आपल्या पूर्वेकडे असलेल्या देशांमधला कंबोडिया बहुतेक लोकांच्या प्रवासाच्या यादीत खूप खाली असतो. त्या बाबतीत सिंगापूर, मलेशिया, थायलंड यांचा क्रम बराच वर लागतो. कदाचित त्या त्या देशांची पर्यटक खेचून घेण्याची यंत्रणा अधिक मजबूत असावी. पण आम्ही कंबोडिया पाहिला. हा देश पाहणारे बहुतेक पर्यटक तो व्हिएतनामला जोडून करतात. कारण हे दोन्ही एकमेकांचे शेजारी आहेत. तसेच पॅकेजही मिळते. इथलं सर्वात प्रसिद्ध आणि सर्वात भेट दिलं जाणारं शहर म्हणजे सीएम रेप. खरं तर त्याचं स्पेलिंग ‘Siam Reap’ असं आहे. पण स्थानिक लोक इंग्रजी अक्षरांच्या नेमेकेपणाला तितकासा भाव देत नाहीत. Siam चा सीम आणि सीएम यांच्या मधला कुठला तरी उच्चार ते करतात.
या देशात जाण्यासाठी फारशी तयारी करावी लागत नाही. तिथं ‘व्हिसा ऑन अरायव्हल’ आहे, शिवाय ई-व्हिसा देखील मिळतो. ऑनलाईन नोंदणी केलीत की साधारण तीनेक दिवसात तुमच्या ईमेलवर व्हिसा येतो. तुम्ही त्याची रंगीत प्रिंट काढलीत की तुमचा व्हिसा झाला. अर्थात प्रिंट काढण्यापूर्वी व्हिसावरचे सर्व तपशील नीट आहेत की नाहीत, याची खात्री करून घेणं चांगलं पडतं. समजा काही चुकलं असेल तरी घाबरून जाण्याचं कारण नाही. त्यांना ईमेल केल्यावर चुका सहजपणे दुरुस्त करून दिल्या जातात. आमच्या बाबतीत चक्क पासपोर्ट नंबर चुकला होता, पण त्यांना ईमेल केल्यावर दोन दिवसात नवीन योग्य व्हिसा त्यांनी पाठवला.
कंबोडियाला भारतातून, किमान मुंबईतून तरी थेट विमानसेवा उपलब्ध नाही. असली तरी आम्हाला त्याची कल्पना नाही. थायलंड, मलेशिया, व्हिएतनाम अशा जवळपासच्या देशांतून तिथं जावं लागतं. आम्ही थायलंड मार्गे गेलो. प्रथम विमानतळावरच आम्ही तिथलं चलन घ्यायचं ठरवलं. एक्स्चेंज काउंटरला गेलो, तेव्हा अचानक खूप श्रीमंत झाल्याचा भास झाला. भारताच्या तुलनेत तिथलं चलन चांगलंच स्वस्त आहे. अर्थात अजून तरी आपण थेट भारतीय चलन बदलून घेऊ शकत नाही. त्यासाठी डॉलर्सच वापरावे लागतात. एका डॉलरला चक्क ४००० कंबोडियन रियाल मिळाल्यावर श्रीमंतीचा भास होणं साहजिकच होतं. पण शेवटी हा भासच ठरला. कारण तिथं सगळं हजारांच्या हिशेबानं चालतं. ४००० रियालमध्ये तुम्हाला साधी पाण्याची बाटली देखील मिळत नाही. शिवाय स्थानिक चलन बदलून घेण्याची नंतर फारशी गरजही उरली नाही. तिथं सगळे व्यवहार अमेरिकन डॉलर्समध्ये चालतात. अगदी साध्या दुकानात गेलात तरी दुकानदार डॉलर्स घेतो. सुटे पैसे मात्र अनेकदा कंबोडियन रियालमध्ये दिले जातात. सुदैवानं विमानतळासकट संपूर्ण देशात एकच विनिमयदर चालतो. अर्थात, काही दुकानात, फारच थोड्या ठिकाणी, अल्प फरक असतो नाही असं नाही.
