ज्येष्ठ संपादक, विचक्षण वाचक आणि मराठी साहित्य क्षेत्रातली व्यक्ती नव्हे, तर एक जिवंत चळवळच असलेले सुनील कर्णिक यांच्या पंचाहत्तरीनिमित्त त्यांचा नुकताच जाहीर सत्कार करण्यात आला. त्यात कर्णिक यांचे स्नेही आणि रंगधर्मी दीपक राजाध्यक्ष यांनी केलेले भाषण संपादित स्वरूपात.
– – –
मराठी साहित्यक्षेत्रात पुस्तकांमागे राहून असंख्य व्यक्तींना लिहितं करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणार्या, अल्पसंख्य असलेल्या आणि महत्त्वाच्या नावांपैकी एक म्हणजे सुनील कर्णिक अर्थात एसके. करंटेपणाची वैभवशाली परंपरा पुढे सुरू ठेवलेल्या महाराष्ट्राकडून दुर्लक्षित झालेल्या सुनील कर्णिक या अफाट कर्तृत्त्ववान माणसाचं काम निरपेक्षपणे सुरू आहे. कुणाच्या दोन चार ओळीही वाचूनह त्यांना आवडल्या तर लिहित राहण्यासाठी त्या व्यक्तीचा ते सातत्याने पाठपुरावा करत राहतात… इतका की पाठपुराव्याचा पाठलाग होऊ लागतो आणि शेवटी ती व्यक्ती थकून जाऊन जोमात लिहू तरी लागते किंवा लिहिनाशीच होते.
साधारणत: एखाद्या सिंहाला सावज टप्प्यात आल्यावर जसा आणि जितका आनंद वाटत असेल, चांगल्या अर्थाने… तसाच आणि तितकाच आनंद, नवा लेखक, नवी लेखिका सापडल्यावर कर्णिकांना होत असावा! आता बसतोच मानगुटीवर आणि चांगलं लिहून घेऊन छापून आणतोच असं त्यांच्या मनात येत असावं.
आपण लिहावं म्हणून सुनील कर्णिक मागे लागले आहेत याचा अर्थ आपण ग्रेटच लिहितो असं वाटून आपली बारीक छाती फुगवून ५६ इंची करून तोर्यात फिरणार्यांना ते त्यांची मर्यादाही अलगद दाखवून देतात… सतत लिहिल्याने आपल्यालाच आपली कुवत, मर्यादा समजावी असा एक सुप्त उद्देशही त्यामागे गुप्तपणे असतो.
आवडलं किंवा नावडलं तरी त्यांचा प्रतिसाद एकाच पद्धतीचा संयमित, संतुलित, मृदू भाषेत आणि आवाजात असतो, चेहर्यावर कुठचाच भाव नाही, ज्याला पोकर फेस म्हणतात….पठडी एकच. समोरच्या व्यक्तीने आपलं आपण समजून घ्यावं असा एकूण कारभार!
कुठच्याही शब्दावर आघात न करता फ्लॅट बोलण्याची त्यांची सवयही जन्मजात असावी… माझ्यासारख्या नाटकवाल्यांना हे दुबेजींच्या शिबिरात सात पिढ्यांचा उद्धार ऐकत शिकावं लागलं. आधी शब्दाचा व्याकरणिक अर्थ समजून घेण्याची गरज असते आणि मग त्याचे भावार्थ… लक्ष्यार्थ, व्यंगार्थ…
कर्णिकांना बोलताना… अगदी ‘साधं’ बोलतानाही फार कमीच ऐकलंय, पण तेवढ्यानेही त्यांचं लेखन त्यांच्या पॉझेस आणि पिकअप्ससह त्यांच्याच आवाजात ऐकू येतं, आपला आपण अन्वयार्थ काढायची संधी हुकत राहते… मग काही काळ थांबावं लागतं, ऐकू येणारा त्यांचा आवाज थांबवण्यासाठी काही ओळी मोठ्याने वाचाव्या लागतात आणि मग पुन्हा शांतपणे वाचता येतं… हे चक्र अखंड सुरू राहतं…
समाज जागृत राहण्यासाठी निखिल वागळे यांच्यासारख्या आक्रमक वृत्तीची माणसं गरजेची असतात, तशीच कर्णिकांसारखी शांत वृत्तीची माणसंही आवश्यक असतात… ज्यांना जी भाषा समजते त्यांना ती ती भाषा उपलब्ध असते.
