सोमीताई म्हणजे सोशल मीडिया ताई. सगळ्या जगाला व्यापून दशांगुळे वर उरलेल्या सोशल मीडियाच्या संदर्भात जे काही प्रश्न पडतील, ते आमच्या सोमीताईंना विचारा… त्यांच्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरं तयार असतात… ‘सोमी’तज्ज्ञ आहेत ना त्या!
– – –
खांबाने धरले, सुटणार कसे?
प्रश्न : ताई, मला सोशल मीडियाचे व्यसन लागले आहे. सतत रील स्क्रोल करणे, फीडमध्ये नवे काही आले आहे का ते तपासत राहणे, पुन्हा पुन्हा व्हॉट्सअप चेक करणे असे दिवसभर चालू असते. हे माझे व्यसन कसे सुटणार?
उत्तर : माझ्या लाडक्या भावा, तुला एक गोष्ट सांगते. एक भले मोठे राज्य होते. राज्याचा राजा प्रजा हितकारी, प्रजेची योग्य काळजी घेणारा, शूर आणि भला माणूस होता. राज्यात सुख शांती, समृद्धी असल्याने सर्व प्रजादेखील आनंदात होती. एकच गोष्ट वाईट होती आणि ते म्हणजे राजाचे गोड खाण्याचे व्यसन. राजाला गोड पदार्थ, विशेषत: मिठाई फार आवडायची. राजाचे सर्व लक्ष सतत मिठाईकडे लागायला लागले होते. आधी मंत्रिमंडळाने हे सगळे गमतीने घेतले, असतात मोठ्या लोकांना काही सवयी म्हणून नजरअंदाज केले. पण हळूहळू राजाची ही आवड व्यसनात बदलू लागली. राजाचे दरबारातही लक्ष लागेना झाले. कधी एकदा दरबार संपतो आणि मी मिठाईकडे मोर्चा वळवतो असे राजाला व्हायला लागले. गडबडीत निर्णय चुकायला लागले, धोरणे बदलायला लागली तसे मग मंत्री सावध झाले. त्यांनी आडून आडून राजाला हे समजवण्याचा प्रयत्न केला, पण राजा तेवढ्यापुरते हो म्हणायचा आणि पुन्हा मिठाईप्रेमापुढे झुकायचा.
राज्यातल्या जंगलात एक तपस्वी राहायचा. अत्यंत शांत, विद्वान आणि तेजस्वी. तो काही मदत करतो का हे मंत्र्यांनी बघण्याचे ठरवले आणि त्याला शरण गेले. तपस्वी पुरुषाने सर्व कहाणी ऐकली आणि म्हणाला, ‘ठीक आहे. उद्या येतो मी दरबारात. जर तुमचा राजा शहाणा असेल तर काही क्षणात त्याचे व्यसन सुटेल.’ तपस्व्याच्या बोलण्याने सगळे आनंदी झाले आणि समाधानाने परतले.
दुसर्या दिवशी तपस्वी दरबारात आला. राजाने मोठ्या भक्तिभावाने त्याचा आदर सत्कार केला. त्याला स्वत:च्या आसनावर बसवले आणि स्वत: पायापाशी बसला. प्रसन्न झालेला तपस्वी म्हणाला, ‘राजन, सर्व क्षेमकुशल तर आहे ना? काही चिंता तर नाही ना?’ राजा काही क्षण विचारमग्न झाला आणि म्हणाला, ‘हे प्रभो, सर्व काही कुशल मंगल आहे. पण माझी गोड खाण्याची आवडच माझी शत्रू बनायला लागली आहे. ध्यानी मनी सतत गोड खाण्याचेच विचार असतात. दरबारातही मिठाईचे वास लक्ष उडवत असतात. हे सर्व चूक आहे, हे व्यसन घातक आहे हे मला कळते, पण तरी व्यसन सुटत नाही ही माझी चिंता आहे. तपस्वी हसला आणि आसनावरून उठला. म्हणाला, ‘राजन, तू माझी एक अडचण दूर कर, मी तुझी अडचण दूर करेन. राजा प्रचंड आनंदित झाला, विचारता झाला, ‘बोला प्रभो, काय करू?’
