गाण्याला वेगवेगळ्या स्वरदागिन्यांनी मढवून ती नितांत श्रवणीय बनविण्याची प्रक्रिया म्युझिक अरेंजर करत असतो. गाण्याच्या सुरुवातीला आणि दोन अंतर्याच्या मध्ये कोणते म्युझिक बसवायचे, त्यासाठी कुठली वाद्ये वापरायची, या सर्वांचे नोटेशन कसे तयार करायचे, हे सर्व काम वाटते तितके सोपे कधीच नसते.
– – –
माझ्या लहानपणाच्या बहुतेक आठवणी रेडिओशी निगडीत आहेत. रेडिओ हे फक्त सुंदर-सुंदर गाणी ऐकता यावी म्हणून तयार केलेले एक उपकरण आहे अशी माझी ठाम श्रद्धा असण्याचा तो काळ होता. रेडिओ ऐकत असताना जेव्हा गाणे सुरू होई, तत्पूर्वी एखादे म्युझिक किंवा एखादा ताल किंवा कुठल्या तरी वाद्याचा मेळ आधी वाजत असे आणि मग गाणे सुरू होत असे. मग हळूहळू या गाण्याच्या पूर्वी वाजणार्या सुरावटी ओळखीच्या झाल्या आणि आत्ता गाणे कोणते वाजणार, हे ओळखता येऊ लागले. मी असे गाणे ओळखले की मित्रांना आश्चर्य वाटायचे. ते म्हणायचे, ‘तू अगदी बरोब्बर कसे ओळखतोस?’… मी म्हणायचो, ‘हाऽऽ हाऽऽ हाऽऽ ते मी का सांगू?’
काही नमुना गाणी मी येथे उदाहरण म्हणून देतोय. ही गाणी वाजवून बघा. मग तुम्हाला अशी डझनभर गाणी सापडतील, जी तुम्हाला पूर्व सुरावटीमुळे सहज ओळखता येतील… उषा उथुप, आशा भोसले यांचे ‘हरे रामा हरे कृष्णा’ या गाण्याचा सुरुवातीचा वाद्यमेळ… ‘बोल राधा बोल संगम होगा की नहीं’ या गाण्याच्या सुरुवातीला राज कपूरने बॅग पायपर या वाद्यावर वाजवलेली धून… ‘दम मारो दम’ या गाण्यापूर्वी चेलो, इलेक्ट्रिक गिटार, ड्रम्स या वाद्यांची धून… ‘होठों पे ऐसी बात मैं…’ यामधील गाण्यापूर्वीचा विविध तालवाद्यांचा ग्रॅजंर वाद्यमेळ… ‘मधुबन में राधिका नाचे रे’ या गाण्यापूर्वीचे सतारीचे तुकडे… ‘रमैया वस्तावैया’ या गाण्यापूर्वीची लयदार धून… ‘ना तो कारवाँ की तलाश है’ या कव्वालीत आधीचे हार्मोनियम, ढोलक, काचेचे तुकडे यांचा सुंदर मिलाप… ‘आजा सनम मधुर चाँदनी में हम’ या गाण्यापूर्वीचे अकॉर्डियन… ‘मन डोले तन डोले’ या गाण्यापूर्वी इलेक्ट्रिक सिंथेसायझरवर वाजवलेली बीनची धून… ‘घर आया मेरा परदेसी’ या गाण्यापूर्वीची बँजो आणि ढोलकवरील धून.. ‘ये मेरा दिल प्यार का दिवाना’ या डॉनमधील गाण्यापूर्वी इलेक्ट्रॉनिक गिटार व सिंथेसायझरवर वाजवलेली धून… तुम्हालाही अशी शेकडो गाणी आठवतील यात शंका नाही.
