• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

स्वत:च्याच पायावर मास्टरस्ट्रोक!

(मर्मभेद ८ जुलै २०२३)

Nitin Phanse by Nitin Phanse
July 6, 2023
in मर्मभेद
0

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तोंडावरची माशी हाकलायला हातवारे करतात, तेव्हाही त्यांचे चाहते आणि प्रसारमाध्यमांमधील भाट ‘मास्टरस्ट्रोक मास्ट्ररस्ट्रोक’ असा गाजावाजा करू लागतात. रविवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्यासह छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल आदी बड्या नेत्यांनी शपथविधी घेतल्यानंतर फडणवीस यांच्या मास्टरस्ट्रोकने महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला असून आता लोकसभेच्या निवडणुकांमध्ये या पक्षाला महाराष्ट्रात ४८ पैकी ८४ जागा मिळणार आहेत, असा हर्षवायू अनेकांना झाला आहे.
मुळात फडणवीस हे मास्टरस्ट्रोक मारण्यात पटाईत आहेत, यात काहीच शंका नाही; फक्त ते दर वेळी आपल्याच पायावर मास्टरस्ट्रोक मारून घेतात आणि नंतर बराच काळ त्यांच्या अंत:पुरातून फक्त ‘ओय ओय ओय ओय’ एवढेच ऐकू येत राहते. फडणवीस २०१४ साली वेगळे होते. अभ्यासू, तरूण नेते होते. पण, सत्तेवर येताच त्यांनी आधी आपले प्रतिस्पर्धी बनू शकतील, अशा सर्व नेत्यांचा या ना त्या मार्गाने काटा काढला आणि त्यांच्यातला कुटीलपणा दिसू लागला. सत्तेची हवा लागल्यावर ते इतके बेभान झाले की आपण युती सरकार चालवतो, निवडणुकीनंतर आम्ही पुन्हा सत्तेत येऊ, असा विश्वास व्यक्त करण्याऐवजी त्यांनी मी पुन्हा येईन, पुन्हा येईन, पुन्हा येईन, अशी गर्जना केली. ती नंतरच्या घडामोडींनी फुसकी वल्गनाच ठरली. हा त्यांचा (स्वपायावरचा) पहिला मास्टरस्ट्रोक.
भारतीय जनता पक्ष शिवसेनेशी विश्वासघात करण्याच्या तयारीत आहे, हे लक्षात आल्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याबरोबर महाविकास आघाडीत जाण्याचे ठरवले तेव्हा सत्ताकांक्षेने पिसाटलेल्या फडणवीसांनी अजित दादा पवार यांच्याबरोबर कुविख्यात पहाटेचा शपथविधी करून घेतला. मात्र, तेव्हा नवचाणक्यांचा उदोउदो सुरू असतानाच अजित दादांनी घूमजाव केले, मविआ सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपद स्वीकारले आणि फडणवीस यांना अतिमहत्त्वाकांक्षी योजना आखल्यामुळे दिल्लीतून कानपिचक्या खाव्या लागल्या. मी पुन्हा येईन, ही वचने ज्यांना दिली होती, त्यांना तोंड दाखवण्याची जागा राहिली नाही. हा त्यांनी (पुन्हा स्वपायावरच मारून घेतलेला) दुसरा मास्टरस्ट्रोक.
दरम्यानच्या काळात फडणवीसांनी शिवसेनेतले पोकळ वासे पोखरून ठेवले होते. केंद्र सरकारच्या पाळीव तपास यंत्रणांचा ससेमिरा मागे लावू, तुरुंगात डांबू, मालमत्ता जप्त करू, असे भय घालून त्यांनी शिवसेनेत फूट पाडली आणि सुरत, गुवाहाटी अशी सहल घडवून आणलेल्या गद्दारांबरोबर सरकार स्थापन करण्याचा घाट घातला. संख्याबळ, योग्यता, ज्येष्ठता या सगळ्या आधारांवर फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार, असे निश्चित वाटत असताना दिल्लीश्वरांनी वरून राज्य भाजपच्या टाळक्यात मास्टरस्ट्रोक हाणला आणि कोणत्याही अर्थाने बरोबरीच्या नसलेल्या मिंध्यांच्या हाताखाली दिपोटी बनून राहण्याचे दुर्भाग्य ‘देव्यादादां’च्या नशिबात आले. हा त्यांचा तिसरा मास्टरस्ट्रोक. तो कुठे बसला ते सांगायला नकोच.
