मुख्यमंत्री एकनाथ शिंदे डॉक्टर झाल्यापासून त्यांच्याकडे छोट्या-मोठ्या ऑपरेशनसाठी येणार्या पेशंटांची संख्या वाढली आहे, असं माझा मानलेला परममित्र पोक्या याने सांगितल्यावर मला हलकासा भूकंपाचा धक्का बसला. मी त्याला तत्काळ डॉ. शिंदे यांची सनसनाटी मुलाखत घ्यायला पाठवला. त्याने ती मुलाखत टेप करून आणली आहे. तीच तुम्हाला वाजवून दाखवतो. सुरुवातीला पोक्या पार्श्वभूमी स्पष्ट करताना म्हणतो, ‘मी त्यांच्या दालनात भलामोठा पुष्पगुच्छ घेऊन त्यांचं अभिनंदन करण्यासाठी गेलो, तेव्हा त्यांनी मला टेबलावरील खोक्यातून मिठाई आणि पेढा काढून दिला आणि माझे आभार मानून ते म्हणाले, पोकेश्वर, कधीही या. ही डिस्पेन्सरी तुमचीच आहे, असं समजा. सामान्य माणसासाठी आपण डॉक्टर व्हावं ही माझी बालपणापासूनची इच्छा. तेव्हाही मी आणि शेजारच्या मित्र-मैत्रिणी आम्ही डॉक्टर डॉक्टर खेळायचो. मी डॉक्टर व्हायचो, कुणी पेशंट व्हायचे, कुणी वॉर्डबॉय, तर कुणी नर्स व्हायचं. इंजेक्शन, कापूस, खेळण्यातला स्टेथोस्कोप अशी सर्व वैद्यकीय सामुग्री, रंगीबेरंगी बाटल्यांतील वेगवेगळी सरबतं असं सर्व साहित्य आमच्या हातापाशी असे. पेशंटची सर्वांगीण तपासणी मीच करायचो आणि ऑपरेशन करावं लागेल, असा निष्कर्ष काढून ताबडतोब ऑपरेशन टेबलवर घ्यायचो… हे पाहिलं की त्यावेळच्या सर्व आठवणी जाग्या होतात.’
– तुमचं हे स्वप्न प्रत्यक्षात आल्यावर त्या डॉक्टरकी देण्याच्या समारंभात तुमचं भाषण ऐकून कान तृप्त झाले…
– ही डॉक्टर डी. वाय. पाटील यांची कृपा. किती मोठा माणूस आणि त्यांचं मोठं हॉस्पिटल. मला त्यांच्या मनाचा दिलदारपणा दिसला तसाच माझ्यासारख्या शून्यातून वर आलेल्या माणसाविषयी वाटणारी सहानुभूतीही दिसली. मोदी-शहा-फडणवीस यांनी जसा माझा दगडातून देव घडवला तसंच डी. वाय. यांनी माझं डॉक्टर होण्याचं स्वप्न साकार केलं.
– त्या दिवशी मनोगतात डॉक्टरी ज्ञानाविषयी तुम्ही जे बोललात त्यावरून तुमच्या हातगुणाची आणि पायगुणाची प्रचिती सार्या महाराष्ट्राला आली. तुम्ही केलेल्या छोट्या-मोठ्या शस्त्रक्रियांविषयी समजलं. तुम्ही इंग्रजीत लिहून आणलेलं भाषण अस्खलितपणे वाचून दाखवलंत तेव्हा तर माझा तुमच्याविषयीचा आदर चौपट झाला.
– धन्यवाद. पण त्यासाठी मला चार दिवस किती रिहर्सल करावी लागली याची कल्पना तुम्हाला येणार नाही. गेल्या दोन-अडीच वर्षांत या महाराष्ट्राच्या भल्यासाठी मी काय काय केलं याची वस्तुस्थिती खर्या अर्थाने तानाजी सावंत हेच समजू शकले. मूळ शिवसेनेतून बाहेर पडण्यासाठी त्या अडीच-तीन वर्षांत आम्ही फडणवीस साहेबांच्या अडीचशे ते तीनशे वेळा कशा चोरून भेटीगाठी घेऊन गुप्त बोलणी केली, हे फक्त तानाजीरावांनाच माहीत आहे. ऑपरेशन गौहाती हे मी आणि आमच्या चाळीस आमदारांनी केलेलं पहिलं ऑपरेशन. त्यानंतर खासदार, शाखाप्रमुख, जिल्हा-तालुकाप्रमुख अशी छोटी-मोठी ऑपरेशन्स होत राहिली. डॉक्टर तानाजी सावंत यांच्यासारखा रोगाचं अचूक निदान करणारा दुसरा डॉक्टर या महाराष्ट्रात नाही. चिंबोर्याचं त्यांचं संशोधन तर जगात गाजतंय. आपल्या बाणेदार शब्दांनी त्यांनी आम्ही केलेल्या शस्त्रक्रियांविषयी अचूक माहिती देऊन आमचा पुढील मार्ग मोकळा केला आहे. आरोग्यमंत्री म्हणून त्याचं कार्य डोंगराएवढं मोठं आहे. डी. वाय. पाटलांना सांगून त्यांना डॉक्टरांची डबल पदवी बहाल करावी, अशी विनंती मी करणार आहे. आमच्या गटातील आणखी कितीजणांना डॉक्टर पदवी देता येईल याची विचारणाही मी करणार आहे. होय. आम्ही गद्दारी केली पण ती महाराष्ट्राच्या आरोग्याच्या भल्यासाठी. ते पाहूनच दीपक सावंतांसारखे डॉक्टरही आमच्यात आले.
