फार वर्षे आधी निसिम इझिकेल या लेखक/ कवीने विधान केले होते की जगातील सर्व कवींना एका बोटीत बसवून बुडवले तरी साहित्यात फार फरक पडणार नाही. अर्थात हा उपहास होता.
आज मात्र मला ते विधान पूर्ण पटते आहे.
आताच पार पडलेला गुढी पाडवा, व्हॉट्सअपवर आलेल्या अनेक हजारो संदेशामुळे जास्त भिनला आणि एकवेळ संदेश परवडले, पण त्यासोबत ज्या कविता होत्या त्यांनी डोक्याला अधिक शॉट!
सोशल मीडिया आला आणि गल्लोगल्ली कवी तयार झाले.
ट ला ट, रे ला रे,
जन म्हणती काव्य करणारे.
निव्वळ यमक जुळवण्याची कला असली की काव्य/कविता प्रसवता येते. अगदी सुलभ प्रसूती. काही वर्षे आधी एका घार्या गोर्या किंचित कवीने चारोळ्या लिहिल्या होत्या. फेसबुकवर तुफान लोकप्रिय झाल्या, जपानी हायकूची तंतोतंत कॉपी. पण ते काय तरल, अलवार म्हणतात तसे भावविभोर इत्यादी.
आम्ही, त्यातही मी रामदास फुटाणे आणि महेश केळुसकर यांची चाहती असल्याने मला काही आवडले नाही. पण हे प्रकरण लोकप्रिय झाले आणि मग काव्यरचनेची साथ आली, जी आजही नवनवीन व्हेरियंट घेऊन येतेच आहे.
एक कविता चैत्र प्रतिपदा उर्फ गुढी पाडव्याच्या निमित्ताने माझ्याकडे ढकलली गेली.
ऐका/वाचा
पाडव्याची सोनेरी पहाट
आशेची नवी किरणे
कोवळी चैत्र पालवी
आली सोन पावली
स्वागत करू
गुढी उभारू!!!
हीच कविता दसरा दिवाळी आणि आपल्याकडे येणारे सतराशे साठ सण यांना पण थोडे फेरफार करून लागू होते आणि पाठवली जाते.
आजकाल ग्रीटिंग कार्डवाल्यांचा धंदा पार बसलाय या शीघ्र कवी आणि सोशल मीडियामुळे.
यांच्याच वर्गातील अजून एक हौशी प्रकार, स्वरचित मंगलाष्टकांचा. गंगा सिंधू सरस्वती च् यमुना म्हटले की कधीकाळी आपोआप माझे डोळे भरायचे, हल्ली जाम हसायला येते, नमुना देते.
कन्या ही – – -ची
झाली आता – – -ची
डोळे भरले माऊलीचे
कंठ दाटले पित्याचे (कंठ अनेकवचनी आहे इथे, पिते आहेत किती?)
हुंदके आले भावा बहिणींना
अश्रू सुटले मैत्रिणींना…
(अश्रू सुटले म्हंजे काय रे भाऊ? मुळ्याच्या किसात मीठ टाकले की पाणी सुटते तसे मैत्रिणींना अश्रू सुटतात की काय?). असो.
पावसाळा आला की पाऊस आणि मुंबईची होणारी तुंबई यापेक्षा धडकी भरते पावसाळी कवितांची. कवी आता पावसाळी कवितेचे बहुप्रसव करणार की काय या शक्यतेनेच पावसाळा लांबत असावा, पाऊसही पडायचा थांबत असावा (बोंबला, हीच एक कविता झाली). पावसाळ्यात भू-छत्र उगवते तसे कवी टपटप कविता पाडू लागतात.
आल्या धारा
सुटला वारा
वीज फिरे गरारा
(म्हंजे नक्की काय? परकरी पोरगी आहे काय ती गरारा फिरायला?…)
आनंदाचा फवारा
(आकाशातून याच्यावर कोणीतरी स्प्रे मारतंय, निदान बेगॉन, हिट तरी मारा…)
करू पावसाळा साजरा.
असे काव्य लिहिणार्या माणसाचा खून करणे ही समाजसेवाच समजली जावी अध्यक्ष महोदय!!!
