गेल्या वर्षी लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागांपैकी ३१ जागांवर महाविकास आघाडीने विजय मिळवून देशात भाजपाचा चौफेर उधळलेला वारू महाराष्ट्रात रोखला. लोकसभेतील या दमदार कामगिरीमुळे महाराष्ट्र विधानसभेत, आघाडीची दमदार कामगिरी होईल या विश्वासावर आघाडीतील घटक पक्ष राहिले. लोकसभा निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शप) गटांमध्ये जो चांगला घट्ट समन्वय होता तो काहीसा ढिला झालेला दिसला. त्यांना काहीसा फाजील आत्मविश्वासही नडला. त्याची परिणती म्हणजे मविआच्या आमदारांचा आकडा ५०च्या वर जाऊ शकला नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे २०, काँग्रेसचे १० तर राष्ट्रवादी (शरद पवार) १४ आणि इतर सहा आमदार निवडून आले. विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी लागणारा २९चा आकडा आघाडीतील कुठलाही घटक पक्ष गाठू शकला नाही. गेल्या ४० वर्षांत प्रथमच अशी विचित्र परिस्थिती विधिमंडळात निर्माण झाली.
महायुतीला घवघवीत यश मिळाल्यामुळे गेल्या अडीच वर्ष रखडलेल्या महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी महायुती पुढे सरसावली आहे. तशी त्यांची तयारीही सुरू झाली आहे. गेल्याच महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी एकदा, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रात दोनदा येऊन भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात निवडणूक जिंकण्यासाठी मंत्र देऊन गेले. निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकर घेण्यासाठी यंत्रणा कामाला लावली आहे. निवडणुकांची तारीख अजून जाहीर झाली नसली तरी लवकरच यावर्षी निश्चित निवडणुका होतील, असे राजकीय पक्षांना वाटते. त्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीतील घटक पक्षांचे मेळावे, शिबिरे झाली आहेत. भाजपा आणि राष्ट्रवादी (अजित पवार) गटाच्या कार्यकर्त्यांचे शिबीर शिर्डी येथे झाले. काँग्रेसच्या पदाधिकार्यांच्या मुंबई-नागपूर येथे बैठका झाल्या. तर शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून शिवसेना मूळ पक्षाचा महामेळावा २३ जानेवारी २०२५ रोजी अंधेरी (प.), मुंबई येथे हजारो निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडला. या महामेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत झालेल्या पराभवाचा सूड घेण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज राहावे असा आदेश दिला. मुंबई-ठाण्यासह इतर महानगरपालिका, नगर परिषदा आणि जिल्हा परिषद निवडणुकीत निष्ठावंतांचा भगवा फडकला पाहिजे, असा निर्धार व्यक्त केला. उद्याच्या निवडणुका या केवळ निवडणुका नाहीत तर हे युद्ध आहे, निष्ठावंतांनी गद्दारांविरुद्ध पुकारलेला हा एल्गार आहे. अजून निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या नसल्या तरी शिवसेना मूळ पक्षाने निवडणुका जिंकण्यासाठी रणशिंग फुंकले आहे.
२३ जानेवारी रोजी झालेल्या शिवसैनिकांच्या या महामेळाव्यानंतर, २४ जानेवारी रोजी महाराष्ट्रातील जिल्हाप्रमुखांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि निवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठी एक बैठक पार पडली. जिल्ह्याजिल्ह्यातील सक्रीय सदस्य नोंदणी,
ऑनलाईन सभासद नोंदणी, गाव तिथे शाखा, स्थानिक प्रश्नासाठी आंदोलने, जनसंपर्क आणि जनसंवाद वाढविण्यावर भर द्यावा. तालुक्याच्या स्तरावर मेळाव्याचे आयोजन करून शिवसेनेची बांधणी मजबूत करावी आणि निवडणुकीला सामोरे जावे, असे संकेत दिले आहेत. निवडणूक ही लढाईच असते. तेव्हा सैनिकांनी आपल्या सर्व अस्त्रांनिशी लढाईसाठी सज्ज राहिले पाहिजे.
आगामी निवडणुकीत प्रत्येक जागा जिंकण्यासाठी शिवसेना पदाधिकार्यांची कर्तव्ये अशी आहेत…
जिल्हासंपर्कप्रमुख – जिल्ह्यातील शिवसेना संघटनेचे नेतृत्व करताना पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मजबूत सांघिक शक्तीचे सुयोग्य व रचनात्मक नियोजन करून जिल्हाप्रमुख ते बूथप्रमुखांच्या माध्यमातून निवडणूक प्रचारात शिवसेना उमेदवारास भरघोस मतदान घडवून विजय प्राप्त करून देणे.