आनंद पटवर्धन यांनी डॉक्युमेंटरी फिल्म या फॉर्मला जशी प्रतिष्ठा प्राप्त करून दिली तशी कर्णिकांनी रिपोर्ताज या फॉर्मला मिळवून दिली.
कुठच्याही कार्यक्रमाला उपस्थित असले तरी ते स्वत:ची उपस्थिती जाणवू देत नाहीत… अत्यंत बारकाईने त्यांचं ऐकणं, पाहणं, निरीक्षण करणं सुरू असतं, हे त्यांचं लेखन वाचल्यावर लक्षात येतं. त्यांना लाभलेली टीपकागदाची वृत्ती त्यांनी जाणीवपूर्वक जोपासलेलीही लक्षात येते.
कधी स्वत:च्याच तर कधी शेजार्याच्या काठीनेही साप मारण्याची, पाहिलेल्या, ऐकलेल्या बाबींवरचं त्यांचं नेमक्या शब्दांतलं भाष्य गरजेनुसार आणि चवीनुसार धारदार किंवा सौम्य आणि परिणामकारक असतं, त्यात मुख्यत्त्वे ते मूल्यात्मक बाबींकडे लक्ष वेधून घेतात आणि त्या दिशेने विचार करायला भाग पाडतात… त्यातही आग्रह नसतो… आवाहन असतं.
त्यांची टीका नर्मविनोदी, बोचरी, टोकदार असते, पण ती जहरी, विषारी, विखारी नसते, त्या टीकेत तुच्छतावाद नसतो. मीच एक हुशार, मला मान देणारे ‘बारीक’ हुशार आणि बाकीचे सगळे निर्बुद्ध असा दृष्टिकोन नसतो, मॅटर ऑफ फॅक्ट पद्धतीची त्यांची समीक्षा, मांडणी, टीका असते… थोडक्यात त्यांनी माणसांवर, लेखकांवर, संस्थांवर, साहित्य आणि कलाव्यवहारावर, लेखन किंवा इतर कलाकृतींवर टीका केली, पण त्या टीकेचं ‘स्वयंवर’ मांडलं नाही. भालचंद्र नेमाडे यांच्याबद्दल त्यांनी केवळ आदराने आणि एकांगी लिहिलंय… या वाक्याचा वरील वाक्यातल्या ‘स्वयंवर’ या शब्दाशी काही संबंध आढळल्यास तो निव्वळ एक योगायोग समजावा. विजय तेंडुलकरांबद्दल त्यांनी अत्यंत जिव्हाळ्याने आणि दोन्ही बाजूंनी लिहिलंय असं माझं निरीक्षण आहे.
तेंडुलकर आणि कर्णिक यांच्यातले साम्यभेद. माणूस वाचण्याची सवय हे साम्य. भेद असा की तेंडुलकरांची नजर अत्यंत तीक्ष्ण आणि यांची सौम्य… ते आपल्याला वाचतायत हे समजू न देणारी… अलिप्त.
आणखी एक साम्य : दोघंही जजमेंटल होत नाहीत.
एका लेखात अण्णा हजारे राजकारणात आले याबद्दल एक सकारात्मक वाक्य त्यांनी लिहिलंय… यातून कर्णिक भाबडेही आहेत असं जाणवतं… असंख्य माणसांना अण्णांची बाहेरून पांढरी, पण आतून काळी असलेली टोपी आिण अदृश्य खाकी चड्डी तेव्हा दिसली नाही, तशी कर्णिकांनाही दिसली नव्हती.
जवळपास रोज त्यांची किमान एक तरी व्हॉट्सअप पोस्ट असंख्य लोकांना येत असते. कधी नवी कल्पना, कधी एखादा प्रश्न, इतरांचं आवडलेलं लिखाण, कधी लिहिण्यासाठी एखादा विषय सुचवणं… जणू काही इतरांनी लिहिलं नाही तर आकाश कोसळेल, काळ स्तब्ध होईल, जगरहाटी थांबेल…
कुणी प्रतिसाद देवो-न देवो… ते सुचवतच राहतात… अथक.
