‘प्रशांतचं नाटक’ यातच सारं काही आलं. कारण गेली तीन पिढ्यांवर आपल्या विनोदाची चौफेर उधळण करणारा हा रंगमंचावरला जादूगारच आहे. त्याने केलेले विक्रम, महाविक्रम याची नोंद घेण्यास अनेक पाने अपुरी पडतील. रेकॉर्डचेही रेकॉर्ड ब्रेक होतील. डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्यानंतर रसिकांची हृदये सर्वाधिक प्रमाणात जिंकणारा तो ‘अभिनेता’ कम ‘बिझनेसमन’ आहे! ‘धंदा’ आणि ‘धर्म’ या दोन्ही बाजू लीलया सांभाळणार्या या ‘सुपरस्टार’चे ‘शिकायला गेलो एक’ हे नाटक आज बुकिंगवर गर्दी खेचतंय. केवळ प्रशांत आहे म्हणून आजी-आजोबा, मुलगा आणि नातवंडे हे सारे सहकुटुंब नटून थटून उत्साहात, एखाद्या लग्नसमारंभासाठी जसे पोहोचतात तसे, नाट्यगृहाच्या दिशेने निघतात. हे भाग्य एखाद्या कलाकाराच्या नशिबी असणं दुर्मिळ आहे, एक चमत्कार आहे…
द. मा. मिरासदार यांची ‘व्यंकूची शिकवणी’ ही एक गाजलेली कथा. अनेकांना भुरळ पाडणारी. त्यावरून ‘गुरुकिल्ली’ हा चित्रपटही निघाला होता. अस्सल रांगडा कोल्हापुरी ग्रामीण बाज आणि विसंगती, विक्षिप्तपणा याचे इरसाल नमुने मूळ कथेत आहेत. त्यातील ‘वनलाईन’वरचा हा डोलारा नव्या पिढीचे कल्पक नाटककार, दिग्दर्शक अद्वैत दादरकर यांनी उभा केलाय. कथेतील गोष्टीची ताकद नाटकाच्या संहितेत नेमकेपणानं उतरवली आहे. प्रशांतचे ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ हेही अद्वैतने इम्तियाझ पटेलच्या कथेवर बेतले होते. दोन्ही नाटके आज रंगभूमीवर सुरू आहेत. कथेचे नाटक करण्यातलं कौशल्य इथेही सिद्ध होतंय. ‘प्रशांत-अद्वैत’ यांची युती जुळली आहे. नाटकाचे शीर्षक ‘शिकायला गेलो एक’ हे कथानकाचा विचार करता ‘करायला गेलो एक अन् झालं भलतंच!’ असं शंभर टक्के झालंय.
एक आदर्श शिक्षक महेश साने. मु.पो. सदाशिव पेठ, पुणे. पुणे तिथे काय उणे? तर या शिक्षकाला आदर्श शिक्षक हा पुरस्कार मिळालाय. त्याच्याच घरात सत्कार करण्याची जय्यत तयारी सुरू आहे. त्यांना एक तरुण मुलगी आहे. विद्या तिचं नाव. ती कामानिमित्त बाहेर असते. वडिलांच्या संपर्कात ती आहे. महेशच्या पत्नीचं निधन झालेलं. या सत्काराच्या निमित्ताने कोल्हापूरचे आमदार तानाजी खराडे तिथे पोहचतात. त्यांची टिपिकल कोल्हापुरी देहबोली. त्यांचा मुलगा श्याम हा अतरंगी. अनेक वर्षे दहावीची परीक्षा देतोय. पण काही केल्या पास होत नाही. ‘नापास’ होण्याचा विक्रमच जणू त्याने केलाय. स्वत:ला ‘रंकाळ्याचा’ रील्स हिरो समजणारा हा महाभाग. शिक्षणापेक्षा दारू, बाई, नाच, पब यात पुरता अडकलेला. ‘डेटिंग अॅप’मध्ये गुंतलेला. या विद्यार्थ्याकडून १०वीची परीक्षा पास करून घेण्याचा प्रस्ताव आमदार साहेब गुरुवर्य साने यांच्यापुढे मांडतात. शिकवणीसाठी भारी फी देण्यासाठीही तयार होतात. मुलीच्या अनुमतीने शिकवणी घेण्यास ‘साने’ गुरुजी तयार होतात आणि इथूनच सुरू होतो ‘उलटा सुलटा’ रंगप्रवास! शिकवणी कोण कुणाची घेतोय याचं कलाटणी नाट्य रंगत जातं. अनेक वळणांवरून हास्यस्फोटाची फटाकेबाजी होते. सुसंस्कृत-असंस्कृत, सुशिक्षित-अशिक्षित नेमकं कोण? हा प्रश्न उभा राहतो. ‘शिकवणी’ची ‘ऐसी तैसी’ होते!!
