात.’
’हो, पोलीस तपासात असं निष्पन्न झालं की सुईसारख्या एखाद्या टोकदार वस्तूने दोघांना शरीरात विष टोचण्यात आले होते. बाबांच्या दंडावर आणि आईच्या मनगटापाशी तशा खुणा मिळाल्या.’
’पुढे?’
’पोलिसांनी खूप तपास केला, वेगवेगळ्या लोकांचे चार चार वेळा जबाब घेतले. पन्नास वेळा सीसीटीव्ही फुटेज तपासले पण तपासाची गती थोडी देखील पुढे सरकली नाही. दोन महिन्यांपूर्वी या तपासासाठी एक स्पेशल टीम देखील बनवण्यात आली. पण तिच्या हाताला देखील फारसे काही लागू शकलेले नाही. तुमचे नाव मी मित्रमैत्रिणींच्या ग्रुपमध्ये बरेचदा ऐकले आहे. तुम्ही सोडवलेल्या काही जबरदस्त केस देखील ऐकल्या आहेत. त्यामुळे मी तुमच्याकडे मदतीसाठी आली आहे. मी फक्त माझे बाबा नाही गमावलेले, एक मित्र, एक भक्कम आधार, एक मायेची सावली कायमची गमावली आहे. माझे बाबा माझे सर्वस्व होते. त्यांचा कोणीतरी खून करतो आणि माझ्या आईला देखील मारायचा प्रयत्न करतो हे माझ्या कल्पनेबाहेरचे आहे. या प्रसंगानंतर मी एक महिना नैराश्येत गेले होते. ट्रीटमेंट आणि सेशन्स यामुळे आता थोडी सावरली आहे. पण माझ्या बाबांना न्याय मिळवून देणे हे आता माझे एकमेव कर्तव्य आहे. तुम्ही कराल ना मला मदत?’
’तुम्ही जे सांगताय त्यानुसार पोलिसांनी सर्व बाजूने व्यवस्थित तपास केलेला दिसतो आहे. स्पेशल टीमने देखील पुन्हा एकदा सर्व तपास करून बघितलेला आहे. अशा परिस्थितीत मी तुम्हाला कितपत मदत करू शकेन, मला शंकाच आहे.’
सारंगच्या उत्तराने दोघींच्या चेहर्यावर एकदम निराशा पसरली. पण सारंगने थेट नकार दिलेला नाही, हे अपर्णाच्या लक्षात आले आणि ती पुन्हा सुखावली, हे तिचा चेहरा सांगत होता.
’उद्या माझे पुण्याला एक महत्त्वाचे काम आहे. ते संपवतो आणि परवा सकाळी मी कर्जतला चक्कर मारतो. तुम्ही तुमचा पत्ता आणि पोलिस स्टेशनचे नाव मला देऊन ठेवा.’
सारंगच्या आश्वासनाने दोघी आनंदल्या. घाईघाईने त्याला सर्व माहिती देऊन त्यांनी सारंगचा निरोप घेतला. दोघी गेल्या, मात्र सारंग त्या विचित्र केसच्या विचारात गुरफटला गेला. अशा आनंदी, सुखी अन् कोणाच्या अध्यात मध्यात नसलेल्या कुटुंबावर कोण हल्ला करेल? आणि तोही थेट विषप्रयोग? तो देखील अशा गर्दीने गजबजलेल्या ठिकाणी? ‘इस केस में दम तो है बॉस!’
रामबाग कॉलनीमध्ये सारंगची कार शिरली आणि डाव्या हाताला पहिला बंगला लागला तो होता जोशी काकांचा ’साफल्य’. सारंगने आधी तिकडेच मोर्चा वळवला. काका काकूंना सारंगविषयी सर्व कल्पना असावी, त्यांनी त्याचे व्यवस्थित स्वागत केले. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि सारंगने थेट मुद्द्याला हात घातला.
’या प्रकरणाविषयी तुमचे मत काय आहे?’
’खरं सांगायचो तर आम्ही सुन्न झालो आहोत. इतक्या हसत्या खेळत्या कुटुंबाला कोणाची दृष्ट लागली असेल? साध्या रस्त्यावर भुंकणार्या कुत्र्याला देखील त्यांनी कधी हाड केले नसेल…’ गदगदलेल्या स्वरात काका म्हणाले.
’रमेश खरात माणूस म्हणून कसे होते?’
