चंदनाच्या नक्षीदार अशा कुपीत ज्याप्रमाणे अत्तर जपून ठेवावं, त्याच प्रकारे नाटकांच्या दालनात जपून कल्पकतेने ठेवण्याजोगी काही नाटके असतात, जी नाट्यसृष्टीत रसिकांच्या मनाला सुगंध देतात. त्यात एक संग्राह्य अशा नाटकाची यंदाच्या वर्षात नोंद घेता येईल, ते म्हणजे ‘अडलंय का?’ अर्थात याचं उत्तरही एका वाक्यात द्यायचे झाले तर – ‘काहीच अडलेलं नाही, कारण शो मस्ट गो ऑन!’ हे देता येईल!
या नाटकाचे मूळ जर्मन लेखक चार्ल्स लेविन्स्की यांचे असून मराठीकरण शौनक चांदोरकर यांनी केलंय आणि त्याची सादरीकरणायोग्य अशी रंगावृत्ती अतुल पेठे, पर्ण पेठे आणि निपुण धर्माधिकारी यांची आहे. दिग्दर्शन निपुण धर्माधिकारी याचेच आहे. या रंगकर्मींच्या यादीवरून हे नाटक शंभर टक्के प्रायोगिक रंगभूमीवरले असणे, हे तसे स्वाभाविकच! पण शासनाच्या व्यावसायिक नाट्य स्पर्धेत हे नाटक (म्हणजे दीर्घांक) सादर करण्यात आलेय. असो. तो एक स्वतंत्र विषय ठरेल. पुण्यातील प्रायोगिक रंगभूमीने हे नाटक रसिकांपुढे नव्या दमात पेश करताना पुण्याच्या नाटक कंपनीला स्विस कॉन्सुलेट जनरल आणि ग्योथं इन्स्टिट्यूट, मॅक्स म्युलर भवन यांचे निर्मिती सहकार्य लाभले आहे.
पडदा उघडतो आणि अंधारात पाठमोरा स्टायलिश टोपीधारी परदेशी माणूस एकटाच भूताप्रमाणे बडबडताना दिसतो. स्वप्न, भुताटकी, हॉरर, थ्रिल… असं काहीसं वातावरण. पिस्तुलीतून स्वतःच्याच मस्तकात गोळी मारून घेण्याची धमकीही तो देतोय. वयोवृद्ध पण कमालीचा उत्साही. आक्रमक खर्जाच्या सुरात ‘तू मला समजून घे. माझं म्हणणं पटवून घे!’ असं सांगून भ्रमिष्टासारखं त्याचं बोलणं सुरूच आहे. तिथे एक तरुणी दबकत-दबकत येते, जी कार्पोरेट जगाचं प्रतिनिधित्व करतेय. आणि दोघांच्या संभाषणातून नाट्य रंगतं.
हे एका नाट्यवास्तूतलं नाटक. अल्ब्रेश्ट हा रंगभूमीवरला थिएटरवर जिवापाड प्रेम करणारा बुजुर्ग अभिनेता आणि त्याला भेटायला आलेली पॉला, जिला तिच्या कंपनीने बिजनेस मीटिंगसाठी या पत्त्यावर पाठविले आहे. मोडकळीस आलेल्या पण नाटकांनी भारावलेल्या जर्मनीतलं हे एक थिएटर, ज्याची मूळ मालकी तिथल्या प्रशासकीय नगरपालिकेची आहे. पॉलाची कंपनी प्रशासनाची ‘अधिकृत सल्लागार’ असल्याने कंपनीने प्रशासकीय यंत्रणेला थिएटरच्या अनुदानात कपात करण्याचा सल्ला दिलाय. हे थिएटरच बंद करण्याचा पडद्याआडूनचा दुष्ट डाव आहे. या दोघांमध्ये त्यावरून उलट-सुलट टोकाच्या चर्चा रंगतात. काहीदा खटकेही उडतात. ‘कला की व्यवहार’ यावर भाष्य होते. आणि त्या ओघात राजकारण, समाजकारण, वृत्ती-प्रवृत्ती, मनोवृत्ती, यावरचा संवाद कळसापर्यंत पोहचतो. अल्ब्रेश्टला थिएटरमध्ये रस आहे तर पॉलाला त्या इमारतीत! दोघांचं मन त्यात गुंतलंय. धंदा की कला… असा हा वैचारिक संघर्ष.