शिकवणीस तयार होण्यासाठी श्याम्याच्या एकेक अटीही भन्नाटच. तो गुरुजींना तंबाखू खाण्यास देतो. चावट मेसेज, रील्स बघायला लावतो. डेटिंग अॅरपपर्यंत प्रकरण पोहचतं आणि हा आदर्श शिक्षक श्याम्याच्या पिंजर्यात अडकतो. ‘कशी नशिबानं थट्टा आज मांडली…’ म्हणण्याची वेळ येते. आदर्श शिक्षकाच्या आदर्शवादाचा पुरता खेळखंडोबा होतो, शेवटी श्याम्याचा निकालाचा दिवस… जो कथानकाचा उत्कर्षबिंदू… जो बराच ताणला गेलाय.
श्याम्याची मैत्रीण ‘हेलन’ नावाने फक्त ‘हेलन’, पण पक्की गावरान! तिलाही ‘शिकवणी’ हवीय. आता बोला!
प्रशांत दामले याचा मास्तर महेश साने. एंट्रीलाच टाळ्यांच्या कडकडाटात रसिक या नव्या रूपाचे स्वागत करतात. भोळा, सज्जन मध्यमवर्गीय प्रवृत्तीचा शिक्षक आणि शिकवणीमुळे त्याचा होणारा कायापालट. हा बदल फरक विलक्षणच रंगतदार आहे. प्रशांतने विनोदाची एकही जागा मोकळी सोडलेली नाही. दिवंगत पत्नीबद्दलचे हृदय हेलावून सोडणारे स्वगत, तसेच गोड गळ्यातली त्याची गाणी, ही नोंद घेण्याजोगी आहेत. ‘मॉड’ मास्तराच्या वेगाला लयाचीही जोड आहे. टायमिंगचा जबरदस्त सेन्स पुन्हा एकदा नजरेत भरतो. हसता-हसवता डोळे ओलावतात. मास्तराचे दु:खही लक्षात राहते. समर्थ, उत्कट अनुभव देण्याची क्षमता प्रशांतमध्ये आहे हेच खरे! लोभसवाणं रुप आणि अभिनयाची संपन्नता यादेखील जमेच्या बाजू.
राज्य नाट्य स्पर्धा, एकांकिका, व्यावसायिक नाटक, चित्रपट असा प्रवास करणारा सुशील इनामदार या दोन्ही गुणी रंगकर्मीने या नाट्यात आमदार तानाजीची रुबाबदार भूमिका केलीय. ढ मुलाचा बाप म्हणून त्याची चिंता दिसते. एखाद्या व्यंगचित्राप्रमाणे त्याची देहबोली. ग्रामीण बाज आणि ठसका उत्तम. लक्ष्या बेर्डेसोबतचे ‘सर आले धावून’ या नाटकातील त्याची भूमिका तसेच ‘हिटलर’चे नाटक स्मरणात आहे. काहीदा होणारा ‘अतिरेक’ टाळता आला तर उत्तम! ऋषिकेश शेलार याचा चावट, आमदारपुत्र श्याम म्हणजे कळस आहे. श्याम्या आणि मास्तर या दोघांची चौफेर आतषबाजी धम्माल उडविते. दोघांनाही भूमिकेची पक्की समज आहे. गुरुशिष्याचे प्रसंग रंगतदार. श्याम्यात आजच्या पिढीचे प्रतिनिधित्व आहे. अजय भगरे हिची मुलगी विद्या, चिन्मय माहूरकर (काका), समृद्धी मोहरीर (हेलन) यांचीही ‘हजेरी’ यात आहे. कलाकारांची कामगिरी चोख आहे. व्यक्तिरेखा पटकन रसिकांच्या जवळ जातात.
