तुमचा मूड डाऊन असेल, तेव्हा तो ताळ्यावर आणण्यासाठी तुम्ही काय करता? वाचत असाल तर काय वाचता?
– पूनम सराफ, वडगाव शेरी
अंगावर आलं की शिंगावर घ्यायला शिका… मूड बीड काही लागत नाही त्याला… (वाघ किंवा एखादी तरुणी अंगावर आली तर काय मूड नाही म्हणणार की वाचत बसणार?)
शिक्षण ही यशाची गुरुकिल्ली आहे, यावर सगळा कारभार अडाण्यांच्या हातात असलेल्या देशात विश्वास कसा ठेवायचा?
– मनोहर पत्की, नागपूर
खोटं बोलणं हीच यशाची गुरुकिल्ली आहे, एवढं जरी शिकलात तरी आज जे तुम्हाला अडाणी वाटतायत ते विश्वगुरू आहेत, यावर तुमचा विश्वास बसेल.
माझा नवरा एरवी स्वत:साठी पाणी आणायलाही उठत नाही, पण बेडरूममध्ये चुकून राहिलेला त्याचा मोबाईल वाजला की हरणाच्या चपळाईने आत धावतो… ही चपळाई कुठून येते?
– अमिता पाध्ये, दादर
घार हरणावर झडप घालते तशी तुम्ही नवर्याच्या मोबाईलवर झडप घालत असणार… त्यामुळे तुमच्या ह्यांना हरणाच्या चपळाईने धावावं लागत असणार… (हरीण तावडीत सापडल्यानंतर घार हरणाला चोचा मारुन कशी फाडते ते नवर्याने बघितलं असणार.)
डाएट, व्यायाम वगैरे करून जे आयुष्य वाढेल, ते तर थकलेल्या म्हातारपणातच खर्च होणार आहे. मग एवढे कष्ट घ्या कशाला?
– राहुल नरसे, नंदूरबार
राहुलजी, अहो जे तरूणपणी जमलं नाही ते म्हातारपणी जमलं तर जमलं असा आशावाद असतो त्यामागे.. तरूणपणी सारं करून सवरून म्हातारपणी देवपूजेला लागलेल्यांना नाही कळणार म्हातारपणातल्या फिटनेसची मजा!
तुम्ही पदवीधर आहात का? असलात तर तुमची डिग्री तुम्ही लपवून ठेवाल की जो मागेल त्याला न घाबरता दाखवाल?
– विनायक पांचाळ, हातखंबा
मी त्याला माझं नाटक दाखवेन आणि वर्तमान साक्षी आहे, नाटकं बघून लोक पदवीच काय, काहीही विचारायला विसरतात.
मुंबईत टाटा आणि अदानीने भाववाढ केली आहे. वीज वाचवण्यासाठी तुम्ही काय काय उपाय करणार?
– फैजल शेख, गोवंडी
आपल्याला वीज नाही वाचवायचीय, आपल्या कमाईचे पैसे वाचवायचेत.
देशाचे सर्वोच्च पदावरचे नेते शिक्षित असावेत, असे अरविंद केजरीवाल यांचे मत आहे… तुमचे काय मत आहे?
– प्रदीप जोशी, डहाणू
सुशिक्षित असावेत आणि त्यांचे मित्र अडाणी नसावेत.
आता वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष पण भारतीय वंशाचे होणार आहेत… आपल्या खात्यांमध्ये १५ लाख रुपये जमा झाल्याचा मेसेज लवकरच वाजणार की काय?
– मायरा फर्नांडीस, सांताक्रूझ
कसले १५ लाख घेऊन बसलात… वर्ल्ड बँकेचा अध्यक्ष भारतीय वंशाचा होणार याचा आता उत्सव साजरा होईल. त्यावर १५ लाख खर्च झालेच म्हणून समजा.. देशप्रेमी असाल तर गप्प बसाल.
सगळ्या सणांना कर्णकर्कश्श डीजे लावून मिरवणुका काढल्याने काय धर्माची थोरवी सिद्ध होते का?
– जगदीश कापसे, बेलापूर
ठेकेदारी तर सिद्ध होते.
पुण्यात हेल्मेटविषयक जागृती करण्यासाठी पोलिसांनी कुत्र्याला हेल्मेट घालून फिरवले… आता पुणेकर खरंच हेल्मेट घालू लागतील काय?
– सोपान साळवे, सोलापूर
पोलिसांना कुत्रंही विचारत नाही, असं आता कोणीही बोलू शकत नाही. ही आयडिया तुम्हाला कळली नाही. पुणे पोलीस आहेत ते… आयडियांची कमी नाही.
तुम्ही महाराष्ट्रभर फिरता नाटकांच्या दौर्यांच्या निमित्ताने. तुमच्या मते पहिल्या तीन क्रमांकाचे वडापाव कोणते?
– भाऊ खंदारे, सीताबर्डी
१ नंबर.. बायकोच्या हातचा (नाहीतर बाहेरच्या वडापाव वर पोट भरावं लागायचं.)
२ नंबर.. आईच्या हातचा (बायकोचा बैल आहे हे ऐकावं लागेल.. पण घरचं जेवण तरी मिळेल.)
३ नंबर.. जो वडापाव खाल्ल्यावर कोणालाही ऐकू येणार नाही असा कोणताही वडापाव.
एक एप्रिलला मूर्ख दिन असतो, आपल्याकडे राष्ट्रीय सण म्हणून या दिवशी सार्वजनिक सुटी का देत नाहीत?
– पूर्वा बोकील, कोथरूड, पुणे
आधी मला सांगा एक एप्रिलला राष्ट्रीय सण का म्हणायचं? माझ्या खांद्यावर बंदूक नका ठेवू ताई. समजा मी म्हटलंच सुटी द्यायला हवी, तर मला सुटी नाही मिळायची. उगाच ईडी, सीबीआयवाले कामाला लागायचे आणि मी धंद्याला लागायचो.