आता त्यांनी दुसर्‍यांदा अर्धवट राहिलेला मास्टरस्ट्रोक नव्याने आपल्या पायांवर मारून घेतला आहे… पहाटेच्या शपथविधीतील वचनांची पूर्तता रविवारी दुपारी करण्यात आलेली आहे. यातून फडणवीस यांची अगतिकता आणि दिल्लीशरणता दिसून येते. शिस्त, आज्ञाधारकपणा आणि स्वाभिमानशून्य बोटचेपेपणा यांच्यातला फरक ते विसरले असतील, पण महाराष्ट्रातील जनता विसरलेली नाही. तिने या घडामोडींचे दोन अर्थ लावले आहेत. एक तर मिंधे आणि कंपनीचे भांडे फुटणार आहे, ते अपात्र ठरणार आहेत, तेव्हा सरकार वाचवण्यासाठी जो टेकू लागणार, त्याची व्यवस्था या नव्या पळवापळवीतून केली गेली आहे.दुसरा अर्थ असा की लोकसभा निवडणुकीत मोदीनामाचा महिमा चालणार नाही, हे लक्षात घेऊन ज्या राज्यांमध्ये फटका बसणार आहे, तिथे ‘बेरजेचे राजकारण’ करण्याची नामुष्की भाजपवर आली आहे. या पक्षाचे नाकाने कांदे सोलणारे समर्थक ज्या पक्षाचे भ्रष्टवादी असे वर्णन करत होते आणि खुद्द फडणवीस ‘राष्ट्रवादीबरोबर कदापिही जाणार नाही, नाही, नाही’ असं त्रिवार किंचाळून सांगत होते, त्यांनी दोन वेळा त्याच भ्रष्टांबरोबर म्होतूर लावावा, यातून हे नामुष्कीचे स्वगत गहिरे झाले आहे. आम्हाला दादा निधी देत नव्हते, म्हणून शिवसेना फोडली, असे नक्राश्रू ढाळणार्‍या मिंध्यांना आता त्याच दादांबरोबर काम करावे लागणार आहे, हाही नियतीने केलेला न्याय आहे.
महाविकास आघाडीला फडणवीस आणि त्यांचा कंपू तीन चाकी रिक्षा म्हणून हिणवत होते. रिक्षा हे सार्वजनिक वाहतूक करणारं फार उपयोगाचं वाहन आहे. मविआच्या सरकारने तशी दमदार कामगिरी करून लोकांचा दुवा घेतला. कोरोनाकाळात या राज्याचा गुजरात किंवा उत्तर प्रदेश होऊ दिला नाही. तेव्हाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पुण्याई इतकी जबरदस्त आहे की सामदामदंडभेद वापरून राज्याची सत्ता हिसकावून घेतल्यानंतरही राज्यातल्या अनैतिक सरकारला कुठेही निवडणुका घेण्याची हिंमत झालेली नाही. त्यांत काय अवस्था होणार आहे, हे त्यांना नीट माहिती आहे.
त्यात त्यांनी शरद पवार यांना अंगावर घेतले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना जसा नेहरूगंड आहे, तसा फडणवीसांना पवारगंड आहे. आपण राजकारण खेळण्यात पवारांपेक्षा तरबेज आहोत, हे आपल्या चिल्ल्यापिल्ल्यांना दाखवून देण्याच्या फंदात त्यांनी याआधी मुखभंग करून घेतलेला आहेच. पण, त्यांची हौस फिटलेली नाही. पवारांनी पक्षफुटीनंतर ज्या प्रकारे झंझावाती दौरा सुरू केला आहे, ते पाहता त्यात भले भले पालापाचोळा बनून उडून गेल्याशिवाय राहणार नाहीत, हे स्पष्ट आहे.
या नव्या मास्टरस्ट्रोकनंतर भविष्यात फडणवीसांच्या पायाला मलम लावण्याइतके लोक त्यांच्यासोबत राहावेत, ही सदिच्छा!

Previous Post

‘अफलातून’ मराठी चित्रपट २१ जुलैला प्रदर्शित होणार

Next Post

‘आम्ही ठाकरे हे असे आहोत…’

Next Post

‘आम्ही ठाकरे हे असे आहोत...’

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.