भाजका कांदा खाल्ला की बायको चिडकी मिळते, असं लहानपणी ऐकलं होतं… तुमचा काय अनुभव?
– विलास पेंढारी, माळेगाव
तुम्ही अजून मोठे झाला नाहीयत का? तुमच्या प्रश्नावरून असं वाटतं. कुठला कांदा खाल्ल्यावर बायको चिडकी मिळते, कुठला कांदा खाल्ल्यावर रडकी मिळते… कांदा नाही खाल्ला की काय वांदा होतो… (जेवणाच्या चवीचा) सगळं तुम्हाला सांगू, पण आधी तुम्ही मोठे झाला आहात का ते सांगा… माफ करा, पण तुम्हाला लहानपणी पडलेल्या प्रश्नावरच तुम्ही अजून अडकलेले आहात त्यावरून तरी अजून तुम्ही बाळबोध आहात असं वाटतंय, विलासराव…
मुलाला म्हटलं अभ्यास कर, दहावीच्या परीक्षेत आपल्या घराण्याचं नाव खराब करू नकोस तर तो माझी दहावीची मार्कशीट मागतोय… आता मी काय करू?
– आरिफ तांबोळी, सातारा
खोटी मार्कशीट बनवून दाखवा… या अमृतकाळात (असं सत्ताधारी बोलतात) खोटी मार्कशीट लिलया मिळते (असं विरोधक बोलतात) हे माहित नाही का तुम्हाला?) पण जर खोटी मार्कशीट दाखवलीत तर तोंड बंद ठेवा. परीक्षा या विषयावर मुलांशी चर्चा करायला जाऊ नका, नाहीतर जे झाकायला जाल तेच उघडं पडेल…
आपल्या पूर्वजांच्या काळात कान फोडणारे डीजे नव्हते, डोळे आंधळे करणारे लेझर लाइट नव्हते; कसे साजरे करत असतील ते देवाधर्माचे, महापुरुषांचे उत्सव?
– गणेश मांडवकर, कोल्हापूर
असं कोण म्हणत की आपल्या पूर्वजांच्या काळात असं काही नव्हतं? आपल्या पूर्वजांच्या काळापासून सर्व होतं… प्लास्टिक सर्जरी होती… विमानं होती वगैरे वगैरे… सध्या हे सिद्ध होतंय.. पण पूर्वजांच्या काळात डीजे-बीजे, लेझर लाईट वगैरे वगैरे सुद्धा होते, हे पण सिद्ध होईल… पण हे सिद्ध करणारे सध्या, आपले महापुरुष, हे महापुरुष कसे नव्हते हे सिद्ध करण्यात बिझी आहेत… ते सिद्ध झालं की तुम्हाला जे हवंय तेही सिद्ध होईल.
अमेरिकेतला माझा मित्र डोलांड हल्ली जरा बहकल्यासारखा वागतो आहे. त्याच्यासाठी एवढं केलं तरी तो चारचौघांत माझा पाणउतारा करतो. तुम्ही सबुरीच्या गोष्टी सांगाल का त्याला माझ्या वतीने?
– अलेक्स लोपीस, नालासोपारा
तुम्ही जरा मागे वळून आठवा… आधी तुम्ही बहकल्यासारखे वागला असाल… तुम्ही त्याच्यासाठी एवढं केलं असं दाखवून, जे केलं ते तुमच्यासाठीच केलं असणार आणि तुमचं काम झाल्यावर त्याला फेकून द्यायला निघाला असणार… पण तो शेरास सव्वाशेर निघाला असणार… आणि पाणउताराचं म्हणाल तर… थोडं हे पण आठवून बघा. तुम्ही कधी कोणाचा पाणउतारा केलाय का? काही नाही… करावं तसं भरावं, पेरलं तेच उगवतं, खोट्याच्या कपाळी गोटा… या म्हणी आठवल्या…
सगळ्या वस्तूंना एक्स्पायरी डेट असते, लग्नाला ती का नसते?
– मीनाक्षी हळदणकर, चेंबूर
समजा लग्नाला एक्सपायरी डेट असती, तरीही डेट संपल्यावर, ‘जे’ लग्न करून घरी आणलंय ते टाकून द्यायची तुमची हिंमत झाली असती? नशीब समजा लग्नाला एक्सपायरी डेट नाहीये… नाहीतर तिनेच तुम्हाला आधी टाकून दिलं असतं, मग काय केलं असतं?
उत्तर भारतातले लोक त्रिभाषा सूत्राप्रमाणे एकही वेगळी प्रादेशिक भाषा शिकत नाहीत. मग आपण त्यांची हिंदी का शिकायची?
– रोहित वेळापुरे, चंद्रपूर
नका शिकू, त्यांच्या बापाचं काय जाणार आहे? आपण आपली भाषा बोलणार्या आपल्याच लोकांच्या भाषेतल्या चुका काढत राहूया, हा घाटी बोलतो, तो कोकणी बोलतो, तो मालवणी बोलतो म्हणून हिणवत राहूया, लोक संगीताला नाकं मुरडूया, नाट्य संगीताला बोअर म्हणूया, मराठी चित्रपटांना नाव ठेवूया, कलाकारांची नावं बघून मराठी नाटक बघायचं की नाही हे ठरवूया, पुढे जाणार्याचे पाय खेचूया, पण उत्तर भारतीय, त्यांचं उत्तर भारतीयत्व कसं जपतात याचा विचार नको करूया… आपण आपल्या भाषेचा गर्व करूया आणि आपल्या मायबापाने जपलेल्या मराठीपणाचं घर खाली करूया आणि त्याचा दोष उत्तर भारतीयांना देऊया… तेच सगळ्यात सोप्पं आहे…
गल्लीत दादा बनून फिरणारा प्रत्येक गणंग समोर त्याच्यापेक्षा मोठा गुंड उभा राहिला की शेपटी का हलवू लागतो लुटुलुटू?
– नामदेव शिंदे, हिंगोली
नसलेल्या शेपटीचा काहीतरी उपयोग करू दे बिचार्यांना. समजा त्यांनी शेपटी नाही हलवली, तर त्यांनी ती कुठे घालायची?… कुत्र्यासारखी पायात घालायची का? तसं केलं तर तुम्हीच विचाराल, ‘मग ते कुत्र्यासारखी जीभ काढून लाळ का गाळत नाहीत?’ (उघड सत्य सांगतो… हे असे दादा त्यांच्यापेक्षा मोठ्या गुंडासमोर लाळसुद्धा गाळतात, पण ती दिसत नाही… शेपटीप्रमाणे)