त्याच्या लिखाणातली, बोलण्यातली वस्तुनिष्ठता आणि त्यातला ब्लॅक ह्यूमर ही वैशिष्टयं म्हणजे मोठी जमेची बाजू… जी पत्रकारिता आणि साहित्यच नव्हे तर सगळ्या क्षेत्रांमध्ये अभावाने आढळते… विशेषत: वस्तुनिष्ठता!
आवर्जून सांगण्यासारखे दोन अनुभव :
ते महानगरमध्ये होते. महानगर मी रोज वाचत असे. तेव्हा मी साधारण २५ वर्षांचा असेन. महाराष्ट्रात दिवसाढवळ्या शपथविधी होऊन स्थापन झालेलं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं. रामकृष्ण मोरे शिक्षणमंत्री होते. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणात भाषांमधून मराठी भाषा शिकण्याची अनिवार्यता बंद करायचा निर्णय मोरेंनी घेतला. त्यावर संतापून ‘जय जय रामकृष्ण मोरे’ या शीर्षकाचं टीकात्मक पत्र लिहून मी महानगरच्या कार्यालयात गेलो. समोर हेच. त्यांचं लिखाण महानगर मधून वाचत होतो इतकाच परिचय. त्यांना हस्तलिखित दिलं, वाचून पाहा आणि ठीक वाटलं तर छापा, ठीक नसेल तर तुम्ही तरी फाडा किंवा मी फाडतो, कचराकुंडी दाखवा असं म्हटलं. त्यांनी, ‘बसा’ म्हटलं, बसणं भाग होतं. शांतपणे पत्र वाचून, चेहर्यावर कुठचाही भाव न आणता, ‘ अक्षर छान आहे तुमचं. असू द्या, लिहित राहा’ म्हणाले.
पत्रातल्या मजकुरापेक्षा वेगळ्याच गोष्टीचं कौतुक झाल्यामुळे मी बुचकळ्यात पडलो.
निघू की थांबू कळेना… निर्णय न देता, पत्र न फाडता स्वत:जवळ ठेऊन घेतलं. मग मी थँक यू म्हणून निघालो. काही दिवसांतच पूर्ण पत्र वाचकांच्या पत्रांच्या कॉलममध्ये छापून आलं. मी भारावून गेलो. त्या दिवशी महानगरचे पाच अंक विकत घेतले.
पुढचा अनुभव जास्त महत्त्वाचा आहे.
आविष्कारच्या संस्थापकांपैकी एक आणि तत्कालीन अध्यक्ष अरूण काकडे म्हणजेच काकडे काका यांचं आत्मचरित्र ‘अमका’ हे कर्णिकांच्या पाठपुराव्यामुळेच लिहून आणि प्रकाशित झालं. महाराष्ट्रातील प्रयोगशील रंगभूमीचा इतिहास, मोठा पट या निमित्ताने वाचकांसमोर आला. कर्णिक तेव्हा आविष्कारमध्ये वरचेवर येऊन ठाण मांडून बसत, कधी कॉल्स करत, काकांच्या मागे लागून त्यांनी पुस्तक लिहून घेतलंच.
काळजात घर करून राहिलेला प्रसंग :
‘न छापण्याजोग्या गोष्टी’ मध्ये एक प्रसंग आहे… घरातल्या सगळ्या बायका कर्णिकांभोवती फेर धरून उभ्या आहेत आणि त्यांच्याकडे बोट दाखवून, ‘आमच्या या परिस्थितीला तूच जबाबदार आहेस’ असं म्हणतायत या अर्थाचा. हा प्रसंग कधीतरी मी दिग्दर्शित करेन त्या नाटकात, वाव असो अथवा नसो, मी वापरणार आहे.
नाटक, कथा, कादंबरी, चित्रपट आणि आता वेबसीरिजमधलं एक कॅरेक्टर हे प्रामुख्याने लेखकाच्या निरीक्षण आणि कल्पनाशक्तीतून अनेक व्यक्तींमधले अनेक गुण-अवगुण घेऊन तयार होतं.
