मंडळी, सदर लेखाचे शीर्षक वाचून तुमच्या भुवया उंचावल्या असतील. पण, तुम्ही हा लेख न वाचता पुढे जाल अशी शक्यता कमी आहे. कारण मूर्खांशी कसे वागावे हा तुमचाही प्रश्न असू शकतो. तुमच्या घरातली, कुटुंबातली, शेजार पाजारची एखादी व्यक्ती तुमच्याशी मूर्खपणे वागत असू शकते. जिथे जॉब करता तिथे एखाद्या मूर्ख माणसाशी संबंध येत असेल आणि त्याच्याशी कसं वागावं असा प्रश्न पडत असेल. घरात घराबाहेर तुम्हाला सारीच विचारी, शहाणीसुरती माणसं भेटतील असं होणं कठीण आहे.
आपण निनाद, मानस, अखिल, सुगंधा यांची उदाहरणे पाहू.
निनाद एका कंपनीत नोकरी करतो. निनादचा बॉस त्याच्यावर कामाचा खूप बोजा टाकतो. एक काम संपत नाही तो दुसरं काम सांगतो. निनादसोबत बॉसचं बोलणंवागणंही नीट नसतं. तो निनादला विनाकारण फायर करत राहतो. निनादला बॉसच्या या वागण्याचा खूप त्रास होत आहे. पण सध्या जॉब टिकवून ठेवणं आवश्यक असल्याने तो बॉसचं चुकीचं वागणं सहन करतो आहे. तडकाफडकी हा जॉब सोडणं त्याला परवडणार नाही, त्यामुळे बॉस इज अल्वेज राईट’ म्हणत काम करत राहिला आहे.
मानसचं लग्न होऊन काही वर्षे झाली आहेत. लग्नानंतर काही दिवस बरे गेले. पण लग्नानंतर मानस बायकोच्या खूप आहारी गेलाय, तिच्या ताटाखालचं मांजर झालाय, असं वाटून त्याची आई त्याला वाट्टेल ती बडबड करते. तिचं बोलणं ताळ-तंत्र आणि तारतम्य सोडून असतं. त्यातला चांगला भाग एवढाच की मानस एकटा असतानाच आई बडबड करते. सुनेसमोर ती बोलत नाही. मानस आईला खूप समजावतो. पण ती काहीच ऐकून घेत नाही. मानस तिला समजावून थकलाय. पण ती त्याची आई आहे. ती वाटेल ते बोलते म्हणून तो तिला वाटेल ते बोलू शकणार नाही. आईच्या या वागण्याचा स्वतःला कमी त्रास होईल याची मानस काळजी घेतो.
अखिल हा तरुण स्नेहाच्या प्रेमात होता. त्याने तिला प्रपोज केलं. तिने त्याला स्पष्ट नकार दिला. पण अखिल तिचं मन वळवण्यासाठी प्रयत्न करत राहिला. तिला भेटत राहिला. मैत्रीचं रूपांतर प्रेमात होईल अशी आशा बाळगत राहिला. पण स्नेहाच्या जोडीदाराच्या कल्पनांमध्ये अखिल कुठेच बसत नव्हता. तिला मोठ्या पगाराचा, उच्चशिक्षित, उच्चपदावर असलेला नवरा हवा होता. तरीही स्नेहा आपली लाईफ पार्टनर होऊ शकत नाही हे सत्य स्वीकारायला अखिलच्या जीवनातला खूप काळ गेला. अखिल स्नेहाच्या प्रेमात सहा सात वर्षं होता. आता अखिल स्वतःशी विचार करतो की स्नेहाने सगळं स्पष्ट केलं होतं तरी आपण तिच्या मागे इतकी वर्षे का वाया घालवली? एरवी मित्रांना सल्ला देणारे आपण इतके दिवस स्नेहाच्या एकतर्फी प्रेमात मश्गुल राहण्याचा मूर्खपणा कसा करून बसलो?