त्यांनी आम्हाला टुकटुक पाठवली होती. टुकटुक म्हणजे इथली रिक्षा. सीएम रेपच्या बहुतेक रिक्षा मोटार सायकलला चार चाकी गाडा जोडून बनवलेल्या, म्हणजे सहा चाकी, आहेत. त्यातली आसनव्यवस्था मात्र छान असते. काश्मीरच्या ‘शिकारा’सारखी चांगली सजवलेली, झूल बिल लावलेली, मस्त हवेशीर असते. आम्ही त्यातूनच सगळा प्रवास केला. अर्थात आपल्या बजाजच्या रेअर इंजिन रिक्षाही कंबोडियात आहेत. त्यांचं प्रमाण ‘न्होम पेन्ह’ या राजधानीच्या शहरात अधिक आहे. सुदैवानं टुकटुकवाल्यांना तुटकं फुटकं का होईना इंग्रजी येतं. शेवटी काय अल्पसा का होईना संवाद झाला म्हणजे झालं.
‘सीएम रेप’चा विमानतळ अगदीच छोटा आहे. पण एकदा का तुम्ही रस्त्यावर प्रवास करायला सुरुवात केलीत की तिथले विस्तीर्ण रस्ते आणि रस्त्यावरची कमालीची स्वच्छता तुमचं मन हिरावून घेते. आम्ही ज्या हॉटेलमध्ये उतरलो होतो, त्या हॉटेलनं आमच्यासाठी हॉटेलपर्यंत प्रवासाची सोय केली होती. पण टॅक्सीच्या ऐवजी टुकटुक आली. इथं अमेरिकेसारखं लेफ्ट हॅन्ड ड्राईव्ह आहे. वाहनं रस्त्याच्या उजव्या बाजूनं चालतात. वाहतूक शिस्तबद्ध असते. आपल्यासारखा उगीचच मध्ये घुसायचा, नियम मोडायचा अट्टाहास नाही. त्यामुळं तुम्ही वाहतूक कोंडीत अडकत नाही. सुरळीत, सुरक्षित, वेळेत पोचता. शिस्तीमुळं वाहनांना पोचे वगैरे दिसत नाहीत.
हॉटेलकडे जात असताना रस्त्यात अनेक टपरीवजा दुकानं लागली. सहज आमचं लक्ष लोखंडी स्टॅण्डवर ठेवलेल्या बाटल्यांकडे गेलं. जुन्या रिकाम्या झालेल्या पेप्सी, कोका कोलाच्या बाटल्यांमध्ये काहीतरी भरून ठेवलं होतं. आम्हाला प्रथम वाटलं ती दारू असावी. आम्ही टुकटुक चालवणार्याला विचारलं ‘हे काय आहे?’ त्यानं सांगितलं ‘गॅसोलीन.’ परदेशात पेट्रोलला गॅसोलीन म्हणतात. इथं तर पेट्रोल पम्पदेखील दिसताहेत. मग अशा प्रकारे दुकानात पेट्रोल विकायचं प्रयोजन किंवा कारण काय? नंतर कळलं की ही ‘खुले आम’ पेट्रोल विक्री ‘चोरी छुप्पे’ चालली आहे. हे पेट्रोल स्मगलिंगच्या मार्गानं आलेलं आहे! ते विकल्यानं किंवा विकत घेतल्यानं शिक्षा देखील होऊ शकते. पण पेट्रोल पंपापेक्षा ते थोडंसं स्वस्त मिळतं म्हणून ही हाराकिरी. प्रशासन याची फारशी दखल घेत नसावं असं दिसतं, कारण असंख्य दुकानांमध्ये ते सर्रास विकत मिळतं.