पण वास्तवातले सुनील कर्णिक हे दुहेरी व्यक्तिमत्त्व आहे… एक : रोजच्या जगण्यात वावरत असणारे आणि दुसरे लिहिणारे, लिहितं करणारे पुस्तकांच्या विश्वातले. आज या दोन्ही व्यक्तिमत्त्वांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस आहे. पण पहिले कर्णिक असे वावरतायत, हे सगळं त्यांच्यासाठी नाहीच जणू… त्या दुसर्या कर्णिकांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस आहे, त्याला ते उपस्थित आहेत.
इदं ना मम्…
मुकेश माचकर यांनी फेसबुकवर लिहिलेले दोन प्रसंग.
पहिल्यांदा वाचल्यापासून मला त्या दोन्हीत कर्णिक दिसतात.
पहिला प्रसंग. थोर शास्त्रज्ञ आल्बर्ट आइनस्टाइन यांचं एका गावात व्याख्यान होतं. त्या गावात चेहर्याने त्यांना कुणी ओळखत नव्हतं. ते आपल्या कारने निघाले. त्यांचा ड्रायव्हर त्यांना म्हणाला की तिकडे तुम्हाला कुणी चेहर्याने ओळखत नाही, तर आज आइनस्टाइन म्हणून मी भाषण करू का?
आइनस्टाइन यांनी त्याला विचारलं, तू बोलू शकशील?
ड्रायवर म्हणाला, हो… तुमची अनेक व्याख्यानं मी प्रेक्षकांत बसून ऐकली आहेत, ती सगळी मला तोंडपाठ आहेत. नमुन्यादाखल एक ऐकवलंही.
आइनस्टाइन खूष झाले, करून तर पाहू… आज तूच व्याख्यान दे म्हणाले. आता कारमध्ये आइनस्टाइन ड्रायवर सीटवर आणि ड्रायवर त्यांच्या जागी बसले.
गाव आलं, ते उतरले, आगत स्वागत झालं आणि ड्रायवरच्या व्याख्यानाला सुरुवात झाली.
आइनस्टाइन प्रेक्षकांत बसले होते.
व्याख्यान संपलं. टाळ्यांचा कडकडाट झाला आणि प्रश्नोत्तरं सुरू झाली. पहिलाच प्रश्न… किचकट होता, तो ऐकल्यावर ड्रायवर म्हणाला… छ्या… हा इतका सोपा प्रश्न आहे की याचं उत्तर माझा ड्रायवरही देईल… पुढे काय झालं ते सांगण्याची आपण सगळे चाणाक्ष चतुर असल्यामुळे गरज नाही…
…यातली ‘करून तर पाहू!’ ही प्रयोगशील वृत्ती कर्णिक सातत्याने जपत नवनव्या कल्पनांना खतपाणी घालत आहेत.
दुसरी गोष्ट प्रख्यात अमेरिकन लेखक मार्क ट्वेनची. त्यांचं एका ठिकाणी व्याख्यान होतं. जाण्यापूर्वी दाढी करण्यासाठी ते एका सलूनमध्ये गेले. दाढी करताना दाढी करणारा कामगार मार्क ट्वेन यांना म्हणाला, आज आपल्या गावात मार्क ट्वेनचं व्याख्यान आहे, मला अनेकदा उभ्याने ऐकावं लागलंय म्हणून यावेळी वेळेत माझं तिकीट मी बुक केलंय. तुम्ही येणार आहात का ऐकायला? तुमची सीट बुक केलीये का तुम्ही?
मार्क ट्वेन उत्तरले, मित्रा… माझं नशीब इतकं खराब आहे की मार्क ट्वेनचं प्रत्येक व्याख्यान मला कायम उभ्यानेच ऐकावं लागतं…
…यातला मिष्कीलपणा कर्णिकांमध्ये ठासून भरला आहे, पण बाहेरून तो अजिबात जाणवत नाही.
प्रिय एसके, इतरांनी लिहिण्यासाठी पाठपुरावा करण्यातला थोडा वेळ स्वत:च्या पाठपुराव्यासाठी वापरतील, स्वत:चाही पाठलाग करतील अशी आशा करतो.
(लेखातील अर्कचित्रे : प्रदीप म्हापसेकर)