’राजा माणूस हो एकदम. नाकासमोर चालणारा. सख्खा बाप काय जीव लावेल असा जीव लावायचा अपर्णाला. कोणाला सांगून सुद्धा खरे वाटले नसते की अपर्णा त्याची सावत्र मुलगी आहे,’ काकू सहजपणे बोलल्या आणि सारंगला चांगलाच शॉक बसला.
’म्हणजे अपर्णा…’
’सुपर्णाच्या पहिल्या नवर्याची मुलगी. अपर्णा तीन महिन्याची असताना तो गेला. रमेशच्या फॅक्टरीमध्येच अधिकारी होता. रमेशचा फार जिव्हाळा त्याच्याशी. रमेशने पुढे होऊन या कुटुंबाला आधार दिला आणि नंतर मोठ्या मनाने त्यांचा स्वीकार देखील केला. कोण काय बोलेल, याचा विचार देखील केला नाही. अगदी मेघाबाबत देखील..’
’म्हणजे?’
’मेघा रमेशची अकाऊंटंट. तिच्या आणि रमेशच्या नात्याबद्दल काही ठिकाणी विचित्र चर्चा झाली. सुपर्णाच्या कानावर देखील ती गेली. पण त्याचवेळी रमेशने सरळ मेघाला घरी आणून आमच्यासकट सर्वांशी ओळख करून दिली. इतकी गुणी मुलगी आहे म्हणून सांगू. आमचा संशय एका क्षणात फिटला.’
जोश्यांच्या घरातून बाहेर पडताना सारंग चांगलाच चक्रावला होता. ही केस इतकी गुंतागुंतीची बनेल, तेही पहिल्याच भेटीत, याचा त्याला अंदाज देखील नव्हता. विचारांच्या नादात तो खरांताचे गेट उघडून आत देखील शिरला होता. घरात सुपर्णा एकटीच होती. अपर्णा तिच्या सेशनसाठी गेली होती.
पुन्हा एकदा चहापाणी झाले आणि सारंग मुद्द्याकडे वळला.
’अपर्णा रमेशरावांची मुलगी नाही हे…’
’हो खरे आहे. ती तीन महिन्यांची असताना तिचे बाबा आम्हाला सोडून गेले. रमेशने आम्हाला खूप आधार दिला. पुढे कोणाचीही पर्वा न करता त्याने या आधाराला नात्याचे रूप देखील दिले. त्यामुळे त्याचे अनेक नातेवाईक दुरावले, पण त्याने कधी त्याची पर्वा केली नाही.’
’अपर्णाला हे माहिती आहे?’
’हो आणि त्यामुळेच रमेशविषयी तिच्या मनात एक प्रचंड वेगळे स्थान निर्माण झालेले आहे. तिला जर कधी ‘आई का बाबा; कोणाला निवडशील? असे विचारले असते, तर तिने बिनदिक्कतपणे बाबाची निवड केली असती.
’फॅक्टरीचे काम आता कोण बघते?’
’महिनाभर बंदच होती. पण शेवटी कामगारांच्या पोटाचा प्रश्न आहे. आता मी आणि मेघा आमचा जुना कर्मचारी सदाकाका यांच्या मदतीने ती सांभाळायचा प्रयत्न करतो आहोत. मी त्यासाठी माझी नोकरी देखील सोडली आहे.’
’मेघा म्हणजे…’
’रमेशची अकाऊंटंट आणि प्रेयसी…’ शांतपणे सुपर्णा म्हणाली आणि दिवसभरातला दुसरा जबर धक्का सारंगला बसला.
’काय?’
’रमेशने ही गोष्ट माझ्यापासून कधीच लपवली नाही, सारंग. सेक्सच्या आणि रोमान्सच्या बाबतीत तो आक्रमक होता आणि मी हळुहळू कमी पडत चालले होते. जे चालले होते ते मला पटत होते असे नाही, पण मी करू तरी काय शकणार होते? मेघाने देखील कधी त्यांच्या नात्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला नाही. आजही ती तो घेत नाहीये.’
’पोलिसांना…’
’हो, मी त्यांना पूर्ण कल्पना दिलेली आहे. फक्त अपर्णाला याबद्दल काही कल्पना नाही आणि कृपा करून तुम्ही देखील ती देऊ नका.’
’मी वचन देतो. तुम्ही मगाशी म्हणालात तुम्ही नोकरी सोडलीत. काय काम करायचात तुम्ही?’