अशा कवीची प्रतिभा मग हळूहळू तुंबते. पण, तोपर्यंत डॅमेज इज डन.
त्यानंतर आपल्याकडे असणारे शेकडो सण येतात आणि त्यानुसार कविता पाडल्या जातात.
गणपती आले की लोकप्रिय हिंदी मराठी गाण्यांच्या मीटरवर आरत्या, गाणी रचली जातात. या गाण्याची एक गंमत आहे, हे गाणे ऐकताना, मूळ गाणेच डोक्यात वाजत राहते. आमच्या कोकणात अशी रग्गड भजने, भक्तिगीते वाजवली जातात.
लग्नकार्यातील मंगलाष्टका परवडल्या पण हल्ली उखाणे पण फॅन्सी झालेत. पूर्वी दोन चार ओळीत संपणारा उखाणा आज महाकाव्य होऊन राहिलाय आणि नवी नवरी तो पाठ बीठ करते. तिचे पूर्ण खानदान, नवर्याचे कुटुंब सगळ्यांना घेऊन हा जंगी उखाणा कार्यक्रम होतो.
अर्थात माझ्यासारखे काही खवट लोक तोपर्यंत जेवून बिवून मस्त बसून घेतात म्हणा.
मुद्दा काय की विं. दा. करंदीकर, महानोर, नारायण सुर्वे, खानोलकर, इंदिरा संत, भट, शांता शेळके, ग्रेस, माडगूळकर (अनेक नावे राहिलीत, क्षमस्व) यांच्या काव्यावर पोसलेली आमची पिढी आजही काव्यात अर्थ शोधू पाहते. आज त्या दर्जाचे अनेक कवी आहेत काही. पण हे जे स्वयंघोषित कवी कढईत उडणार्या तिळागत उडत असतात त्यांचे काय करावे?
सोसायटी/कुटुंब ग्रूप, माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन अशावेळी तर उदंड पीक येते.
व्याकरणातील अल्पविराम, प्रश्नचिन्ह अथवा पूर्णविराम यांना या किंचित कवितेत फार महत्त्व असते बाप्पा. एक ओळ, चार पूर्णविराम.
दोन शब्द एक प्रश्नचिन्ह.
(आमच्या मनातील, हे काय चाललेय हा प्रश्न अनुत्तरित बरं का!)
चार पाच उर्दू शब्द घेवून पूर्ण गजल लिहितात हो. अरे कुठे फेडाल ही पापे?
अशा कवीच्या लिहिण्याबद्दल काहीएक आक्षेप नाही, पण जाहीररित्या जेव्हा त्यांचे सादरीकरण होते तेव्हा ती शिक्षा ठरते राव. एक नमुना देते…
क्षितिजावर धुक दाटले,
लाल कुंकू सांडले,
धरा लाजली आरक्त…
उभी उत्सुक होऊनी!!!!
काय कळले? खरं सांगा.
विरामचिन्हे, आशय व्यक्त करतात हा मला यातून लागलेला शोध.
वर्तमानपत्रातील जाहिरातीमधून मराठीचे मुडदे बघणे आता रोजच झाले आहे. पण हा क्लेश मात्र अद्वितीय मानावा लागेल.
सरकारी जाहिराती पण बर्यापैकी गेय आणि अर्थपूर्ण असतात अशी वेळ आलीय.
आरोग्य बघा
संडासातच हगा
असे परवडले, स्पष्ट अर्थ, नो नॉनसेन्स.
इतके कायदे अाहेत, पण अशा कविता, चारोळ्या यांच्या रचनाकारांना (मी शस्प यांना कवी म्हणणार नाही) काहीतरी दहशत बसावी असे करा प्लीज.
समाज वाचवा
कवी कुठेतरी पाठवा
हायला.. झाले की काव्य!!!!!
टीप : वरील लेख निव्वळ करमणूक म्हणून वाचावा. तुमच्या भावना दुखावल्या असल्यास ते खोटे आहे. कारण वर सांगितलेले काव्यप्रकार तुम्ही सहन करत असाल, ते आवडत असेल, तर तुमची भावना ठणठणीत आहे, संवेदना मात्र झिजून नष्ट झाली असावी.