साप्ताहिक ‘मार्मिक’च्या दि. १ मार्चच्या अंकात विकास झाडे यांनी ‘अधोरेखित’ या सदरात लिहिलेला ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा वृत्तांत ज्येष्ठ पत्रकार, संपादक मधुकर भावे यांनी वाचला आणि आपल्या ब्लॉगवर त्यांना शाबासकी देणारी पोस्ट लिहून तो प्रकाशित केला, अनेक लोकांना समाजमाध्यमांवरून पाठवला. त्यांच्यासारख्या ज्येष्ठांनी दिलेली शाबासकी विकास झाडे यांच्याबरोबर ‘मार्मिक’चाही हुरूप वाढवणारी आहे…
– – –
एक मराठी पत्रकार दुसर्या मराठी पत्रकाराबद्दल मनापासून चांगले बोलतो आहे, चांगले लिहितो आहे, म्हणून फार आश्चर्य वाटून घेऊ नका. आज मनापासून लिहितो आहे… आणि विकास झाडे या पत्रकाराची पाठ दोन्ही हातांनी थोपटावी, त्याचे अभिनंदन करावे यासाठी लिहितो आहे. दिल्लीमध्ये झालेल्या ९८व्या मराठी साहित्य संमेलनाचे संपूर्ण कार्यक्रमाचे आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी विश्लेषण केले त्या सर्वांपेक्षा मूलभूत विषयाला हात घालून विकास झाडे यांनी ज्या पद्धतीने त्या लेखाची मांडणी केलेली आहे, ते महत्त्वाचे आहे.
दिल्लीमध्ये गरीब कुटुंबातील पत्रकार ‘आव्हान’ म्हणून मिळालेली संधी स्वीकारतो, दर आठवड्याला अतिशय मार्मिकपणे राजकीय टीका-टिपण्णी करतो, ते मी वाचतच होतो. पण साहित्य संमेलनावर, जे भले भले पत्रकार तिथे गेले होते, त्यांना जे जमले नाही, त्या अभिजात मराठी भाषेच्या मूळ प्रश्नाला हात घालून विकासने जे विश्लेषण केले आहे त्याचा मनस्वी आनंद वाटला. ताबडतोब त्याला फोन करून त्याचे अभिनंदन केले.
याचे कारण आहे. बरोबर ३५ वर्षांपूर्वी हा विकास झाडे नागपूरच्या ‘लोकमत’मध्ये रात्रपाळीचा टेलिफोन ऑपरेटर होता. दिवसा एका ठिकाणी दुसरी नोकरी करून संध्याकाळच्या ७ ते २ या टेलिफोन ऑपरेटरच्या सेवेमध्ये तो ‘लोकमत’मध्ये रुजू झाला. त्याने रात्री २ वाजेपर्यंत अनेक वर्षे काम केले. तो दिवसा नोकरी करतो हे अनेकांना माहिती नव्हते. त्यानंतर त्याला ‘लोकमत’मध्ये बातमीदार होण्याची संधी मिळाली तीही त्याच्याच चोखंदळ निरीक्षणामुळे. विजय दर्डा यांनी त्याला ऑपरेटरचा वार्ताहर करायला मान्यता दिली आणि १९९१ साली विकास वार्ताहर झाला. वाचन वाढवत गेला. संपर्क वाढवत गेला. बघता बघता तो ‘लोकमत’च्या दिल्ली आवृत्तीचा संपादक झाला. नंतर ‘सकाळ’मध्ये गेला. आज दिल्लीमध्ये तो मुक्त पत्रकार म्हणून प्रभावीपणे वावरतो आहे.
दिल्लीमधील पत्रकारिता मराठी पत्रकारांना फार सोपी नाही. विकास ज्या परिस्थितीतून गेलाय तो संपूर्ण तपशील मला माहिती आहे. म्हणून त्याचे जास्त कौतुक वाटते. प्रभावी इंग्रजी आणि प्रभावी हिंदी या दोन्ही भाषांची सवय… शिवाय तिथले हवामान… निवासस्थान… या सर्व गोष्टी अतिशय कठीण आहेत. दोन वर्षे मी त्याचा अनुभव दिल्लीमध्ये घेतलेला आहे. अशावेळी एकेकाळच्या टेलिफोन ऑपरेटरने पत्रकारितेची संधी मिळाल्यावर त्याच मेहनतीने, जिद्दीने, वाचनाने एक परिपक्व पत्रकार म्हणून राजकीय पत्रकारितेत निपुणत्व सिद्ध करणे हे काहीसे समजण्यासारखे आहे. पण, तीन दिवसांच्या साहित्य संमेलनाच्या विविध विषयांचे सार काढून एका लेखात संपूर्ण संमेलन विश्लेषणात्मकरीत्या समतोलपणे कागदावर उतरवणे हे काम सोपे नाही.
आज विकासच्या लेखाची पोस्ट वाचल्यानंतर राहवले नाही म्हणून त्याला फोन केला. १९९१चा विकास आणि आजचा विकास… फक्त एकच शब्द तोंडातून आला, ‘शाब्बास विकास…’
– मधुकर भावे