’मी इथल्या माध्यमिक शाळेत कामाला होते. अर्थात आर्थिक लाभासाठी नाही. रमेश तसा उत्तम कमावत होता. पण घरी बसून तरी काय करणार? तेवढाच विरंगुळा.’
’अपर्णा सध्या काय करते आहे?’
’अकरावी सायन्स. मोठी हुशार आहे मुलगी,’ तिचे बोलणे पूर्ण होत असतानाच अपर्णा आली. अपर्णाशी काही जुजबी गप्पा करून सारंगने थेट पोलिस स्टेशन गाठले. मुंबईच्या कमिशनर साहेबांची ओळख देताच तिथल्या ऑफिसरने थेट केसची फाइल सारंगला सुपुर्द केली. अक्षरश: आजूबाजूला कोणी नाहीच अशा थाटात सारंगने तब्बल दीड तास ती फाइल मेंदूत कोरून घेतली. पोलिसांच्या तपासात उणीव काढण्यासारखे काही नव्हते. सर्व बाजूंनी त्यांनी सर्व तपासणी करून बघितलेली होती. रमेश आणि सुपर्णावर आर्सेनिक विषाचा प्रयोग झाला होता. ज्या प्रमाणात ते रमेशच्या शरीरात शिरले होते ते बघता तो वाचण्याची शक्यता शून्य होती. त्या मानाने सुपर्णा सुदैवी निघाली होती. सारंगने रेल्वे स्टेशनचे सीसीटीव्ही फुटेज देखील दहा वेळा तपासले. जिन्यावरून खाली येणार्या गर्दीत, सगळ्यात पुढे अपर्णाचा हात धरून मेघा, तिच्या मागे जोशी काका काकू आणि सर्वात मागे रमेश आणि सुपर्णा जिना उतरत होते. शंका घेण्यासारखे कुठेच काही दिसत नव्हते. त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना मोठ्या हिंमतीने शोधून काढून पोलिसांनी त्यांचे जबाब देखील घेतले होते. सगळेच क्लीन निघाले होते. त्यातल्या ९० टक्के लोकांचा तर कर्जतशी काही संबंध देखील नव्हता आणि जे कर्जतचे होते ते रमेशच्या कधी संपर्कात देखील आलेले नव्हते. फाइलमधल्या काही गरजेच्या कागदांचे फोटो काढून सारंग बाहेर पडला.
मुंबईची वाट धरायच्या आधी त्याने एकदा अपर्णा आणि सुपर्णाची पुन्हा भेट घेतली आणि दोन दिवसात पुन्हा चक्कर मारायचे आश्वासन देऊन तो बाहेर पडला. अपर्णा त्याला गेटपर्यंत सोडायला आली.
’अपर्णा, तू काय गमावले आहेस ते मी समजू शकतो. पण विश्वास ठेव, तुझ्या बाबांना नक्की न्याय मिळेल. पण तू लवकरात लवकर नैराश्यातून बाहेर ये. अभ्यासाकडे लक्ष दे. वाटले तर एखादा क्लास लाव.’
’नको हो. आई घेते ना माझा इतका चांगला अभ्यास,’ ती हसून म्हणाली. सारंगने एकदा प्रेमाने तिच्या डोक्यावर थोपटले आणि त्याने कार गेटबाहेर घेतली. सारंग जोशीकाकांच्या बंगल्याजवळून निघाला आणि त्याने करकचून कारला ब्रेक मारले. ‘सुपर्णा अपर्णाचा अभ्यास घेते?’ तो झटकन बाहेर पडला आणि त्याचवेळी समोरून जोशी काका दत्त म्हणून प्रगटले.
’काय रे निघालास?’
’हो, निरोपच घ्यायला येत होतो. काका आता सुपर्णाताई सांगत होत्या की त्यांनी शाळेतली नोकरी सोडली. काय शिकवायच्या त्या?’ ’ती शिक्षिका नव्हती रे, लॅब असिस्टंट होती,’ काका कौतुकाने म्हणाले आणि सारंगच्या डोक्यात अनेक गणिते एकाच वेळी बेरीज-वजाबाकी करायला लागली. मुंबईला जायचा बेत रद्द करून सारंगने सरळ कर्जत माउंट व्ह्यूला खोली घेतली आणि कर्जतच्या बदमाश मंडळींमधला कोण या क्षणी उपयोगी पडेल, या विचारात तो पडला.
