संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड याची करोडो रुपयांची मालमत्ता उजेडात आल्यानंतरही भाजपचे जगप्रसिद्ध नेते, हिंदुस्थानी ईडीबिडीचे शिल्पकार किरीटजी सोमय्या तोंडात मिठाच्या गुळण्या घेऊन गप्प का आहेत, याची चर्चा देशभरात सुरू आहे. माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्या हे ऐकून स्वस्थ बसणारा नव्हताच. तो तातडीने किरीटजींच्या घरी जाऊन त्यांची मुलाखत घेऊन आलासुद्धा… तीच ही मुलाखत.
– नमस्कार किरीटजी.
– नमस्कार.
– तुम्ही असे काय बोलता?
– त्या कराडची करोडोची नाय तर अब्जावधींची संपत्ती मालमत्ता समजल्यावर माझी तर हवाच गेली.
– त्याच्या संपत्तीशी तुमचा काय संबंध?
– अरे, तुला माहीत नाय पोक्या, हे ईडीवाले त्याचं काही बरंवाईट होण्याआधी मलाच त्येच्या पाठी लावतील डॉगसारखे. म्हणून मीच आमच्या दिल्लीतल्या आणि महाराष्ट्रातल्या नेत्यांना फोन करून विचारलं की मी लागू का त्या कराडच्या पाठी? तर ते म्हणाले की तो तुरुंगात आराम करतोय आणि आपल्या ईडीचा त्याच्याशी काहीच संबंध नाही. उलट आपल्याच काही नेत्यांशी त्याची धंद्यात मोठी भागीदारी हाय. म्हणजे एवढ्या मोठ्या धनाढ्य माणसाशी आपण पंगा घेणं योग्य नाय. त्याच्यावर आधीच हत्येचे आरोप हायत. तेव्हा त्याच्यामागे ईडी लावून त्येला त्रास देणं योग्य वाटत नाही. उद्या हत्येच्या आरोपातून निर्दोष सुटला तर आपण त्याच्यामागे ईडी लावून वसुली नक्की करू.
– पण हे विचित्र नाही वाटत का? इतकी वर्षं दोषी नसताना कुणावरही तुम्ही ईडीतर्पेâ बेहिशोबी संपत्तीचे आरोप लावून त्यांना जीवनातून उठवण्यासाठी जिवाचं रान करत होता, मग आताच या कराडच्या बाबतीत तुमची दातखीळ का बसत्येय?
– धाड टाकली ना सीबीआय का आणखी कसल्या तरी आयनी. दोषी असेल तर तो आता सुटल्यावर त्याला ईडीची कलमं लावून पुन्हा आत टाकू.
– तो निर्दोष असल्याची इतकी खात्री वाटते तुम्हाला? त्याच्याविरुद्ध इतके पुरावे आणि साक्षीदार असून?
– मी काय त्याची बाजू घेत नाय. जे बराबर ते बराबरच. नायतर ते भाजपचे मंत्री माननीय धनंजय मुंडे कराडविरुद्ध बोलले असते ना! ते का नाय बोल्ले? ते कधीच खोटा बोलत नाय. उलट त्येंच्यावर कराडबद्दल घाणेरडे आरोप झाले त्यावेळी रडला तो माझ्या सामने. शेवटी मीच त्येला उगी केला. कर नाय त्येला डर कसला?
– हे बघा, किरीटजी तुम्ही पण त्यांना सपोर्ट केल्यासारखं बोलताय! मला त्या देशमुख हत्या प्रकरणात नाही बोलायचंय. मला त्या कराडच्या अफाट मालमत्ता आणि बेकायदा संपत्तीबद्दल बोलायचंय. तुम्ही ईडीचं मशीन पुन्हा कधी सुरू करताय? नाही तर गंजून जाईल ते.
– आता सध्या तर माझ्या हाताशी ईडीची चावी नाय. त्यामुळे त्येच्याविषयी मला आमच्या ज्येष्ठ नेत्यांशी बोलावं लागेल. हळूहळू वसुली करू म्हणजे त्येला बी त्रास नाय नि मला बी नाय. एवढ्या पैशेवाल्या माणसाशी आपले संबंध आहेत याचा आपल्याला गर्व वाटला पायजे. कुणाची तरी नजर लागलीय त्येला.