तपस्वी सिंहासनाच्या पायर्या उतरून खाली आला आणि त्याने दरबारातल्या एका खांबाला घट्ट मिठी मारली. ‘राजन, या खांबाने मला पकडून ठेवले आहे, मला वेदना होत आहेत, माझी सुटका कर. मला मदत कर.’ तपस्वी विनवणी करत म्हणाला. सर्व दरबार आणि राजाही आश्चर्यचकित झाला. ‘पण मुनीवर, खांबाने तुम्हाला नाही तर तुम्ही खांबाला धरून ठेवले आहे. तुमची सुटका तुमच्याच हातात आहे,’ नम्रपणे हात जोडत राजा म्हणाला. तपस्वी गूढ हसला आणि खांब सोडून दरबारातून बाहेर पडला. तपस्व्याला काय सांगायचे होते, ते विद्वान राजाला बरोबर समजले आणि त्याचे व्यसन कायमचे सुटले.
– तपस्वी सोमी
तरुणांना अफू पाजतंय कोण?
प्रश्न : सोमी, सोशल मीडियावर जी अराजकता चालू आहे, अश्लीलतेचा कळस गाठला आहे, तो बघता तिच्यावर बंधने घालण्यासाठी कडक कायदा का राबवला जात नाही? तुम्ही चुकीच्या मार्गाने जात आहात हे या तरुण लोकांना कोणी का सांगत नाही? एकही आदर्श राजकारणी, खेळाडू, कलाकार यावर आवाज उठवताना का दिसत नाही?
उत्तर : हे त्रस्त मानवा, जगात ज्या ज्या गोष्टीने उच्छाद मांडलेला असतो, जी जी गोष्ट सातत्याने प्रसिद्ध पावत असते, ती जगभरातील राजकारण्यांसाठी काळाची गरज असते हे कायम लक्षात ठेव. कोणत्याही सरकारला खरा धोका असतो तो युवकांकडून. जेव्हा जेव्हा अनागोंदीविरुद्ध युवक उभे राहतात तेव्हा तेव्हा भली भली सरकारे कशी कोसळतात हे आपण पाहिले आहे आणि पाहतो आहोत. सजग, सावध आणि प्रश्न विचारणारा युवक जगातील कोणत्याही सरकारला नको असतो.
युवकांचे लक्ष आजूबाजूच्या परिस्थितीकडे, अनागोंदीकडे वळू द्यायचे नाही हा मूळ उद्देश असतो. काही सुज्ञ कारभारी अशावेळी युवकांच्या हाताला काम देतात, त्यांच्यासाठी एक योग्य दिशा ठरवतात, तर काही युवकांना अफूची गोळी देतात. ही अफूची गोळी मग कधी सोशल मीडिया असते, कधी क्रिकेट असते, कधी धर्म असते. जगभरातील सरकारे, लाडके सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स बघितले तर एक गोष्ट लक्षात येते की हे लोक त्यांना आंधळेपणाने फॉलो करणार्या युवकांना कधीही सावध व्हायला, आजूबाजूच्या परिस्थितीचे आकलन करायला सांगत नाहीत. ते युवकांना काय सांगतात, धर्म कसा धोक्यात आला आहे, अमके तमके चित्रपट तुमची संस्कृती कशी नष्ट करत आहेत, देशाच्या जीडीपीपेक्षा विराट कोहलीचा स्ट्राईक रेट वाढणे जास्ती महत्त्वाचे कसे आहे, सामूहिक बलात्कार झालेल्या पीडितांच्या आवाजापेक्षा कबड्डी लीगमध्ये कोण खेळाडू कितीला विकला गेला हे ऐकणे जास्त महत्त्वाचे कसे आहे, देशाच्या सीमेवर नक्की काय चालू आहे हे बघण्यापेक्षा अमक्या तमक्याने देशद्रोही पोस्ट कशी केली आहे आणि त्याला अद्दल घडवणे कसे जास्त महत्त्वाचे आहे, कुपोषणाने होत असलेले बालमृत्यू हा काही महत्त्वाचा विषय नसून, जिममध्ये बायसेप योग्य प्रकारे कसे मारावेत आणि वजन वाढवण्यासाठी कोणती पावडर योग्य आहे हे माहिती असणे महत्त्वाचे आहे. वाढती बेरोजगारी, कमी होत चाललेल्या नोकर्या, वाढत चाललेली धर्मांधता, महिलांची असुरक्षा, वाढते अपघात, हिंसाचार याकडे नंतर देखील लक्ष देता येईल, पण अमक्या तमक्या ओटीटीवर आलेला चित्रपट किंवा वेबसिरीज तातडीने बघणे जास्त महत्त्वाचे कसे आहे, हे सर्व ते युवकांपर्यंत स्वत:चा वेळ वाया घालवून पोहोचवत असतात.