– – –
लांबूनच अपर्णा सेशनला जाताना दिसली आणि सारंगने एक दीर्घ श्वास घेतला. ती बाहेर पडली आणि पाच मिनिटांनी सारंगने गाडी तिच्या बंगल्यात नेली. अपेक्षेप्रमाणे सुपर्णाने दार उघडले. त्याला पाहून तिला प्रचंड आश्चर्य वाटले.
’तुम्ही इतक्या लवकर?’
’मी परत गेलोच नाही. काही प्रश्न पायाला घट्ट पकडून आहेत.’
’कोणते प्रश्न?’
’काल माझा एक माणूस चोरून मेघाच्या घरात शिरला होता. तिथे मला तिच्या ऐबॉर्शन संदर्भातले कागद..’ सारंगचे वाक्य पूर्ण होण्याआधीच सुपर्णा ’गॉड!!’ असे चित्कारली आणि ताड्कन् उभी राहिली.
’का केलेत तुम्ही दोघींनी असे?’
’नाही, मेघाचा या सगळ्याशी काही संबंध नाही सारंग. ती पूर्ण निर्दोष आहे. जे काय केले आहे ते मी केले आहे आणि पूर्ण विचारपूर्वक केले आहे.’
’असे काय घडले की खून करायची वेळ आली?’
’सारंग, रमेश खरात हा माणूस स्वत:ला कितीही देवमाणूस दाखवत असला, तरी तो एक सैतान होता. सान्निध्यात आलेल्या प्रत्येक बाईवर त्याची वाईट नजर असायची. शारीरिक प्रेमाबद्दलच्या त्याच्या कल्पना देखील अत्यंत हिंसक आणि विकृत असायच्या. मी तर अक्षरश: जिवाला कंटाळले होते, पण फक्त अपर्णाकडे बघून मी सगळे सहन करत होते. सांगायला वाईट वाटते की रमेशच्या आयुष्यात मेघा आली म्हणून मी खरेतर सुखावले होते. रोज रात्रीच्या वेदना आणि त्रासातून मुक्ती मिळाल्यासारखे वाटले होते. पण त्या सुस्वभावी मुलीला देखील त्याने क्रूर वागणूक द्यायला सुरुवात केली, तिला मूल पाडायला भाग पाडले. तो इथेच थांबला नाही सारंग, त्याची वाईट नजर अपर्णावर फिरायला लागली आणि मी सावध झाले. देवाच्या रूपात बापाकडे बघणार्या अपर्णाला त्याचे स्पर्श, त्याची नजर जाणवत नव्हती, पण मी ती बरोबर ओळखली होती. मी त्याला हात जोडून विनंती केली, पण त्या सैतानाला काही फरक पडला नाही. ‘या कळीचे फूल मीच करणार’ अशा किळसवाण्या शब्दात त्याने मला प्रत्युत्तर दिले आणि मी हादरले. पाणी डोक्याच्या वर गेले होते. आता बुडणे किंवा हात पाय मारणे एवढेच करणे शक्य होते. मी न बुडण्याचा निर्णय घेतला. अपर्णाला तर मी हे सगळे सांगू शकत नव्हते. तिची आताची अवस्था तुम्ही बघत आहात. हे सत्य कळले असते तर ती वेडी झाली असती हो. शेवटी मी माझ्या ज्ञानाचा उपयोग करण्याचे ठरवले.’
’असा उपाय ज्याने काटा देखील दूर होईल आणि कोणाला तुमचा संशय देखील येणार नाही…’ सारंग शांत आवाजात म्हणाला.
’बरोबर आहे तुमचे. मी न्याय केला का अन्याय मला माहिती नाही पण एका आईला जे योग्य वाटले ते तिने केले. तुम्ही पोलिसांना बोलावा, मी गुन्हा कबूल करायला तयार आहे. फक्त मी हे का केले ते अपर्णाला कधीच कळणार नाही, मला थेट शिक्षाच सुनावली जाईल असे काही करता येईल का?’ काकुळतीला येऊन सुपर्णाने विचारले.
’सध्या तुम्ही फक्त चहा करा. अर्ध्या तासात निघालो तर ट्रॅफिक न लागता मुंबईत पोहोचेन मी,’ मंद हसत सारंग म्हणाला आणि भारावलेल्या सुपर्णाने वयाचे भान विसरत सारंगच्या पायावर झोकून दिले.