एखाद्याचा मूर्खपणा चेहर्यावरून दिसतो, बुद्धिमत्तेची झलक कुठे दिसते?
– निसार शेख, महाड
बुद्धिमत्तेची झलक ही प्रश्नांना दिलेल्या उत्तरातून दिसते. नसेल दिसत तर माझी उत्तरं पुन्हा पुन्हा वाचा, बुद्धिमत्तेची झलक दिसेपर्यंत वाचा. नाही दिसली तर आरशात चेहरा बघा.)
तुम्ही जंगलातून जात असाल आणि समोरून वाघ आला तर काय कराल?
– गार्गी रेवणकर, फत्तेपूर
मी वाघाला सांगेन ‘लेकीकडे जातो, तूप रोटी खातो, जाडजूड होतो, मग तू मला खा..’ (वाघ आळशी असेल तर माझं एवढं ऐकेल. नाहीतर माझ्यासमोर वाघ आल्यावर मी काही करेपर्यंत तो कशाला झक मारायला थांबेल? त्याला जे करायचे ते तो करेल. फार फार तर मी चड्डीत सू सू करेन.)
धर्माच्या नावाने एकमेकांशी झगडणारे लोक पाहिल्यावर जंगलातले पशुपक्षी काय विचार करत असतील?
– जनार्दन शिकारखाने, उदगीर
पशुपक्षी विचार करत नसतील. विचाराच्या बंधनात न अडकता मुक्त जगत असतील. ते जर विचार करतील तर विचारांच्या लढाईत मानवासारखेच मरतील.
मला कॉलेजात जायला अजिबात आवडत नाही. घरातले जबरदस्तीने कॉलेजात पाठवतात. मी काय करू?
– सुकन्या पाटोळे, कल्याण
अभ्यास करा (किंवा कोणाशी तरी अफेअर करा. घरवाले स्वतःच तुमचं कॉलेजला जाणं बंद करून टाकतील.)
भारतात सर्वात मोठा धंदा कोणता?
– सौरभ पाटील, इस्माईलपूर
आपला आपणच अधिकारी राहण्याचा आणि बिनपगारी असा एकच मोठा धंदा… दुसर्यांना प्रश्न विचारणे.
मी काळा असूनही मला कुठलीही मुलगी पटते. हे कसे काय?
– प्रवीण शिरसाट, दापोली
कुठल्याही मुलीला ब्युटी स्पॉट (काळा तीट आवडतो.) किंवा हा तुमचा स्वप्नदोष असावा.
ड्रीम-११ची टीम बनवून किंवा रमी सर्कलवर रमी खेळून तुम्ही लखपती का होत नाही?
– पवन होन्याळकर, एकलहारे
उद्या लखपती झालो आणि परवा कुठल्या नोटा बंद झाल्या तर त्या बदलून घ्यायला बँकेच्या रांगेत तुम्ही उभे राहाल का? तुम्ही तयार असाल तर होतो लखपती.
संतोषराव, परवा राजभवनाच्या परिसरात दिसलात… शपथ घेऊन आलात की काय?
– रोहन जमदाडे, टेंभुर्णी
मी फक्त आडनावाचा पवार आहे. मी कोकणातला आहे… तुम्ही समजताय तेवढा मी ‘करामती’ नाही… मी माझ्या काकांच्या आज्ञेबाहेर नाही… मी शपथ घेतली तर आई-वडिलांची घेतो. देवाची घेतो… जी शपथ घेतल्याने खोटं बोलता येत नाही… ती शपथ मोडता येत नाही… तुम्ही दुसर्या कुठल्या तरी पवारांना पाहिलं असेल.
पावसाळ्यात कोणी बेसावध गाठून आपल्या कविता ऐकवू नयेत, यासाठी तुम्ही काय करता?
– पार्वती नांगरे, जत
कोणी कविता ऐकवायला येतंय असा संशय जरी आला तरी त्याला मीच कविता ऐकवतो. त्यामुळे कोणी जवळ येऊन कविता ऐकवण्याचं डेअरिंग करत नाही.
सासू सून असताना नको नकोसा सासुरवास भोगते, तरी ती सासू झाल्यावर आपल्या सुनेला तसाच सासुरवास का भोगायला लावते?
– मान्यता राणे, राजापूर
आपली सून सासू झाल्यावर तिला, तिच्या सुनेला सासुरवास भोगायला लावता यायला पाहिजे, म्हणून प्रत्येक ‘बिचारी’ सासू सासुरवास भोगायचा वसा आपल्या सुनेला देत असते.
मी नेमकं काय केलं म्हणजे माझी बायको सुखी होईल?
– रवींद्र खरात, घाटकोपर
दुसर्याची मदत घेणं सोडा. स्वतःच्या बायकोला स्वतःच तोंड द्या (भांडणात). नवर्याशी भांडायला मिळालं की बायकोचं मन साफ होतं आणि आणि ती खूश होते… अर्थात सुखी होते.
कवी लोकांना पावसाळ्यात अचानक इतक्या कविता का होतात?
– सुयश बेंडखळे, निगडी
पावसाळ्यात पाणी गाळून-उकळून न पिल्याने सारखं ‘सोचालयात’ जावं लागतं आणि ‘सोचालयात’ गेल्यावर न ‘सोचता’ कविताच होत असाव्यात.