घरेलू कामगार सुगंधा खूप मेहनती आहे. अनेक घरची कामं करून ती स्वतःचं घर चालवते आहे. मुलाबाळांचे शिक्षण करते आहे.ती राबराब राबते. पण नवरा काही कामधंदा करत नाही. तो खूप संशयी आहे. तो सतत तिला घाणेरडे बोलून मानसिक त्रास देत राहतो. मारहाणही करतो. त्याच्या या वागण्याचा सुगंधाला आणि मुलांना खूप त्रास होतो. मुलांच्या शिक्षणावरही परिणाम होतो म्हणून आता सुगंधाने मुलांना घेऊन नवर्यापासून वेगळं राहायचं ठरवलं आहे.
वरील उदाहरणात निनादला बॉसच्या आणि मानसला आईच्या वागण्याला सामोरं जावं लागतं आहे. अखिलला स्नेहाच्या प्रेमात अनेक वर्ष राहिल्याबद्दल स्वत:च्या मूर्खपणाची जाणीव झाली आहे. तर सुगंधाने मूर्ख माणसासोबत राहायचे नाही असं ठरवलं आहे. आपल्याकडे मूर्खाची पाच लक्षणं सांगितली गेली आहेत.
मूर्खस्य पञ्च चिह्नानि गर्वो दुर्वचनं मुखे।
हठी चैव विषादी च परोक्तं नैव मन्यते…
१) मूर्ख माणसाला स्वतःबदल वृथा गर्व असतो. मूर्ख माणूस खूप अहंकारी असतो.
२) मूर्खाच्या तोंडी सतत अपशब्द येतात.
३) मूर्ख माणसं खूप हट्टी असतात.
४) मूर्ख माणसं कुणाचं काही ऐकून घेत नाहीत.
५) मूर्ख माणसाच्या चेहर्यावर नेहमी विषाद असतो.
या लक्षणांत तथ्य आहे. मूर्ख माणसं कुणाचं ऐकूनच घेत नाहीत. आपलंच खरं करतात. आपलं काही चुकत असेल, आपणही चुकीचं वागत असू असं त्यांना सहसा वाटत नाही. चुकतं ते इतरांचंच असं त्यांचं मत असतं. या माणसांना चटकन राग येतो अन् ती तो विनाविलंब व्यक्तही करतात. ही माणसं संयम बाळगत नाहीत. सगळे आपल्या विरोधात आहेत. सगळे आपल्याला मुद्दाम त्रास देतात. आपल्यावर सतत अन्याय होतोय असं त्यांना वाटत असतं.
आता सांगा, वरील लक्षण असलेली माणसं तुमच्या घरात, कुटुंबात, नातेवाईकांत, मित्र परिवारात नाहीत असं तुम्ही म्हणू शकता का? नाही ना? किंबहुना तुम्हाला असंही जाणवलं असेल की यातली काही लक्षणं खुद्द तुमच्या स्वतःमध्येही आहेत. माफ करा. तुम्हाला राग येऊ शकतो. अन् का नाही येणार? पण मंडळी, तुमच्या-माझ्यामध्येही मूर्खाची काही लक्षण असू शकतात ना? लोक मूर्ख अन् आपण तेवढे शहाणे असं कसं होईल? हं, मूर्खपणा कमी जास्त असू शकेल, पण अजिबातच नाही असं कसं असेल?
मूर्खपणा करणार्यांमध्येही वेगवेगळ्या क्वालिटीज असतीलच की. थोडा मूर्खपणा करणारे, खूप मूर्खपणा करणारे, सतत मूर्खपणा करणारे, प्रासंगिक मूर्खपणा करणारे, असे वेगवेगळे प्रकारही असू शकतात. आपण कमी मूर्खपणा करणारे किंवा क्वचित मूर्खपणा करणारे आहोत, एवढं मान्य करायला काय हरकत आहे? क्षणभर मान्य करू की आहेत बुवा काही लोक जवळ जवळ शहाणे. नसतील करत ते कधीच थोडाही मूर्खपणा. पण त्यांचा मूर्खाशी संबंध तर येत असणारच ना? मग त्या मूर्खांशी कसे वागावे हे पहायला काय हरकत आहे?
मंडळी, सर्वप्रथम एक दुरुस्ती करूया. मूर्ख माणसाला मूर्ख न म्हणता ‘मूर्खपणा करणारे’ म्हणू या. लेखाला ‘मूर्ख माणसाशी कसे वागावे’ हे शीर्षक दिलं आहे ते शीर्षक आपण ‘मूर्खपणा करणार्या लोकांशी कसे वागावे’ असं वाचू या. तर—
१) मूर्खपणा करणार्याला मूर्ख हे लेबल लावून टाकू नये.
