कोकणात काजू बोंड, काजू बोंडूला जांब असेही म्हणतात. यालाच विलायती-आंबा आणि काजू-सफरचंद असेही संबोधले जाते. कॅशू अॅपल हा इंग्रजी शब्द तर वनस्पती-शेती-फळ संशोधन प्रबंधात ही सर्रास वापरला जातो. जांब किंवा बोंडू हे वनस्पती शास्त्राप्रमाणे नक्की काय आहे? काजूचे वैशिष्ट्य सांगताना फळाच्या बाहेर असलेली बी म्हणजे काजू असेही बोलले जायचे. बोंडूला फळ समजून तसे बोलले जात होते. बी तर फळाच्या आत असते, चिकू (बी) आंबा (कोय), फणस (आठीळ) भोपळा, कलिंगड, काकडी, चिबूड या फळांच्या आतच बिया असतात! बोंडू कापला तर बी कुठेच आढळत नाही! कारण बोंडू हे फळच नाही तर त्यात बी कुठून येणार? काजू बोंडूला सामान्य तसेच तज्ज्ञ माणसांनी आंबा, सफरचंद या श्रीमंत फळांच्या पंगतीत बसविले. काजूफळ तयार होत असताना वरच्या बोंडूला आंबा सफरचंदाप्रमाणे लाल पिवळा केशरी नारिंगी रंग प्राप्त होत जातो. अत्यंत आकर्षक रंगीत रसरशीत दिसणारे, घंटेच्या आकाराचे काजू बोंडू हे फळ नसून चक्क ‘देठ’ आहे! आज या देठाचे माहात्म्य इतके वाढत आहे की महाराष्ट्र सरकारच्या अर्थसंकल्पीय भाषणात त्याला स्थान प्राप्त झाले. कोकणात फळप्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी १३७० कोटी रुपयांची कागदावर तरतूद झाली आहे. बोंडू उत्पादक मालकाच्या नशिबात किती रक्कम येणार?
काजूचा भारतात प्रवेश
वाश्कु द गामा (वास्को) हा पोर्तुगीज व्यापारी क्रूर, लढवय्या लुटारु (चाचा) होता. १४९८ला तो केरळच्या किनार्यावर प्रथम आला. नंतर तो गोव्यातही पोहोचला. पुढे पोर्तुगीजांनी मुस्लीम राज्यकर्त्यांचा पराभव करुन गोवा जिंकला. पोर्तुगिजांनी ४५० वर्षे गोव्यावर राज्य केले, तसेच त्यांनी ब्राझीलमधेही सत्ता प्रस्थापित केली होती. तर मुद्दा असा की, काजू हे मूळचे ब्राझीलचे फळझाड आहे. पोर्तुगिजांनी ते भारतात प्रथम आणले. कुणा पोर्तुगिजाने सुमारे १५६०च्या दरम्यान केरळ किंवा गोव्यात हे प्रथम लावले. भारत हे आशिया खंडातील काजूचे माहेरघर. भारतातूनच काजू आशिया खंडात तसेच आफ्रिकेत गेला. भारताच्या उष्णकटिबंधीय किनारपट्टीनजीकच्या हवामानात काजू ब्राझीलप्रमाणेच चांगले रुजले. ओली उष्ण दमट खारी हवा काजूला चांगलीच मानवली. भारतातल्या आसाम, ओडिशा छत्तीसगड, आंध्र, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, महाराष्ट्रात हे नगदी बागायती पीक म्हणून महत्वाचे ठरत आहे. बंगाल गुजरात, त्रिपुरा मेघालय, नागालँड या राज्यांतील काही भागात काजू लागवड होते. जिथे चांगला पाऊस, पण पाणी न साचणारी जमीन, अतिउष्ण, अतिथंड हवामान नाही, म्हणजे ४० अंश सेल्सिअसच्या वर आणि ९ अंश सेल्सिअस खाली तापमान जात नाही, अशा भूभागात काजूचे चांगले उत्पन्न मिळते. जिथे उष्माघात सहसा होत नाही, थंडीने हाडे वाजत नाहीत, दवबिंदू गोठत नाहीत, बाष्पीभवनामुळे उडून जाणार्या