कुठल्याही सरकारला कलेचा, संस्कृतीचा मारेकरी कधीही व्हायचं नसतं. याचा अर्थ त्यांना नाटकात, कलेत खूप काही रुची आहे, असं कदापि नव्हे. तर पुढल्या निवडणुकीत कलासक्त मतदारांची त्यांना मते हवी असतात. लोकप्रतिनिधी, राजकारणी यांचे मतांसाठी हे नाटक कायम सुरू असते. हे सत्य या भेटीतून अखेरीस प्रकाशात येते. अल्ब्रेश्ट हा या थिएटरमधून बिल्डिंगशिवाय, अनुदानाशिवाय, सवलतींशिवाय बाहेर पडण्याचा निर्णय घेतो. नाटक करण्यासाठी रंगकर्मींना एखाद्या गल्लीतला छोटासा कोपराही पुरेसा असतो. त्यातही नाटक रंगविण्याची त्याची ताकद आहे, असा निष्कर्ष मांडून तो शेवटी निघतो. सोबत ‘मीटिंग’साठी आलेली पॉला ही पूर्णपणे बदललेली असते. त्याच्या मताशी ती शंभर टक्के सहमत होते. कार्पोरेट विश्वातील तिची नोकरी सोडण्याचा निर्णय घेऊन तीही त्याच्यासोबत पुढलं पाऊल टाकते. दोघेही हसत-गात आनंदाने निघतात…
कथानक कुठेतरी महाराष्ट्रातील थिएटरची आजची भयानक अवस्था सांगणारी आहे. ‘जर्मनी’तली कथा ही आपल्याकडेही थोड्याबहुत फरकाने तीच आहे आणि याच अवस्थेतून जाणारे पुण्यातील प्रायोगिक रंगभूमीचे रंगधर्मी अतुल पेठे यांनी यातील याओकिम अल्ब्रेश्ट ही भूमिका अक्षरशः जिवंत केलीय. एक थिएटरचा पक्का माणूस जो प्रत्यक्ष आणि रंगभूमीवरही सारखाच दिसतो. ‘थिएटर’ वाचावं म्हणून उपोषण, आंदोलन करण्यासाठी सज्ज होणारा; पण या उपोषणाचा फायदा नगरपालिकेतील सभासद राजकीय स्वार्थासाठी करून घेतील हे देखील त्याला जाणवते. ‘थिएटर एक वेड लावण्याची डेंजर जागा!’ अशीही शेरेबाजी त्यातून होईल. त्यामुळे तो वेगळी वाट निवडणं पसंत करतो. अतुल पेठे यांचा प्रदीर्घ अनुभव आणि नाट्यशैलींवरचा अभ्यास यामुळे त्यांची देहबोली बहरून आलीय. आजच्या पिढीचा प्रायोगिक रंगभूमीवरला ‘नटसम्राट’ त्यांच्या भूमिकेतून डोळ्यापुढे उभा राहतो. आवाजाची चढउतार, हालचाली, स्वगतांचे सादरीकरण हे सर्वांगसुंदरच. त्यांची साथसोबत करणारी कन्या पर्ण पेठे हिने एक रंगवसा पुढे ताकदीने साकार केलाय. ‘पॉला’ ही आजच्या कार्पोरेट जगताचे प्रतिनिधित्व करते. बदललेल्या मनोवृत्तीचा शेवट ‘नोकरीला रामराम’ करण्यापर्यंत पोहोचतो. दोघांचं ट्युनिंग मस्त जमलं आहे. केवळ दोनच कलाकार रंगमंचावर असूनही ‘नाट्य’ कुठेही रेंगाळत नाही किंवा अडखळतही नाही.
