□ अर्थसंकल्पीय अधिवेशनात मोदी सरकारची अग्निपरीक्षा; अनेक मुद्द्यांवर विरोधक घेरणार.
■ घेरले कोण जातात, जे संसदीय कामकाज गांभीर्याने घेतात. ही विचारधारा संविधान, संसद वगैरे सगळ्यांचीच गरिमा नष्ट करण्याच्या हिरीरीने उतरलेली आहे. ती या घेरण्याला काय भीक घालणार? नंगे से खुदा भी डरता है… अग्निपरीक्षा देशाची, जनतेचीच असणार आहे.
□ मंत्रालयाची सुरक्षा मंत्र्यांकडूनच धाब्यावर; नरहरी झिरवाळ यांची कार्यकर्त्यांसह पास न घेताच घुसखोरी.
■ त्यांना ती घुसखोरी करू देणार्या अधिकार्यांवर काय कारवाई झाली? झिरवाळ यांना कोणी काही समज दिल्याचं ऐकिवात आहे का? लोकप्रतिनिधी स्वत:ला राजे महाराजे समजतात आणि सार्वभौम जनतेला प्रजा समजतात. जनतेलाही तेच वाटतं. मग, इथे वेगळं काही कसं होईल?
□ मनोज जरांगे-पाटील यांची आता मुंबईत धडक; समोरासमोर लढण्याचा निर्धार.
■ किती वेळा धडक देणार, किती वेळा लढणार? किती वेळा उपोषणास्त्र उपसणार? त्याची धार बोथट होत जाणार. जरांगे पाटलांना सगळ्या सत्ताधीशांनी मिळून राजकारणासाठी व्यवस्थित वापरून घेतले आहे.
□ रायगडचे पालकमंत्रीपद शिंदेंना देऊन मुंबई मिळवण्याची भाजपची खेळी.
■ शिंदे यांना आता काही दिले काय आणि काही न दिले काय, सारखंच आहे. त्यांना जे हवं होतं ते मिळवून झालं आणि आता ते पुन्हा मिळणार नाही, हेही स्पष्ट झालं… आता कुणीही काहीही मिळवा, लुटा.
□ मंत्रालयात वर्णीसाठी भाजपच्या ‘चाणक्यां’कडे इच्छुकांच्या रांगा; मंत्र्यांचे सचिव, ओएसडींच्या नियुत्तäयांचा घोळ मिटेना.
■ या सगळ्यांच्या मार्फत मंत्र्यांच्या कारभारावर नियंत्रण प्रस्थापित करण्याचा मोदी फॉर्म्युला आहे हा! अर्थात, तो धुडकावून लावण्याइतका ना पाठीचा कणा शाबूत आहे कुणाचा ना कुणात ते नैतिक बळ आहे. मिळतंय ते घ्या, जमेल तेवढं ओरपा, हाच सध्याचा फंडा.
□ मतदान गायब झाले : राज ठाकरे यांचा ईव्हीएमवर हल्ला.
■ बैल गेला अन् झोपा केला म्हणतात तो असा. बरं हा साक्षात्कारही मनोरम आहे. त्यांनी तुलनेसाठी भाजपची २०१४ची विधानसभेची आकडेवारी घेतली आहे आणि महायुतीतल्या इतर पक्षांची आत्ताच्या लोकसभेची आकडेवारी घेतली आहे… आता यातली संगती कुठे गायब झाली आहे?
□ मुंबईला दररोज आठ हजार टन डेब्रिजचा विळखा.
■ हळुहळू मुंबईची वाटचाल काँक्रीटच्या एका डम्पिंग ग्राऊंडकडे होत चालली आहे. प्रदूषण, वाहतुकीच्या समस्या यांच्यामुळे एकेकाळचं हे चैतन्यशील महानगर आता राहायला अयोग्य शहरांमध्ये जमा होत चाललं आहे.
□ बाप्पाच्या प्रदूषणकारी पीओपी मूर्ती का बनवता? -माघी गणेशोत्सवाच्या तोंडावरच हायकोर्टाचा संताप.
■ नद्यांचं, हवेचं, ध्वनीचं प्रदूषण, पर्यावरणाचं रक्षण, निसर्गाचं संतुलन वगैरे सगळेच विषय अख्ख्या देशाने ऑप्शनला टाकलेले आहेत. अनेकांना तर हे विषय खरोखरच गांभीर्याने घेण्याचे आहेत, असंही वाटत नाही. त्यात गणेशभक्तांना वेगळं काय काढणार? याबाबतीत कधी आणि कोण गंभीर होतं आजवर?
□ अदानींना मोठा झटका; नफा ९७ कोटींनी घसरला.
■ काही फरक पडत नाही त्यांना. चौकीदाराला सांगून आणखी दोनचार शहरांमधले सगळे मोक्याचे भूखंड, धंदे, वगैरे ताब्यात घेतले की ९७०० कोटी रुपयांची भर पडेल नफ्यात. चौकीदार है तो मुमकिन है.
□ बिले थकल्याने कंत्राटदारांचा आंदोलनाचा इशारा; विकासकामे ठप्प पडणार.
■ तेवढीच हवा सुधारेल… विकासकामांच्या अतिरेकाने श्वास घेणं जड करून टाकलेलं आहे.
□ धनंजय मुंडेंचा विषय निघताच अजितदादांनी बैठक गुंडाळली.
■ विषयच तसा आहे. सेन्सिटिव्ह. दादाही तिथे दादा असू शकत नाहीत, तर इतरांची काय प्राज्ञा!
□ मिंध्यांच्या थोरवे यांची आमदारकी धोक्यात; सुधाकर घारे यांची याचिका हायकोर्टाने स्वीकारली.
■ यांच्यातल्या कितीतरी जणांची लॉटरी कशी लागली आहे, ते गुपित सगळ्यांनाच ठाऊक आहे. यांचं उघड्यावर येण्याची थोडी शक्यता निर्माण झाली, इतकंच.
□ मराठी माणसाला कलह करायला आवडतो – विश्व मराठी संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीसांची टिप्पणी.
■ कलह ही समाज जिवंत असल्याची निशाणी असते. एकचालकानुवर्ती पद्धतीने बाबा वाक्यम् प्रमाणम् अशी शिस्तशीर, घोकंपट्टी करणारा, कलह न करणारा, प्रश्न न विचारणारा समाज मठ्ठ आणि निष्प्राण होत जातो, हे त्यांना माहिती असेलच.
□ अमरावतीमध्ये चंद्रशेखर बावनकुळेंच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट.
■ त्याला हिरे जडवलेले होते की नाही? निदान मकाऊमधून आणलेली पिसं वगैरे तरी लावायची. मग शोभून दिसला असता सगळा सरंजाम.
□ ‘समान काम, समान वेतन’ मागत कंत्राटी कामगारांच्या महिनाभराच्या उपोषणानंतरही नवी मुंबईत प्रशासनाकडून दखल नाही.
■ कंत्राटी कामगार नेमलेच यासाठी असतात की ते काही मागणी करणार नाहीत, ती पूर्ण करण्याचं बंधन असणार नाही. प्रशासन दखल कशाला घेईल? कंत्राट रद्द करून इतरांना नेमेल, बेरोजगारांची कमतरता आहे का देशात?
□ ममता कुलकर्णीची महामंडलेश्वर पदावरून हकालपट्टी.
■ मुळात तिची किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पदावर नेमणूक झाली, हाच एक विनोद होता. त्यावरून तिची हकालपट्टी झाली, हा दुसरा विनोद. बाकी काही नाही.