संबंध गाणे रेकॉर्ड होऊन आपल्यापर्यंत येण्याची एक लांबलचक प्रक्रिया ही अत्यंत जटील अशी असते. संगीतकाराकडे गीतकार आपले गीत देतो. या गीताला एक चाल लावण्याची जबाबदारी संगीतकारावर असते. अनेकदा गीतकार संगीतकाराने दिलेल्या चालीवरही गाणं लिहितो. गाण्यातले मुखडे व अंतर्यांना चाल लावली की गायकांकडून तालीम करून घेतली जाते. या सर्व तालमीच्या प्रक्रियेत एक हार्मोनियम, तबला किंवा ढोलक एवढी वाद्ये पुरेशी असतात. पण या गाण्याला वेगवेगळ्या स्वरदागिन्यांनी मढवून ती नितांत श्रवणीय बनविण्याची प्रक्रिया मात्र म्युझिक अरेंजर करत असतो. गाण्याच्या सुरुवातीला आणि दोन अंतर्याच्या मध्ये नेमके कोणते म्युझिक बसवायचे, त्यासाठी कुठली वाद्ये वापरायची, या सर्वांचे नोटेशन कसे तयार करायचे, प्रत्येक वादकाने नेमके आपले वाद्य कसे व केव्हा वाजवायचे हे सर्व काम वाटते तितके सोपे कधीच नसते. पूर्वी एकेका गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी अक्षरश: आठ आठ दिवस ही कसरत करावी लागे (हल्ली तंत्रज्ञान खूप पुढे गेले असल्यामुळे बरीच मेहनत कमी झाली आहे). एकावेळी शेकडो लोकांना हाताच्या इशार्याने नियंत्रित करणारे हे संगीत संयोजक व आपल्या वाद्याने आपले कान तृप्त करणारे म्युझिशियन्स ग्लॅमरच्या दुनियेतही गुमनाम राहिले आणि आजही गुमनाम आहेत.
गंमत म्हणजे हिंदीतील संगीतकार देशातील सर्वच प्रांतांतून आलेले आढळतात. मात्र बहुतेक म्युझिक अरेंजर्स गोव्याचे आहेत. असे का बरे झाले असावे? यासाठी इतिहासात थोडे मागे जावे लागेल. ब्रिटीश अनेक गोष्टी सोबत घेऊन आले आणि जाताना काही येथेच सोडूनही गेले. त्यांच्या लष्कराचा एक महत्वपूर्ण घटक म्हणजे लष्करी बँड. आजही हा बँड भारतीय लष्कर, पोलीस दल यांचा बँड आणि लग्नातील बँडवाले बनून आपली भूमिका पार पाडत आहे. या बँडमध्ये विविध वाद्ये वाजविली जातात. त्यात प्रत्येक वाद्य वाजविणार्यासमोर कागदावर काही लिहिलेले असते. याला नोटेशन असे म्हटले जाते. प्रत्येक कलावंत समोरच्या सांगितिक भाषेतील नोटेशननुसार आपलं वाद्य वाजवत असतो. याच लष्करी बँडमधले ए. बी. अल्बुकर्क, राम सिंह व पीटर डोरॅडो या त्रिकुटाने ‘एआरपी’ नावाची बँड पार्टी तयार केली. भारतीय चित्रपटसृष्टीतले आद्य म्युझिशियन असे त्यांना म्हटले तरी वावगे ठरू नये.
‘अमर अकबर अँथनी’ या चित्रपटात एक गाणे आहे, ‘माय नेम इज अँथनी गोन्साल्वीस.’ त्यातील अँथनी गोन्साल्वीस हे खरोखरचे नाव आहे, ते एक म्युझिक अरेंजर होते. नंतर ट्रम्पेटवादक चिक चॉकलेट, सॅक्सोफोन वादक जॉनी गोम्स, अरेंजर सेबेस्टियन डिसुजा, फ्रँक फर्नांडिस, मार्टिन पिंटो, चिक कोरिया, सी फ्रॅन्को, अल्बर्ट डिकोस्टा, आर्थर परेरा, क्रिस पॅरी यांसारखे म्युझिशियन्स व अरेंजर्स भारतीय चित्रपट संगाrताच्या मुख्य प्रवाहात येऊन मिसळून गेले. ही सर्व मंडळी पारशी, ख्रिश्चन व पोर्तुगीज अशा समाजातून आलेली असल्यामुळे पाश्चिमात्य वाद्येही सोबत घेऊन आली. ५०च्या दशकात प्रथम शंकर जयकिशन या जोडीने आणि नंतर नौशाद यांनी आपल्या भव्य ऑर्केस्ट्रात या सर्व कलावंताचा पुरेपूर वापर करून घेतला.
