□ तुमच्या-आमच्या ‘पीएफ’चा पैसा अदानी समूहात.
■ आता केजरीवालांच्या आरोपांनंतर तो नक्की अदानी समूह आहे की मोदी समूह आहे, तेही कळेनासं झालेलं आहे…
□ ना तपास, ना उत्तर… पंतप्रधानांना एवढी भीती कशाची वाटते? – राहुल गांधी.
■ सत्याची!
□ ‘मविआ’मध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाहीत – नाना पटोले.
■ ते चुकून यशस्वी झाले तर मविआ बनवायला विरोधी पक्षच शिल्लक राहणार नाहीत…
□ आता मी कोणालाही लोणी लावायला जाणार नाही – नितीन गडकरी यांचे स्पष्ट प्रतिपादन.
■ ‘आता’? तुमचा तडक भडक वर्हाडी बाणा पाहता तुम्ही आधीही कोणाला लोणी लावायला गेला असाल, असं वाटत नाही नितीनभौ!
□ खोके सरकारकडून कांदा उत्पादक शेतकर्यांची फसवणूक – बातमी.
■ यात बातमी काय आहे? कोणाचं काही भलं झालं असेल तर ती बातमी असेल ना?
□ शिकाऊ डॉक्टरांचे खाण्याचे वांदे.
■ शिकल्यानंतर क्लिनिक काढण्याइतकं भांडवल नसेल तर काय होणार आहे, याची प्रॅक्टिस करून घेतात की काय याच काळात?
□ मुंबईचे ‘स्वच्छता मॉडेल’ गुजरातमध्ये राबवणार.
■ गुजरात महाराष्ट्रापेक्षा सर्व बाबतीत पुढे आहे, असे तारे इथूनच तिथे गेलेल्या मातृभूमीद्रोही भाजप प्रदेशाध्यक्षांनी तोडले होते… त्यांच्या मेंदूचीही काही सफाई होते का ते पाहा याच मॉडेलनुसार!
□ ‘ईडी’ सरकारने महानंदला वार्यावर सोडले; कर्मचार्यांना दोन महिन्यांपासून पगार नाही.
■ मलईचे असतील जिथे खोके, तिथेच सापडतील बोके! महानंद म्हणजे साय काढलेलं टोन्ड मिल्क आहे त्यांच्यासाठी.
□ भाजप वॉशिंग मशीन, काळ्याचे पांढरे करते – ममता बॅनर्जी.
■ तुमचेही काही सहकारी तिकडे जाऊन सफेदी की चमकार घेऊन आले आहेत दीदी!
□ श्रीरामाचे नाव घेऊन दगड तरंगतायत; दगडच राज्य करतायत- उद्धव ठाकरे यांचा सणसणीत टोला.
■ या दगडांची अपात्रता स्पष्ट झाली की ते रामनामच त्यांना घेऊन बुडेल… अशा अमर्यादांना तो मर्यादापुरुषोत्तम साथ देईल काय?
□ विधानसभेत भाजप आमदार पाहात होता पॉर्न.
■ भाजप आमदार पाहात होता ना, मग ते भजनच असणार… विषय कट्!
□ मिंधे सरकारने अडवली शेकडो दलित विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती.
■ ते शिकले तर तथाकथित वरच्या जातींचं शेकडो वर्षांचं मेरिट नावाचं भंपक जातीय आरक्षण धोक्यात येतं ना? आप क्रोनॉलॉजी समझिए!
□ एटीएम ऑपरेटरने केला पैशाचा अपहार.
■ त्याची चूक नाही… त्याला वाटलं एटीएम म्हणजे एनी टाइम मनी!
□ मोदींना खोट्या केसमध्ये गुंतवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न – अमित शहा.
■ तुमच्याच शब्दांत सांगायचं तर लोकांना काय सांगता, कोर्टात जा! हवंतर जिथे तुम्ही लिहून दिल्यानुसार तुम्हाला हवा तसा न्याय मिळतो, त्या गुजरात कोर्टात जा!
□ कल्याण-डोंबिवली पालिकेच्या कार्यक्रमात मिंधे गटाचा कमळाला बाहेरचा रस्ता.
■ संधी मिळेल तिथे एकमेकांना चेपतायत हे ‘मित्र’पक्ष! यांच्यापेक्षा शत्रू परवडले…
□ धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा, पण मुख्यमंत्र्यांचा जिल्हा तहानलेला.
■ त्यांना कळू देऊ नका… ते तिकडे जाहिरातींचा पाऊस पाडतील… लोकांना त्याचा उपयोग काय?
□ विराट कोहलीच्या सर्वोत्कृष्ट खेळाडूंच्या यादीत सचिन तेंडुलकर आणि विवियन रिचर्ड्स.
■ हे दोघे ज्या यादीत नसतील ती यादी बनावटच म्हणायला हवी!
□ मोदींची डिग्री मागितली म्हणून केजरीवालांना दंड.
■ गुजरातच्या न्यायालयाने त्यांना तुरुंगवास सुनावला नाही, मुख्यमंत्रीपदावरून काढलं नाही, हेच खूप झालं… मोदींचे पाळीव नोकर त्यांनी छू म्हटलं की काय करतील ते सांगता येत नाही.
□ सरकार बदलले म्हणून जनहिताची कामे थांबवू नका- उच्च न्यायालयाचा मिंधे सरकारला दणका.
■ आधीच्या सरकारच्या योजनांची नावं बदलून आपल्याच योजना म्हणून जाहिरातबाजी करण्याची ट्रिक मोदींनी यांना शिकवलेली नाही का?
□ रेल्वेच्या मालमत्तेवर चोरांचा डल्ला.
■ चोरांचा दोष नाही… स्टेशन आपकी संपत्ती है, अशी अनाऊन्समेंट रेल्वेच करते ना?
□ रामनवमीतील हिंसाचारामागे भाजपच- ममता बॅनर्जी कडाडल्या.
■ तुम्हीही अशा काय हो दीदी? त्यांच्याकडे मतं मिळवण्याचा दुसरा काही मार्ग आहे का?