– तुमच्या बंडखोर आमदारांचा समावेश अजून मंत्रिमंडळात होत नाही, याबद्दल तुम्हाला काहीच वाटत नाही?
– मंत्रिमंडळ विस्तारात सर्व गद्दार आमदारांना आणि त्याचबरोबर डॉ. दीपक सावंत यांनाही स्थान देण्याची आमची इच्छा आहे. आम्ही चाळीसच काय ऐंशी आमदारांचं जम्बो मंत्रिमंडळ स्थापन करू. आताही कोरोना दाराशी उभा असल्यावर चार-चार आरोग्यमंत्री नेमावेच लागणार. त्याशिवाय यापूर्वी नसलेली नवी काही खाती आम्ही निर्माण करणार आहोत. उदा. दुष्काळ निवारण खाते, शीघ्र पैसेवाटप खाते, पैसा उपसा खाते, मिठाई वाटप खाते, गॅस सिलिंडर लाभार्थी खाते यांसारखी जनतेच्या हिताची खाती आम्ही निर्माण करणार आहोत. प्रत्येक खात्याला दोन कॅबिनेट, दोन उपमंत्री आणि तीन-तीन देखरेख मंत्री नेमणार आहोत. त्याशिवाय राज्यात उंदीर आणि घुशींची वाढ रोखून जनतेचे आरोग्य सुरक्षित राहण्यासाठी दोन कॅबिनेट दर्जाचे मंत्री, तसेच मच्छर वाढल्यामुळे मच्छर निवारण खाते निर्माण करून त्यासाठीही चार कॅबिनेट मंत्री नेमणार आहोत. नागरिकांना मेडिकल दुकानांतून मोफत औषधं पुरवण्यासाठी साडे बासष्ट कोटींची खास तरतूद करण्यात येणार आहे. मद्यनिर्मितीला उत्तेजन देण्याचा आणि मद्यपींना अधिक उर्जा देण्याचा निर्णय आम्ही याआधीच घेतला आहे. आता ‘आरोग्यदायी मद्या’ची युद्धपातळीवर निर्मिती करून जनतेचे आरोग्य सुधारण्याची विस्तारित मंत्रिमंडळाची योजना असेल. त्याही पुढे जाऊन जनतेला फुकट धान्य देण्याची तसेच सणावाराला मोफत मिष्टान्न भोजन देण्याचीही आमची योजना आहे. त्यासाठी आमची अमेरिका आणि इंग्लंडच्या मराठी मित्रमंडळांशी बोलणी सुरू आहेत. निवडणुकीआधी सर्वांना मोफत बस-टॅक्सी प्रवास करण्याची मुभा देण्याची सरकारी योजना आहे.
– पण अशाने राज्याची तिजोरी खाली नाही का होणार?
– त्याची चिंता जनतेने करू नये. मोदी आणि शहांचा वरदहस्त असल्यावर पैशाची चिंताच करू नका. आधीच आमच्या आमदारांनी गडगंज संपत्ती कमावली आहे. त्यांना अधिक उत्तेजन देण्यासाठी त्यांच्या पगारात व पेन्शनमध्ये दुप्पट वाढ करण्यात येईल. त्यामुळे ते अधिक उत्साहाने आणि कार्यक्षमतेने कामे करू शकतील. तसेच सर्व आमदारांना स्वसंरक्षणासाठी पिस्तुले देऊन ते चालवण्याचे प्रशिक्षणही देण्यात येईल. तुम्हाला काही आजार असल्यास मी स्वत: तुमच्यावर मोफत उपचार करीन. आता या तुम्ही. मला माझ्या काही आमदारांवर मानसिक उपचार करायचे आहेत. माझे विचार ऐकून तुम्ही मला डॉक्टर फेकनाथ म्हटलंत तरी मला त्याची पर्वा नाही. जय महाराष्ट्र.