लक्ष्मीकांत प्यारेलाल या जोडीतील प्यारेलाल यांचे वडील रामप्रसाद शर्मा हे ४०-५०च्या दशकातील उत्कृष्ट ट्रम्पेटवादक व म्युझिक अरेंजर होते. पण असे अपवाद वगळता अधिकांश वाद्यमेळ संयोजक हे गोवेकरच होते. वनराज भाटिया हे सुप्रसिद्ध संगीतकार व अरेंजर म्हणतात की चित्रपटातील हॉटेल डान्सचे म्युझिक हे पूर्णपणे गोवन कलाकारांची भारतीय चित्रपटसृष्टीला देणगी आहे. यात भारतीय शास्त्रीय संगीताचा कोणताच सहयोग नाही आणि ते खरेही आहे. कारण मुळात हॉटेल, बार, रेस्टॉरन्ट्स, मोटेल्स या संकल्पनाच पाश्चिमात्य आहेत. त्यामुळे तेथील नृत्याचा बाजही तसाच असणार. हिंदी चित्रपटातील हॉटेल डान्सवरील गाणी लोकप्रिय करण्याचे श्रेय निश्चितपणे या गोवन कलावंतांकडे जाते. ‘मेरा नाम चिनचिन चू’ ते ‘पिया तू अब तो आजा’ अशी एक खूप मोठी यादी या गाण्यांची आहे. चित्रपटातील गाण्यात जाझ आणि ब्रास सोलो वाद्यांचा वापर याच कलावंतांनी केला. गोव्याला चर्च संस्कृतीची एक मोठी परंपरा आहे. संगीताचे नोटेशन कसे लिहावे व वाजवावे याचे प्रशिक्षण चर्चमधून मिळत असे. त्यामुळे गोवन म्युझिशियन हवे तितके परफेक्ट वाजवू शकत होते. उलट उर्वरित भारतीय म्युझिशियन्सना आधी हे नोटेशन शिकावे लागत असे.
चिक चॉकलेट, जॉनी गोम्स, सेबेस्टियन डिसुजा, तालवाद्याचे मास्टर दत्ताराम हे सर्व या भूमीतील रत्ने होती, ज्यांनी नंतर मुंबईतील चित्रपटसृष्टीतील संगीताला मोठ्या उंचीवर नेऊन ठेवले. दक्षिण गोव्यातील माजोर्दा या गावात जन्मलेले अँथनी गोन्साल्वीस हे ४० ते ६०च्या दशकातील महत्वाचे अरेंजर. वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी त्यांचे संगीतातील टॅलेंट संगीतकार नौशाद यांनी हेरले आणि अँथनी यांनी त्यांच्याकडे कामास सुरुवात केली. पुढे ते एक अत्यंत महत्वाचे संयोजक म्हणून प्रसिद्ध झाले. लक्ष्मीकांत-प्यारेलाल त्यांना आपले गुरू मानत असत. प्यारेलाल यांना त्यांनी तीन वर्षे व्हायोलीन शिकवले होते. ‘एक प्यार का नगमा है…’ या गाण्यात व इतर अनेक गाण्यातील व्हायोलीन स्वत: प्यारेलाल यांनी वाजविले आहे. लक्ष्मी-प्यारे नेहमी म्हणत की या आमच्या गुरूने आम्हाला फक्त संगीतच नाही, तर एक चांगला माणूस कसा असावा हेही शिकवले. या गुरूला संगीतमय श्रद्धांजली म्हणून त्यांनी ‘माय नेम इज अँथनी गोन्साल्वीस’ हे गाणे तयार केले. अँथनी गोन्साल्वीस यांनी पाश्चात्य शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतलेले होतेच, पण मुंबईला आल्यानंतर ते भारतीय शास्त्रीय संगीतही तितक्याच तन्मयेते शिकले. ‘हकीकत’ या सिनेमातील मोहम्मद रफी यांनी गायलेले अजरामर गाणे आठवा,
मैं ये सोचकर उसके दर से उठा था
के वो रोक लेगी मना लेगी मुझको…
मदन मोहन यांच्या संगीतातील या संपूर्ण गाण्याचे संगीत संयोजन अँथनी गोन्साल्वीस यांनी केले होते. यातील व्हायोलीनचे सर्व तुकडे त्यांनीच वाजवले आहेत.
