(स्टँडमध्ये उभी बस निघण्याच्या प्रतीक्षेतील काही प्रवासी पाटी बघून चढताय, काही बघून दुसरीकडे जाताय. कंडक्टर ड्रायव्हर अजून आलेले नाहीयेत. ‘तो’ खिडकीच्या कडाची सीट पकडून बसलाय, हातात काही फावड्यासाठी वगैरे घेतलेले दांडकं नि बी-बियाणांच्या बॅगा दिसताय, मोबाईलवर गाणं वाजतंय, ‘मेरी जिंदगी से जाने का क्या लोगे तुम…’ तो त्यात गुंगलेला. त्यात जीन्स-टीशर्ट घातलेली ‘ती’ बट अन् बॅग सावरत बसमध्ये चढते. रिकामी नि काही एक जागेची सीट सोडून ती केवळ त्याला बघून त्याच्या जवळ येते.)
ती : (त्याच्या शेजारी बसत) मग कुणाला जायला सांगतोय ‘जिंदगी’तून?
तो : (तिला एकदम जवळ बघून सावरून बसतो) तुला तरी नाही. तसंही जायला जिंदगीत हवं ना?
ती : मग ह्या काठ्या का घेऊन बसलास?
तो : (हसून) तुला धमकावून माझं प्रेम कबूल करायचं होतं.
ती : (तीही हसून) बात नहीं जमेगी। कोयता, सुरा, बंदूक असलं काही पाहिजेल. हत्यार असं पाहिजे की चटकन भीती वाटली पाहिजे.
तो : (हसतो) नेक्स्ट टाइम!
ती : नेमका काय प्लॅन आहे? कुणाला जिंदगीतून घालवायचा की बोलवायचा?
तो : माझ्या हातात काय आहे?
ती : (चिडवत) निदान पुढाकार तुलाच घ्यावा लागेल ना?
तो : म्हणजे बघ, नववीत होतो. तेव्हा पहिल्यांदा प्रपोज केलेलं एका मुलीला…
ती : (उत्सुकतेने) खरं काय? कुठे भेटलेला तू तिला?
तो : दुसर्या तुकडीतली होती, जेवणाच्या सुट्टीत व्हरांड्यात भेटलेलो. तेव्हा वरच्या वर्गातल्या मुलांच्या तोंडी एक शब्द फार असायचा, ‘लव्हशिप!’ मग थेटच तिला विचारलं, ‘लव्हशिप देशील का?’
ती : आणि ती हो म्हणाली! असंच ना?
तो : नाही ती गांगरली, रडवेली झाली. पण काय बोलावं हे तिला सुचेचना! मग ‘सॉरी, आपली जात वेगळीय,’ एव्हढं बोलून पळाली.
ती : मग रे?
तो : ती नात्यातलीच कुणी होती, बर्याच लग्नांत तिच्या आजोबांना माझ्या बाबांशी म्हणजे आजोबांशी बोलताना बघितलेलं मी! त्यामुळे जातीचा प्रश्नच नव्हता, त्यामुळे ते आठवलं का हसू येतं.
ती : पुढं रे? आजोबांना सांगून बघायचं ना?
तो : नाही, परत मी कधीच तिच्या आगंमागं गेलो नाही. अगदी चारेक वर्षांपूर्वी तिच्या लग्नाची चर्चा घरात झालेली, नवरा शोधायला.
ती : तू तुझं नाव सुचवायचं की!
तो : गरज वाटली नाही, आणि तसंही मी तिला विसरून पुढे आलेलो. हा, ती पहिली क्रश होती, राहील. पण आता.
ती : परत कुणी नाही आली का?
तो : आली ना!
ती : मग जायचं ना ही काठी घेऊन. हो म्हण नाहीतर.
तो : आपल्या बापाच्यानं जमायचं नाही हे! खुट्याच्या जनावराला हाणलं तरी तासभर डोकं धरून बसतो मी! जित्या माणसावर हात उचलायचा म्हणजे. त्याच्यात बी ज्याच्यावर जीव जडलाय त्याच माणसाला मारायचं म्हणजे, काळीज नसल्याचा परिणाम.
ती : (गंभीर होत) पण अलीकडं हे लोण खूप वाढलंय, म्हणजे कोण केव्हा मुलींना टार्गेट करील सांगता येत नाही. हल्ली मम्मी रोज ‘जपून जा गं!’ म्हणत दारापर्यंत येते. पपा दिवसातून चारेक वेळा फोन करतात. त्यात दुसर्या बाहेर गावी गेले तर तासाला फोन ठरलेला.
तो : गुन्हे जस्टीफाय करायला अनेक कारणं देता येतीलच. पण गुन्हे कितीवेळ डिफेन्ड करायचे हेही बघायला हवं. अलीकडं आई-बाप मुलींना चारदा जपून जा, म्हणून सांगतात. पण मुलांचं काय? जेव्हा असल्या अत्याचारी मुलांच्या मागे त्याच्या घरचे उभे राहतात तेव्हा राग येतो फार!
ती : त्या आसारामची दिंडी निघाली म्हणे!
तो : आपण समाज म्हणून संपलोय हेच याचं लक्षण! जिथं बलात्कार्यांचं ग्लोरिफिकेशन होतं असेल, त्यांना समाजात मुख्य स्थान मिळत असेल नि अशी लोकं प्रतिनिधी, मंत्री, संघटनेतील मुख्य पदं घेऊन समाजाला अक्कल वाटत असतील तर काय म्हणावं?
ती : समाज संपलाय म्हंटलं तर फुल्लस्टॉप लागेल की. त्यांची डोकी सडली म्हंटलं वा समाज चुकीच्या हाती गेलाय म्हंटलं तर जास्त संयुक्तिक ठरेल ना?
तो : खरं विचारू?
ती : विचार की!
तो : माझ्यावर प्रेम करशील?
ती : आणि नाही म्हणाले तर?
तो : पहिल्या नकारासारखा हाही नकार सेलिब्रेट करिन की! तुझा होकार असो वा नकार दोन्ही सुंदरच असेल. एकात तुझी सोबत होईल, दुसर्यांत तुझ्या आठवांची! फक्त तू सोबत असलीस तर ह्या रानटी समाजाला जरा ‘माणूस’ बनवायचे प्रयत्न करण्यासाठी सोबत आणि कारण दोन्ही मिळेल इतकंच!
(ती त्याच्याकडे शांतपणे पाहते. हातावर हात ठेवते. आश्वस्त करते… नेमका तेव्हाच त्याच्या मनात विचार येतो, नेमका मागे बसलेला कुणी दुसराच हे पाहून जळफळत नसावा आणि बॅगेतला सुरा चाचपत नसावा म्हणजे मिळवली…)