आजच्या तरुणाईतील सर्जनशीलतेचा विजेता आणि प्रायोगिक-व्यावसायिक रंगभूमी, डिजिटल कंटेंट आणि चित्रपट यात भरीव कामगिरी करणारा तरुण तेजांकित निपुण धर्माधिकारी याचे दिग्दर्शन तसेच संहितेच्या जुळवाजुळवीत महत्त्वाची भूमिका पडद्यामागे आहे. जर्मन लेखक चार्ल्स लेविन्स्की मध्यंतरी पुण्यात आले होते. त्यावेळी पुण्यातील काही नाटकवाल्यांशी त्यांचा ‘संवाद’ही झाल्याचे आठवते. त्यातूनच या नाट्यसंहितेला प्रयोगापर्यंतच आकार मिळाला. काहीदा धक्कातंत्र तर काहीदा फॅन्टसी यांचा सुरेख वापर करण्यात आलाय, जो दीडएक तास रसिकांना खिळवून ठेवतो. जबरदस्तीने दोन अंकांची ‘ताणतणाव’ न केल्याने संहिता व सादरीकरण बंदिस्त झाले आहे. दिग्दर्शकाने पडद्यामागील तांत्रिक बाजूंसाठीही अभ्यासू मंडळींचे सहाय्य घेतले आहे, ही देखील एक जमेची बाजू ठरावी. ज्येष्ठ नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये यांनी काही चाके लावलेल्या सरकत्या वस्तूंची संकल्पना राबविली आहे, तर यातील लटकते झुंबर, खुर्ची, लेव्हल्स, कमानी शिरस्त्राण, टोप्या याची निवड जुन्या नाटकांची आठवण करून देते. एक कालबाह्य धाटणीची लाकडी खुर्ची प्रेक्षकांमध्येही आहे, जी विचार करायला लावते. काहीदा ज्यावर बसून ‘पॉला’ प्रतिक्रिया नोंदविते. त्यामुळे हे नाट्य थेट प्रेक्षकांचे व प्रेक्षकांसाठी असल्याचे सतत जाणवत राहते. इथे संहिता व दिग्दर्शनाची ताकद नजरेत भरते. थिएटरचा भास-आभास होतो. वातावरणनिर्मितीत भर पडते. इतर तांत्रिक बाजूही नाट्याला पूरक ठरतात.
विजय तेंडुलकर, चिं. त्र्यं. खानोलकर, वृंदावन दंडवते, सदानंद रेगे, सतीश आळेकर, महेश एलकुंचवार, शफायत खान, प्रशांत दळवी, मकरंद साठे, दिलीप चित्रे, अच्युत वझे अशा अनेक प्रायोगिक नाटकांच्या शिलेदारांनी आजवर एक दालन समृद्ध केले. नवा आकृतीबंध मांडला. त्यातल्या नव्याच्या नवलाईचे रसिकांनी स्वागतही केले. त्याच वाटेवरलं ‘पुण्याच्या टीम’ने सादर केलेले हे एक वैचारिक नाट्य.
परदेशातलं नाटक हिंदुस्थानात रुजविण्यासाठी ग्योथं इन्स्टिट्यूट माक्सम्युलर भवन यामागे उभी आहे. ‘अडलंय का?’ या नाट्याप्रमाणेच अजून एक नाटक ‘दि अनफेअर हायटाटेटेन’ हे जर्मन नाटक. ज्याचे मूळ लेखक एवाल्ड पाल्मेट् झोफर. त्याचा मराठी अनुवाद रेणुप्रसाद पत्की आणि रंगावृत्ती माया पंडित तर दिग्दर्शन आदित्य खेबुडकर यांनी केलंय. कोल्हापूरच्या ‘प्रत्यय’ या प्रायोगिक रंगभूमीने त्याचे सध्या अभिवचनाचे प्रयोगही सुरू केलेत. दुसर्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवरले तिघा स्त्रियांच्या जीवनावरले हे नाट्य. मराठीत ‘बिनलग्नाच्या’ या नावाने हा रंगखेळ रचलाय. मुद्दा हा की महाराष्ट्र असो वा जर्मनी रंगकर्मींचे काही प्रश्न समान आहेत. हेच अशा निर्मितीतून दिसते. जे आपल्या जवळपासचे वाटतात. आपण ते ‘रिलेट’ करतो.