गोव्यातील अल्दोना या छोट्या गावात जन्मलेले अन्टोनियो झेवियर वाझ उर्फ चिक चॉकलेट हे भारतीय चित्रपटसृष्टीतील नामवंत ट्रम्पेटवादक. अत्यंत वळणावळणाचे आयुष्य लाभलेला हा म्युझिशियन लुईस आर्मस्ट्राँग या जगप्रसिद्ध ट्रम्पेटवादकाला आपला गुरू मानत असे. ट्रम्पेट या वाद्यावर चिक चॉकलेट यांनी अनेक प्रयोग केले. मास्टर भगवान यांच्या ‘अलबेला’ या चित्रपटाचे संगीतकार सी. रामचंद्र यांच्याकडचे ते महत्वाचे म्युझिशियन होते. ‘शोला जो भडके’, ‘ओ बेटाजी किस्मत की हवा कभी गरम’, ‘दीवाना ये परवाना’ (या गाण्यात स्वत: चिक चॉकलेट आपल्या वाद्यासह नाचताना दिसतात) इत्यादी सर्वच गाण्यात ट्रम्पेट या वाद्याची जादू लक्षात येईल. ‘जाने कहाँ गये वो दिन…’ या गाण्यात हे वाद्य मनाला किती स्पर्शून जाऊ शकते याचा नक्कीच प्रत्यय येईल.
गोव्यातच जन्मलेले आणखी एक महान म्युझिशियन म्हणजे सॅबेस्टियन डी’सुझा. भारतीय आणि युरोपियन शास्त्रीय संगीत शिकलेल्या या संगीतकाराने भारतीय चित्रपट संगीताचे हार्मनी स्ट्रक्चरच बदलून टाकले. हार्मनी म्हणजे विविध वाद्यांचा एकत्रित गुंफलेला स्वरमेळ. ओ. पी. नय्यर आणि शंकर जयकिशन या दोन संगीतकारांचे संगीत नियोजन सॅबेस्टियन करीत असत. खरे तर हे किती वेगवेगळ्या प्रकृतीचे संगीतकार, पण त्यांच्या चालींना सॅबेस्टियन यांनी वेगवेगळा संगीत साज चढवला. ‘मेरा नाम चिन चिन चू’, ‘सुन सुन सुन जालिमा’, ‘आपके हसीन रूख पर आज नया रंग है’, ‘बंदा परवर थाम लो जिगर’, ‘रात के हमसफर’ या ओ. पी. नय्यरच्या सर्व गाण्यातील संगीत आजही मनाला मोहून टाकते. शंकर जयकिशन यांच्या चाली एकदम वेगळ्या प्रकारच्या असत. अॅकॉर्डियन हे वाद्य जयकिशन यांना खूप आवडत असे. स्वत: सॅबेस्टियन हे उत्कृष्ट अॅकॉर्डियन वाजवत. ‘आजा सनम मधुर चाँदनी में हम’ व ‘ये रात भिगी भिगी’ या गाण्यातील सुरुवातीचे अॅकॉर्डियनचे सूर वजा करून बघा… सगळी मजाच निघून जाईल. याशिवाय शंकर जयकिशनची ही गाणी बघा, ‘तेरा जाना’, ‘अजीब्ा दास्ताँ है ये’, ‘ऐ मेरे दिल कहीं और चल’, ‘जीना यहाँ मरना यहाँ’, ‘ये मेरा प्रेमपत्र पढकर’, ‘तुझे जीवन की डोर से बांध लिया है’, ‘तेरा मेरा प्यार अमर’ इत्यादी. ही सर्व गाणी मेलडीमुळे आजही आम्हाला श्रवणीय वाटतात. मेलडी किंग हे बिरूद शंकर जयकिशन यांना दिले जाते, त्यात सेबॅस्टियन डि’सुझा यांचा निम्मा वाटा आहे. वसंत देसाई यांच्या ‘ऐ मालिक तेरे बंदे हम’ या गाण्यातील कोरस आणि बंगाली मृदुंग आठवून बघा… सर्व किमया सॅबेस्टियन यांची. पार्श्वसंगीतासाठी एकाच वेळी ५० ते १०० व्हायोलीन्सचा किंवा बास सेलोचा वापर त्यांच्या इतका प्रभावीपणे कुणाला जमत नसे. चर्चमध्ये जे ऑरगन आजही वाजविले जातात, त्याचाही अत्यंत सुंदर वापर सॅबेस्टियन यांनी केला आहे. ‘संगम’ चित्रपटाचे पार्श्वसंगीत आजही मनाला मोहून टाकते. कोरसचा समर्पक वापर ऐकायचा असेल तर त्यांचे ‘दिल के झरोखें में तुझको बसाकर’ हे गाणे ऐका किंवा ‘जीना यहाँ मरना यहाँ’ ऐका… कोरस मनाचा ठाव घेतो… ‘संगम’मधील ‘ओ मेरे ओ मेरे सनम’ या शिवरंजनी रागात बांधलेल्या गाण्यातील सतारीचे बोल कानातून थेट हृदयात उतरतात. त्यांची सून मर्लिन डिसूझा देखील चांगली म्युझिक कंपोजर आहे. पण ती आजही सासर्याच्या कामासमोर नतमस्तक होते.