कोल्हापुरी पट्ट्यातली बोलीभाषा आणि त्यातून उभे राहणारे अर्थ-अन्वयार्थ याची पेरणी हमखास हशे वसूल करते. उडणार्या चिमण्या, झाकपुक, एक बुक्कीत टेंगुळ… एक ना दोन. ग्रामीण शब्दकोशातल्या अनेक ज्ञात-अज्ञात शिवराळ शब्दांची ओळखही आमदार आणि आमदारपुत्र करून देतात. ‘दारू’ला ‘दिव्य वनस्पतीतलं दिव्य’ ही विशेषण लावण्यात येते ते भन्नाटच. ‘साने’ गुरुजींना ‘शाणे’ या नावाने फलकावर झळकावणेही लक्षात राहते. इरसाल कलाकार या बोलीभाषेचा ‘टाळ्या-हशे’ वसुलीसाठी पुरेपूर वापरही करतात.
संहिता आणि दिग्दर्शन हे एकाच हाती असल्याने जरी ‘एकसंघ’पणा वाटला तरी काहीदा लेखक हा स्वत:च्याच संहितेच्या प्रेमात पडण्याची शक्यता अधिक असते. परिणामी दिग्दर्शनावर मर्यादा येऊ शकतात. तटस्थपणे स्वत:च्याच संहितेकडे बघता येत नाही, हे जरी खरे असले तरीही इथे दोन्ही बाजू एकमेकांना पूरक आहेत. ‘दिग्दर्शक-लेखक’ एकच असणारे देवेंद्र पेम, संतोष पवार, केदार शिंदे यांनी सध्याच्या काळात दुहेरी भूमिका पेलवून व्यावसायिकवर नवी समीकरणे यशस्वी केलीत. रांगड्या ग्रामीण भाषेला दिलेली विनोदाची फोडणी, प्रशांतच्या भूमिकेचा पुरेपूर विचार, या जमेच्या बाजू ठरतात. द. मा. मिरासदार यांची ‘वनलाइन’ आजच्या प्रेक्षकांपर्यंत पोहचविण्याची हुकमत ही लेखनात आणि सादरीकरणात आहे. ‘कालबाह्य’ नाट्य वाटत नाही. ‘मूळ’ गोष्टीचे ‘मूळ’ भक्कमपणे रुजले असल्याने सादरीकरणाची नवी पालवीही डौलदार आहे.
ज्येष्ठ नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये यांच्या हाती नेपथ्य सुरक्षित आहे. एकाच घरात संपूर्ण नाट्य घडते. मास्तराचं घर म्हणून तपशिलांसह आकाराला आलंय. भिंतीवरले फोटो, बैठक, खुर्ची, फळा याची मांडणी उत्तम. रंगसंगती शोभून दिसते. हालचालींना पुरेशी जागा उपलब्ध आहे. विक्रमी संगीतकार अशोक पत्की यांचे संगीत चांगली स्वरसोबत करतेय. गुरू ठाकूरचं प्रशांतने म्हटलेलं गाणं मस्तच. पब संस्कृतीचा ताल-सूर हादेखील प्रसंग जिवंत करतोय. किशोर इंगळे याची प्रकाशयोजना, श्वेता पेंडसे यांची वेशभूषा तर प्रमोद खरटमल याची रंगभूषा ही पूरक आहे. सत्कारानंतरचा मास्तरांचा गेटअप सुरेखच. तांत्रिक बाजू चांगल्या जुळून आल्यात. पडदा उघडल्यानंतर बॅकस्टेज आर्टिस्टही भूमिका चढवून प्रगटतात. आदर्श शिक्षकाच्या अभिनंदन सोहळ्यात त्यांचाही सहभाग आहे. हे वेगळेपण नोंद घेण्याजोगे. एकूणच निर्मितीमूल्ये प्रयोगाला उठाव देणारी आहेत. कुठेही तडजोड केलेली नाही.
