बाळासाहेबांची रविवारची जत्रा कधी येते आणि त्यांनी कोणत्या नेत्याची कशी ‘मिरवणूक’ काढली आहे, ते पाहतो, असं मार्मिकच्या वाचकांना तर वाटत असेच; पण, बाळासाहेबांच्या कुंचल्याचे फटकारे ज्यांच्यावर ओढले गेले असायचे, तेही आपलं व्यंगचित्र पाहून खूष व्हायचे. बाळासाहेबांचा कुंचला माणसांना, प्राण्यांना, पक्ष्यांना कसा जिवंत करतो, याचं दर्शन घडवणारे एक व्यंगचित्र मार्मिकच्या मुखपृष्ठावर असायचेच. पण, जत्रा दोन पानांची आणि त्या आठवड्यातल्या अनेक घडामोडींना गुंफून घेणारी असायची, एक चित्र कुठे संपतं आणि दुसरं कुठे सुरू होतं, ते कळायचं नाही. प्रत्येक व्यंगचित्र स्वतंत्रपणे मुखपृष्ठ बनावं अशा वकुबाचं आणि प्रसंग समोर घडताना पाहात असावं, असं जिवंत. इथे राज्य सरकारी कर्मचार्यांचा संप वेगवेगळ्या लोकांना कसा दिसतो, ते बाळासाहेबांनी दाखवलं आहे. सरकार संपाकडे कसं पाहतं, कर्मचार्यांना तो कसा न्याय्य वाटतो, माध्यमांना कसा ‘टीआरपी’ मिळतो, हे दाखवत जात शेवटी बाळासाहेब सर्वसामान्य माणसांची अवस्था कशी दोन मस्तवाल रेड्यांच्या तावडीत सापडल्यासारखी होते, हे सहजतेने दाखवून जातात… १९७५ सालातल्या संपाचं हे चित्र २०२३मध्ये पण जसंच्या तसं लागू पडतं, हो ना!