हॉटेलमध्ये आणि अन्यत्र रस्त्यावर युरोपियन पर्यटक मोठ्या प्रमाणावर दिसतात. कदाचित कंबोडियावर काही काळासाठी फ्रेंचांचं राज्य होतं, त्यामुळं असं असेल. पण आम्ही गेलो तेव्हा तरी त्यामानानं अमेरिकन कमी होते. फ्रेंच संस्कृतीचा आणखी एक परिणाम दिसला. जिथं तिथं फ्रान्समध्ये प्रसिद्ध असलेल्या बेकर्या त्यांच्या शाखा उघडून होत्या. महाग असल्या तरी दर्जेदार मालासाठी त्या मशहूर आहेत. इथं चहा आणि कॉफी दोन्ही उत्तम मिळतात. व्हिएतनाममधून येणारी कॉफी अधिक पसंत केली जाते. चहा कोरा मिळतो. आम्हाला दूध आणि साखर दोन्ही मागावं लागलं. इतर देशांसारखा बहुतेक हॉटेल्समध्ये तुमच्या खोलीच्या भाड्यात नाश्ता मोफत असतो. फक्त काही ठिकाणी निवडीला मर्यादित वाव असतो. आम्ही ज्या हॉटेलमध्ये उतरलो होतो, तिथं तर फक्त चार पदार्थ मिळत होते. अंड्याचे प्रकार, शाकाहारी लोकांसाठी भरपूर भाज्या घातलेला फोडणीचा भात, पॅनकेक आणि कापलेल्या फळांची प्लेट. बस इतकंच. तेही कुठल्याही एका पदार्थाचा केवळ एकाच हिस्सा. पुन्हा काही मागायला गेलात तर त्याचे वेगळे पैसे. हा प्रकार आमच्यासाठी नवीन होता.
कंबोडियाचं जेवण म्हणजे भात, भातापासून बनवलेल्या नूडल्स, वेगवेगळ्या भाज्या, मासे आणि सूप्स. हा भात, आपल्याकडच्या इंद्रायणी भाताच्या जवळ जाणारा, थोडासा चिकट असतो. चवीला मात्र चांगला असतो. तिकडच्या पद्धतीप्रमाणे चॉपस्टिक्स किंवा बांबूच्या काठ्यांच्या साहाय्याने खायला सोयीचा पडतो. या भागात ख्मेर संस्कृतीचं प्राबल्य आहे. त्यामुळं इथल्या जेवणालाही ‘ख्मेर’ म्हटलं जातं. या सगळ्यात ती मंडळी ‘फिश सॉस’ घालतात. हा काही सॉसचा वेगळा प्रकार नव्हे. चक्क ताज्या माशांचा घोटून केलेला लगदा. तो एरव्ही मासे खाणार्यांनाही खूप उग्र वाटतो. बाजारात तो विकायला असतो. एकदा चवीपुरतं कंबोडियन जेवण घेतलं, पण ते काही फारसं पसंतीला उतरलं नाही.
सुदैवानं आमच्या हॉटेलच्या जवळच एका केरळी माणसाचं रेस्टॉरंट होतं. अगदी डोश्यापासून परोठ्यापर्यंत सगळं मिळत होतं. या रेस्टॉरंटमुळे आमची चांगलीच सोय झाली. त्यांचं जेवण खरंच अप्रतिम होतं. अगदी दहीभात देखील उत्कृष्ट होता. त्यांच्याकडून कळलं की त्यांना लागणारे मसालेसुद्धा तिथंच मिळतात. भारतीय किराण्याचं दुकान देखील सीएम रेपमध्ये आहे. एक गोष्ट आवर्जून सांगायला हवी. आपल्या इथल्या शहाळ्यापेक्षा आकाराने दुप्पट अशी चवदार शहाळी तिथं मिळतात. त्यांचा स्वाद नक्कीच घ्यायला हवा. शहाळी सोलायची कलादेखील मस्त आहे. नारळाचा आतला गोलाकार भाग एक थेंब पाणी बाहेर न पाडता सोलतात. तो प्रकार पाहायची पण एक वेगळी गंमत आहे.
‘अंगकोर वाट’मधली आम्हाला भावलेली आणखी एक गोष्ट म्हणजे इथलं शिक्षक ट्रेनिंग कॉलेज. विस्तीर्ण प्रसार आणि अनेक इमारती असलेलं हे कॉलेज बघून खरंच खूप बरं वाटलं. इथे शिक्षकांना आणि शिक्षणाला प्रतिष्ठा असावी असा समज झाला. प्रत्यक्षात काय परिस्थिती आहे ते मात्र समजणं शक्य नव्हतं. कारण भाषेची अडचण होती. आणखी एक गोष्ट. इथे कोपर्या कोपर्यावर मसाज पार्लर आहेत. काचेच्या तावदानाआड असलेलं सगळं स्पष्ट दिसत होतं. पण फारसं कोणी मसाज करताना दिसलं नाही. टुकटुकवाल्यानं आम्हाला अनेकदा त्याबद्दल विचारलं. परंतु आम्ही त्याकडे दुर्लक्ष केलं.