– मला नाही खरं वाटत. दोन बायकांचा दादला आहे तो. आता त्यांच्या नावावर किती कोटी, लक्ष, हजारो, शेकडो आणि दहा-वीसच्या नोटांच्या बंडलांची मालमत्ता असेल त्याची कल्पना नाही येणार कुणाला.
– त्येचा पैसा हाय. तो वाटेल ते करील. शेवटी तुमचा मराठी माणस मोटा झाला पायजे ना. आमच्या मोटाभायला तुमी वाटेल ते बोलते. त्याने काय वायट केला तुमचा! आज देशातली आणि महाराष्ट्रातली जनता सुरक्षित हाय ती त्येंच्यामुळे.
– असं कसं बोलता किरीटजी तुम्ही? तुम्ही पेपर वाचत नाही का? टीव्ही पाहात नाही का? देशात काय आणि किती अत्याचार चाललेत जनतेवर ते कळत नाहीत का तुम्हाला?
– अरे बाबा हो हो. मी त्या शपथविधी समारंभानंतर आतापर्यंत घरात तोंडाला आणि डोळ्याला चिकटपट्टी लावून बसलोय. तशीच गरज असली तर दाढी लावून, गॉगल लावून, तोंडावर मास्क लावून जातो. टीव्हीच्या बातम्या ऐकत नाय नि पेपर बी वाचत नाय. कंटाळा आला तर मोबाईलवरच्या माझ्या सेव्ह केलेल्या व्हिडीओ फिल्म बघत बसतो. दिवस-रात्र मी आता तुमच्या त्या चिंतनशील दीपक केसरकरांसारखा होण्याचा प्रयत्न करतोय. शेवटी कशातून तरी समाधीपर्यंत जायचाय.
– अहो, तसं केलंत तर पुढच्या २६ जानेवारीला पद्मश्री मिळेल तुम्हाला. मी आधीच अभिनंदन करून ठेवतो.
– थँक्यू थँक्यू. तुझ्या तोंडात साखर आणि खमण ढोकळा पडो.
– आता मला एक सांगा किरीटजी, सध्याच्या महायुती सरकारबद्दल तुम्हाला काय वाटतं? अगदी खरं खरं सांगा.
– तुला म्हणून सांगतो. मी तर कधी असला कोणत्याबी पक्षाचा विचित्र सरकार बगितला नाय. आमचा त्या येळचा भाजप आणि ठाकरे सेनेचा सरकार लय चांगला होता. त्या महाआघाडीचा सरकार बी चांगला होता. पन या शिंदे-पवार-फडणवीस ह्येंचा जांगडगुत्ता का काय म्हणतात तसा सरकार जगात कोणी पाह्यला नसेल. शेतात एक शेतकरी दोघांना नांगराला लावून नांगर चालवतो तसा चाललाय हा सरकार. कशाचा कशालाच मेळ नाय. ह्या राज्यावर सरकार सरकार हाय का नाय हेच समजत नाय. मी कुठे पेपर वाचतो! घरात जे बोलतात त्यावरून कळतो सगळा.
– तसं नाही. चांगलं चाललंय सरकार. सगळे मंत्री, आमदार मजेत आहेत. भरपूर चंगळ आहे सगळ्यांची. मध्ये कुठेतरी लावोस का पावसला जाऊन आले म्हणतात. पैशाच्या राशी घेऊन आलेत हजारो पोती भरून महाराष्ट्राच्या भल्यासाठी.
– तसा नाय वाटत मला. ऐश करायला जाऊन आले तिथे. मागे बी गेले होते. तेवढा रिलीफ मिळतो आयुष्यात.
– बरीच माहिती मिळालीय तुम्हाला घरच्या घरी. तेवढी त्या कराड आणि मुंडेंची माहिती अपडेट करीत रहा म्हणजे झालं!