जिल्हाप्रमुख – तालुका, शहर तसेच जिल्हापरिषद गट, पंचायत समिती गण व ग्रामपंचायत स्तरावर संघटनेची बांधणी करताना जिल्हा संपर्कप्रमुखांशी समन्वय ठेवून ‘गाव तेथे शाखा’ व ‘घर तेथे शिवसैनिक’ या वंदनीय शिवसेनाप्रमुखांच्या उक्तीप्रमाणे शिवसैनिकांना विविध जबाबदार्या देऊन आक्रमक, रचनात्मक, लोकाभिमुख व विधायक कार्य करणारी जाज्वल्ल्य संघटनशक्ती उभी करणे व निवडणुकीच्या प्रचारात या शक्तीचे नियोजन करून शिवसेना उमेदवारास भरघोस यश प्राप्त करून देणे.
उपजिल्हाप्रमुख – जिल्हापरिषद गट, पंचायत समिती गण, नगरपालिका/नगरपरिषद ते ग्रामपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेना प्रबळ करण्यासाठी बूथ पातळीवर शिवसैनिकांच्या योग्य नेमणुका करणे. या अभेद्य साखळीचा उपयोग तालुक्याच्या/विधानसभा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी करणे. निवडणूक प्रचारात तालुका ते गाव व गावातील प्रत्येक घराघरात शिवसैनिक नोंदणीमार्फत शिवसेनेची निशाणी, ‘मशाल’ पोहचविणे व मतदारांशी नियमित संपर्क ठेवून शिवसेना उमेदवाराला भरघोस मतदान करून विजयाचे शिलेदार होण्यासाठी शिवसैनिक सज्ज करणे.
तालुकाप्रमुख – जिल्हाप्रमुख व उपजिल्हाप्रमुख यांच्याशी समन्वय राखून शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून येणार्या सूचनांचे तंतोतंत पालन करणे. तसेच युवा सेनेच्या पदाधिकार्यांनाही निवडणुकीच्या प्रचार यंत्रणेत सहभागी करणे. जिल्हापरिषद गट, तालुका पंचायत समिती गण यामध्ये उत्तम शिवसैनिकांना जबाबदार्या देत शाखाप्रमुख ते बूथप्रमुख या साखळीतून निवडणूक प्रचाराचे जाळे उभे करणे.
शहरप्रमुख – शहरातील शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, बूथप्रमुखांच्या वेळोवेळी बैठका घेऊन निवडणुकीच्या प्रचाराची रूपरेखा आखणे व प्रत्येक मतदारापर्यंत शिवसेनेची ‘मशाल’ ही निशाणी पोहचविणे. व्यक्तीपेक्षा पक्ष निवडून देण्यासाठी कार्य करण्याकडे शिवसैनिकांचे उद्दिष्ट असले पाहिजे. मतदारसंघातील घराघरात शिवसेनेची निशाणी मशाल पोहचविणे, उमेदवाराची जमेची बाजू, त्यांचे उत्तम कार्य यावर जास्त प्रकाश टाकणे. शिवसैनिकांशी संपर्क ठेवून त्यांचे प्रश्न, अडचणी समजून घेऊन त्यांच्यात समन्वय घडविणे. निवडक महत्त्वाच्या व्यक्ती, संस्था, कार्यालये यांची संपर्क पुस्तिका (नाव/फोन/पत्ते यांची नोंद असलेली) तयार करून घेणे. दैनंदिन भेटीगाठी/बैठका/सभा यांच्या आयोजनासाठी ‘टीम’ तयार करणे. जिल्ह्यातील व शहरातील प्रभावी गटांच्या शिक्षक-उद्योजक-डॉक्टर, विविध संस्था यांच्या बैठकांचे नियोजन करणे. वचननाम्यातील मुद्दे जनतेपर्यंत पोहोचविणे.
सर्व मतदारांशी पुन्हा-पुन्हा संपर्क साधणे, कुंपणावरील मतदारांना आपलेसे करणे. वॉर्डात-विभागात आपल्या उमेदवाराला आधीच्या निवडणुकीत मिळालेल्या मतांपेक्षा जास्त मते या निवडणुकीत कशी मिळतील त्यासाठी रणनीती आखणे. शिवसेनेच्या सर्व अंगीकृत संघटनांच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी दिलेल्या विभागात निवडणुकीचा प्रचार करण्याची जबाबदारी चोखपणे बजावून शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराच्या विजयासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणे.