२) मूर्खपणा करणार्याला समजून घ्यावे.
३) मूर्खपणा करणार्याशी अत्यंत हुशारीने वागावे. बोलावे. त्याला समजावताना त्याला रुचेल पचेल, अशा प्रकारे समजवावे. अनावश्यक घाई करू नये. योग्य वेळ, प्रसंग पाहून समजवावे. ती व्यक्ती अशी का वागत आहे याचाही विचार करायला हवा. तिचीही बाजू समजून घ्यावी.
४) मूर्खपणे वागण्याचा त्या व्यक्तीलाही मानसिक, शारीरिक त्रास होत असतो. आपण चुकीचं वागत बोलत आहोत. स्वतः स्वतःला त्रास करून घेत आहोत हे तिच्या लक्षात येत नसतं. त्यामुळे अशा व्यक्तीबद्दल मनात राग, चीड, संताप न बाळगता तिच्याबद्दल विचार करावा.
५) अशा व्यक्तीशी शांतपणे बोलून, समजावूनही काही उपयोग होत नसेल, आपल्या डोक्याला ताप होत असेल, तर अशा माणसाशी सबंध न ठेवणं हा उपाय असू शकतो. पण प्रत्येक नात्यात हे सहज शक्य होत नाही. निदान तिच्या वागण्याचा आपल्याला त्रास होणार नाही याची काळजी घ्यायला हवी.
६) या माणसांनी बदलावं, सुधारावं यासाठी प्रयत्न जरूर करावे. पण त्या व्यक्तीने बदललंच पाहिजे. सुधारलंच पाहिजे असा दुराग्रह धरू नये. याचा अर्थ त्या व्यक्तीचे वाट्टेल ते सहन करावे, असा नाही.
७) ही माणसं चुकीची वागतात म्हणून त्यांना धडा शिकवण्याचा, इंगा दाखवण्याचा दृष्टिकोन बाळगू नये.
८) आपण त्यांना चांगल्या भावनेने समजावतो आहोत हे त्यांच्यापर्यंत नीट पोहचायला हवे.
मंडळी, आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की प्रत्येक व्यक्ती कधी न कधी मूर्खपणा करत असते. अनेक मोठमोठे जाणकार, मुरब्बी राजकारणी देखील अशोभनीय वागताना, बोलताना पाहिलं, ऐकलं, वाचलं आहे. अनेक क्षेत्रांतील नामवंत देखील काहीतरी चुकीचं बोलून वागून जातात.
अमेरिकेतील थोर मानसशास्त्रज्ञ डॉ. अल्बर्ट एलिस यांनी शेकडो माणसांचा सखोल अभ्यास करून अशी मांडणी केली आहे की ‘मूर्खासारखं वागण्याचं बीज सर्व माणसांमध्ये असते’. एलिस म्हणतात, एरवी विवेकी आणि विचारीपणे वागणारी माणसे देखील कधी कधी मूर्खासारखी वागतात. ही वृती, प्रवृत्ती माणसात नैसर्गिकच असते. ते म्हणतात, ‘जगातील सर्वच माणसं कधी न कधी मूर्खासारखी वागतात. एकदाच नव्हे तर अनेकदा, पुन्हा पुन्हा मूर्खासारखं वागतात. ज्ञानी आणि बुद्धिमान माणसं देखील कधी न कधी मूर्खासारखं वागतात. मूर्खासारखे वागणे हा माणसाचा जैविक वारसा आहे. तेही नैसर्गिक आहे.आपण नेहमीच शहाण्यासारखं वागलं पाहिजे, आपल्याकडून कधीच मूर्खपणा होताच कामा नये असा दुराग्रह करणे अविवेकीपणाचे आहे.
तेव्हा मंडळी, तुमच्याकडूनही अधूनमधून मूर्खासारखं वागणं झालं असेल, होत असेल तर त्याचं फार टेन्शन घेऊ नका. सिर्फ हमसे नहीं. बडे बडे लोगों से भी छोटे मोठे मूर्खपणा होते रहते हैं…