आता इतके योग्य मार्गदर्शन मिळत असताना त्यावर बंदी घालावी असे म्हणणे योग्य आहे का? नसेल एखाद्याला नोकरी, पण त्याच्या पेजला दोन हजार फोलोअर्स आहेत, महिनाअखेरीला होत असेल थोडीफार ओढाताण पण त्याने विरोधी पक्षाच्या नेत्याला सुनावलेल्या खड्या बोलांना ५०९ लोकांचा लाईक मिळालेला आहे, पाकिस्तानवर क्रिकेटमध्ये मिळवलेला विजय हा पहिल्या पगारापेक्षा त्याला जास्त आनंद देणारा आहे, किंग अन भाईचे शेवटचे दोन्ही चित्रपट आपटले, हे वडील निवृत्त व्हायला आले आहेत या चिंतेपेक्षा जास्त काळजी करण्यासारखे नाही का? या सगळ्याचा विचार तुम्ही का करत नाही? बंदी घाला म्हणे. काही लोकांना इतरांचा आनंद बघवत नाही हेच खरे.
– तरुणाईचे आशास्थान सोमीताई
मुखवटे आणि चेहरा!
प्रश्न : ताई, मला किडे करायला फार आवडते. मी लोकांना त्रास देण्यासाठी वेगवेगळ्या नावांनी प्रोफाइल तयार करतो आणि सोशल मीडियावर येतो, पण तरी लोक मला लगेच ओळखतात आणि हाड् हाड् करतात. हे असे कसे घडत असेल?
उत्तर : लाडक्या बहुरुपी भावा, तुला पण गोष्ट सांगते. मथितार्थ आपला आपला समजून घेणे. उगाच टवाळक्या करत वेळ घालवणारा एक माणूस एकदा एका इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात जातो आणि दुकानदाराला विचारतो. ‘ओ हा टीव्ही कितीला आहे?’ दुकानदार म्हणतो, ‘आम्ही मूर्खांना टीव्ही विकत नाही!’ टवाळखोराला हा अपमान वाटतो. आता काहीही करायचे पण टीव्ही विकत घ्यायचा असा तो निश्चय करतो. दुसर्या दिवशी तो एका सरदारजीचा वेष करतो आणि त्या दुकानात जातो. पंजाबी ढंगात बोलण्याचा प्रयत्न करतो आणि टीव्हीची किंमत विचारतो. दुकानदार शांतपणे म्हणतो, ‘मूर्खांना आम्ही टीव्ही विकत नाही. टवाळखोर हार मानत नाही आणि काही दिवसांनी एका मद्रासी अण्णाचा वेष करून पुन्हा त्या दुकानात जातो आणि टीव्हीची किंमत विचारतो. दुकानदार पुन्हा तेच ठरलेले उत्तर देतो. आता संतापलेला टवाळखोर काही दिवसांनी चक्क स्त्रीवेष धारण करतो आणि त्या दुकानात जातो. पुन्हा टीव्हीची किंमत विचारतो. दुकानदार नम्रपणे म्हणतो, ‘अहो, तुम्हाला किती वेळा सांगायचे, की आम्ही मूर्खांना टीव्ही विकत नाही.’
हताश झालेला टवाळखोर आता हात जोडतो आणि म्हणतो. ‘ठीक आहे नका विकू. पण मला एवढेच सांगा, की मी इतकी वेगवेगळी रूपे घेऊन आलो, तरी तुम्ही मला ओळखले कसे? दुकानदार गालातल्या गालात हसतो आणि म्हणतो, ‘तुम्ही टीव्ही-टीव्ही म्हणून ज्याची किंमत विचारत होतात, तो ओव्हन आहे.’
– शेरलॉक सोमी