विधानसभेतील अनपेक्षित पराभवाने शिवसेना खचून गेली नाही. शिवसेनाप्रमुखांनी ६८ वर्षांपूर्वी चेतवलेला मराठी अस्मितेचा अंगार निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये अजूनही धगधगतो आहे. पराभवाने जखमी झालेला शिवसेनेचा वाघ चवताळून विरोधकांचा-गद्दारांचा फडशा पाडणार आहे. अजून काही स्वार्थी व सत्तेला चटावलेले पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी पक्ष सोडून महायुतीत सामील होत आहेत. ‘ज्यांना जायचे असेल त्यांनी खुशाल जावे, मी तुम्हाला थांबवणार नाही.’ असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. वृक्षाची जुनी-जीर्ण झालेली पाने गळत असली, तरी नवीन पालवी फुटतच राहते. हा निसर्गाचा नियम आहे. शिवसेना तर न वठणारा वटवृक्ष आहे. त्याचबरोबर ज्यांना भाजपची हुकूमशाही मान्य नाही, शिंदेसेनेच्या गद्दारीचा तिरस्कार आहे आणि संविधनावर अढळ निष्ठा आहे अशी सामान्य जनता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना मूळ पक्षाबरोबर जोडली गेली आहे.
२०१४च्या लोकसभा निवडणुकीतील घवघवीत यशानंतर भाजपाने शिवसेनेबरोबरची ३० वर्षांची युती तोडून विश्वासघात केला. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर युती तोडल्यामुळे शिवसेना कमजोर होईल असे भाजपाच्या धुरीणांना तेव्हा वाटले होते. पक्षप्रमुखांनी हे आव्हान स्वीकारले आणि २८८ पैकी २८४ जागांवर शिवसेनेचे उमेदवार देऊन भाजपाला दे-माय-धरणी ठाय केले. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आणि स्वबळावर शिवसेनेचे ६३ आमदार निवडून आणले. संकटाला संधी मानून या संधीचे सोने केले. हा इतिहास तसा ताजाच आहे. आगामी स्थानिक स्वराज्यांच्या निवडणुका भाजपाप्रणित महायुती एकत्रित लढणार आहे, असे महायुतीचे नेते सांगतात. महाविकास आघाडीही एकत्रित लढेल. पण आघाडी झाली नाही तर स्वबळावर लढण्याची ताकद शिवसेनेत आहे. मुंबईतील शिवसैनिक महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची भूमिका मांडत आहेत.
विधानसभेत ईव्हीएम घोटाळ्याच्या आधारे भाजपाच्या महायुतीने खोटा विजय मिळवला. याच्या विरोधात जनता एकटवून लढा देत आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच शिवसेनेने संविधान सन्मान दिंडी आणि भारतमातेचे पूजन प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शिवसेना भवन दादर येथे केले. निवडणूक जिंकल्यानंतर महायुती सरकारने एसटी भाडेवाढ करून सामान्य व गरीब प्रवाशांचे कंबरडे मोडले. त्या विरोधात राज्यात ठिकठिकाणी ही अनाठायी भाडेवाढ रद्द करण्यासाठी ऊग्र आंदोलन केले.
महाराष्ट्र राज्यात आज फक्त बजबजपुरीच माजली आहे. शेतकरी सुखी नाही, कष्टकरी अर्धपोटी आहे, महिलांच्या अब्रूचे धिंडवडे निघत आहेत. चंबळ खोर्यातील डाकूंप्रमाणे महायुतीचे मंत्रीच चोर्या व लूटमार करीत आहेत. शिक्षणाचा पुरता बोजवारा उडाला आहे. बेरोजगारीने उच्चांक गाठला आहे. कारण महाराष्ट्रात असलेले उद्योगधंदे आणि येऊ घातलेले उद्योगधंदे परराज्यात महायुती सरकारच्या आशीर्वादाने पाठवले जात आहेत. या महाराष्ट्रद्रोही महायुती सरकारला धडा शिकवण्याचे काम कडवट निष्ठावंत शिवसैनिकांना करावेच लागेल. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पराभावाचे उट्टे काढायची संधी महाराष्ट्रातील मतदारांना मिळणार आहे. शिवसैनिकांना या पराभवाचा सूड घ्यायचा आहे. त्यासाठी मूळ शिवसेनेने रणशिंग फुंकले आहे.