पाण्यापेक्षा पावसाचे पाणी जास्त मिळते, अशा मुंबईसह कोकण किनारपट्टीत (सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर) या पिकाला अत्यंत पोषक हवामान आहे. वर्षाचा बराच काळ २०-३०-३५ अंश सेल्सिअस दरम्यान तापमान असते, म्हणून काजूचे पीक तुलनेने कोकणात उत्तम येते (मुंबईतही काजूपाडा हा एक भाग आहे.) कोकणातली खारी हवा घाटावर चक्कर मारायला अधूनमधून जाते. कोल्हापूरचा चंदगड तालुका हे त्याचेच प्रमाण. चुकून माकून सांगली-पुण्यातही कोकणातला काजू सोयरीक जमवायला जातो. पण गणपती आणि पार्वतीला दुरूनच दंडवत घालून माघारी फिरतो. मराठवाडा, विदर्भात तर काजू स्वप्नातही जात नाही. खार्या वार्याशिवाय त्याचा जीव रमत नाही. कांदा, कापसाचा, ज्वारी, सोया आणि चण्या-गव्हाचा त्याला मोह नाही. मुख्यत: काजू म्हणजे कोकण एके कोकण. हापूस आंबो दृष्टीक पडत नाय थय जावचाच नाय!
जागतिक विचार केला तर आप्रिâकेत आयव्हरी कोस्ट, टांझानिया, दक्षिण अमेरिकेत अर्थातच ब्राझील, आशियात विएतनाम, इंडोनेशिया आणि भारत अशा एकूण ३०-३५ देशांत काजूची व्यापारी लागवड केली जाते. काजूगर सुकामेवा म्हणून खाणारे लोक जगभर आहेत. काजूची वाईनही अनेक देशांत पेय म्हणून लोकप्रिय आहे. गोव्यात सरकार कुणाचेही असले तरी काजूबोंडूपासून बनलेले अल्कोहॉलिक पेय ‘फेणी’ हा संस्कृतीचा भाग आहे. या पार्श्वभूमीवर कोकणातील बोंडू या रसाळ देठाचा विचार करु या.
मद्य की वाईन?
विदर्भात गडचिरोली नावाचा प्रसिद्ध जिल्हा आहे. आदिवासीबहुल, वनाने भरगच्च, नक्षलग्रस्त, तेलंगणा आणि छत्तीसगड या राज्यांच्या सीमेवरचा हा जिल्हा आहे. या जिल्ह्यात निसर्गदत्त अशी मोहाची झाडे आहेत. त्याच्या फुलांपासून मद्यनिर्मिती होते. या फुलांच्या अन्नघटकांचा विचार केल्यास ती सकस आहारात अंतर्भूत व्हायला हवीत. आदिवासी कुटुंबे ही फुले गोळा करतात. किरकोळीत जमा होत होत शेवटी ठेकेदाराकडे अल्प किमतीत विकली जातात. बडे ठेकेदार ती फुले मद्यनिर्मिती कारखान्यास विकतात. आदिवासी कुटुंबांना किलोला दोन चार रुपयेही मिळत नाहीत. बडा ठेकेदार किलोला ४० रूपयांप्रमाणे त्याची विक्री करतो.
नीरज हातेकर हे विकास अर्थशास्त्राचे प्राध्यापक-संशोधक, मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाचे माजी प्रमुख आहेत. त्यांनी सरकारदरबारी खेटे घालून मोहपुâले वेचणार्या आदिवासींना उत्तम किंमत मिळावी म्हणून खटपट केली. त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. केंद्र सरकारला अबकारी कर मिळतो म्हणून अनेक कायदेशीर बाबी आड आल्या. सर्व प्रशासकीय यंत्रणा, कायदे हे बडे व्यापारी आणि मद्यनिर्मिती करणार्यांच्या फायद्याची. एक लक्ष टन मोहाची फुले योग्य किंमतीत आदिवासींकडून विकत घेतली गेली तर गडचिरोलीच्या आदिवासींचे कल्याण होईल असे प्रा. नीरज हातेकरांचे मत आहे.