मुंबई मराठी साहित्य संघानं पूर्वी प्रायोगिक नाटकासाठी ‘गुरुवार योजना’ सुरू केली होती. त्यावेळी कोणत्याही प्रायोगिक नाटकांना ‘साहित्य संघ’ नाट्यगृह हे मोफत उपलब्ध केले होते. तिथे अनेक प्रयोग झाले. प्रकाशयोजना, ध्वनीयंत्रणा सबकुछ फुकट! पण पुढे ही योजना बंद पडली. छबिलदासही एकेकाळी प्रायोगिक चळवळींचे माहेर घरच होते. या ना त्या कारणाने अशी नाट्यगृहे ‘प्रायोगिक’ साठीची बंद झाली. ही सत्यस्थिती आहे. याची आठवण या नाट्यातील थिएटरवर जिवापाड प्रेम करून ते जपण्याचा प्रयत्न करणार्या नायकाची ‘अवस्था’ आहे. जी सुन्न करते.
काही वर्षांपूर्वी मुंबईतल्या छबिलदास, पृथ्वी, भुलाभाई, वालचंद टेरेस, साहित्य संघ यांची ओळख ही प्रायोगिक नाटकांचं हक्काचं ‘थिएटर’ अशी होती. काळ बदलला. मिनी थिएटर आले. त्यातही ही चळवळ बहरली. विद्यापीठापर्यंत नाट्य हे एक शिक्षणाचा भाग बनले. नव्या संकल्पना त्यातून उदयाला आल्या. आता प्रायोगिक नाटके मुख्य नाट्यगृहाच्या रंगमंचावर पोहचली आहेत. त्यातून बुकिंगवरल्या अपयशाचा धोका पत्करून संवेदना व्यक्त करण्याचा विविध प्रकारे प्रयत्न होतोय. कोविडकाळातील सक्तीच्या मध्यंतरानंतर केवळ मनोरंजनासाठी मनोरंजन करणारा महापूर आला खरा, पण त्यातही वास्तवावर भाष्य करून काही निर्मितीतून रसिकांना ‘आरसा’ दाखविण्याचे मोलाचे काम होतेय. ‘अडलंय का…?’ यात ‘नाटक हे का महत्त्वाचे? कशासाठी? रंगमंचाचे अस्तित्व कसे काय जपणार?’ हाच विषय प्रामुख्याने नजरेत भरतो. जो रंगकर्मी, रसिक, प्रशासन यांच्या बदलत्या मनोवृत्तींचे तपासणीनाट्य म्हणून लक्षवेधी ठरतेय!
सेव्ह अवर थिएटर! शो मस्ट गो ऑन! हाच यामागला सतर्क करणारा संदेश.
अडलंय का…?
मूळ लेखक – चार्ल्स लेविन्सकी
भाषांतर – शौनक चांदोरकर
रंगावृत्ती – अतुल पेठे, पर्ण पेठे, निपुण धर्माधिकारी
दिग्दर्शन – निपुण धर्माधिकारी
नेपथ्य – प्रदीप मुळ्ये
संगीत – सौरभ भालेराव, नुपूरा निफाडकर
प्रकाश – सचिन लेले, विक्रांत ठकार
रंगभूषा – आशिष देशपांडे
निर्मिती सूत्रधार – समीर हंपी, सत्यजित दांडेकर
निर्मिती – नाटक कंपनी, पुणे