संगीतकारांच्या यशात हे अरेंजर आपली सर्व प्रतिभा पणाला लावतात. सर्व वाद्यांचे नोटेशन त्या त्या कलावंतांना दिल्यानंतर ते तसे वाजवितात की नाही यावर अरेंजर बारीक लक्ष ठेवून असतात. त्यातील कुणी एखाद्याने चुकीचे वाजवले, तर त्याचा अपमान होईल म्हणून सर्वांसमोर त्याला न बोलता ते संगीत दिग्दर्शकाला सांगत असत. सर्व संगीतमेळ नोटेशनसह मग म्युझिक कंडक्टरकडे सोपविला जाई आणि सर्वात शेवटी गाण्याचे रेकॉर्डिंग होई. गायक, संगीतकार, ऑर्वेâस्ट्रा, ध्वनिमुद्रक हे सर्वच्या सर्व एकत्र येऊन गाणे मुद्रित होत असे. हा एक प्रकारचा लाइव्ह कार्यक्रमच असे.
भारतीय संगीत ही लिनीअर मेलडी आहे, जी गाताना वळणदार होत राहते. पाश्चिमात्य संगीत ही कॉर्ड मेलडी आहे. पाश्चिमात्य संगीत गोव्यात आले आणि नंतर ते हार्मनिक होत गेले. गायक गात असताना त्याला सतत बेस देण्यासाठी वाद्ये अशी वाजवली जात की ती गायकाच्या सुरात एकजीव होत. गायकाला गाण्यासाठी संगीताचा एक पाया निर्माण करून देण्याचे काम अरेंजर करत असतात. म्हणून गाण्यापूर्वीची सुरावट वाजेपर्यंत गायक रेडी होत असत. शिवाय इंटरल्यूड संगीतामुळे दोन अंतर्याच्या मधील काळात त्यांना काही सेकंद विश्रांती मिळत असे. एखाद्या गाण्यासाठी ५० व्हायोलीन वादक असतील, तर प्रत्येकजण एकच नोट वाजविणार नाही. पाच-पाच व्हायोलीन वादकांचा ग्रुप वेगवेगळी नोट वाजवेल. यामुळे संगीतातील हार्मनी अधिक वाढते आणि गाणे कर्णप्रिय होते.
८०च्या दशकानंतर मात्र संगीतात खूप बदल होत गेले. नवनवीन उपकरणांचा शोध लागत गेला. पूर्वीसारखे सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज उरली नाही. ट्रॅक म्युझिक आले. गायक गाणे गाऊन निघून जाऊ लागले. मग त्यात संगीत टाकले जाऊ लागले, मग मुद्रण केले जाऊ लागले. एक प्रकारची कृत्रिमता येऊ लागली. आज जसे नेटमुळे आपण जगाशी जोडले जातोय, पण आपल्याच घरातील माणसांपासून लांब होतोय तसेच संगीतातही होत आहे. काही मोजके संगीतकार वगळले तर सर्व गाणी एकाच सुरावटीची वाटू लागत आहेत. पूर्वी गाणे ऐकूनच याचा संगीतकार कोण असेल हे समजत असे.
रसिकांनो, आता जेव्हा जेव्हा तुम्ही गाणे ऐकाल तेव्हा तेव्हा गाण्यापूर्वी आणि मध्यातल्या जागेतल्या या सुरावटी काळजीपूर्वक ऐका, वरील सर्व प्रतिभावान अॅरेंजर कलावंत तुमच्या डोळ्यांसमोर दिसू लागतील. यातल्या प्रत्येकाने गाण्यात रंग भरलेला आहे. मग तो घुंगराची छुनछुन असेल किंवा काचेच्या तुकड्याची कर्रकट् असेल, लाकडाचा एखादा हलकासा ध्वनी असेल किंवा डिमडीचा नाद असेल. कधी कंपणारी गिटार असेल तर कधी सतारीची छेडलेली नाजूक तार असेल. जलतरंगाचा मंजुळ ध्वनी काय किंवा संतूरस्वरांचा फुलागत अंगावर पडणारा वर्षाव काय… पडद्यामागच्या अशा असंख्य प्रतिभावान कलावंताचे योगदान आपण कधी विसरू नये, एवढीच माफक अपेक्षा.