हा अनुभव सांगितला कोकणात त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे म्हणून. कोकणातील बोंंडूकडे वळताना गडचिरोलीच्या अनुभवाकडे दुर्लक्ष करता येत नाही. कोकणात बोंडूचे उत्पादन १०-१२ लक्ष टन आहे. (परिपक्व सात किलो बोंडू असतील तर सुमारे एक किलो काजू बी असे प्रमाण पडते) शंभर किलो बोंडूपासून ४०-४५ किलो रस निघतो (किलो आणि लीटर सारखेच धरुया). अशा ताज्या रसात साखर वेलची घालून पेय तयार केले तर सिरप मिळेल, तेही अनेकांना आवडेल (जैविक शेती समर्थकांना नैसर्गिक पेय मिळेल). दुसरा पर्याय जो सरकारच्या मनात असणार तो या रसाची वाईन करण्याचा. शंभर किलो बोंडूपासून ४०-४५ लिटर रस मिळतो. यात यीस्ट घातले की तो रस आंबून जाईल (फर्मेंटेशन), यातून २८ लीटर वाईन तयार होईल. ४०-४५ लीटर रसापासून २८ लीटर वाईन मिळते. मग उडाले काय? तर वायू. आता ही फेणी नव्हे. ही वाईन सौम्य अल्कोहॉलिक पेय होय. शेतकरी जीवनात दवादारू असा शब्दप्रयोग आहे. योग्य प्रमाणात दारु ही दवा म्हणजे औषधच आहे, हा त्यातला विचार. दिवसातून एकदा थोडी दारु पिणारा सुदृढ राहतो. तीन वेळा घेणारा म्हणजे झिंगणारा बाद होतो, हा समज राजमान्यच आहे. काबाडकष्ट आणि दुर्गंधीत काम करणारे आणि उच्चभ्रूही दारू पितात. म्हणूनच दारुची अधिकृत दुकाने देशभर उघडली जातात. सरकारला तो महसूल अनैतिक वाटत नाही.
देशात कोरोनाकाळात सर्वाधिक वेगाने विकास झाला तो मद्य व्यवसायाचा. अत्यंत महागड्या भारतीय व्हिस्कीला परदेशातून सध्या प्रचंड मागणी आहे. ऊस पिकविणार्या शेतकरी कुटुंबात गुर्हाळाचे वेळी दारु तयार करण्याची प्रथा होती. आजही असेल (मळीचा उपयोग). सणासुदीला पै पाहुण्यांचा आदरसत्कार करताना या दारुचा वापर मोठी पुरुषमंडळी करीत असत. मुद्दा हा की दारुमुळे संसार उद्ध्वस्त होतात म्हणून काही स्त्रिया आणि गावातील सदस्य अधिकृत दारु दुकाने बंद करावीत यावर मतदानाची मागणी करतात. बहुमताचा निर्णय दारु दुकानदाराला मानावा लागतो. असे बहुमत करुन दारु दुकाने बंद झाली अशी गावे किती? नगण्यच. हातभट्टी अनधिकृतच असते. कोकणातली काजू बोंडे (१०-१२ लक्ष टन) काजू झाडांचे मालक झाडाच्या बुंध्यात फेकून देतात, गुरांना घालतात, किंवा जवळपासच्या दवादारुच्या गृहकुटीर उद्योगाला टोपलीभर किंवा डबाभर बोंडू ठराविक रकमेला विकतात. गोव्यापासून काजूबोंडे जितकी जवळ उपलब्ध तितका भाव अधिक.