राज्यकर्त्यांची शिक्षणाकडे बघण्याची मनोवृत्ती ही यातून दिसते. लाखभर रुपये रोख मोजून, पैसे फेकून शिक्षण विकत घेण्याची बिनधास्त प्रवृत्ती त्याची आहे सत्ताधारी हे शिक्षणाला दुय्यम महत्त्व देतात. तसेच त्यांना महापुरुषांची त्यांच्या कार्याची साधी ओळखही नाही. याचीही उदाहरणे कथेच्या ओघात आलीत. आजच्या शिक्षणपद्धतीवर तसेच यंत्रणेवरही मिश्किल भाषेतून चिमटे काढले आहेत.
मराठी रंगभूमीवर कथा, कादंबर्यांवर आधारित नाटकांनी एक काळ गाजविला. त्यात जयवंत दळवी हे आघाडीवर आहेत. ‘सभ्य गृहस्थ हो’, ‘संध्याछाया’, ‘स्पर्श’, ‘कृष्णलीला’ ही नाटके कथेवर बेतलेली आहेत तर ‘बॅरिस्टर’, ‘महासागर’, ‘दुर्गा’, ‘सावित्री’, ‘मुक्ता’, ‘नातीगोती’ ही नाटके कादंबरीवर बेतलेली. अगदी मागे वळून बघता मामा वरेरकर यांनी ‘सोन्याचा कळस’ हे नाटक ‘धावता घोटा’ या कादंबरीतून लिहिले. कादंबरीकार श्री. ना. पेंडसे यांनी ‘यशोदा’ नाटकावरून कादंबरी केली असा उलटा प्रवासही झाला. व. पु. काळे यांनी त्यांचा ‘पार्टनर’ कादंबरीचे नाट्यरूपांतर केले. कथेवरून नाटके हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय ठरेल, एवढी नाटके या वाटेवरून आजवर आलीत. त्यात हे नव्या कल्पकतेतील ‘फ्रेश’ नाट्य रंगभूमीवर आलंय. वाचकांच्या मनात कायमची ठाण मांडून बसलेली ‘शिकवणी’ आजची झालीय. समर्थ ग्रामीण विनोदी कथालेखकाचे दर्शनच होतंय.
‘गुरु-शिष्य’ नातेसंबंधातली ही लक्षवेधी इरसाल शिकवणी हसत-खेळत रंगली आहे. धाब्यावरल्या अस्सल ‘कोल्हापुरी’ स्टाईलचा पांढरा तांबडा झणझणीत रस्सा आणि तडका दिलेला ठेचा जर समोर आला तर… अगदी तसंच यातील नाट्य ग्रामीण बाज उभं करतं. आणि आजच्या मोबाईल जमान्यातही डोकावतं. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर ही समाजमाध्यमंही कथेत येतात. त्यामागे सर्वस्वी उभे आहेत दहा हजार प्रयोगांचा विक्रम ओलांडणारा हिंदुस्थानातील पहिला रंगमंच अभिनेता अर्थातच प्रशांत दामले आणि त्याची बहुरूपी जादूगिरी!
शिकायला गेलो एक
मूळ कथा : द. मा. मिरासदार
लेखन/ दिग्दर्शन : अद्वैत दादरकर
नेपथ्य : प्रदीप मुळ्ये
संगीत : अशोक पत्की
प्रकाश : किशोर इंगळे
वेशभूषा : श्वेता पेंडसे
रंगभूषा : प्रमोद खरटमल
सूत्रधार : अजय कासुर्डे
निर्मिती : गौरी थिएटर्स
प्रकाशित : प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन