पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अमेरिका भेट त्यांना अनपेक्षित असलेल्या कारणांनी गाजली. त्यांनी भारतात कधीही पत्रकार परिषदेला सामोरं जाण्याचं धैर्य दाखवलेलं नाही. कोणत्याही पूर्वनियोजित नसलेल्या प्रश्नांवर त्यांची ततपप होते. टेलिप्रॉम्प्टरविना ते भाषणच करू शकत नाहीत, साधं बोलूही शकत नाहीत. अमेरिकेत त्यांना दोन का होईना, प्रश्नांचा सामना करावा लागला, तोही व्हाइट हाऊसमध्ये. मोदीकाळात भारतात अल्पसंख्याक समुदायांवर अत्याचार होत आहेत, या प्रश्नावर मोदींनी थेट उत्तर न देता भारत ही लोकशाहीची जननी आहे, वगैरे नेहमीचीच टेप वाजवली. अशीच टेप आणीबाणीनंतर पंतप्रधान झालेले मोरारजी देसाई यांनी तेव्हाचे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांच्यापुढे वाजवली होती. आपल्या देशात केवढं लोकशाही स्वातंत्र्य आहे, याची टिमकी त्यांनी वाजवल्यावर जिमी कार्टर इथे या व्यंगचित्रात म्हणतात, तुमच्या आमच्या लोकशाही स्वातंत्र्यात समानता आहे. आमच्याकडे पण समाजाला दिशा देऊ पाहणार्या विचारवंतांचे, नेत्यांचे खून पडले आणि तुमच्याकडे पण महात्मा गांधींचा खून झालाच! आजही दोन्हीकडच्या लोकशाहीमध्ये फारसा फरक पडलेला नाही. यंदाच्या भेटीत विद्यमान अध्यक्ष ज्यो बायडेन मोदींना कार्टर यांच्याप्रमाणे काही म्हणाले की नाही, याची नोंद नाही. पण, अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी मात्र हा प्रकार असाच चालू राहिला तर भारताला एकत्र बांधून ठेवणारे एकात्मतेचे महावस्त्र उसवून जाईल, असा इशारा दिला आहे.