महाराष्ट्र सरकार जो नवीन फळप्रक्रिया उद्योग सुरु करणार म्हणते, त्याचा आराखडा अजून जाहीर झालेला नाही. या घटकेला उपलब्ध माहितीप्रमाणे संपूर्ण कोकणात काजूलागवड क्षेत्र १.९१ लक्ष हेक्टर आहे (आंब्याची लागवड १.८६ लक्ष हेक्टर. म्हणजे काजूपेक्षा कमी आहे). १९९० ते २०१४ या २४ वर्षांत लागवडक्षेत्र २२,००० हेक्टरवरुन १,८४,००० हेक्टर झाले. गेल्या आठ वर्षांत लागवड जेमतेम ७००० हेक्टरने वाढली. वाढीचा वेग खूप मंदावला आहे. कोकणात कोकणच्या राजाच्या म्हणजे हापूस आंब्यापेक्षा अधिक क्षेत्र काजूने व्यापले आहे. काजूफळ बागायतीचे दर हेक्टरी उत्पन्न आजच्यापेक्षा किमान अडीच पट वाढणे सहज शक्य आहे. आज काजूबीचे एका झाडापासून मिळणारे सरासरी उत्पन्न सात आठ किलो आहे. योग्य निगा, खतांचा वापर, रोग, कीडनियंत्रण झाले तर हे उत्पन्न सहज अडीच पट वाढवणे शक्य आहे. हे गणित आजच्या उपलब्ध लागवडीवर आधारलेल्या उत्पन्नाचे आहे. हे लागवड क्षेत्र दुप्पट करणे शक्य आहे, कारण तितकीच जमीन लागवडीयोग्य असूनही पडीक आहे. याचा अर्थ असा की लागवड वाढ आणि उत्पादनवाढ दोन्ही गृहीत धरता एकूण वाढ पाचपट करता येईल. म्हणजे बोंडूच्या आजच्या दहालक्ष टनावरून उत्पन्न ५०-६० लक्ष टनावर जाऊ शकते.
या आज दुर्लक्षित असलेल्या बोंडूचा उत्पादकाला किमान भाव किती मिळावा यावर कोकणवासीयांनी एकमत करायला हवे. यासाठी नवीन कल्पक अशी फळबाग योजना आखावी लागेल. बोंडूचे सरबत, किंवा वाईन आणि रस काढल्यावर उरलेल्या (चोथा) खाद्यपदार्थापासून कँडीही (आवळा कँडीसारखे) करता येईल. याचा अभ्यास-संशोधन दापोली कृषी विद्यापीठात उपलब्ध आहे. अभाव आहे तो कृतिशील सक्षम अंमलबजावणीचा. ओल्या काजूगराचाही उल्लेख करणे गरजेचे आहे. खेड्यातील शेतकरी स्त्रिया काटकीच्या सहाय्याने ओल्या काजूचे पोट फाडून अखंड बी बाहेर काढण्याचे बाळंतपण करण्यात पटाईत होत्या. आता ही शस्त्रक्रिया यंत्र करू लागले आहे. महत्वाचा मुद्दा हा की हे अखंड काजूगर कोकणातच रू. ८०० ते १४०० प्रति किलो विकले जातात. कोकणावरचा ‘दारिद्र्य’ हा कलंक पुसला गेल्याचे हे द्योतक आहे. ओला काजूगर सुकामेव्याच्या दराने जिल्ह्यातच विकला जात आहे! आकडेवारीत अज्ञात राक्षस दडलेला असतो तो असा.
कोकणातील हापूस आंबा फळांचा राजा असेल तर काजू राणी आहे. दोन्ही झाडे सदाहरित. या घटकेला राणीने अधिक क्षेत्र व्यापले आहे. योग्य नियोजन केल्यास आंबा आणि काजू कोकणातील उरलीसुरली गरिबी दूर करील. बोंडूला फलोद्यानातून हंगामी रोजगार मिळतो. आंबा काजू या फलोत्पादनाच्या जोडीला जैतापूर, रिफायनरीसारखे रखडलेले प्रायोजित मोठे प्रकल्प त्वरित सुरु होऊन कायमचा उत्तम पगाराचा रोजगार मिळाला तर सिंधुदुर्ग-रत्नागिरीची घटणारी लोकसंख्या वाढू लागेल, तरुणांचे स्थलांतरही रोखले जाऊ शकेल. असे झाले तर (मुंबई शहर -उपनगर वगळूनही) महाराष्ट्रातील कोकणपट्टी सर्व विभागात आघाडीवर राहील.
मो. ९८२००७१९७५